निळू दामले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘वरवर भाबडय़ा वाटणाऱ्या भारतीय साधेपणात इतर कोणत्याही समाजात सापडणार नाही इतकं क्रौर्य आहे.’ समिलगी संबंधांची ओढ नैसर्गिक आहे हे विज्ञानानं मान्य केलंय. पण समाज ते मान्य करायला तयार नाही. त्यामुळंच चौकटीबाहेरचं जिणं जगणारी माणसं घुसमटतात. त्या माणसांचं भावजीवन सचिन कुंडलकरांची कादंबरी सांगते.

श्रीनिवास अनेक वर्षं अबोल आणि अंतर्मुख पुरुष म्हणून जगला होता. त्याच्या लहानपणी त्यानं त्याचे आजोबा, त्याची काकू आणि त्यांच्या घरी परदेशातून आलेला ज्यूल अशा तिघांचा संभोग पाहिला होता. श्रीनिवासनं कॉलेजच्या वयात त्याच्यासोबत शिकणारे तीन मुलगे आणि एक मुलगी यांना आपलं शरीर सलग आणि वारंवार दिलं होतं.

श्रीनिवास तंजावूर, नंतर चेन्नई आणि नंतर लंडनमध्ये शिकला. शिकून मानसोपचारतज्ज्ञ झाला. मानसिक तणाव असलेली माणसं त्याच्याकडं उपचार करून घेण्यासाठी येत. त्यांच्या मनातला गाळ उपसताना श्रीनिवासची माणूस नावाच्या जनावराशी ओळख झाली.

हे उद्योग करत असता-असता श्रीनिवास स्वत:च्या मनातला गाळ उपसत होता. आपण आहोत तरी कोण, याचा शोध घेत होता. घरच्या लोकांच्या आग्रहाखातर त्यानं सुहासिनी नावाच्या स्त्रीशी लग्नही केलं. जगरहाटी म्हणून, कदाचित स्वत:ला तपासण्यासाठी म्हणून. पण शेवटी त्याला उमगलं की आजी-आजोबा-काकू, घर, घराणं, कुटुंब असं काहीही नसतं. ती सारी शरीरं आणि मनं असतात. प्रत्येकाच्या भुका वेगळय़ा असतात. आपण आजवर आपली भूक ओळखू शकलो नाही, फक्त शरीर कोणाकोणाला दिलं, असं श्रीनिवासला कळतं.

निशिकांत नावाच्या पुणे-मुंबई-पॅरिस-लंडन-मुंबई असं हिंडलेल्या मुलाच्या कुशीत श्रीनिवास विसावतो तेव्हा त्याला आपल्यातली स्त्री सापडते. उभं आयुष्य पुरुष म्हणून जगतो, पण शेवटी आपण स्त्री आहोत हे कळतं आणि श्रीनिवास नाहीसा होतो. या जगात रोजाली आहे, ती ‘चांगल्या स्पर्शाला अनाथ, सतत ओरबाडली गेलेली’ आहे. प्रसन्न नावाचा देखणा मुलगा आहे. ‘माझ्या शरीराला पहिला फुलोरा आला तो फादरच्या कुशीत. त्या भुकेल्या वयात त्यांनी दिवसरात्री हवं तितक्या वेळा मोठय़ा लाडानं मला शांत केलं, माझ्यावर प्रेमाचं पांघरूण घातलं.’ एका कोरियन मुलीला भारतीय संगीतातलं काही कळत नाही, ती भारतीय संगीताची फॅन आहे.

लेखक या सर्वाची गोष्ट सांगतो.

‘मोनोक्रोम’ या ‘पपायरस’ प्रकाशनाने काढलेल्या कादंबरीचा लेखक सचिन कुंडलकर निशिकांतचं लहानपण पाहतो. त्याच्या सवयी आणि विचारांची रीत पाहतो. निशिकांत मुळी इतर मराठी पुणेकरांसारखा नसतोच. तो भरमसाट इंग्रजी पुस्तकं वाचतो. सरासरी मराठी माणूस ती पुस्तकं वाचत नाही. निशिकांत जॅझ संगीत ऐकतो. सरासरी मराठी माणसाला ते संगीत माहीत नाही. निशिकांत नुसता चाल चाल चालत राहतो. साधारण माणूस असं चालत नाही.

लेखकाचं लक्ष निशिकांतच्या आईबापांवरही आहे. एकमेकांवर प्रेम नसतानाही त्यांनी निशिकांतला विनाकारणच जन्म दिलाय. निशिकांत त्याच्या आईच्या तोंडाळ मैत्रिणीकडे राहत असतो. या मैत्रिणीचा नवरा एक लेखक. घर आणि कॉलेज यापलीकडं काहीही न पाहिलेला, कोणालाही भेटणं म्हणजे वेळ वाया घालवणं आहे असं मानणारा. तरीही भरमसाट लिहिणारा. साहित्य संमेलनाचा अध्यक्ष शोभणारा. तो बायकोच्या स्वप्नात येतो. त्याला त्याच्या पुण्यतिथीच्या दिवशी त्याची प्रेमपत्रं आणि आठवणी प्रसिद्ध करायच्या असतात. प्रेमपत्र आणि आठवणी फारशा नसतात. तो बायकोला सांगतो की, साताठशे पत्रं आणि आठवणी तयार कर. पत्रव्यवहार काल्पनिक आणि आठवणीही काल्पनिक. त्यात ‘व्यामिश्र’, ‘साक्षेपी’ असे शब्द घालायला बजावतो. ते सारं मराठी पेपरात छापून येणार असतं. या साहित्यिकाचा मुलगा बापावर वैतागून स्पेनला गेलेला असतो आणि बाप टुकार लिहितो हे त्याला पक्कं माहीत असतं. बाय द वे हा मुलगा ‘गे’ असतो.

लेखकाचं निशिकांतच्या मित्रांवर लक्ष असतं, ते मित्र कोणत्या वातावरणात वाढलेत त्यावर लेखकाचं लक्ष आहे. निशिकांतचा एक मित्र आहे. त्या मित्राचे आईवडील उच्च स्तरातले. ‘शनिवारच्या  मेजवान्यांत त्या काळात भारतात सहजपणे चाखायला न मिळणाऱ्या तुर्की, लेबनीज, रशियन पदार्थाची रेलचेल. दर शनिवारी एक तरुण, होतकरू, पण भयंकर गुणी कलाकार आलेला असे. सारंगी वाजवणाऱ्या मुली, देवस्थानाची उगमस्थानं सांगणारे कोवळे इतिहासकार, हिजडय़ांवर माहितीपट बनवणारे तरुण, सतत भारावून जाऊन थकून गेलेल्या पगारी सामाजिक कार्यकर्त्यां. भरपूर दारू पिऊन आधी कलाकारांचं कौतुक केलं जाई, मग उपस्थित माणसं एकमेकांचं तोंड फाटेस्तोवर कौतुक करायला लागत. नंतर जनावरांसारखं ओरडून शिव्या देत घाणेरडे हातवारे करून नाचत.’ हे सारं निशिकांतला माहीत आहे हे आपल्याला लेखक सांगतो.

वा: काय माणसं.

निशिकांत पॅरिसमध्ये राहिलाय. लेखक पॅरिसबद्दल बोलतो.

‘भूतकाळाला सोन्याच्या चौकटी लावून विकायची कला फ्रान्सनं फार हुशारीनं अवगत केली होती. आपल्या आळशी आणि बडबडआसक्ती असलेल्या जनतेला पोसत जगात टिकून रहायचं असेल तर भूतकाळाच्या उदबत्त्या पेटवून त्या जगभर भयानक किमतीला विकण्याशिवाय आपल्या देशाला पर्याय नाही हे त्या देशानं ओळखलं असावं.

मास्तरकी करणारे आणि तज्ज्ञ असण्याचा आव आणणारे डाव्या विचारांचे आळशी (फ्रेंच) नागरिक. सरकार भरपूर पैसे खर्च करून ते नागरिक जोपासतं. कमीत कमी काम करून भरपूर विचार करावा. मास्तरडे आणि समीक्षक यांचं बंपर पीक पॅरिसमधे निघू लागलं, पुण्यात आणि कलकत्त्यापेक्षा किती तरी जास्त.’

पुण्यातली निशिकांतच्या आईची मैत्रीण आपल्या मांजराना तूप मेतकूट भात खायला घालते.

हे जग लेखक आपल्याला दाखवतो. या जगात ‘मोनोक्रोम’मधली पात्रं वावरतात.

लेखक फार आटोपशीर आहे आणि मुद्दय़ाला धरून राहतो म्हणूनच पुण्यातली मिसळ, पुण्यातले सणवार, बाबासाहेब पुरंदरेंची व्याख्यानं, गणपतीतली ढोलपथकं, व. पु. काळय़ांच्या कथा, मराठीतले बायोपिक वगैरे तपशील त्यानं टाळलं असावेत.

ही कादंबरी म्हणजे एक आटोपशीर चित्रपट आहे. चित्रपटात किरदार असतात. दीड-पावणेदोन तासात बारा-पंधरा पात्रं उभी करायची असतात. पात्रातला दिग्दर्शकाला हवा असलेला, लेखकाला हवा असलेला नेमका जिन्नस निवडून दृश्यं उभी केली जातात. प्रेक्षकाला २० सेकंदांच्या जांभईलाही वाव ठेवायचा नसतो. चित्रपटाचं ते तंत्र कादंबरीत आहे. विषयाला धरून आवश्यक तेवढंच पात्रात शोधलं जातं, तेवढंच मांडलं जातं. फापटपसारा नाही.

 समाजानं लैंगिक संबंधांची एक हज्जारो वर्षांची चौकट स्वीकारली आहे. लैंगिक संबंध केवळ स्त्री आणि पुरुष यांच्यातच असावेत ही ती चौकट. लैंगिक संबंधांत मानसिक आपलेपण, प्रेम असण्याचं बंधन नसतं. केवळ मुलं जन्माला घालण्यासाठी, रूढी म्हणून, लैंगिक संभोग होतो. लैंगिक संबंध जवळपास जनावरांसारखेच होतात.

हज्जारो वर्ष हे चालत आलंय.

खूप म्हणजे खूप माणसांना असे लैंगिक संबंध मान्य नसतात. लैंगिक संबंध कोणाशी असावेत याचं गणित त्यांच्या मनात दडलेलं असतं. मन त्यात गुंतलेलं असतं. मग ते संबंध पुरुष-पुरुष असतील, स्त्री-स्त्री असतील, पुरुष-स्त्री-पुरुष असेही असतील. संबंधांचं हे गणित निसर्गानंच त्या माणसांच्या शरीरात लिहून ठेवलेलं असतं. पुरुषात स्त्री दडलेली असते, स्त्रीत पुरुष दडलेला असतो. एखादं माणूस स्त्री आणि पुरुष दोघांशीही लैंगिक संबंध ठेवू शकतं. लैंगिक संबंध केवळ शारीरिक नसतात, ते मनाचेही असतात. परंतु समाजाला हे मान्य नाही. कायद्याला मान्य नाही. देवधर्माचं तर विचारायलाच नको.

अशा स्थितीत ही माणसं फार एकटी असतात. घुसमटलेली असतात. अपार मानसिक यातना त्यांना सहन कराव्या लागतात. त्या यातना कादंबरीत आहेत. कादंबरीत निशिकांत, शिव, प्रसन्न, श्रीनिवास यांच्या उत्कट लैंिगक संबंधांचं वर्णन आहे. या वर्णनात एक पुरुष आणि एक स्त्री दाखवली असती तर तेच वर्णन एक उत्तम शृंगारिक कथा म्हणून मराठीमान्य झालं असतं. ते वर्णन दोन पुरुषांतलं असल्यानं मराठी कपाळावर आठय़ा पडू शकतात.

कादंबरी बारकाईनं वाचली की वाटतं, कुंडलकरांनी ही चित्रपटाची पटकथाच लिहिलीय. मासला म्हणून खालील वाक्य वाचा.

‘निशिकांत पावसात धावपळ न करता शांत भिजत जाणाऱ्या श्रीनिवासकडे तो दिसेनासा होईपर्यंत पाहत राहिला. त्याने बाहेरच्या बाजूनं काचेवर चालणाऱ्या  ओघळासोबत काचेच्या आतून आपलं बोट फिरवत फिरवत खालपर्यंत

पर्यंत आणलं.

.. मग त्याने समोरचा कप उचलून श्रीनिवासनं न प्यायलेली कॉफी पिऊन टाकली.

श्रीनिवासची पत्नी सुहासिनी. श्रीनिवासनं निशिकांतला लिहिलेल्या उत्कट पत्रांचा अर्थ तिला समजत नाही. एक परदेशात शिकलेला, समृद्ध घरचा, हिंदू माणूस आणि आपल्याशी रममाण होत नाही हे तिला उलगडत नाही.

सुहासिनीला श्रीनिवासची घुसमट समजत नाही. भारतीय समाजाचंही तेच. त्यांनाही श्रीनिवास, निशिकांत समजत नाहीत.’

हाच तर कादंबरीचा गाभा.

कादंबरी वाचकांना सांगते, ‘वरवर भाबडय़ा वाटणाऱ्या भारतीय साधेपणात इतर कोणत्याही समाजात सापडणार नाही इतकं क्रौर्य आहे.’

समिलगी संबंधांची ओढ नैसर्गिक आहे हे विज्ञानानं मान्य केलंय. पण समाज ते मान्य करायला तयार नाही. त्यामुळंच चौकटीबाहेरचं आयुष्य जगणारी माणसं घुसमटतात. त्या माणसांचं भावजीवन कुंडलकरांची कादंबरी सांगते. म्हणूनच तिचं स्वागत केलं पाहिजे. कुंडलकर जगाबद्दल बोलतात आणि त्या माणसांबद्दलही.

कुंडलकरांची भाषा, रूपकं, प्रतिमा सारं सारं वेगळं आहे, वाचनीय आहे, प्रसंगी धमालही आहे.

मराठीत असं लेखन किती होतं?

शोधपत्रकार आणि लेखक म्हणून पाच दशकांपासून सक्रिय. ‘मराठवाडा’, ‘माणूस’ या साप्ताहिकापासून पत्रकारितेस आरंभ. ‘दिनांक’ साप्ताहिकाचे सहसंपादन. विविध नियतकालिकांतून सातत्याने लिखाण. हिंदी आणि इंग्रजीतूनही लेखन. ‘अवघड अफगाणिस्तान’, ‘इस्तंबूल ते कैरो’, ‘उस्मानाबादची साखर आणि जगाची बाजारपेठ’, ‘टेलिवर्तन’ आदी गाजलेली पुस्तके. अखंड वाचक आणि कार्यरत ब्लॉगर हीदेखील एक ओळख.

lokrang@expressindia.com

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Author nilu damle article about monochrome novel by sachin kundalkar zws
First published on: 04-06-2023 at 01:07 IST