scorecardresearch

Premium

दृष्टिकोन

‘ज नात-मनात’ या सदरात छापून येणाऱ्या लेखांकांबद्दल वाचकांच्या येणाऱ्या प्रतिक्रियांनी माझ्या मनात आवर्तने उठतात. पुष्कळशा प्रतिक्रिया या विचारांशी सहमत होणाऱ्या आणि आनंद व्यक्त करणाऱ्या असतात.

दृष्टिकोन

‘ज नात-मनात’ या सदरात छापून येणाऱ्या लेखांकांबद्दल वाचकांच्या येणाऱ्या प्रतिक्रियांनी माझ्या मनात आवर्तने उठतात. पुष्कळशा प्रतिक्रिया या विचारांशी सहमत होणाऱ्या आणि आनंद व्यक्त करणाऱ्या असतात. काहींमध्ये मौलिक सूचना असतात. काही वेळेला वाचक आपले अनुभव व्यक्त करतात आणि माझे अनुभवविश्व समृद्ध करून जातात. मला आज आठवण येते ती ‘गेले द्यावयाचे राहून’ या लेखांकाची. एका वाचकाने आपल्या वडिलांचा अत्यंत हृदयस्पर्शी अनुभव त्या लेखावरील प्रतिक्रियेत कथन केला होता. घरी येताना कोपऱ्यावर उभ्या असलेल्या अंध लॉटरी विक्रेत्याकडून त्याचे बाबा दहा रुपयांचे लॉटरीचे तिकीट त्याला मदत म्हणून खरेदी करतात आणि कर्मधर्मसंयोगाने त्या तिकिटाला २०० रुपयांचे बक्षीस लागते. तेव्हा ‘त्या तिकिटावर खरा हक्क त्या विक्रेत्याचा आहे, आपला नाही,’ असे म्हणत ते त्या विक्रेत्याच्या शोधार्थ निघतात. पण तो त्यांना सापडत नाही. आणि ‘गेले द्यावयाचे राहून’ अशी त्यांची अवस्था होते. हा अनुभव वाचल्यावर माझेही डोळे पाणावले.
या पाश्र्वभूमीवर काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेला बँकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रेमळ वागणुकीची दखल घेणारा माझा लेख.. त्यावरही अनेक प्रतिसाद उमटले. बँकेत कार्यरत असणाऱ्या अनेकांनी लेख आवडल्याचे आवर्जून कळविले. आम्ही आता आपल्या अपेक्षेप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करू आणि नवीन तंत्रज्ञान आपलेसे करताना मानवी स्पर्शाचे महत्त्व कमी होऊ देणार नाही, असा दुजोराही त्यांनी दिला. या पाश्र्वभूमीवर आलेले एक पत्र मला अस्वस्थ करून गेले. पत्रलेखकाने माझ्यावर टीका केली होती. किती जागा रिकाम्या आहेत, नोकरभरती होत नाही, त्यामुळे सहृदयतेने सर्वाशीच वागणे शक्य नाही, असा त्या पत्राचा रोख होता. पत्रातून कर्मचाऱ्यांना बँकिंग क्षेत्रात सहन कराव्या लागणाऱ्या अडचणींचा पाढा वाचला होता. ते वाचल्यावर मी विनम्रतेने माझ्या लेखाचा उद्देश वेगळा आहे, हे कळविले. पण त्यांचे काही केल्या समाधान होईना. आपला मुद्दा सोडण्यास ते तयार नव्हते. शेवटी मी पत्रव्यवहार बंद केला. तरी माझ्या मनात निर्माण झालेले विचार काही केल्या शमेनात.
केवळ बँकाच नव्हेत, तर व्यवस्थापन, रुग्णालये, महाविद्यालये, विद्यापीठ अशा सर्वच क्षेत्रांमध्ये नकारार्थी विचार करणारी मंडळी असतातच. या मंडळींना टेबलावर ठेवलेला पेला अर्धा भरला आहे की रिकामा, यात स्वारस्य नसतेच; तर उलट पेला टेबलावर अस्तित्वातच नाही, अशी त्यांची भूमिका असते. कावीळ झाल्यावर जसे सर्वत्र पिवळे दिसते तसे यांना फक्त प्रत्येक गोष्टीतील उणेपणा जाणवतो. असे कोणतेही प्रकल्प नाहीत आणि असे कोणतेही क्षेत्र नाही, की जे सदासर्वदा, सर्वथव परिपूर्ण असतात. अचूकतेचा आणि पूर्णत्वाचा सतत ध्यास घेणे योग्यच; पण ते करताना काळ-काम-वेगाचे गणित विसरून चालत नाही. कधी कधी काय होते, की रिकाम्या राहिलेल्या जागा भरण्याच्या प्रयत्नात आपण नकारात्मक गोष्टींमध्ये इतके गुंतले जातो, की कामाचा मूळ उद्देशच हरवून बसतो. एखादी गोष्ट विशिष्ट वेळात पूर्ण करणे महत्त्वाचे असते. वेळ निघून गेली की मग ‘बल गेला अन् झोपा केला’ अशी आपली अवस्था होते.
नकारात्मक विचार वणव्यासारखे पसरतात. सकारात्मक बीज पेरायला अन् रुजवायला खूप मशागत करावी लागते. सहकाऱ्यांच्या बठका घ्याव्या लागतात. प्रत्येक बठकीचे काळजीपूर्वक पूर्वनियोजन करणे आवश्यक असते. निर्णय खरं तर तुमच्या मनात आधीच झालेला असतो. पण तरीही बठकीत सांगोपांग चर्चा घडवून आणणे आणि घेतलेला निर्णय हा जणू काही प्रत्येक सदस्याचा स्वत:चाच निर्णय आहे अशा थाटाने बठकीची सिद्धता-सांगता करणे, हे व्यवस्थापकाचे खरे कौशल्य असते. अशी कोणतीही संस्था किंवा प्रकल्प नसतो, की जिथे पटावरच्या सर्व जागा पूर्णपणे भरलेल्या असतात. मला तर अनेकदा असा अनुभव आला आहे की, कमी माणसांच्या मदतीने जास्त चांगले आणि परिणामकारक काम करता येते.  छत्रपतींनी रोहिडेश्वरावर स्वराज्यस्थापनेची शपथ घेतली तेव्हा इन-मिन चार मावळे त्यांच्याबरोबर होते. पुढे अफझलखानाचा वध केला तेव्हा जिवाभावाचा जिवा महाल होता आणि दिल्लीला पेटाऱ्यातून सुटका करून घेतली तेव्हा तर फक्त संभाजीराजांची साथ होती. राजांचे कोणतेच काम सर्व जागा भरलेल्या नाहीत म्हणून थांबले नाही. उलट, पुष्कळ माणसे आल्यावर ‘मी कशाला करायचे? कुणीतरी करेलच ना!’ असा विचार बळावू लागतो आणि मग कोणीतरी करावयाचे काम कोणीही न केल्यामुळे शेवटी अपूर्णावस्थेत राहते.
नकारात्मक विचार तुमच्या चेहऱ्यावर दिसतात. तुमच्या कपाळावरच्या आठय़ांमध्ये गुंतले जातात. तुमच्या डोळ्यांमधून त्यांचा अंगार उसळतो आणि तुमच्या तोंडातून नकारघंटा वाजू लागते. तुमची संपूर्ण देहबोलीच प्रकल्पाला नकार देऊ लागते. दुर्दैवाने नकारामध्ये लोकांना आकृष्ट करण्याची शक्ती सकारापेक्षा अधिक असते आणि मग दोहोंचे चार, चारांचे दहा व्हायला वेळ लागत नाही.  सारी संस्था भुंग्याने झाडाचा बुंधा पोखरावा तद्वत पोखरली जाते. प्रत्येक संस्थेला बाह्य स्पर्धक आणि प्रतिस्पर्धी हे असतातच. पण हे आतले शत्रू खऱ्या अर्थाने ‘घर का भेदी लंका डहाये’ ही उक्ती प्रत्यक्षात आणतात. विरोधासाठी विरोध वाढू लागतो आणि सौजन्य, सहकार आणि सहिष्णुता यांना मूठमाती मिळते.
बरं, नकारात्मक असल्या, तरी याही मानवी भावनाच आहेत. हा त्या व्यक्तीचा दोष नसतो, तर हे तिचे वैगुण्य असते. अनेकदा त्या व्यक्तीचा स्वत:च्या क्षमतेबद्दल असलेला अविश्वास हा अशा नकारात्मक उद्गारांना कारणीभूत ठरतो.  मग अशा वेळेला वरिष्ठ व्यवस्थापकाने करायचे तरी काय? त्यांना खडय़ासारखे बाजूलाही काढता येत नाही. तेव्हा प्रसंगी त्यांना चुचकारून, समजावून सांगून, त्यांची समजूत काढून सकारात्मक बाजूला वळवून घेणे गरजेचे ठरते. तथापि ‘आलात तर तुमच्यासह आणि नाही आलात तर तुमच्याविना’; पण कार्य सिद्धीस नेलेच जाईल, हे अशा नकारवीरांना स्पष्ट करून सांगणे आवश्यक ठरते. मला माझ्या देशाच्या उज्ज्वल भविष्याचा विचार करताना हे सकारात्मक शूरवीर वाढवायचे आहेत आणि सहकाऱ्यांच्या प्रवृत्तीमध्ये बदल हे त्यासाठी व्यवस्थापक म्हणून माझे आद्य कर्तव्य आहे, हे मी मला बजावून सांगतो.  
जस्टिन हेराल्ड या प्रख्यात लेखकाचे मानवी प्रवृतींवर मार्मिक भाष्य करणारे Attitude हे पुस्तक वाचले. तो म्हणतो, ‘काही लोकांचे समाधान तुम्ही कधीच करू शकत नाही. तुम्ही त्यांना दशलक्ष रुपये भेट म्हणून दिलेत तर ते तक्रार करतील की, घरी नेण्यासाठी फार ओझे झाले आहे.’ ज्यांच्या मनात प्रकल्पाबद्दल संवेदना नाहीत अशांचे समाधान करण्याचा प्रयत्न व्यर्थ ठरावा. आनंद थलीतल्या दशलक्ष रुपयांचा मानावयाचा, की तक्रार खांद्यावर जड झालेल्या ओझ्याची करावयाची, हा निर्णय प्रत्येकाने लवकरात लवकर घेणे श्रेयस्कर. आणि जे बदलू इच्छित नाहीत, त्यांच्यासाठी जस्टिन हेराल्डचा संदेश आहे- kour village called – Their idiot is missing!

the other eden
बुकरायण: ‘चित्रदर्शी’ विस्थापन कहाणी..
this 4 Zodiac Signs people win trust good friends never share your secrets taurus gemini pisces and libra zodiac
Zodiac Signs : ‘या’ चार राशींचे लोक असतात अधिक विश्वासू; फसवेगिरी यांना जमतच नाही
ncp leader jitendra awhad reaction on ripti devrukhkar issue
मराठी माणूस सहन करतोय म्हणून अशा प्रवृत्तींची हिमंत वाढते ; जितेंद्र आव्हाड यांची तृप्ती देवरुखकर प्रकरणावर प्रतिक्रिया
Women, menopause problems sex relations partner
कामजिज्ञासा: मेनॉपॉजच्या काळात शरीरसंबंधांचा त्रास होतोय?

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व जनात…मनात बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Attitude

First published on: 25-05-2014 at 01:01 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×