scorecardresearch

आदले । आत्ताचे : लेखकाची दृष्टी, कशी टिपते समष्टी..

गोठण्यातील गोष्टी’ हे ‘रोहन प्रकाशना’ने प्रकाशित केलेलं पुस्तक हृषीकेश गुप्ते यांच्या आशयद्रव्याचा मागोवा घेण्यासाठी उपयुक्त आहे.

book gothanyatlya goshti
गोठण्यातील गोष्टी’ हे ‘रोहन प्रकाशना’ने प्रकाशित केलेलं पुस्तक हृषीकेश गुप्ते यांच्या आशयद्रव्याचा मागोवा घेण्यासाठी उपयुक्त आहे. (संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता

सतीश तांबे

आशय, घाट, कथावस्तू वगैरेंचं भान बाळगून लिहिणाऱ्या मोजक्या लेखकांपैकी हृषीकेश गुप्ते हे एक महत्त्वाचं नाव आहे. मराठी साहित्यात आजवर रायगड जिल्ह्यातील ग्रामीण वातावरणाला पुरेसं स्थान मिळालं नव्हतं, ते गुप्ते यांच्या एकूणच लिखाणात मिळताना दिसतं. त्यांची शब्दकळा भले जुन्या मराठीतील असली तरी  ठेवणीतील वाक्यं न वापरता आपल्याला नेमकं काय म्हणायचे आहे, ते चपखल शब्दांमध्ये सांगण्याची त्यांची हातोटी वाखाणण्याजोगी आहे..

मराठी साहित्यात गेल्या दशकामध्ये लक्षणीय स्थित्यंतर होताना दिसत आहे. साठ-सत्तरच्या दशकानंतर घाटाची तमा न बाळगता या प्रांतात समाजाच्या सर्वच स्तरांमधून जो आशयाचा लोंढा शिरत होता, त्यामध्ये आता सर्वसमावेशक संपृक्तता आल्यामुळे मराठी साहित्यात पुन्हा घाटाचाच एक भाग म्हणता येईल अशा शैलीचे प्रयोग होत असल्याचं जाणवतं आहे. मात्र या प्रयोगामध्ये ‘कथावस्तू’चं प्रमाण ओसरत चाललेलं दिसतं. तर अशा या काळात आशय, घाट, कथावस्तू वगैरेंचं भान बाळगून लिहिणाऱ्या मोजक्या लेखकांपैकी हृषीकेश गुप्ते हे एक महत्त्वाचं नाव आहे असं त्यांचं आजवरचं प्रकाशित साहित्य वाचून जाणवतं.

गुप्तेंनी आपल्या लेखनाची सुरुवात गूढकथा/ भयकथांनी केली. या कथाप्रकारांमध्ये कथानक/ कथावस्तू रचण्यावर चांगली पकड असावी लागते. नंतर त्यांनी ‘चौरंग’ आणि ‘दंशकाल’ या दोन कादंबऱ्या आणि ‘काळजुगारी’ व ‘हाकामारी’ या कादंबरिका लिहिल्या. ही सर्व पुस्तकं वाचताना जाणवतं, मुळात त्यांच्याकडे आशयद्रव्याची मुबलकता आहे. जोडीला वाचनीय शैली आणि घाटाचंही चांगलं भान आहे. यापैकी शैली, घाटाचं भान साहित्यकृतींचं वाचन, चिंतन, मनन यांतून विकसित होऊ शकतात, तर आशयद्रव्य हे लेखकाच्या जीवनानुभवातून निपजतं. हा जीवनानुभव स्वत:चाच असतो असं नाही तर त्यामध्ये पंचेद्रियांनी टिपलेले इतरांचे अनुभवही असतात. शिवाय अनुभवातील घटकांची कल्पकतेने सरमिसळ करून वेगळा अनुभव घडवणं देखील कल्पक लेखकाला शक्य असतं. ‘गोठण्यातील गोष्टी’ हे ‘रोहन प्रकाशना’ने प्रकाशित केलेलं पुस्तक हृषीकेश गुप्ते यांच्या आशयद्रव्याचा मागोवा घेण्यासाठी उपयुक्त आहे.

‘गोठण्यातील गोष्टी’ या त्यांच्या पुस्तकात सात गोष्टी आहेत. पुस्तक उघडल्यावर सुरुवातीलाच गुप्ते यांनी ‘गोष्टी सांगण्यापूर्वी’ असं मनोगत लिहिलेलं आहे. ज्यामध्ये त्यांनी या पुस्तकातील कथांचं वेगळेपण स्पष्ट करताना असं म्हटलं आहे की, ‘‘ही खऱ्या किंवा खोटय़ा माणसांची व्यक्तिचित्रणं नाहीत. कथा या लेखनप्रकारात घटना वा घटितं केंद्रस्थानी असतात व त्या घटनांचा कार्यकारणभाव म्हणून व्यक्ती वा पात्रं येतात. इथे तसं नसून व्यक्ती केंद्रस्थानी आहेत आणि घटितं व्यक्तींचा कार्यकारणभाव म्हणून या कथांना मी  व्यक्तिकथा असं संबोधतो.’’ हे वाचलं तरी नंतर या व्यक्तिकथांची जी सात नावं दिसतात ती व्यक्तींचीच असल्यामुळे ती व्यक्तिचित्रणं असल्याची शक्यता मनातून बाद होत नाही. शिवाय नागोठणे या त्यांच्या खऱ्या गावाच्या नावाशी साधर्म्य जाणवणारं गोठणे हे नाव काल्पनिक कथांसाठी घेतल्यामुळे ही शंका वाढतच जाते.

‘सुलतान पेडणेकर’ या पहिल्याच कथेच्या सुरुवातीलाच जाणवतं की, यातील निवेदक प्रथमपुरुषी म्हणजे ‘मी’आहे आणि तो सुलतानविषयी सांगताना स्वत:चं कुटुंब, गावातील आणखी काही माणसं यांची माहितीही सढळपणे देत आहे. जी वाचताना ही व्यक्तिकथा आहे की व्यक्तिचित्रण ही आपल्या मनातील शंका  काहीशी पुसट होत जाते आहे; आणि सुलतान ज्या अद्भुतिका सांगतो आहे, त्यामध्ये आपल्याला गुप्ते यांनी आपल्या साहित्यनिर्मितीची सुरुवात ही गूढ कथांपासून का केली असेल याची पाळंमुळं सापडत आहेत. या कथेमध्ये गुप्ते एके ठिकाणी म्हणतात की, ‘‘‘जादूची अंगठी’ किंवा ‘जादूची तलवार’ यांसारख्या गोष्टीच्या पुस्तकांमधल्या सातासमुद्रापार घडणाऱ्या विलक्षण जादुई कथानकांनी माझं बालभावविश्व कधीचंच काबीज करून टाकलं होतं. पण ही सारी कथानकं अनाकलनीय आणि अज्ञात अशा परकीय भूमीत घडायची. सुलतानच्या अविश्वसनीय अद्भुतिका  घडत त्या गावकुसाच्या अल्याडपल्याड. जसं, ‘वेशीवरल्या डाकबंगल्यावर अमावास्येला संध्याकाळी बुटकी चिनी माणसं येतात. त्यांच्याकडे हिरे असतात..’ एकदा आगपेटीत कैद केलेल्या एका भूताच्या मोबदल्यात स्वत: सुलतानने त्यांच्याकडून काही हिरे घेतले होते. ही कपोलकल्पित घटना सांगतासांगताच सुलतानने खिशात हात घातला होता आणि आभाळाच्या निळय़ा रंगासारखे मूठभर मणी बाहेर काढून दाखवले होते.’’

तर या पहिल्याच व्यक्तिकथेमध्ये गुप्ते वाचकाची पकड घेतात आणि पुढे पुढे वाचत जाताना कळतं की, या सर्वच कथांमध्ये एक ढाचा आहे तो असा की प्रत्येक कथेमध्ये निवेदक तर ‘मी’ आहेच, पण कथेच्या शीर्षकात जरी एक पात्र असलं तरी ते त्यातलं मुख्य पात्र आहे एवढंच; आणि त्याला हाताशी धरून या कथेतील निवेदक आपल्याला आणखी थेट संबंधित नसलेले, पण लिहिण्याच्या भरात आठवलेले काही नाटय़पूर्ण प्रसंग, किस्से, माणसं यांच्याविषयीही सांगत आहे. गाभोळीच्या पोटातील अंडय़ांप्रमाणे या व्यक्तिकथांमध्ये गुंगवणाऱ्या अनेक गोष्टींची रेलचेल आहे आणि प्रत्येक कथेमध्ये यातील ‘मी’ हा निवेदक जे काही सांगतो आहे, त्यातून लेखकाची जडणघडण कशी झाली आहे याचे काही सुगावे, सूत्रं हाती येत आहेत.

या व्यक्तिकथा वाचता वाचता जाणवतं की, गुप्तेंना खरं तर गावाचीच गोष्ट सांगायची आहे, ज्यासाठी त्यांनी या सात व्यक्तींना हाताशी धरलं आहे आणि गुप्तेंना  केवळ गोठण्याचीच गोष्ट सांगून थांबायचं नाहीये, तर एकूणच गाव या युनिटमधील व्यवहारांविषयी लिहायचं आहे. यासाठी त्यांनी या सात व्यक्तिकथांमध्ये जी पात्रं आहेत ती केवळ त्यांच्या नावापुरत्या कथांपुरती सीमीत ठेवलेली नाहीत, तर प्रत्येक पात्राचा  केवळ उल्लेख तर काही तपशील देखील अन्य कथांमध्ये पेरली आहेत. तसेच अन्य काही पात्रेदेखील अनेक कथांमध्ये सामाईक आहेत. जसं की, ‘मोगरा’ मावशी हे पात्र तीन-चार ठिकाणी येतं. अशी सामाईक पात्रं आणखीही आहेत. ही गुंफण केल्याचा परिणाम असा होतो की गावातील सहजीवन मनावर ठसतं. गावातील सर्व जाती, धर्माच्या लोकांमधील सलोखा जाणवणे, ही गोठण्यातील गोष्टींची मोठीच जमेची बाजू आहे.

या सातही व्यक्तिकथांमध्ये गाव या वसाहतीबद्दल काही निरीक्षणे/ भाष्ये थेट नोंदवली जातात. जसं की, ‘जयवंतांची मृणाल’मध्ये गावाला विषयांतरांचं वावडं नसतं. एका विषयातून दुसऱ्या विषयात आणि दुसऱ्यातून तिसऱ्यात जायला गावाला वेळ लागत नाही. किंवा ‘खिडकी खंडू’मध्ये गावाचं एक असतं- गाव बेरकी असतं, गाव विखारी असतं, गाव कुटिल आणि जहरीही असतं; पण अगदी त्याचप्रमाणे गावाकडे काही ओलसर मृदू भावनाही असतात. तर ‘रंजन रमाकांत रोडे’ या कथेमध्ये गाव कलाश्रयी असतं. आपल्या कुशीत निपजलेल्या कलावंताची गाव नेहमीच बूज राखतं असे गुणावगुण दोघांचेही उल्लेख केले जातात. किंवा ‘मॅटिनी मोहम्मद’मध्ये गाव एखाद्याच्या आयुष्याची कधी कधी क्रूर चेष्टाही करतं असं एकच अधांतरी वाक्यही येतं. गावविषयक अशा वाक्यांची पखरण पुस्तकभरही थेट पहिल्या मनोगतापासून आहे.

‘गोष्टी सांगण्यापूर्वी..’ मध्ये लेखक लिहितो की, प्रत्येक गावात काही आख्यायिका, काही दंतकथा असतात. या आख्यायिका आणि दंतकथांमागे काही खरी, काही कल्पित माणसं आणि घटना असतात. एक लेखक म्हणून या आख्यायिका, दंतकथा मला भुरळ पाडतात. कोणताही लेखक त्याच्या कानावर पडलेल्या आख्यायिका निव्वळ कपोलकल्पित प्रदेशात राहू देत नाही. कधी चिमूटभर आशयाच्या सुतावरून कल्पनेचा स्वर्ग गाठत, तर कधी आशयाच्या स्वर्गात कल्पनेचं सूत कातत या आख्यायिका, दंतकथांना लेखक कागदावर उतरवत राहतो.

आख्यायिकांमध्ये पिढय़ान् पिढय़ा टिकणारं काहीतरी शाश्वत नाटय़, तथ्य आणि सत्य असतं. आणि ते टिकवण्यासाठी सांगणारा त्यामध्ये भरीला तिखटमीठमसाला लावत असतो. अशा आख्यायिकांची पेरणी गोठण्यातील गोष्टींमध्ये गुप्तेंनी मुबलक केली आहे. हे करताना त्यांच्या भाषेमध्ये अतिशयोक्तीचा त्यांनी जाणीवपूर्वक वापर केलेला दिसतो.

‘रंजन रमाकांत रोडे’ या कथेत तर ते असंही लिहितात की, ‘यापुढील निवेदन हे काही माझ्या कल्पनेचं देणं नाही. पुढील परिच्छेद हा गाव, गावातील विविध माणसं आणि रंजनचं नाव या सर्वाबाबत मी ऐकलेल्या कपोलकहाण्यांचा एक कोलाजमात्र आहे. यात कल्पानरंजन असलं तरी ते गावाचं आहे माझं नाही. मी ऐकीव गोष्टी इथे मांडणारा निव्वळ ‘तो हमाल भारवाही ’आहे. खरं तर अशा अतिशयोक्त धमाल किश्शांची रेलचेल या पुस्तकात अनेक ठिकाणी आहे. किंबहुना पुस्तकाची वाचनीयता वाढवण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. तर हा उल्लेख ते इथेच का करतात? कारण हे की, या कथेचा नायक असलेल्या ‘रंजन’ या नावाची जन्मकथा खरोखरच अविश्वसनीय वाटावी अशी आहे. रंजनच्या आधी रमाकांत रोडे यांना दोन मुलगे आहेत, ज्यांची नावं ‘गुंजन’ आणि अंजन’अशी आहेत. तर याच धर्तीवर पुढची नावं म्हणून ‘भंजन’, ‘मंजन’ असे पर्याय सुचतात आणि शेवटी ‘रंजन’हे नाव कसं निश्चित केलं जातं, ती प्रक्रिया अजिबात खरोखर घडलेली वाटत नाही तर कुणाच्या तरी सुपीक डोक्यातून ती आली असावी असं वाटत राहतं आणि लेखकाने हा जर श्रेयअव्हेर केला नसता तर हे नक्कीच लेखकाने रचलं आहे असं वाटलं असतं, याची गुप्तेंना जाणीव आहे. त्यामुळेच त्यांनी आपली मूठ सोडवून घेतली आहे. अन्यथा गावामध्ये पाळण्यातलं नाव तिरडीपर्यंत कायम रहाणं ही तशी विरळा गोष्टच असते.‘खिडकी खंडू’ हे यातील एका कथेचं नाव असलेल्या नायकाचं नाव हे याचं उत्तम उदाहरण आहे. ‘स्मगलर खंडू’, ‘मुतऱ्या खंडू’, ‘खिडकी खंडू’ आणि ‘कोयत्या खंडू’ या नावांच्या गोष्टी खूपच इंटरेस्टिंग आहेत.

.. तर हे झाले ‘गोठण्यातील गोष्टीं’चे ठळक गुणविशेष. आणखीही कितीतरी बारकावे सांगण्यासारखे आहेत. जसं की, मराठी साहित्यात आजवर रायगड जिल्ह्यातील ग्रामीण वातावरणाला पुरेसं स्थान मिळालं नव्हतं, ते गुप्ते यांच्या एकूणच लिखाणात मिळताना दिसतं. त्यांची शब्दकळा भले जुन्या मराठीतील असली तरी  ठेवणीतील वाक्यं न वापरता आपल्याला नेमकं काय म्हणायचे आहे, ते चपखल शब्दांमध्ये सांगण्याची त्यांची हातोटी वाखाणण्याजोगी आहे. गुप्ते हे लेखक तर आहेतच, पण एक चित्रपट दिग्दर्शक या नात्याने त्यांना चित्रपटांची देखील ओढ असल्यामुळे या पुस्तकात चित्रपटांचे उल्लेख तर आहेतच, शिवाय त्यांच्या अनेक प्रसंगांची वर्णनं ही कॅमेऱ्याच्या नजरेतून बारकावे टिपावेत तशी आहेत. एका गोष्टीचं तर नावच ‘मॅटिनी मोहम्मद’ आहे. असो, तर गुप्तेंच्या एकूणच शैलीवर एक स्वतंत्र लेख होऊ शकेल. ‘गोठण्यातील गोष्टी’ची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यातून गुप्तेंच्या आजवरच्या साहित्यकृतींची उकल होण्यासाठी तसेच पुढील लेखनाची चाहूल घेण्यासाठी मदत होऊ शकते. गुप्तेंनी त्यांच्या मनोगतामध्ये आपल्या गावाविषयी कृतज्ञताभाव व्यक्त करताना गाव आपल्या मनावर गोंदले गेले आहे आणि ‘माझ्या लेखनाची गुणसूत्रं माझ्या सर्जनाची कुळं तपासायची झाल्यास माझ्या या गोंदणापासून करावी लागेल’ असा सरळ उल्लेखच केला आहे.

बाकी या सर्वच कथांमधून येणारी पात्रं, प्रसंग अत्यंत विलोभनीय असल्यामुळे पुस्तक वाचनीय झालं असलं तरी या प्रत्येक कथेमध्ये ‘मी’ हा निवेदक समजा आणला नसता तर कदाचित ही व्यक्तीचित्रं अधिक प्रभावीपणे रंगवता आली असती का? अशी शंका येत रहाते. गंमतीचा भाग असा की गुप्तेंनी या व्यक्तिचित्रणांतून कथा साकारायचा कितीही प्रयत्न केला असला तरी पान नं.२२० वर ते या लेखादरम्यान अशा अनेक जागा राहून गेल्या असं लिहितात, तेव्हा त्यांनी राखलेलं व्यक्तिकथा करण्याचं भान अधेमधे सुटल्याचं ते प्रातिनिधिक उदाहरण वाटतं. पण कथा स्वरूप देण्यासाठी त्यांनी जी ‘मी’ या निवेदकाची योजना केली त्यामुळे वाचकांना त्यांच्या लेखकीय पाळामुळांचा वेध घेण्याची संधी मिळाली आहे, हे या गोष्टींचे वर्गीकरण करण्यापेक्षा अधिक महत्त्वाचं आहे. लेखकाची दृष्टी, कशी टिपते समष्टी, याचा जणू वस्तुपाठच आहे ‘गोठण्यातील गोष्टी’.

नव्वदीच्या दशकापूर्र्वीपासून  आजतागायत समाजातील  संगती-विसंगतीला  पकडत कथा-दीर्घकथा लिहिणारं नाव. ‘आजचा चार्वाक’ या वैचारिक आणि ‘अबब हत्ती’ या प्रायोगिक बालसाहित्य मासिकाचे सहसंपादन. ‘राज्य राणीचं होतं’, ‘मॉलमध्ये मंगोल’, ‘ रसातळाला ख.प.च’ , ‘माझी लाडकी पुतनामावशी’  हे गाजलेले कथासंग्रह.

satishstambe@gmail.com

मराठीतील सर्व लोकरंग ( Lokrang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-01-2023 at 01:08 IST