हा लेख पर्यावरण बदलामुळे येऊ शकणार्या आपत्तींविषयीची वस्तुस्थिती वेळीच लक्षात न घेण्याचे परिणाम समर्पक शब्दांत सांगणारा अन् त्यामुळे चिंतनीय आहे. मुळात हिमालय पर्वतरांगा म्हणजे हिमाच्छादित ‘दुरून डोंगर साजिरे’ असंच म्हणावं लागेल. कारण चकाकणारे ‘ग्लेशियर’ वितळले की उतारावरून केवळ आपल्याबरोबर सर्व वस्तु, प्राणी यांना लोटते. वाहणारे पाणी आणि भुरभुरत पडताना आधी मन मोहून टाकणार्या बर्फाचा खाली पडल्यावर निसरडा चिखलच. त्यामुळे निसर्गाच्या या रूपांची वस्तुस्थिती लक्षात घेऊनच त्याच्याशी सलगी करायचं धाडस करणे योग्य. नुकतंच नेपाळ-तिबेटच्या मार्गानं मान-सरोवराची यात्रा करू पाहणार्या श्रद्धाळू पर्यटकांनी ठोठवलेलं स्वर्गाचं दार बर्याच जणांच्या बाबतीत फक्त एकतर्फी उघडून परतीचे मार्ग बंद करणारं ठरलं. आता नेपाळ, तिबेट म्हणतात की चीन, भारत, अमेरिका यांनी ऊर्जा उत्सर्जन करणारी हरितगृहे प्रस्थापित केल्यानं हिमालयाचा हा भाग वितळला, म्हणून त्यांनी स्थानिकांना नुकसानभरपाई द्यावी. निसर्गाला गृहीत धरू नये हे त्यांनाही लागू आहे. कारण निसर्गाचं रौद्र रूप हे विज्ञानसंकल्पनांमध्ये बांधता येणार नाही एवढं भयंकर आहे आणि हे कटू सत्य आहे. हे लक्षात न घेता, जागतिक पातळीवर नैसर्गिक आपत्तींसाठी सहकार्य करण्याऐवजी आरोप-प्रत्यारोप आणि युद्धाच्या रूपानं गुद्दागुद्दीवर उतरून मूळ मुद्द्यांना बगल द्यायची हेच जगभर चालू झालंय. मग निसर्ग तरी आपली लय सांभाळत राहील ही अपेक्षा का ठेवायची? या पार्श्वभूमीवर मानवामुळे ढासळत चाललेला निसर्गाचा समतोल सावरण्यासाठी सर्व देशांनी एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत हेच अशा घटनांमधून शिकलं पाहिजे, अहंकार बाजूला ठेवून. – श्रीपाद पु. कुलकर्णी, पुणे

नाहीतर विनाश अटळ

या लेखामधून हिमकडे आणि हिमनद्या यांचे दाहक वास्तव समोर आले आहे. सध्या संपूर्ण जगामध्ये ग्लोबल वार्मिंगचे संकट प्रत्येक दिवसागणिक वाढत चालले आहे. या हिमकड्यांच्या बदलामुळे संपूर्ण मानव जात आणि निसर्गाची मोठ्या प्रमाणावर हानी होत असून, भविष्यात महाभयंकर प्रलय येऊन खूप मोठी जीवित आणि वित्तहानी होऊ शकते. यासाठी सर्व देशांनी आत्ताच त्याच्यावर योग्य तो मार्ग काढला पाहिजे, नाहीतर येणार्या विनाशाला सर्वांना सामोरे जावे लागेल. – विजय आकुर्डेकर, पुणे.

जेन-झीने आवाज उठवावा

लेखकाने भयावह असे वास्तव मांडले आहे. जगात सर्वांची वाटचाल अधोगतीच्या दिशेने कशाप्रकारे सुरू आहे हे अगदी उदाहरणासह दिलेे. सध्या शिक्षणासाठी जागृत झालेली जेन-झी हवामान बदलाच्या खोलाबाबतसुद्धा जागृत होणे आवश्यक आहे, म्हणजे भविष्यातील नैसर्गिक आपत्तीबाबत आपण जागृत होऊ शकतो. – अनुराधा लिंगे, सांगोला.

पेराल तेच उगवेल

नेपाळमधील महाप्रलय आणि त्यामागील कारणांची लेखकाने केलेली अर्थपूर्ण मांडणी मानवी जीवनाला विचार करायला भाग पाडणारी आहे. निसर्गाप्रती तात्पुरती किंवा वरवरची सहानुभूती काही कामाची नसून, हा लेख आपल्याला कर्तव्याची जाणीव करून देतो. हवामान बदल या विषयासोबतच आर्मस्ट्रॉंग यांच्या हवामान अंदाजांचा संदर्भ देत मानवाचा आसुरी हव्यास आणि न संपणारी भौतिक ओढ लेखकाने अचूक मांडली आहे. पृथ्वीतलावरील खरी संपत्ती ही महाकाय पर्वत, महासागर आणि विशाल अरण्ये हीच आहे, हे अगदी योग्य आहे.

भूकंप, बर्फ वितळणे आणि जमिनीतून बाहेर पडणारा घातक मिथेन वायू यांमुळे निर्माण होणारी परिस्थिती चिंताजनक आहे. ‘इसीमोड’च्या वैज्ञानिकांनी २१०० सालापर्यंत हिमालय पर्वत रांगा बर्फमुक्त होतील, असा दिलेला निष्कर्ष मानवाच्या निष्ठुरतेवर बोट ठेवतो. याचा भारतावर मोठा परिणाम होईल; २०५० सालापर्यंत हिमालयातून निघणार्या सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा यांच्या उपनद्या लहान होतील आणि भूजल पातळी खालावेल. वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तींमुळे मूळ मानवी विकास दूरच राहून उलट सर्व मानवजात नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. ‘चांगलं पेराल तर चांगलं निश्चित उगवेल’ हेच या लेखातून स्पष्ट होते. – अभिजित रजपूत, सांगली.