|| अरविंद पिळगावकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संगीत रंगभूमीवरील एक अभ्यासू आणि शिस्तीचे ज्येष्ठ गायक नट रामदास कामत नुकतेच दिवंगत झाले. त्यांच्या यशस्वी आणि लोकप्रिय नाट्यकीर्दीचा धांडोळा घेणारा लेख…

आयुष्यात काही गोष्टींची समीकरणं अशी काही जुळून जातात की नंतर त्याचं विलगीकरण करणं दुरापास्त होऊन बसतं. कलाकाराची एखादी भूमिका किंवा गायकाचं एखादं गाणं त्याच्याशी इतकं निगडित होऊन जातं की तेच त्याची ओळख बनतं. पूर्वी ‘भावबंधन’ या नाटकात कामण्णाची भूमिका करणारे नट दिनकर ढेरे हे नंतर ‘दिनकर कामण्णा’ या नावानेच ओळखले जात. गायक नटांच्या बाबतीत सांगायचं झालं तर १९६० साली ‘पंडिराज जगन्नाथ’ या नाटकातील प्रसाद सावकार यांनी गायिलेलं ‘जय गंगे भागीरथी’ हे पद इतकं गाजलं की त्यामुळे सावकार एरदम कीर्तीच्या शिखरावर पोहोचले. ते गाणं ही त्यांची वैशिष्ट्यपूर्ण ओळख ठरली.

असाच चमत्कार चार वर्षांनंतर रंगभूमीवर पुन्हा घडला. ‘सं. मत्स्यगंधा’ या नाटकातील ‘देवाघरचे ज्ञात कुणाला…’ या पदाने रामदास कामत यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवलं. अर्थात त्यामागे पं. जितेंद्र अभिषेकी यांचं रचनाकौशल्य आणि मार्गदर्शन होतंच; परंतु ते अत्यंत समर्थपणे रंगभूमीवर सादर करण्यात सिंहाचा वाटा होता तो रामदासजींचा. गंगाधरपंत लोंढे यांच्यानंतर अत्यंत निकोप, भरदार, सुरेल आवाज रंगभूमीवर पुन्हा ऐकायला मिळाला तो रामदासजींच्या गळ्यातून. या आवाजाला शास्त्रीय संगीताचा पक्का पाया असल्यामुळे रंगभूमीवरील त्यांच्या सादरीकरणाला एक वेगळाच आयाम मिळाला.

केवळ हौस म्हणून नाटकात काम करताना प्रत्येक कलाकाराला उमेदवारी करावीच लागते, तशी ती रामदासजींनीही केली. त्यासाठी लागणारे कष्टही केले. मानापमान झेलले. आणि पराशराच्या रूपाने रंगभूमीला एक समर्थ गायक मिळाला. अभिषेकीबुवांनी दिलेल्या चालींचं त्यांनी सोनं केलं. त्यानंतर दोनच वर्षांनी ‘सं. ययाति आणि देवयानी’ या वि. वा. शिरवाडकरांनी लिहिलेल्या नाटकाद्वारे कचाच्या भूमिकेतील पदांनाही तितक्याच तोलामोलाने त्यांनी न्याय दिला. ‘सं. मत्स्यगंधा’ आणि ‘सं. ययाती’मधील रामदासजींची सगळी गाणी लोकप्रिय झाली.

यानंतर अभिजात संगीत नाटकांतून भूमिका करणंही ओघानं आलंच. ‘सं. सौभद्र’, ‘सं. शारदा’, ‘सं. संशयकल्लोळ’, ‘सं. मानापमान’ अशा नाटकांतून त्यांनी नायकाच्या भूमिका साकारल्या. संगीत नाटकांचा सुवर्णकाळ ज्याला म्हणता येईल तो ‘सं. सुवर्णतुला’ या नाटकापासून सुरू झाला. या काळात सादर झालेल्या संगीत नाटकांतून रामदासजींनी प्रमुख भूमिका केल्या; परंतु त्या नोकरी सांभाळूनच! रंगभूमी आणि नोकरी यांमध्ये निवड करण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी नोकरीला प्राधान्य दिलं. आणि ती सांभाळून जितके जमतील तसे प्रयोग केले. त्यांनी केलेल्या नाट्यप्रयोगांची आणि त्यांच्या ध्वनिमुद्रिकांची संख्या पाहता त्यांच्या कार्याची व्याप्ती लक्षात येईल.

एअर इंडियामधली त्यांची नोकरी खूप जबाबदारीची होती. ती त्यांनी अत्यंत एकनिष्ठेने केली. तसेच रंगभूमीवर भूमिका करतानाही ते अतिशय प्रामाणिक आणि एकाग्रचित्त असत. नाट्यव्यवसायावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून नसतानासुद्धा त्या व्यवसायाशी त्यांनी जुळवून घेतले. व्यवस्थित तालमी करून भूमिका करायची अशी त्यांची शिस्त होती. त्याचं फळ त्यांना भरभरून मिळालं.

मी त्यांच्याबरोबर तीन नाटकांतून भूमिका केल्या. ‘सं. सौभद्र’, ‘सं. मानापमान’ आणि ‘सं. संत कान्होपात्रा’! ‘सं. संत कान्होपात्रा’ नाटकात त्यांना विलासराव पाळेगाराची भूमिका करण्याविषयी विचारलं तेव्हा त्यांनी त्यास नकार दिला होता. कारण त्यांची पॅरिसला पोस्टिंग होणार होती. मी त्यांना म्हटलं, ‘तुम्ही सुरुवात तर करून द्या… मग पुढचं पुढे पाहू.’ गंधर्व नाटक कंपनीत त्यांचे मामा श्रीपादराव नेवरेकर ती भूमिका करत असत. त्यामुळे कामत तयार झाले आणि नाटकाची सुरुवात दमदार झाली. ते फॉरेनला जाण्यापूर्वी मुंबई-पुण्यात काही प्रयोग व कोकण-गोवा दौरा असे मिळून २५-३० प्रयोग झाले. पुढे सर्व कलावंतांच्या सहकार्याने मी स्वत: या नाटकाचे प्रयोग लावायला सुरुवात केली. एका प्रयोगाला फारसं उत्पन्न झालं नाही. त्यामुळे त्यांची नाइट द्यायला मी त्यांच्या ऑफिसमध्ये नंतर गेलो. त्यावेळी ‘तुम्हाला नुकसान झालेलं असताना मी नाईट घेणार नाही,’ असं सांगून त्यांनी मनाचा जो मोठेपणा दाखवला तो मी कधीच विसरू शकणार नाही.

 ते गोंयकार असल्यामुळे त्यांना कोंकणी भाषेचा आणि सारस्वत असल्याचा खूप अभिमान होता. एकदा ते वास्तव्याला असलेल्या गोमंतक सोसायटीत मी लग्नासाठी गेलो होतो. लग्न लागल्यानंतर जेवणाची वेळ होईपर्यंत वेळ होता म्हणून रामदासजींना भेटायला घरी गेलो. रविवार होता. स्वयंपाकघरातून मत्स्यगंध दरवळत होता. ते नुकतेच आंघोळ करून आले होते. ‘देवाचं थोडंसं म्हणून येतो…’ असं म्हणून पाच मिनिटांत ते आले. आतून त्यांच्या ‘सौ.’नी हाक मारली तेव्हा ‘आलोच’ म्हणून परत आत गेले. बाहेर आले आणि म्हणाले, ‘आज कुल्र्यांचं कालवण आहे. खाणार का?’ मी म्हटलं, ‘अहो, मी लग्नाला आलो आहे.’ तेव्हा ते म्हणाले, ‘अहो, गोंयकार आणि सारस्वत रविवारी कधी वरणभात जेवतो का?’ असं म्हणून आतून काचेच्या मोठ्या बोलमधून ते कुल्र्यांचं कालवण घेऊन आले आणि आम्ही दोघांनी त्यावर मनसोक्त ताव मारला. एका गृहस्थाश्रमीचं आदरातिथ्य मी त्या दिवशी अनुभवलं.

नाट्यव्यवसायातून निवृत्त होण्याचा त्यांनी निर्णय घेतला त्यावेळी पुण्याच्या भरत नाट्य संशोधन मंदिरतर्फे त्यांचा भव्य सत्कार केला गेला. त्यांनी ‘भरत’तर्फे केलेल्या पाच नाटकांचा महोत्सव तेव्हा भरवला होता. ‘लक्ष्मीधराच्या भूमिकेसाठी कोण?’ असा प्रश्न त्यावेळी निर्माण झाला होता. त्यांनी तात्काळ त्या भूमिकेसाठी मला बोलावण्यास सांगितले. ही धैर्यधराची लक्ष्मीधराला मिळालेली पावतीच जणू!

शुभदा आणि श्रीकांत दादरकर यांच्या ‘शुभश्री’ संस्थेतर्फेसाभिनय नाट्यसंगीताचे वर्ग सुरू करण्यात आले तेव्हा कामतांचा उत्साह पाहण्यासारखा होता. पहिल्या वर्षी फक्त माहीम सेंटर होतं. दुसऱ्या वर्षी मागणी वाढल्यामुळे डोंबिवली, ठाणे, पुणे इथेही जाऊन शिकवायला ते एका पायावर तयार असायचे. अभ्यासक्रम आणखी कसा सुधारता येईल याचेही मार्गदर्शन करायचे. हा क्रम जवळजवळ बारा वर्षे अव्याहत चालला होता. पत्नीच्या निधनानंतर या संगीतसाधनेनेच त्यांना साथ दिली.

गेली काही वर्षे त्यांच्या प्रकृतिअस्वास्थ्यामुळे त्यांच्याशी संपर्कहोऊ शकत नव्हता. दोन महिन्यांपूर्वी त्यांचा मुलगा डॉ. कौस्तुभ याने त्यांच्या प्रकृतीबद्दल जे सांगितलं ते ऐकून आता काही खरं नाही हे लक्षात आलं. देवाघरचे ज्ञात कुणाला… हेच शेवटी खरं ठरलं.

‘सत्यवती’ला (आशालता वाबगावकर) काळुबाईने (करोनाने) नेलं आणि आता ‘पराशरा’ला हिमालयाच्या शिखरांनी साद घातली आणि ‘मत्स्यगंधा’ पुन्हा पोरकी झाली.

‘दुर्दैवे आपण दुरावलो या देही

संगीतगंध दरवळे रसिक हृदयांशी…’     

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Author arvind pimpalgaonkar article actor ramdas kamat scholar and veteran singer of music theatre akp
First published on: 16-01-2022 at 00:04 IST