सुबोध जावडेकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरी जग क्षणभंगुर, चिंताग्रस्त आणि अनाकलनीय बनले आहे. ‘बटरफ्लाय इफेक्ट’  या गणेश मतकरी यांच्या संग्रहातील बहुतेक कथांत काहीतरी अगम्य, गूढ आहे. त्याचा शोध आहे. पण तरीही रूढार्थानं या गूढकथा नाहीत. स्वत:च्या अस्तित्वाबद्दलच्या प्रश्नांची उत्तरं शोधणाऱ्या माणसांच्या कथा आहेत.

साठ वर्षांपूर्वी भाऊ पाध्यांचं ‘वासूनाका’ प्रसिद्ध झालं. त्यात झोपडपट्टीत राहणाऱ्या अडनिडय़ा वयातल्या पोरांच्या कथा होत्या. त्या एकाच जगाशी निगडित आणि एकाच शैलीत लिहिलेल्या असल्यामुळे त्या कथासंग्रहाला कादंबरी सदृश स्वरूप आलं होतं. जयंत पवारांनी ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ या कथासंग्रहातून वेगवेगळय़ा कथांमधून मुंबईतल्या गिरणगावचं, कामगार वस्तीचं अनेकांगी दर्शन घडवलं होतं. अलीकडे हृषीकेश गुप्ते (गोठण्यातील गोष्टी), पंकज भोसले (विश्वामित्र सिंड्रोम), निखिलेश चित्रे (गॉगल लावलेला घोडा) यांनी अशाच प्रकारे कथांचा कोलाज पेश करून एका गावातलं किंवा परिसराचं जग उभं केलं. ‘बटरफ्लाय इफेक्ट’ या पुस्तकात गणेश मतकरींनीही अनेक कथांतून मुंबईतल्या विशिष्ट जगाचं चित्र रेखाटलं आहे.

हे जग आहे श्रीमंत आणि उच्चभ्रू तरुण-तरुणींचं. या जगातल्या माणसांना खाण्यापिण्याची भ्रांत नाही. राहायला उत्तम घरं आहेत. पण म्हणून ती सुखी आहेत का? अजिबात नाहीत. त्यांनाही समस्यांनी जेरीला आणलं आहे.  शहरात राहणाऱ्या या मंडळींना दिवसरात्र करावं लागणारं काम, रोजच्या प्रवासाची दगदग, कॉर्पोरेट विश्वातली जीवघेणी स्पर्धा, समाजापासून तुटलेपण, त्यांतून येणारं नैराश्य यांनी त्याना घेरलं आहे. शहरी जीवनशैलीचे हे अटळ भोग त्यांच्या नशिबी आले आहेत. 

जमाइस कॅसीओ या अमेरिकन लेखकानं सध्याच्या जगाला बानी (BANI)) जग असं नाव दिलं आहे.  Brittle,  Anxious,  Nonlinear आणि  Incomprehensible या शब्दांची आद्याक्षरं घेऊन हा शब्द बनवलाय. आजच्या जगात सर्वच गोष्टी ठिसूळ, चटकन मोडणाऱ्या झाल्या आहेत. माणसं सतत एका तणावाखाली वावरताहेत. पुष्कळदा इथं छोटय़ाशा गोष्टींचा प्रचंड मोठा परिणाम होताना दिसतो. याला ‘बटरफ्लाय इफेक्ट’ असं म्हणतात. त्यामुळे साध्यासाध्या गोष्टींचा बऱ्याचदा अर्थच लागत नाही. मतकरींच्या कथासंग्रहातल्या जगाला हे वर्णन तंतोतंत लागू पडतं. हे शहरी जग क्षणभंगुर, चिंताग्रस्त आणि अनाकलनीय आहे. या संग्रहातील बहुतेक कथांत काहीतरी अगम्य, गूढ आहे. त्याचा शोध आहे. पण तरीही रूढार्थानं या गूढकथा नाहीत. स्वत:च्या अस्तित्वाबद्दलच्या प्रश्नांची उत्तरं शोधणाऱ्या माणसांच्या कथा आहेत.

मतकरी चित्रपटांचे अभ्यासक आहेत. साहजिकच चित्रपटांचे अनेक संदर्भ त्यांच्या पात्रांच्या आणि निवेदकाच्या तोंडी येतात. आपल्याला आवडणाऱ्या मुलीचा पाठलाग करताना ‘जगबुडी’तल्या गायतोंडेला आपण एखाद्या तद्दन हिंदी सिनेमातला हिरो असल्याचा भास होतो. ‘फेरा’तल्या आजोबांना घरापासून लांब राहायची मुभा मिळते तेव्हा त्यांच्यासाठी ती ‘सिमरन, जी ले अपनी जिंदगी’ मोमेंट असते! असे अनेक.

मतकरींची पात्रं कित्येकदा समोरची दृश्यं कॅमेऱ्यातून पाहत असल्यासारखी पाहतात. गायतोंडेला गोरेगावच्या ट्रॅफिक जॅमचे दृश्य टॉप अँगलनं दिसतं तर ‘कौल’मधल्या स्ट्रेचरवरून नेल्या जाणाऱ्या शिल्पाला वरचं दृश्य लो अँगलनं दिसतं. (वर दिसणारे पांढरे फॉल्स सीिलग. त्यावर दर दहापंधरा फुटांच्या अंतरावर लावलेलं मोठं चौकोनी लाइट फिटिंग. स्ट्रेचर ढकलणाऱ्या वॉर्ड बॉईजचे गंभीर चेहरे.) ‘कौल’, ‘नॅरेटर्स’सारख्या काही कथांतल्या दृश्यांना लाँग शॉट, क्लोज-अप सारखी तंत्रं वापरून शोर्ट फिल्म्सचा फील दिला आहे. ‘कौल’, ‘दुय्यम’ सारख्या काही कथा भूतकाळात न लिहिता रीतीवर्तमान काळात लिहिल्यानं चित्रपटाची गोष्ट ऐकत असल्याचा परिणाम साधला जातो.

कथांमधलं वातावरण चित्रदर्शी आहे. आत्महत्येचा विचार सुमितच्या मनात येतो तेव्हाचं वातावरण (लांबवर एखाद्या कुत्र्याचं रडणं आधीच्या शांततेला अधिकच गहिरं करतं. शर्टात टिकून राहिलेली किंचित ओल, तो पिवळट प्रकाश, हातातल्या सिगरेटची ठिणगी आणि धूर..). हॉस्पिटलमधलं उदास वातावरण (िभतींचा मळकट पांढरा रंग. त्यावर टेक्सश्चरसारखे उमटलेले पावसाळय़ाच्या लीकेजचे डाग. अंधारलेल्या कोंदट जागेत भगभगीत टय़ूबलाईटचा निर्जीव प्रकाश). अशी चित्रमय वर्णनं पात्रांच्या मनस्थितीवर नकळत भाष्य करतात.

मतकरींच्या कथांतून चित्रपटांचे उल्लेख येतात हे खरं असलं त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्यांना चित्रपटातल्या केवळ सिच्युएशन्स आठवत नाहीत, त्यातल्या पात्रांच्या भावभावना, त्यांची जीवनदृष्टीही आठवते. त्या चित्रपटांचं मर्म मतकरींना आकळलेलं असल्यामुळे त्यांची पात्रं समोरचा प्रसंग एखाद्या क्लासिक सिनेमातल्या सिच्युएशनशी जोडून घेऊ शकतात. ‘इंस्टिक्ट’मधल्या मंगेशचा फोन हरवतो तेव्हा त्याला ‘बायसिकल थीव्ज’मधल्या नायकाची सायकल चोरीला जाते, तो प्रसंग आठवतो. मग त्याच्या अचानक लक्षात येतं की, तो सिनेमातला सायकल शोधणारा आणि आपण यांच्यात तसा काहीच फरक नाही. आपल्यावर झालेल्या अन्यायाचं उत्तर त्यानं दुसऱ्यावर अन्याय करून दिलं. आणि फोन चोरीला गेल्याचं खोटं सांगून आपण तरी दुसरं काय केलं? अशी चिंतनशीलता त्यांचे सगळेच कथानायक दाखवतात.

मराठी टीव्हीबद्दल लेखकाचं फारसं चांगलं मत नाही. त्याची खिल्ली उडवण्याची एकही संधी तो सोडत नाही. ‘जगबुडी’ या कथेत जगभर निसर्गाचं रौद्र थैमान चालू असताना एका मराठी न्यूज चॅनेलवर बातम्यांऐवजी कुकरी शो चालू असतो. कहर म्हणजे त्याच वेळी खालच्या पट्टय़ांवर मात्र  ‘प्रलयाची चाहूल’,  ‘युरोपच्या पश्चिम किनाऱ्यावर वादळ’, ‘जगबुडी येणार’ अशा ‘काहीबाही’ गोष्टी सरकत असतात! लोकल ‘बीबीसी’ चॅनेलवर बोलणारा माणूस तोंडातल्या तोंडात शब्द घोळवत ओरिजनल बीबीसी अ‍ॅक्सेन्टची नक्कल करत असतो. एका मराठी चॅनेलवरची अमराठी बाई मंत्रपठण केल्याच्या आवेशात आणि अ‍ॅक्सेन्टमध्ये बातम्या वाचून दाखवत असते.

मतकरी आपल्या कथांमध्ये निवेदनाला अधूनमधून नर्मविनोदाची फोडणी देतात. मसाजला ते ‘परक्या माणसाकडून स्वत:ची धुलाई करून घेणं म्हणतात’. मुजोर रिक्षावाले जवळचं भाडं नाकारतात. त्याचं वर्णन ते ‘त्यांना स्वत:ला जिथं जायचं तिथंच योगायोगानं कोणाला जायचं असेल तर त्या गिऱ्हाईकाला बरोबर नेण्याची ‘चॅरिटी’ करतात’, असं करतात. युनिफॉम्र्स कथेचा नायक ‘श्वास घेणं ही माझी मूलभूत गरज असल्यामुळे आणि टॉर्चर हा माझ्या फारसा जिव्हाळय़ाचा मर्दानी खेळ नसल्यामुळे मी ट्रेन प्रवास तात्काळ बंद केला’, असं सांगतो. त्याची बहीण सारिका ‘‘तू पुढेमागे एखादी कंपनी काढलीस तर त्याचं नाव ‘गाजराची पुंगी’ ठेव. चालली तर चालली नाहीतर.. ’’ अशी त्याची थट्टा करते. अशा खेळकर भाषेतल्या निवेदनामुळे त्यांना एक वेगळीच खुमारी येते.

कॉर्पोरेट विश्वात वावरलेले असल्यानं मतकरींना ते जग आतून-बाहेरून माहीत आहे, याचा प्रत्यय जागोजाग येतो. इथं बॉसला त्याच्या हाताखालचे लोक एकेरी नावानं हाक मारतात. इतकंच काय तर त्याचं भाषण चालू असताना मीटिंगमधून कॉफी किंवा सिगारेट पिण्यासाठी उठूनसुद्धा जाऊ शकतात. दोन मित्र जेव्हा क्लायंट आणि कन्सल्टटंट म्हणून एकमेकांसमोर येतात तेव्हा ओळख दाखवत नाहीत. इंटिरियर डेकोरेशन करणाऱ्या फर्मबरोबरचा वाद मिटवण्याबद्दल सौम्याला ‘ब्राऊनी पॉइंट्स’ (एखाद्याला क्रेडिट मिळणं या अर्थानं कॉर्पोरेट विश्वात वापरला जाणारा शब्द) मिळणार असतात. एखादी कंपनी डबघाईला आली की त्या कंपनीतला बॉसच हाताखालच्याला ‘इथून वेळेवर येथून बाहेर पड’ असं सांगतात. त्याला नवीन जॉबही मिळवून देतात. मराठी साहित्यिकांच्या लिखाणात कॉर्पोरेट विश्वाची जी हास्यास्पद वर्णनं अनेकदा वाचायला मिळतात त्या पार्श्वभूमीवर मतकरींच्या कथा उठून दिसतात.

बोलताना कथेतल्या पात्रांच्या तोंडी काही विशेष शब्द किंवा शब्दप्रयोग येतात. त्यावरून आपल्याला त्या पात्राची सांकृतिक पार्श्वभूमी आणि आर्थिक स्तर आपोआप कळतो. उदाहरणार्थ, कारचा रंग नुसता ‘लाल’ न म्हणता तर ‘फायर रेड’ म्हणणारा एकतर गाडीच्या धंद्यातला म्हणजे गॅरेजवाला तरी असतो किंवा नवश्रीमंत असतो. वांद्य्राला ‘बँड्रा’ म्हणणारा हटकून कॉन्व्हेन्टमध्ये शिकलेला असतो. मतकरी अशा शब्दांचा जाणीवपूर्वक आणि अर्थपूर्ण उपयोग करून घेतात. बघा ना, त्यांच्या कथेतलं एक पात्र बियर घेत नसतं तर ‘करोना लाईट’ घेत असतं किंवा कॉफी नव्हे ‘फ्लॅट व्हाईट’ पीत असतं. सौम्यानं मैथिलीला ‘न्यू इयर बॅश’मध्ये पाहिलेलं असतं. आर्ट स्कूलला जाऊन पार्थच्या मित्राला ‘हिप’ वाटायला लागतं. असे शब्दप्रयोग न बोलता खूप काही सांगून जातात.

या कथांमध्ये संवाद खूप कमी आहेत. पण निवेदनाच्या अनौपचारिक शैलीमुळे त्यांची उणीव जाणवत नाही. ‘मुंबईत कुठला आलाय कसला पाऊस?’, ‘ते आले ते बरंही झालं आणि नाहीही’ अशी बोलण्यातली भाषा किंवा अधूनमधून  ‘नाऊ कम ऑन’, ‘आय नो, आय नो’, ‘व्हॉटेव्हर दॅट मीन्स’, ‘टु कट द लॉंग स्टोरी शॉर्ट’ असे इंग्रजी वाक्प्रचार वापरल्यानं लेखक वाचकांबरोबर गप्पा मारत आहे असा भास होतो.  

मतकरींच्या कथेत इंग्रजी शब्दांचा अतिरेकी वापर असतो, अशी टीका त्यांच्यावर केली जाते. पण एकतर, कथेतल्या पात्रांची पार्श्वभूमी बघता ते अशा भाषेत बोलणं अगदी स्वाभाविक आहे. वासूनाक्यातल्या टपोरी पोरांच्या तोंडी शिव्या असणं जितकं नैसर्गिक आहे तितकंच ‘बटरफ्लाय इफेक्ट’मधल्या पात्रांच्या तोंडी इंग्रजी शब्द येणं नॅचरल आहे. शिवाय ‘ऑब्व्हीअस चॉइस’, ‘डिफॉल्ट मोड’, ‘स्टिम्युलेशन’, ‘प्लग-इन’ यांसारख्या कित्येक शब्दांना सोपे आणि चपखल मराठी प्रतिशब्दही नाहीत.

कथांमध्ये फारसे संवाद नसले तरी याचा अर्थ लेखक संवाद लिहू शकत नाही असं मुळीच नाही. ती त्यांनं जाणीवपूर्वक स्वीकारलेली शैली आहे. याचं कारण पुस्तकात  जिथं कुठं संवाद आले आहेत ते त्या त्या पात्राच्या तोंडी शोभतील असे अस्सलच आहेत. उदाहरणार्थ, कॉर्पोरेट विश्वातले लोक ‘‘दोनएक दिवसांत इश्यू सोर्ट आउट नाही झाला तर लेटस टच बेस’’, अशी धेडगुजरी भाषा बोलतात तर गॅरेजवाला उस्मान ‘‘उसकी आँख का कलर थोडा अलग लगा मेरेकू..’’, असं हैदराबादी हिंदी बोलतो. गॅरेजमधल्या पोरांची जबानी घेताना पोलीस ‘‘कुणाला च्युत्या बनवता रे भाडखाव?’’, अशा भाषेत डाफरतो मात्र फोन चोरीला गेल्याची तक्रार करायला आलेल्या मंगेशवर ‘‘बोला आता, काय, कुठे, सांगा चटचट’’, असं किंचित सौम्यपणे गुरकावतो.

जर्मनीत नुकत्याच झालेल्या एका संशोधनात असं दिसून आलंय की शहरातली गर्दी, गजबज, धावपळ, रहदारी, आवाज, यांचा शहरात राहणाऱ्या माणसांच्या मेंदूवर विपरीत परिणाम होतो. त्यांच्या मेंदूतले दोन भाग, अमिग्डाला आणि सिंग्युलेट कॉर्टेक्स, हे सतत उत्तेजित अवस्थेतच राहतात. त्यातला पहिला भाग आपण एखाद्या परिस्थितीत लढायचे की पळ काढायचा ते ठरवतो. आणि दुसऱ्या भागाकडे नकारात्मक भावनांवर नियंत्रण ठेवायचं काम सोपवलेलं असतं. त्यामुळे होतं काय की शहरात राहणाऱ्या माणसांच्या भावनांचा केव्हा कडेलोट होईल ते सांगता येत नाही. आणि नैराश्य, अवास्तव चिंता, आत्महत्येचे विचार, यांसारख्या भावनांना ती सहजी बळी पडू शकतात.

मतकरींच्या या कथासंग्रहातील प्रत्येक कथेतून या वास्तवाचा अचूक प्रत्यय येतो.

मुंबई आयआयटीमधून रसायन अभियांत्रिकीची पदवी. एसीसी, हिंदूस्तान लिव्हर, स्टँडर्ड अल्कली आणि जेकब्स या कंपन्यांमध्ये सदतीस वर्षे नोकरी. १९८२ सालापासून विज्ञानकथा लेखनात सक्रिय. कुरुक्षेत्र, गुगली, चाहुल उद्याची, पुढल्या हाका, संगणकाच्या सावलीत हे कथासंग्रह लोकप्रिय. हसरं विज्ञान, मेंदूच्या मनात आदी ललितेतर पुस्तके.

subodh.jawadekar@hotmail.com

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Author subodh javadekar article on novel butterfly effect by ganesh matkari zws
First published on: 21-05-2023 at 01:06 IST