मी इथं लिहिण्याची माझी पात्रता काय तर मी आतापर्यंत एक डॉक्युड्रामा ‘माई’, दुसरी एक डॉक्युमेण्ट्री ‘वाड्यांच्या सहवासात’ आणि तिसरी एक डॉक्युमेण्ट्री ‘तीन पावले समृद्धीची’ यांचं लेखन दिग्दर्शन केलं आहे. याबद्दल मी इथं थोडक्यात लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे. लेखन आणि दिग्दर्शन म्हणून ते माझ्या नावावर असलं तरी या तिन्ही गोष्टी घडण्यामागे मला वेळोवेळी माझे मित्र-मैत्रिणी- जे याच क्षेत्रात काम करतात- यांनी दिलेली साथ, माझ्या बाबतीत ठेवलेले ‘पेशन्स’ यांमुळे ते काम होऊ शकलेलं आहे. कारण डॉक्युमेण्ट्री कधीच एकट्याची नसते. यात नम्रता असण्यापेक्षा तेच खरं आहे आणि असतं.

‘माई’ ही मी माझ्या आजीवर (वडिलांची आई – प्रेमल वागेश्वरी) केलेली पहिली फिल्म. मला आजही आठवतं की, वाड्यातल्या बाळंतिणीच्या खोलीच्या दारावर बाळाची दृष्ट काढण्यासाठी माई एक जळणारी वात लावायची. चरचरणाऱ्या वातीवर रडणारं बाळ अगदी शांत होऊन जायचं… आणि माई खोलीतून बाहेर यायची. हे दृश्य माझ्या मनावर कोरलं गेलं होतं. हीच माझ्या पहिल्यावहिल्या फिल्मची पहिलीवहिली फ्रेम आहे. आपणही एक लघुपट (शॉर्टफिल्म) करूया असा उत्साह वाटू लागल्यावर मी माईच्या एका आठवणीची पटकथा लिहून काढली. मला प्रचंड आवडणाऱ्या ‘विहीर’ सिनेमाचे कर्ते गिरीश कुलकर्णी आणि उमेश कुलकर्णी यांना मी ती पटकथा भीतभीत वाचायला दिली होती. ते ‘कर’म्हणाले. बरं, गंमत अशी की, मी ती स्क्रिप्ट फिक्शन लिहिली होती, पण जसजशी प्रक्रिया पुढे जात राहिली… पहिला एडिट ड्राफ्ट, दुसरा एडिट ड्राफ्ट तयार झाला तेव्हा फिल्म एडिटर मकरंद डंबारे यानं मला पुन्हा एकदा फुटेज वेगळ्या दृष्टीनं पाहायला शिकवलं आणि डॉक्युड्रामा तयार झाला- ज्यात वास्तवातील माई आपली आठवण सांगते, जी आपण फिक्शन रुपानं पाहतो. ज्यांनी आजपर्यंत फिल्म पाहिली आहे त्यांना ती भावली आहे. याचं श्रेय माईत माणूस म्हणून असलेलं सच्चेपण, कॅमेरामन सत्यजित, एडिटर मकरंद, साऊंड करणारा पीयूष आणि माझे सगळे मित्रमैत्रिणी यांना आहे.

सत्यतेबद्दल (ऑथेंटिसिटी) खूप बोललं जातं किंवा आग्रह धरला जातो आणि ते रास्तही आहे. ‘माई’च्या वेळी माईतच भरपूर ‘ऑथेंटिसिटी’ होती, त्यामुळे मला फिकीर नव्हती. पण माझंच भावविश्व असल्यानं आपण त्यात जास्त रमत राहू, आपल्याला मोह होत राहतोय या गोष्टी मला बुचकळ्यात टाकत होत्या- ज्या आजही काम करताना टाकतातच. पण डॉक्युमेण्ट्री निर्मिती ही प्रक्रियाच अशी आहे ना की, मी यामुळे हळूहळू माझ्याच अनुभवांकडे, शूटिंग करून आणलेल्या फुटेजकडे तटस्थपणे पाहायला शिकते आहे. कारण याची कुठलीही तालीम मला नाही. मी फिल्म स्कूलमध्ये शिकलेले नाही. मी पत्रकारितेमध्ये पदवी घेतलेली असली तरी मुख्यत्वे मुद्रित माध्यमातील पत्रकारिता शिकलेले आहे. हे सांगण्याचं कारण असं की, बहुतांश मुलामुलींना चित्र, शिल्प पाहता येणं किंवा ध्वनीबद्दलची सजगता हे काहीही कळत नाही, तर मी त्याच गटातील आहे. त्यामुळे सुरुवातीचा खूप काळ आणि वेळ या क्षेत्रात काम करताना भारावून जाणं, दडपून जाणं, आता कुठं लपू, जीव अर्धामुर्धा होणं यातच गेलेला आहे. आणि यात दाखवा करून डॉक्युमेण्ट्री! तर मी केली. धीर धरला आणि धाडस केलं हीच काय ती उमेद!

‘वाड्यांच्या सहवासात’ ही माझ्याकडे दुसऱ्यांकडून आलेली डॉक्युमेण्ट्री होती. पुण्यातील वाड्यांवर एकाला माहितीपट करून हवा होता. मी असं पहिल्यांदाच काम करत होते. ‘माई’ केली तेव्हा मी माझ्या मर्जीची मालकीण होते, पण इथं तसं नव्हतं. आपल्याला डॉक्युमेण्ट्रीबद्दल काय अपेक्षा सांगितल्या जात आहेत ते समजून त्यांना हवं तसं आणि त्यांच्या बजेटमध्ये करून दाखवणं आवश्यक होतं. अर्थात मी यात मला काय दिसतं आहे, याची कशा पद्धतीनं रचना मला वाटते आहे हे आधी स्पष्ट केलं. पण शूटिंगच्या आदल्या रात्री मला प्रचंड धडकी भरली आणि आलेलं बजेट परत करून टाकावं असं वाटलं. मग दुसऱ्या दिवशी सकाळी चित्रीकरणाच्या ठिकाणी पोहोचलो तेव्हा माझा पार्टनर संकेत कुलकर्णी (फिल्म एडिटर) यानं बाईक काढली, सारी सूत्रं हातात घेतली आणि शूटिंग सरू झालं. बघता बघता आम्ही डोक्युमेण्ट्री पूर्ण केली. शूटिंगच्या दुसऱ्या दिवशी माझ्या अंगात आल्यासारखा उत्साह संचारला होता. आता हे सगळं लिहिताना जाणवतं आहे की, डॉक्युमेण्ट्रीची प्रोसेस मला आकाश-पाळण्यात बसण्याचे अनुभव देत असते. डॉक्युमेण्ट्रीच्या प्रक्रियेमध्ये मी हेही शिकते आहे की, एडिट टेबलवर गोष्टी किती वेगवेगळ्या तयार होतात. अशावेळी आपल्याला काय वाटतं आहे यापेक्षा फुटेज काय सांगतं आहे, हे बघण्याचा आणि ऐकण्याचा प्रयत्न केल्यावर किती वेगळं दिसतं आणि ऐकू येतं याचा मी विलक्षण अनुभव घेतला आहे.

‘वाड्यांच्या सहवासात’ ही डॉक्युमेण्ट्री बघून लेखक, नाट्य दिग्दर्शक, अभिनेते किरण यज्ञोपवित यांनी एका डॉक्युमेण्ट्रीसाठी विचारलं आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे मी आणि संकेत कुलकर्णी आम्ही सह्याद्रीतील शेतकऱ्यांच्या वास्तव परिस्थितीवर भाष्य करणारी ४० मिनिटांची डॉक्युमेण्ट्री केली. पुण्यातील शाश्वत विकास केंद्र, गोखले अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र संस्था, पुणे यांच्यासाठी ही डॉक्युमेण्ट्री बनवण्यात आली. नरेंद्र खोत, गुरुदास नूलकर, हृषीकेश बर्वे या पर्यावरण तज्ज्ञांनी जो अभ्यास केला होता तो यात दृश्य रूपाने मांडता आला. ही डॉक्युमेण्ट्री अद्याप रिलीज होणं बाकी आहे. ‘तीन पावले समृद्धीची’ असं तिचं नाव आहे. या डॉक्युमेण्ट्रीच्या निमित्ताने सह्याद्रीतला निसर्ग आणि तेथील शेतकरी पाहणं हा आमच्या सगळ्या टीमसाठी खूप काही शिकवणारा अनुभव होता.

मी आधीही लिहिलं आहे त्यानुसार मला अनेकदा मोठ्या लोकांसोबत काम करताना शिकायला जरी मिळत असलं तरी त्यांच्या व्हिजनचं एक दडपण माझ्यावर असतं. हा माझा दोष आहे. पण ते दडपण बाजूला करत अभ्यासाला धक्का न लावता डॉक्युमेण्ट्री म्हणून मला ती कशी आणि कोणापासून सुरुवात करायची आहे, याबद्दल ठाम राहून पाहिलं. अर्थात दर ड्राफ्टनुसार त्यात बदल होत राहिले. अशा वेळी टीमकडून सगळं बसून करून घेणं यासाठी लागणारे पेशन्स याची परीक्षा दर वेळी होत राहते. डॉक्युमेण्ट्रीमेकिंग काय आणि एकूण फिल्ममेकिंगमध्ये तुमच्यातील गुणवत्ता, कौशल्य, समज इतकंच महत्त्वाचं. तुम्ही ते सगळं शेवटापर्यंत पुढे नेऊ शकता तेही! डॉक्युमेण्ट्रीच्या प्रक्रियेमध्ये मुख्यत्वे आपण जेव्हा दुसऱ्यांसाठी डॉक्युमेण्ट्री बनवत असतो, तेव्हा सगळी मंडळी एका लयीत, एका विचारांनी एकत्र येणं हेच एक मोठं काम असतं. ते होता होता डॉक्युमेण्ट्री पुढे सरकत राहते.
या डॉक्युमेण्ट्रीची विशेष आठवण ही आहे की, आम्ही केलेलं ड्रोन शूटिंग. ड्रोन आजकाल सगळेच उडवतात. त्यावर शॉट्स लावतात, पण डॉक्युमेण्ट्रीच्या विषयाला धरून आम्ही ड्रोन शूटिंग केलेलं. यामुळे त्या डॉक्युमेण्ट्रीच्या विषयाची खोली आणि गांभीर्य कळायला मदत झाली. या डॉक्युमेण्ट्रीत आम्ही सामान्य शेतकरी ते ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ अशा रेंजमध्ये मुलाखती घेतल्या. या लोकांना ऐकणं आणि त्यांना डॉक्युमेंट करणं हा अनुभव न विसरता येण्यासारखा आहे.

मला स्वत:ला काय दिसतं आहे? कसं दिसतं आहे? मी दिसण्याचा काय अर्थ लावते आहे? का तो अर्थ तसाच लावण्यासाठी मला काय काय प्रभावित करतं? मला तसंच काय ऐकू येतं? हे सगळे प्रश्न मला डॉक्युमेण्ट्री मेकिंगमध्ये पडत गेले आहेत. डॉक्युमेण्ट्री मेकिंग फक्त त्या माहितीपटापुरती मर्यादित राहत नाही, तर त्याच्या अवतीभवती जे जगणं सुरू असतं त्याच्यावरही परिणाम करत राहतं. दोन्ही ठिकाणची ‘मी’ अगदी पूर्ण वेगळी वाटते आणि कधी कधी पूर्ण एकजीव. हे सगळं मला किती जमतं यापेक्षा मला हे करायला आवडतं आहे, करून पाहावं वाटतं आहे इतकंच आत्ता कळतं आहे. इतकीच आत्ता समज आहे.

डॉक्युमेण्ट्री मेकिंग करताना ‘फिक्शन’ आणि ‘नॉनफिक्शनच्या तळ्यात-मळ्यात खेळल्यासारखं वाटतं. ‘वास्तव’ आणि ‘कल्पना’ धूसर होत जातात. आणि म्हणायला डॉक्युमेण्ट्रीही आपणच आपल्या आत उतरवत जातो म्हणूनच या प्रोसेसची मजा येते. माझ्या माईला जत्रेत सिनेमा बघायला गेली म्हणून रात्रभर जिन्यात बसवलं गेलं होतं आणि तीच माई सिनेमाच्या पडद्यावर दिसली. मग वाटलं, करून पाहायला हवं. आपणही सांगून पाहूया… एक स्त्री म्हणून आपल्याला कॅमेरातून हे जग कसं दिसतं आहे.

साहाय्यक दिग्दर्शक आणि लेखक म्हणून अनेक चर्चित मराठी चित्रपटांसाठी काम. ‘हायवे’, ‘जाऊ द्या ना बाळासाहेब’, ‘धप्पा’ या चित्रपटांसाठी सहलेखन. ‘मिफ’च्या डॉक्युमेण्ट्री महोत्सवात ‘माई’ या माहितीपटाची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड.

madhavi.wageshwari@gmail.com