लेखकपणाची जबाबदारी जीवनानेच टाकलीय…

‘श्रीलिपी’त मात्र ही मात्रा चालली नाही. कारण यात स्त्री-व्यक्तिरेखा आहेत. पण त्या चुपचापपणे कथेच्या परिघावर वावरणाऱ्या आहेत.

|| किरण गुरव

यंदाच्या साहित्य अकादमी पुरस्कारांचे तीन मानकरी…  किरण गुरव, संजय वाघ आणि प्रणव सखदेव आपल्या लेखनामागच्या प्रेरणांचे उत्खनन करताना त्यांच्या हाती लागलेल्या ऐवजांचे कथन करताहेत…

माझ्या आठवणीप्रमाणे मी पहिली कथा लिहिली होती त्याला आता वीस वर्षांहून अधिक काळ झालेला आहे. दरम्यानच्या काळात ‘राखीव सावल्यांचा खेळ’, ‘श्रीलिपी’, ‘बाळूच्या अवस्थांतराची डायरी’ आणि ‘क्षुधाशांती भुवन’ असे चार कथासंग्रह प्रसिद्ध झाले. ‘जुगाड’ ही कादंबरीही पूर्ण झाली आणि वाचकांच्या गळाभेटीसाठी गेली. या सगळ्या पुस्तकांना साहित्यविश्वातील काही वेचक पुरस्कारही लाभले. ‘बाळूच्या अवस्थांतराची डायरी’ या कथासंग्रहाला तर नुकताच साहित्य अकादमीचा पुरस्कारही जाहीर झाला. यावर्षीचा मराठी भाषेसाठीचा तो ‘मुख्य’ पुरस्कार असल्याचे काही वर्तमानपत्रांनी चुटपुटते लिहिले आणि लोकांना त्या पुस्तकापर्यंत घेऊन जाण्याचा त्यांच्या परीने प्रयत्न केला.

माझ्या मते, कोणताही पुरस्कार हा एक सामाजिक विधी असतो आणि तो अटळ असतो. लेखकाच्या दृष्टीने त्याचा उपयोग वगैरे तपासण्यात फारसा अर्थ नसतो. कारण लेखन ही एक स्वयंचलित गोष्ट असते. शिवाय जातिवंत लेखक हा नेहमीच चांगलं काहीतरी लिहून स्वत:ला पुरस्कार देण्याच्या नादात असतो. त्याला दुसरं कोण पुरस्कार देणार? तशी संधी त्यानं स्वत:ला देणं आणि त्यासाठी निष्णात शिकाऱ्यासारखं घात लावून बसणं मात्र फार आवश्यक असतं. घात लावून बसणं हा परत त्याचा आयुष्यभरासाठीचा उद्योग असतो. त्यात काही वेळेला त्याला यश मिळतं, काही वेळेला अपयश. काही वेळेला ‘अस्वलानेच नाचवावा दरवेशी’ तशी सावजाकडूनच त्याची हालत खराब होते. हे सगळं लिहिण्याच्या प्रक्रियेत नैसर्गिक वाटावं एवढ्या सहजपणे सतत चाललेलं असतं. लिहिण्यातला हा निसर्ग लेखकाला कळला नाही तर त्याचा आत्मघात ओढवण्याची शक्यता जास्त असते.

अर्थात मलाही तो लगेच कळला किंवा सर्वार्थानं कळलेला आहे असं अजिबात नाही. ‘राखीव सावल्यांचा खेळ’ आणि ‘श्रीलिपी’ या कथासंग्रहातील अनेक कथांनी माझ्या डोक्याला ताप दिलेला आहे. कथेसाठीची पात्रं, प्रसंग, घटना ही नेहमीचीच बोथट आयुधं माझ्या हाती त्यावेळी नुकतीच लागली होती आणि त्यांच्या ‘रचारचीत’ मी अगदी गढून गेलो होतो. पण यातल्या काही कथा लिहिता लिहिताच त्यांच्या मुक्कामाला आपोआप पोहोचल्या. गावाकडं अनेक तरुण लग्न झालं की वर्षभरातच बाप म्हणून मिरवू लागतात तसाच या कथांचा कथाकार म्हणून मी मनातल्या मनात तसाच मिरवू लागलो. त्यासाठी मला नैसर्गिक ऊर्मीच पुरेशी वाटली. पण ही भविष्यकालीन जोखीम आहे ही गोष्ट त्यावेळी माझ्या गावीही नव्हती. ‘श्रीलिपी’ ही मला या जोखमीची जाणीव करून देणारी पहिली कथा. कारण तत्पूर्वीच्या ‘राखीव सावल्यांचा खेळ’मधील बहुतांशी कथा या खेड्यापाड्यातील कष्टकरी स्त्रियांच्या समर्थ बोलीनं तोलून धरल्या होत्या. पाटी-दफ्तरासारखीच ही भाषा लहानपणापासून भरणपोषण करत होती. मी केवळ तिचा संग्राहक आणि उपयोजक होतो, एवढंच.

पण ‘श्रीलिपी’त मात्र ही मात्रा चालली नाही. कारण यात स्त्री-व्यक्तिरेखा आहेत. पण त्या चुपचापपणे कथेच्या परिघावर वावरणाऱ्या आहेत. आणखी अबोल आहेत. त्यामुळे यातल्या पात्रांसाठी मला पहिल्यांदाच स्वतंत्रपणे भाषा शोधावी लागली. एका खेडेगावात पहिल्यांदाच संगणक इन्स्टिट्यूट काढू पाहणारा तरुण पव्या आणि त्याचा पठडीबाज शिक्षक बाप यांच्यातील संघर्षाची ही कहाणी आहे. बाप आणि तरुण मुलाचा पारंपरिक संघर्ष त्यात आहेच, पण त्यापेक्षा आधुनिक काळाची गुंतागुंतही खूप आहे. बापाची इच्छा आहे की, पोराने आपला सढळ खर्च करू पाहणारा हात धरावा आणि त्याच्या आधारे मस्तपैकी डॉक्टर व्हावे. आयुष्यभर शामबालेलाही लाजवील असले लक्ष्मीव्रत करावे. पण… तसे होऊ शकत नाही. काळाचा आणि स्वपुत्राचा हा ‘पण…’ समजून घेताना होणारी मास्तर वडिलांची घसरगुंडी हा कथेचा एक पदर आहे. दुसऱ्या बाजूने मुलगाही मास्तर वडिलांच्या जुनाट मेंदूवर आपण नवीन काही  ्रल्ल२३ं’’ करू शकत नाही म्हणून खट्टू आहे. भरीस भर म्हणून मास्तर वडिलांना शासनाने संगणकाची ‘एमएस सीआयटी’ परीक्षा कम्पलसरी केली आहे. आणि दैवाचा खेळ म्हणून त्यांना गावातील एकमेव पव्याच्या संगणक इन्स्टिट्यूटमध्ये त्यासाठी प्रवेश घ्यावा लागला आहे. कथेचा हा नाट्र्यंबदू आहे. त्यातून उगम पावलेले कथानाट्य भराभर विस्तारत जाऊ लागले. हा विस्तार जवळपास शंभर पानांवर पोहोचला. तो आनंददायक आहे असेही लिहिता लिहिता लक्षात येऊ लागले. कारण या कथेला तिची भाषा सापडली होती. ती मुख्यत: पव्या, त्याचे मास्तर वडील आणि त्यांना घेरून उभा असणारा काळ या सर्वांचे वर्तनशास्त्र तपासताना सापडली होती. लिहिता लिहिताच हा एक मानसशास्त्रीय खेळही नकळत कथेने पूर्ण केला होता; ज्यातून तिला तिची भाषा सापडली होती. त्यामुळे अनेक बाजूने विचार करून, अनेक तºहेने कथेत भाषा वापरून, ‘भाषा म्हणजे मन’ या छोटेखानी व्याख्येपाशी मी लेखक म्हणून येऊन पोहोचलो आहे.  

‘बाळूच्या अवस्थांतराची डायरी’ आणि ‘क्षुधाशांती भुवन’ या पुढच्या कथासंग्रहांचा जेव्हा मी विचार करू लागतो, त्यावेळी तो मुख्यत: ‘भाषा म्हणजे मन’ या माझ्या शोधाचाच कथात्म विस्तार दिसू लागतो. आयुष्याच्या या टप्प्यावर हा शोध लिखित आणि उच्चारित अशा दोन्ही भाषा-वापरांसाठी मला अर्थपूर्ण दिसू लागतो. असो.  

अधूनमधून मी का लिहू लागलो, का लिहिता राहिलो, या प्रश्नाने मी विचारप्रवण होतो.

 मी लिहू लागलो २००१ पासून. परंतु ऐंशीचे दशक आणि पर्यायाने माझे बालपण ही त्या लिहिण्याला बळ पुरवणारी गोष्ट होती. माझं इंधनच होतं ते. साधेपणा हा त्या काळातील खेड्यांचा प्राण होता. कदाचित माझी बालबुद्धीही असावी ती. पण गावातल्या सगळ्या घरांत, परड्यांत, अगदी घरांच्या माळ्यांवरही आम्हाला  मुक्त प्रवेश असायचा. नसला तर आम्ही तो करून घेत होतो. देवळात संध्याकाळी भजनं चालायची. गवळणी रंगायच्या. दिवसा कुठंतरी हालगी कैचाळ घुमायचं. पी-ढबाक सूर धरून जाताना दिसायचं. कधीतरी चौंडकं येऊन आक्रोश करत दारात थांबायचं.          गावाबाहेरच्या माळावर कधी तंबूत सिनेमा यायचा. कधी नाटक, कलापथक. ते कधी बघायला मिळायचं, कधी नाही. पण मी रात्री अंथरूणाला पाठ टेकली की यातलं काहीही मला झोपण्यापूर्वी आठवत राहायचं… काही झोप उडवायचं. मग डोळे मिटून मनाच्या दिव्यदृष्टीनं पूर्वी पाहिलेलं सगळं मी परत पाहण्याचा प्रयत्न करत असे. पाहता पाहता त्यात मनाने सक्रिय होत असे. कधी भजन म्हणे. कधी सिनेमातले संवाद. कधी कलापथकातील नाचकाम. असं काहीही. मला वाटतं, ‘सक्रिय कल्पना’ ही लेखक होण्याची पूर्वअट असावी.      

पुढे यथावकाश मी शहर कोल्हापुरात शिक्षणासाठी दाखल झालो. त्यावेळी शहराच्या चकचकीत दर्शनाने हडबडून गेलो. त्यावेळचे  दोन प्रसंग मात्र माझ्या अजूनही लक्षात आहेत. एक खेडूत स्त्री गजबजलेल्या रस्त्यावरून एकटीच बराच वेळ रडत चाललेली मी पाहिली. खरं तर गावाकडं एखादी अनोळखी स्त्री जरी अशी रडत चालली असती रस्त्यावरून, तरी लोकांनी लगेच तिची विचारपूस केली असती. दुसऱ्या एका प्रसंगात हॉटेलात चहासाठी गेलो तर तिथं अचानक गावातलाच एकजण चहा घेऊन प्रकटला आणि शेजारी मख्खासारखा वेटरवत उभारला. हा गृहस्थ अर्थातच गावातला उपटसुंभ्या होता. पण त्याच्या मख्खपणाने मी तेव्हा कोसळलो होतो आणि चहा न घेताच बाहेर सटकलो होतो. चकचकीत दिसणाऱ्या शहराची अशीही एक बाजू पुढं आली. पण तेव्हा आपणही पुरेसे सक्रिय वागलो नाही हे आठवताच आता वाटते की, ते आपलेही अवस्थांतर होते. नंतर हळूहळू शहराला सरावलो. आणि नंतर काही काळ वेडावूनही गेलो.

शिक्षण पूर्ण होताच शहर पुण्यास काही काळ जाऊन तिथल्या उद्योगजगताची असुरक्षितता, गरगर, घुसमट एखाद्या वादळासारखी अंगावर घेतली. एक तरुण म्हणून त्या वादळातली आपली क:पदार्थता अनुभवली. यथावकाश त्यावर ‘जुगाड’ ही कादंबरी लिहिली. या कादंबरीतही सक्रिय कल्पना आहे, पण ती अनुभवलक्षी आहे. लिहिण्यासाठी अनुभव आणि कल्पना या दोन्ही गोष्टी मला महत्त्वाच्या वाटतात. या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या की लेखक म्हणून सक्रिय होणं सोपं जात असावं.

आज ‘जुगाड’चा टप्पा मागं पडून त्याच्या पुढच्या टप्प्यावर आयुष्य आलं आहे. कोणी वय विचारलं तर आता मी ‘तीन  कमी पन्नास’ म्हणून सांगतो. पण या काळातली आव्हानं आणि प्रश्न वेगळे आहेत. तंत्रज्ञानाचा स्फोट जवळजवळ झालेलाच आहे. समाजमाध्यमांनी या काळाला उत्तराधुनिक करण्यासाठी जणू कंबर कसली आहे. संभ्रम हा या काळाचा नायक आहे आणि संशय ही त्याची संहिता. त्यामुळे तर्काची फारशी मात्रा या काळावर चालत नाही. हा काळ चिमटीत पकडणं लेखकासाठी खरंच कठीण आहे. एखादेच जयंत पवार त्यांच्या अचाट प्रतिभेनं ‘तर्काच्या खुंटीवरून निसटलेलं रहस्य’सारखी कथा लिहून या काळाला जेरबंद करताना दिसतात. असो.

माझ्या लिहिण्याचा ज्यावेळी मी विचार करतो त्यावेळी बालपणी पाहिलेलं खेडं आणि ऐंशीचं दशक ही मूळ प्रेरणा मला दिसते. मी खेडं म्हणतो त्यावेळी मुख्यत: मनाशी माझं गाव राधानगरी आणि त्याच्या जवळचं आजोळ कपिलेश्वर आहे… ज्यांनी  माझी खास गावठी संवेदनशीलता घडवलेली होती. पुढं तिला शहराचा स्पर्श होताच वेगळे दाब मनाला बराच वेळ काचत राहिले. अशावेळी मनाचा निचरा होणं खूप गरजेचं असतं. माझ्याबाबतीत वाचनानं असा निचरा केला. माडगूळकरांच्या कथेतून अवतरणारा समग्र गावगाडा असो किंवा चारूता सागर, सखा कलाल यांच्या कथेतून अनुभवायला मिळणारे ग्रामीण जीवनाचे गोळीबंद कवडसे असोत; या सगळ्यांनी मला वाचक म्हणून पोटाशी धरलं. त्याचवेळी गावखेड्यातून येऊन शहरात भरकटलेला तू एकटाच नाही आहेस, हे राजन गवस, रंगनाथ पठारे, आसाराम लोमटे यांच्या कथेनं नीट समजावून दिलं. पुढं भाऊ पाध्ये, जयंत पवार यांच्या कथेनं चाकरमानी मुंबईचे अंतरंग आणि बर्हिरंग दाखवून दिले.

लिहिणं ही स्वान्तसुखाय गोष्ट असते असं मानलं जातं, आणि ते बरोबरही आहे. पण जोपर्यंत वाचक ते वाचत नाहीत तोपर्यंत त्या सुखाचा परिपोष होत नाही. वाचक हाच लेखकाचा खरा उत्तराधिकारी असतो. माडगूळकर, चारूता सागर, भाऊ पाध्ये या लेखकांना कधी भेटता आलं नाही. पण त्यांचा वाचक म्हणून मला कळतं, की हे लोक ‘आतून’ कसे होते. त्यांचे कुटुंबीय किंवा नातेवाईक हे जर त्यांचे वाचक नसतील तर ते काही वेचक तपशिलांचेच केवळ उत्तराधिकारी असतील. कारण कोणतीही साहित्यकृती हा तिच्या निर्मात्या लेखकाचा क्ष-किरण रिपोर्ट असतो, तोच त्याचा सीटीस्कॅन, एमआरआय रिपोर्टही असतो, तोच त्याचा रक्तगट रिपोर्टही ठरू शकतो. प्रामाणिक लेखकाचा आत्मा साहित्यकृतीत कायमचा वास्तव्यासाठी असतो. लेखक अप्रामाणिक असेल तरीही जागरूक वाचकाला ते लगेच कळतं. कारण परत… भाषा म्हणजे मन!

अकादमीच्या पुरस्काराच्या निमित्ताने लोक जेव्हा विचारतात की, ‘आता जबाबदारीत वाढ वगैरे झाली आहे असं वाटतं का?’ तेव्हा मला गंमत वाटते. मेघना पेठे म्हणतात तसं लेखकपणाची जबाबदारी ही जीवनाने तुमच्यावर टाकलेली असते. जीवनाने तुम्हाला त्यासाठी निवडलेलं असतं. ती बाब काही ऑफिसमधील आणखी एखाद्या विभागाची जबाबदारी अंगावर पडण्यासारखी नसते. 

kirangurav2010@gmail.com

मराठीतील सर्व लोकरंग ( Lokrang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Author kiran gurav article the responsibility of authorship is laid by life itself jugaad also a novel akp

Next Story
एका ‘केऑस’ची गोष्ट
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी