scorecardresearch

Premium

दु:खपंडिताची दास्तान…

‘सध्या मराठी कथेला फार वाईट दिवस आलेले आहेत. सुमारे चाळीस वर्षांपूर्वी मराठी कथेला जो बहर आला होता, तो गेल्या काही वर्षांत पूर्णपणे ओसरला आहे.

दु:खपंडिताची दास्तान…

|| पंकज भोसले

कथाकार भारत सासणे यांची उदगीर येथे होणाऱ्या अ. भा. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. गेली ३५-४० वर्षे व्रतस्थपणे लेखन करणाऱ्या आणि कोणत्याही साहित्यिक कोंडाळ्यापासून कायम दूर राहणाऱ्या या लेखकाचे लेखन परिचित वाटावळणांचे नाही. त्याच्याशी वाचकाला सलगी करावी लागते. चोखंदळ वाचक त्या वाटेनं आवर्जून जातात. त्यांच्या या साहित्यवळणाचा मागोवा…

canada allegations on india
India-Canada Conflict: कॅनडाचे भारतावर आरोप, अमेरिका व ऑस्ट्रेलियाचा कॅनडाला पाठिंबा; जागतिक स्तरावर भारतविरोधी भूमिका!
abhidnya bhave shared swami samarth experience
नवऱ्याच्या आजारपणात अभिज्ञा भावेला ‘अशी’ आली स्वामींची प्रचिती; अनुभव सांगत म्हणाली, “तेव्हा माझ्या डोळ्यात…”
donald trump
“डोनाल्ड ट्रम्प यांचा मृत्यू झालाय”, माजी राष्ट्राध्यक्षांच्या मुलाच्या ट्वीटनंतर खळबळ, नेमकं प्रकरण काय?
What Udaynidhi Stalin Said?
उदयनिधी स्टॅलिन यांचा भाजपाला सवाल, “हाच का तुमचा सनातन धर्म? राष्ट्रपती विधवा आहेत म्हणून..”

‘सध्या मराठी कथेला फार वाईट दिवस आलेले आहेत. सुमारे चाळीस वर्षांपूर्वी मराठी कथेला जो बहर आला होता, तो गेल्या काही वर्षांत पूर्णपणे ओसरला आहे. आपल्या साहित्यविश्वात जर पंचवीस-तीस वर्षांपूर्वीचे चैतन्यपूर्ण वातावरण आज असते तर सासणे यांचा दीर्घकथांचा संग्रह मोठ्या प्रमाणावर गाजला असता, चर्चेचा विषय झाला असता. त्यांच्याबद्दलचे माझे भविष्यकथन असे आहे : लेखक म्हणून येत्या काही वर्षांत ते फार मोठी आघाडी मारतील. मोठा लौकिक मिळवतील. कदाचित लघुकथा लेखनात ते फारसे अडकणार नाहीत. कारण त्यांना कादंबरीकडे… मोठ्या कादंबरीकडे वळणे आवश्यक आहे.’ – जयवंत दळवी, १ डिसेंबर १९८५.

 (चिरदाह, दीर्घकथा संग्रहाच्या प्रस्तावनेतून)

‘ठणठणपाळ’ बनत भल्या भल्या लेखकांची रेवडी उडवणाऱ्या जयवंत दळवींनी ४० वर्षांपूर्वी व्यक्त केलेले कथावर्तमान आणि भारत सासणे यांच्या लेखनाविषयीचे भविष्यमान किती खरे ठरले, हे सांप्रतकालीन कथाप्रवाहाकडे किमान पाहणाऱ्याला तरी लक्षात येईल. ‘सत्यकथे’तील प्रयोगशील कथेच्या ‘रिपेअरिंग’ व्यवस्थेपासून दूर राहिलेली- आणि त्यामुळेच की काय प्रस्थापित नावांच्या कथावकुबाला आव्हान देणारी कथा भारत सासणेंकडून लिहिली गेली. ऐंशी-पंच्याऐंशी सालातील सत्यकथेचा अस्त आणि भारत सासणेंच्या लेखणीला आलेला बहर या दोन्ही गोष्टी लक्षात घेतल्या तर सासणेंची कथा ही बुद्धिवादी समीक्षकांनी ठरवून दिलेल्या ‘शुद्ध साहित्यिक’ मापदंडांच्या कक्षेत न सामावताही तिची वाट शोधत राहिली. वाचकांचा, चाहत्यांचा जथा बनवत राहिली.

नकारात्मक सृष्टीचे ज्ञान देणाऱ्या आणि आयुष्यातील दु:खरंगांच्या छटा लेखणीतून हयातभर साकारणाऱ्या जी. ए. कुलकर्णी यांच्या कथांमधून मिळणाऱ्या मानवी जाणिवांचे अधिक विस्तारित रूप सासणेंच्या दीर्घकथांमधून सापडते. (वास्तविक ही तुलना सासणेंच्या कथेकडे पाहण्याचा पूर्वग्रह तयार करीत असली तरीही अपरिहार्यच.) व्यक्तीस्वभाव विशेषांचे, त्याच्यातील एकटेपणाचे कितीतरी नमुने सूक्ष्मलक्ष्यी वर्णनांनी त्यांच्या कथांमधून पाहायला मिळतात. ‘सुखसाधकांच्या ताफ्यांसमोर नेमेचि येणारा दु:खांचा पाऊस’ ही त्यांच्या कथांतील मध्यवर्ती संकल्पना असली तरी कथातंत्राच्या,भाषेच्या, लेखन-वाचन आनंदाच्या प्रयोगांना सासणे कसे राबवतात, हे पाहणे कुतूहलाचे असते.

वरच्या जयवंत दळवींच्या परिच्छेदात चार दशकांपूर्वी कथा या प्रकाराच्या दूरवस्थेत पुढील चार दशकांत आणखी भर पडली. त्याला कारण चांगले कथालेखन घडत नव्हते हे नाही, तर चांगल्या किंवा कोणत्याही कथांचे साठोत्तरीच्या तुलनेत मूल्यमापनच होत नव्हते. नव्वदोत्तरीतील लेखक आणि लेखन अधिकाधिक वाचले जावे यासाठी पुढाकार घेणारी नियतकालिकांची यंत्रणाच हद्दपार होत होती. जागतिकीकरणाच्या चाकाने वेग आलेल्या आयुष्याला, केबल-क्रांतीने मनोरंजनाच्या दिलेल्या बहुविध पर्यायाला आणि संगणक-मोबाइलने स्मार्ट बनलेल्या जगण्यालाही ताणेबाणे होते आणि ते या काळातील कथालेखक तीव्रतेने मांडत होते. मिलिंद बोकील, सानिया, सतीश तांबे, सुमेध वडावाला रिसबुड, राजन खान, संजीव लाटकर, अनंत सामंत, आशा बगे, मेघना पेठे, जयंत पवार, जी. के. ऐनापुरे, रंगनाथ पठारे, राजन गवस, पंकज कुरुलकर ही नव्वदीच्या दशकावर ठसा पाडणारी कथालेखकांची फौज. या साऱ्यांच्या कथांकडे पाहिले तर कुणी नात्यांची बदलती रूपे शोधत होते, कुणी मुंबईतून मराठी माणसाच्या विस्थापन आणि अनागोंदी पसरलेल्या व्यवहारांच्या नोंदी टिपत होते, कुणी ग्रामीण भवतालाचा आक्रस्ताळा बदल दाखवत होते, कुणी अत्याधुनिक स्त्रीजाणिवांचा कैवार करीत होते, तर कुणी समुद्रापारच्या समाजात आपली कथा आकारण्याचा अट्टहास करीत होते. या काळात सासणेंची कथा मानवी दु:खांची नवनवी समीकरणे उकलत होती. जागतिकीकरणोत्तर काळातील समाजबदल त्यांच्या कथांतून डोकावत होताच; पण आदिम, अनाकलनीय वर्तनांत अडकलेली नाती आणि त्यांतून उत्पादित होणाऱ्या दु:खांची नवनवी रूपे ते कथांमधून घडवीत होते.

या काळात सासणेंची कथा अग्रभागी असण्याची दोन कारणे होती. आधी इतरत्र खूप लिहिणाऱ्या सासण्यांच्या कथांना १९९० आधीच्या काही वर्षांपासूनच ‘मौज’ आणि ‘दीपावली’ या (नंतरच्या काळात ‘सत्यकथे’चे मापदंड पाळणारी अशी ओळख असणाऱ्या) वार्षिकांकात मानाचे स्थान मिळाले. मौज, दीपावली, साधना या दिवाळी अंकांतील दीर्घकथा विभागात पहिले नाव सासणेंचे वाचण्याची सवय वाचकाला झाली होती. आणि आता सासणेंचा निवेदक कोणत्या अद्भुत जगाची आणि किरमिजीश्रीमंत जगाची ओळख करून देतो याची ओढही लागून राहिली होती. दुसरे कारण म्हणजे समकालीन लेखकांपेक्षा अधिक तल्लीनतेने मानवी दु:खाचा पसारा शोधण्याकडे त्यांचा कल अधिक असल्याने कथांत येणारे तपशील, तंत्र आणि भाषिक कौशल्य वाचकाला सर्वार्थाने नव्या जगात नेणारे होते. शासकीय नोकरीमुळे विविध तालुक्यांमधील वास्तव्यानुभवांचा आणि तिथल्या मातीतील कथा, आख्यायिका, लोकवदंतांचा कथासूत्र वापरण्याचा छंद जडल्याने त्यांच्या कथेला ‘नागर कथा’ म्हणता येत नाही, तसेच ‘ग्रामीण’ म्हणूनही तिची वाचननोंद होऊ शकत नाही. शहरगावांत घडणाऱ्या घटनांना ते आपल्या काव्यात्मक भाषेत आणि पावसाच्या अस्तित्वात साकारतात. ‘लोखंडी रंगाचे’, ‘जास्वंदी रंगाचे’ संधीप्रकाशातील वातावरण अनेक कथांमधले मुख्य घटक बनतात. वाक्यांचे पुनरावृत्त संदर्भ सौंदर्यवर्धक दागिन्यांसारखे परिच्छेद सजवत कथेला अधिकाधिक आकर्षक आणि रहस्यपूर्ण अवस्थेत नेतात आणि त्याची उकल करण्यासाठी वाचकाला खिळवून ठेवतात.

वनमंत्र्यांच्या गावातला उंट मेल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लेखी असलेल्या तीन क्षुल्लक कर्मचाऱ्यांवर पालिकेच्या गाडीतून नवा उंट आणण्याची सोपविलेली जबाबदारी आणि दु:खाच्या आपापल्या डोंगरांना खांद्यावर वागवणाऱ्या त्या तिघांना सामोरे जावे लागणारे अडथळे ‘उंट’ या कथेला परमोच्च पातळीवर नेतात. एकाच वेळी ही शोकांतिका कथनाचे अनेक प्रयोग राबविते. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चर्चा आणि प्रत्यक्ष कामात राबणाऱ्या घटकांपुढील आंतरिक समस्या या दोन्ही एकमेकांशी अनभिज्ञ जगांचे सूक्ष्म विच्छेदन सासणेंमुळे वाचकांना अनुभवायला मिळते. या कथेची काव्यात्मक सुरुवात लक्षात राहणारी आणि पुुढे पुढे कथा संपेस्तोवर व्यसन जडवणारी आहे.

‘चंद्र निघाला.  झाडाच्या फांद्यांमधून चंद्रप्रकाश विखरून त्या तिघांवर पसरला आणि वारं सुुटलं. फांद्या हलू लागल्या. त्यामुळं छोटी छोटी फुलं त्यांच्या अंगावर पडू लागली आणि कसलंसं सुगंधी वातावरण तयार झालं.’ पुढे काही अंतराने उंटासह परतणाऱ्या तिन्ही व्यक्तिरेखांवर चंद्राची सावली पडण्याचा उल्लेख ‘थाळीसारखा चंद्र निघाला आणि लिंबाच्या झाडातून गाळून चांदीचा प्रकाश त्या तिघांवर पसरला…’ अशी वर्णनं सासणेंच्या कथांतून सहजगत्या येतात.

सासणेंची कथा वाचकांवर त्यांच्या लेखनात वारंवार येणाऱ्या वाक्याप्रमाणे ‘कसले तरी संमोहन पसरवत जाते.’ सासणेंच्या ‘जॉन आणि अंजिरी पक्षी’ या पहिल्या संग्रहातील ‘कावळे उडाले स्वामी’ ही कथा त्यांच्या पुढील दीर्घकथांचा भक्कम पाया म्हणून मानावी लागेल. ग्रेस यांच्या लोकप्रिय कवितेच्या ओळी शीर्षकासाठी वापरून तयार झालेल्या या कथेतील दु:खघटकांची आवर्तने विस्तृत स्वरूपात पुढील कथांमध्ये दिसतात. आईसोबत नाखुशीने आडगावच्या धर्ममठामध्ये दाखल झालेल्या मुंबईच्या उपनगरातील तरुणाची पुढे आत्मशोधाकडे जाणारी वाट सासणेंचे अनेक नायक स्वीकारताना दिसतात. ‘कर्म’ या कथेतील ब्रह्मदेव बंडूजी नावाचे मुख्य पात्र आपल्या गावात एका विलक्षण कारणासाठी परतते. भरभराटीत असताना आपल्या जिंबो नावाच्या कुत्र्याच्या गळ्यात चांदीची चैन घालणारा पंचविशीतील तरुण वाताहतीच्या फेऱ्यात आल्यानंतर त्या चांदीच्या चैनीला परत मिळवण्याची आस घेऊन असतो. वर्षभरात रोगट आणि पिसाळलेल्या जिंबोचा गावभर माग काढणारी ही कथा तिच्या विषयापासून रचनेपर्यंत पानोपानी थक्क करते. ‘आयुष्य, दो दिसांची वस्ती’ कथेतील दामोदर पादरे नावाचा तरुण आपल्या आडनावाचे मूळ शोधत येणेगुर या खेड्यात पोहोचतो. तिथे घडणाऱ्या घटनांची मालिका आपल्याला अज्ञात असलेल्या प्रदेशाची दारे उघडून देते. ‘डफ’, ‘एका प्रेमाची दास्तान’, ‘दूर तेथे, दूर तेव्हा’, ‘अस्वस्थ विस्तीर्ण रात्र’, ‘रात्र क्षितिजावरची रात्र’, ‘ठकाजी रामाच्या स्मरणातील रात्र’, ‘रंगराजाचा अजगर’, ‘पाप आणि वटवाघुळ’, ‘चिरतरुण दु:खांचे बुरूज’ आदी त्यांच्या कित्येक  अव्वल दीर्घकथांचा परिसर आयुष्यभरासाठी मनावर गोंदणारा.

त्यांची ‘दोन मित्र’ ही कादंबरी भोवतालच्या राजकीय आणि सामाजिक विघटनाचे बारकावे टिपणारी. दोन दशकांपूर्वी लिहिलेले त्यातील संदर्भ आणखी दोन दशके  तरी ताजेच राहतील इतके चपखल आहेत. त्यांची एक दीर्घकथा टीव्ही सीरियलचे एपिसोड्स पाडणाऱ्या लेखकाचे आहेत. एक कथा जादुगारीतल्या शंभर वर्षांच्या इतिहासाला सांधत ही विद्या आत्मसात करण्याची मनसा धरणाऱ्या तरुणावरची आहे. सासणेंनी नाटके लिहिली. नाटकासारख्या संवादी कथांचा प्रयोग केला. लहान मुलांसाठी पुस्तके लिहिली. आणि हिंदीतून एका विलक्षण कादंबरीचा अनुवादही केला. गेल्या पस्तीस-चाळीस वर्षांत त्यांनी लिहिलेल्या कथन साहित्याचा पसारा माहीत असणाऱ्यांना वरील विवेचनात नवे काही सापडणार नाही. तरी दीर्घ म्हणून लांब राहणाऱ्या किंवा वेगवेगळ्या कारणांमुळे अपरिचित असलेल्या वाचकांना सासणेंच्या कथाविश्वाच्या गुरुत्वाकर्षणात अडकण्यासाठी चांगली संधी आली आहे. उदगीर येथील साहित्य संमेलनासाठी अध्यक्ष म्हणून निवड झालेल्या या दु:खपंडिताची कथाऊर्जा समजून घेणे वाचक म्हणून समृद्ध होण्यासाठी महत्त्वाचे आहे.

pankaj.bhosle@expressindia.com  

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-01-2022 at 00:04 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×