|| अरुंधती देवस्थळे

अरुंधती देवस्थळे… इंग्लिश आणि अमेरिकन तौलनिक साहित्याच्या अभ्यासक. प्रकाशन व्यवसायात सरकारी, कॉर्पोरेट आणि डेव्हलपमेंट क्षेत्रांत कार्यानुभव. युनेस्कोच्या दोन प्रकल्पांत काम. बहुराष्ट्रीय प्रकाशन संस्थांमध्ये काम केल्याने अनेक देशांत भ्रमंती. कला आणि बालसाहित्यातील शोधकार्यासाठी युनिव्हर्सिटीज्च्या फेलोशिप्स. इंग्रजी, हिंदी आणि मराठीत लेखन व अनुवाद. सध्या हिमालयातील एका खेड्यात वाचनालयांचे नेटवर्क चालवत साक्षरतेचे कार्य करतात.

Shani Maharaj & Budh Made Panchgrahi Yog On Hanuman Jayanti
हनुमान जयंतीला शनी- बुधाचा पंचग्रही योग बनल्याने ‘या’ राशींचे नशीब घेईल कलाटणी; चहूबाजूंनी बरसणार अपार श्रीमंती
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
Why is neem and jaggery consumed during Gudi Padwa 2024
गुढीपाडव्याला कडुलिंब आणि गुळाचे सेवन का करतात? काय आहे कारण, तज्ज्ञांकडून जाणून घ्या….
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !

मानवनिर्मित सौंदर्याचं एवढं विशाल परिमाण आणि सृजनशीलतेचा स्तिमित करणारा उत्सव कदाचितच इतरत्र असेल; म्हणून लूव्र ही उरकून टाकण्याची गोष्ट नाही. त्याची तिकिटं आधीच ऑनलाईन आरक्षित करून ठेवावी, कारण ती महिनोन् महिने आधीच संपतात. हे परिमाण एका व्यक्तीला एका दिवसात पेलण्यासारखं नाहीच. म्हणूनच येताना आपल्याला काय बघायचं आहे आणि सौंदर्याच्या जल्लोषात ते कुठं भेटणार आहे हे जाणून घ्यावं. नेमक्याच गोष्टी, पण नीट बघायच्या, ही एक स्ट्रॅटेजी असू शकते. पण इथे आलोच आहोत तर- किंवा ‘परत येऊ की नाही’ या विचारापोटी जमेल तितकं भराभर पाहून घ्यायचा मोह भल्याभल्यांना आवरता येत नाही. प्रत्येकानं आपापलं लूव्र स्वत:च शोधायचं असतं. काही कृती लोकप्रिय असल्या तरी आवडतीलच असं नाही. अनेकांना इथे आल्यावर अकल्पित कलेशी भेटीचा प्रत्यय येतो. कलावृत्तीच्या काहींचं तर जन्मभरासाठी नातं जुळतं. आपण माध्यमं, शैली आणि तंत्र यांचे गाढे अभ्यासक सोडा, जाणकारही नसलो तरी एक गोष्ट लक्षात येत जाते- पौर्वात्य आणि पाश्चिमात्य सौंदर्यशास्त्रं ही दोन वेगळी विश्वं आहेत. याचं साधंसं उदाहरण म्हणजे रंगयोजना! इथली प्रत्येक कलाकृती तिचा काळ आणि सांस्कृतिक संदर्भातच पाहावी. तुलनेच्या फंदात पडू नये. इथली अनेक शिल्पं आणि चित्रं जवळजवळ विवस्त्रच, दैहिक सौंदर्याला कुर्निसात करणारी; पण अभिलाषा जागवणारी नाहीत. जसं की- पुतळा प्रेमदेवतेचा असूनही कामभावनेचा सोहळा नाही. देह आणि देहातीत (असेल तर आत्मा!) यांतील फरक प्रगल्भतेनं दाखवून देणारी कला! ती घडवणाऱ्या शिल्पकारांची नावं मिळतात, पण त्यांनी हे कसब कसं संपादन केलं हे कळण्याची वाट सापडत नाही. असं असूनही काही शिल्पकृतींबद्दल वेगळ्याने थोडंसं…

तळमजल्यावरून थोड्याशा पायऱ्या चढून आत शिरताच दोन्ही बाजूला काचेतून येणाऱ्या नैसर्गिक प्रकाशात नाहणारी खुली प्रांगणं… त्यातील देखण्या शिल्पांवर काचेच्या छतातून नैसर्गिक प्रकाश योग्य त्या कोनातून, अगदी हवा तितकाच येईल अशी रचना! इथे भेटतं ग्रीक संगमरवरात कोरलेलं दुसऱ्या शतकातलं एक ३.७ ७ १.६५ मीटर्सचं महाकाय शिल्प ‘द टायबर’! इटलीतून वाहून भूमध्य सागराला मिळणाऱ्या टायबर नदीचं मानवी रूप… एक प्रौढ, कर्ता पुरुष खडकावर रेलून बसलेला. एका हातात अधिकाराचं प्रतीक आणि दुसऱ्या हातात जीवनदायी धान्य, फळं आणि कणसं- म्हणजे नदीचा पोषणारा स्वभाव. जवळच रोमस आणि रोम्युलस हे जुळे भाऊ. आई-वडिलांनी नदीत सोडून दिलेले आणि शिल्पातील लांडगीणीने दूध पाजून मोठे केलेले. या दोन्ही भावंडांनीच पुढे रोमचा शोध लावला अशी आख्यायिका. नेपोलिअनच्या मृत्यूनंतर अनेक देशांना त्यांच्या कलेचा वारसा असणाऱ्या हजारो कलाकृती परत करण्यात आल्या. पण ऑस्ट्रियातून आणलेलं ‘द टायबर’ हे मूळचं इटालियन शिल्प लूव्रमध्येच राहिलं. आकार आणि वय बघता ते मूळ गावी- म्हणजे व्हॅटिकनला नेणं अशक्य ठरलं. मग हे अद्वितीय शिल्प पोपने अठराव्या लुईला दिलेली भेट मानावी असा तोडगा निघाला.

स्लीपिंग हर्माफ्रोडाईट्स’ हेही एक बहुचर्चित शिल्प. या संगमरवरी, १.६७ मीटर्स लांबीच्या, एक हात उशाशी घेऊन पोटावर अस्ताव्यस्त झोपलेल्या, नग्न, कमनीय देहाकृतीचं नेमकं वय आणि शिल्पकार अज्ञात आहेत. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे या प्रमाणबद्ध शिल्पात स्त्रीदेहाची गोलाई आहे आणि पुरुषाचे अवयवही! पण डोळ्यांना त्यात काही विसंगत वाटत नाही. हे शिल्प लूव्रमध्ये आणल्यावर त्याच्यासाठी गादी शिल्पकार बर्निनीने कोरून दिली. चेहऱ्यावर अर्भकासारखे निष्पाप भाव आणि पांघरलेल्या वस्त्रावर पडलेल्या चुण्या फारच सुंदर आहेत. आणि ते कुठल्याही कोनातून पाहावं- आकर्षकच दिसतं. याच्या अनेक प्रतिकृती आणि प्रतिमा वेगवेगळ्या देशांच्या कलासंग्रहालयांत आहेत.

याच प्रांगणात ‘दि रिबेलीअस स्लेव्ह’ आणि  ‘दि डाइंग स्लेव्ह’ ही संगमरवरातली शिल्पांची जोडी खडकांवर उभी आहे. त्यांची निर्मिती १५१३-१५ च्या दरम्यानची- म्हणजे अखेरच्या काही वर्षांतली. २.५ मीटर्स उंचीचं ‘दि डाइंग स्लेव्ह’ अधुरं असलं तरी मायकेलअँजेलोचं देहबोली शिल्पात साकार करण्याचं कसब दाखवणारं. शिल्पाच्या चेहऱ्यावर तरळणारी वेदना, सगळं संपल्याची जाणीव… छातीवरून नेत मागे बांधलेल्या बंधनांनी दास्यत्व समजणारं. मजबूत हात केलेल्या कष्टांची साक्ष देणारे. बंधनं तोडू पाहणाऱ्या बंडखोर गुलामाच्या वळलेल्या देहात गुर्मी. कोरीव, घोटीव असं काही नसतं गुलामीत; पण एक रांगडी ताकद असते, ती जाणवते. तपशिलांमधलं सौंदर्य जाणून ते कामात प्रर्तिंबबित करू पाहणाऱ्या बरोख शैलीमधलं आणखी एक संगमरवरी  शिल्प म्हणजे ‘दी हॉर्स टेमर्स.’ राजाच्या पदरी असलेल्या गीयुमे कुस्तू या पिढीजात शिल्पकाराने कोरून काढलेलं. उधळलेल्या  घोड्याची ताकद आणि त्याला त्याहून अधिक ताकदीने काबूत घेणारे वीर. दोघांचीही शक्ती पणाला लागल्याने ताठरलेले देह. ‘असामान्य कलाविष्कार’ एवढंच म्हणता येतं.

इसवी सनपूर्व काळातली ‘व्हीनस ऑफ आर्लेस’ म्हणजे १.९५ मीटर्स उंचीचं नखशिखांत सौंदर्य. कमरेपर्यंत अनावृत. सौंदर्याची देवताच म्हटल्यावर आणखी काय? त्यातही बारकाईने पाहणाऱ्या काहींना तिची पावलं शरीराला किंचित विशोभित वाटतात. पण ते सोडूनच देण्यासारखं. संगमरवरी, घोटीव शरीर कुठूनही पहावं तर तेवढंच सुंदर. हिचंच ग्रीक पुराणकथांमधलं रूप म्हणजे प्रेम आणि सौंदर्याची देवता अ‍ॅफ्रोडाईट. ग्रीक पुराणातील देवदेवता आपल्यासारखेच असंख्य. त्यांना मानवी राग, लोभ इत्यादी भावना, विकारांपासून मुक्त न ठेवल्याचं शिल्पांवरूनही कळतं. खूप लिहीलं गेलंय हिच्यावर वेगवेगळ्या भाषांमधून. हिच्या अनेक प्रतिमा, प्रतिकृती वेगवेगळ्या कलामाध्यमांतून देशोदेशी आहेत. काही वर्षांनी हिची प्रतिकृती कुठल्याशा विहिरीत सापडली, पण तिचे हात तुटलेले होते. ती ‘व्हीनस डी मिलो.’ चेहऱ्यावर टवके उडून छोटे व्रण पडले आहेत… तरीही सुंदरच. ती तिच्या मूळ कृतीपेक्षा- मोठ्या बहिणीपेक्षा जास्त कीर्तिमान ठरली. पण दोघीही लूव्रमध्ये आहेत, हे विशेष!

इटालियन शिल्पकार आंतोनिओ कानोवाचं ‘सायकी रिवाइव्हड बाय क्युपिड्स किस’ हे १.५  ७ १.६ मीटर्स आकाराचं संगमरवरी शिल्प अठराव्या शतकाच्या शेवटच्या दशकातलं… रोमन पुराणकथा सांगणारं. राजकन्या सायकी ही  अलौकिक सुंदरी. इसवी सनपूर्व काळातील या शिल्पात विषाच्या वासाने चक्कर येऊन पडलेल्या नाजूक सायकीवर झुकून पंखवाला क्यूपिड तिला शुद्धीवर आणू पाहतोय. बहुतेक वेळा क्यूपिड फुलांचे धनुष्यबाण घेतलेल्या, पंख असलेल्या  बाळाच्या रूपात पाहण्यात येतो. इथे तो प्रेमात पडलेला नवतरुण आहे. याही शिल्पावरून स्फुरलेल्या प्रतिमा आणि प्रतिकृती अनेक माध्यमांतून वेगवेगळ्या देशांत बनवल्या गेल्या. सायकी आणि क्यूपिडची कहाणी काही संस्कृतींमध्ये थोडी बदलत गेली, पण गाभा तोच राहिला… जो या शिल्पाचा विषय आहे. असंच आणखी एक १.८ मीटर उंचीचं निओ-क्लासिकल शैलीतलं शिल्प : ‘व्हीनस अँड मार्स.’ मार्सचं मॉडेल म्हणून इसवी सनपूर्व दुसऱ्या शतकातला राजा हेड्रिअन स्वत:च होता म्हणतात. पायघोळ कपडे घातलेली ती आणि आणि फक्त वीरश्री पांघरलेला तो.

इथे असलेल्या प्रत्येक कलाकृतीमागे शेकडो वर्षांचा इतिहास आहे, त्यांना कलात्मकरीत्या  रसिकांसमोर पेश करणाऱ्या जाणकारांचे परिश्रम आहेत. प्रत्येक कलाकृतीला चिरतरुण ठेवणारी तंत्रशुद्ध यंत्रणा आणि प्रकाशयोजना आहे. सगळ्याच दालनांत चालून थकणाऱ्यांना खिनभर टेकायला बाकं, खुर्च्या आहेत. पण शिल्पांच्या खुल्या प्रांगणात बाकांवर बसून पायांना जरा विश्रांती देत, आवडत्या शिल्पावर डोळे विसावत लाभलेल्या या भाग्याचं शांत सुख आळवत बसावं, हे उत्तम. या प्रांगणांना शिल्प-उद्यानाचं रूप यावं म्हणून यात लहान-थोर झाडंही लावली गेली आहेत. शुभ्र शिल्पं संगमरवरी आणि हिरवी झाडं इतकी सुंदर मिसळून जातात, की ज्याने कोणी हे लँडस्केपिंग केलं असेल तोही धन्यच! लूव्र अनंत हस्ते देणारं. इतकं तर निश्चितच की, यू आर नॉट द सेम पर्सन आफ्टर बीइंग हिअर!

आपणा सगळ्यांची एक बकेट लिस्ट असते. एकदाच मिळणाऱ्या आयुष्यात कुठला अनुभव आपण अगदी घ्यायचाच हे ठरवून, स्वत:ला कबूल केलेली! उत्कट स्वप्नांचे रोडमॅप्स शोधून ठेवायचे असतात, कारण सहजसाध्य नसतंच काही. प्रेम आणि कलेचं प्रतीक असलेलं पॅरिस खूप काही ऐकल्या-वाचल्यामुळे बघणं अनेकांच्या संकल्पात असतं. पॅरिसमध्ये दाखवलं जातं त्यातलं एखाद् दुसरं  स्थळ पाहून घ्यावं… पण हे शहर  पायी भटकत आपल्या आत उतरवून घ्यायची चीज आहे. अनेक जण पर्यटन कंपन्यांबरोबर पॅरिसयात्रा करतात. ते लोकांना शांजेलिजेमधली खरेदीची दुकानं, डिस्नी लँड वगैरे दाखवू पाहतात. पण बाकी सगळं विसरून जगातल्या सर्वोत्कृष्ट कलासंग्रहालयात- म्हणजे लूव्रमध्ये दिवस घालवावा… ते पाहिल्यावर  इथली बाकी प्रेक्षणीय स्थळं न पाहिली तरी काही बिघडत नाही. काही अनुभव ‘उरकून टाकण्यासाठी’ नसतातच घ्यायचे. डॉम पेरीयॉनचा एक ग्लास की मर्लोचे चार, हा निर्णय काहींसाठी सूर्यप्रकाशासारखा स्वच्छ असतो… काहींना तो सुजाणपणे करावा लागतो. ही लेखमालिका सुदैवाने माझ्या वाट्याला आलेल्या लूव्रचे ‘गुण गाईन आवडी’ म्हणून सुरू होतेय. काम आणि मजा दोन्ही करत मिळालेला मॉनेंची गिव्हर्नी, वेनिस त्रिनाले, कांदिंस्की आणि गॅब्रिएला मुन्टर यांचं नातं आणि म्युझिअम झालेलं घर, पिकासोच्या बायकोशी  स्टुडिओत भेट…  प्रत्येक अनुभव या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करण्यालायक! आयुष्यातल्या तमाम बऱ्या-वाईटाचा विसर  पाडून फक्त सृजनशीलतेच्या सोहोळ्यात वेधून टाकणारी ही सौंदर्ययात्रा अनुभवण्याची संधी प्रत्येक रसिकाला मिळावी, एवढंच!

(क्रमश:)

arundhati.deosthale@gmail.com