अंजली अंबेकर
गुलज़ार हे नाव चित्रपट दिग्दर्शक, गीतकार, कवी, पटकथाकार, साहित्यिक आणि अलीकडे चित्रकार म्हणूनही लोकप्रिय आहे. त्यांच्या साहित्याचे अनेक भारतीय भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. कुठल्याही भाषेतून अनुवादित न होता मराठीत प्रथमच गुलजारांचं नवं पुस्तक प्रकाशित झालं आहे. मात्र त्याचं शीर्षक आहे ‘धूप आने दो..’! गेल्या २९ वर्षांपासून गुलजार लेखक या नात्याने अरुण शेवते यांच्या ‘ऋतुरंग’ दिवाळी अंकाशी जोडले गेले आहेत. त्यात त्यांच्या कविता, कथा, आत्मकथनात्मक, अनुभवपर लिखाण आलं आहे. अलीकडच्या काळात त्यांची काही रेखाटनं आणि चित्रही ‘ऋतुरंग’चं मुखपृष्ठ म्हणून छापलं गेलं आहे. गुलजारांच्या सर्जनरंगाच्या या वळणवाटा आता एकत्रित रूपात ‘धूप आने दो..’द्वारे वाचकांसमोर येत आहेत. गुलजारजींचा मुंबईतील विचारे मोटर गॅरेजमधील दीडशे रुपये पगाराची नोकरी ते ऑस्कर अवॉर्ड हा विलक्षण आडवातिडवा प्रवास यातून उलगडतो. ‘धूप आने दो..’मधील लेखांचं शब्दांकन विविध शैलीच्या लेखकांनी केल्यामुळे प्रत्येक लेखाचा बाज वेगवेगळा आहे. गुलजार शैलीचा सुगंध मात्र त्यातूनही अनुभवास येतो.
प्रकाशक अरुण शेवते यांची प्रस्तावना गुलजारांना लिहिलेल्या पत्रस्वरूपात आहे. गुलजारांसोबतच्या अनुबंधाची मांडणी त्यात आहे. ‘धूप आने दो..’मधील अनेक लेखांमध्ये ते स्वत:सोबतच आपल्या मुलीला- मेघनाला आणि नातू समयला ‘महाराष्ट्रीय’ संबोधतात. विविध भाषांविषयीची त्यांची आत्मीयता त्यांच्या लेखांतून व्यक्त झाली आहे. त्यांनी उर्दूनंतर सर्वाधिक प्रिय भाषा म्हणून बंगालीचा उल्लेख केला आहे. त्यांचं हे बंगालीप्रेम बिमलदा, रुमा भादुडी (सेनगुप्ता), पंडित रविशंकर, हेमंतकुमार आणि सलिल चौधुरी यांच्यावरील लेखांतून व्यक्त झालंय.
जन्मगाव दीना (आता पाकिस्तानमध्ये!) ते मुंबई व्हाया जुनी दिल्ली असा गुलजारांच्या आयुष्यपटाचा प्रवास झाला. बालपणीच्या भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेदना, लहान वयातच आईचं छत्र हरवण्याचे ओरखडे, वडिलांवरची अपार माया, ती वेळीच व्यक्त न करता आल्याची घुसमट, कुटुंब दुरावल्याचं दु:ख हे एकीकडे साहत असताना सर्जनाच्या कोवळ्या फांद्या ऐन तारुण्यात फुटल्याने पुढे बहरत गेलेलं आयुष्य, मुंबईत फिल्म इंडस्ट्रीशी संबंध आल्यावर चित्रपट निर्मितीची लागलेली ओढ, त्यानिमित्ताने जुळून आलेले भावबंध, राखीजींपासून ते नातू समयपर्यंत कुटुंबाचा होत गेलेला विस्तार, त्यात अडकत गेलेले पाय.. अशा वेगवेगळ्या टप्प्यांवरचे त्यांचे अनुभव गुलजारांना एक माणूस म्हणून वेगळ्या उंचीवर घेऊन जातात. यात गुलजारांनी त्यांच्या पाली या कुत्र्यावरही एक हृद्य लेख लिहिला आहे.
गुलजारांचं निसर्गावरचं प्रेम ‘फॅमिली ट्री’ या लेखात व्यक्त झालंय. झाडांचं चैतन्यशील असणं त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर दूरगामी परिणाम करणारं ठरलं. गुलजारांना त्यांच्या बालपणातील दिल्लीतल्या रोशन आरा बागेतील झाडांशी जुळलेला अनुबंध आजही आठवतो. त्यांनी झाडांवर अनेक कविताही लिहिल्या आहेत. झाडांशी बोलण्याची बंगाली परंपरा आहे. झाडाशी संवाद साधल्याने कोमेजणारं झाड कसं वाढत गेलं याचा संदर्भ त्यांनी एका लेखात दिला आहे. भल्या पहाटे पहाडातील प्रवासाचे अनुभव, तसंच बालपणी अनुभवलेलं गाव कसं आयुष्यभर आपल्यासोबत असतं.. असे विविध अनुभवांचे कवडसे त्यांच्या लिखाणातून प्रत्ययाला येतात.
त्यांच्या अनेक रचनांतून रात्र, चंद्र या प्रतिमा आढळून येतात. गुलजारांनी रात्री प्रचंड प्रवास केलाय. हिमालय तसेच जंगलांतील रात्रींच्या त्यांच्या असंख्य आठवणी आहेत. त्यांचे सहकारी भूषण बनमाली आणि तरण या दोघांसोबत हृषिकेशच्या प्रवासाच्या आठवणीही त्यांनी नोंदवल्या आहेत. हे सारं लिखाण मुळातूनच वाचायला हवं.
गुलजारांच्या ‘सपनों पे पांव पड गया था..’ या ओळी आठवतात. स्वप्नांच्या अनेक फेजेसवर गुलजारांनी लिहिलंय. गुलजारांनी कोवळ्या वयात फाळणी अनुभवली, नृशंस संहार पाहिला. त्या इमेजेस कित्येक वर्ष त्यांचा पाठलाग करत राहिल्या. स्वप्नातील घुसमट त्यांनी कित्येकदा अनुभवली. ‘मौसम’ या चित्रपटाचा क्लायमॅक्सही त्यांना स्वप्नामध्येच सुचला. पावसाळ्यात ते पन्हाळ्याला गेले असताना त्या वातावरणात अर्धवट निद्रेत त्यांना तो क्लायमॅक्स सुचला.
गुलजारांच्या अनेक क्षेत्रांतील वावरामुळे त्यांचा बऱ्याच कलावंतांशी जवळून संबंध आला. फिल्म इंडस्ट्रीत प्रदीर्घ काळ व्यतीत केल्यामुळे अनेक किस्से आणि घटनांचे ते साक्षीदार झाले. या इंडस्ट्रीतील मोजक्या व्यक्तींवर त्यांनी लिहिलेले लेख हा या पुस्तकाचा ‘यूएसपी’ आहे. एखाद्या कलावंताची कला जोखतानाच त्याचं त्यात बेमालूमपणे मिसळलेलं माणूसपण ते अलगद उलगडून दाखवतात. जादू आणि साहिर, मीनाकुमारी, भूतकाळातील साद-पडसाद, कुलदीप नय्यर आणि पीरसाहेब, मेरे अपने सिप्पीसाहेब.. हे काही वानगीदाखल लेख. अभिनेत्री मीनाकुमारी या वृत्तीने शायर होत्या. त्यांनी त्यांच्या मृत्युपत्रात त्यांच्या कवितांचे हक्क गुलजारांकडे सुपूर्द केले होते. मीनाकुमारीच्या संवेदनशील स्वभावाचे, त्यांच्या एकाकीपणाचे आणि विशाल मनाचे वर्णन एका लेखात गुलजारांनी केले आहे.
मीनाजींबद्दल लिहिताना हळवे झालेले गुलज़ारजी पंचमदांबाबत (आर. डी. बर्मन) लिहिलेल्या ‘साद-पडसाद’ या लेखात मात्र मस्तीच्या मूडमध्ये येतात. गुलजार आणि पंचम यांचं अजोड कॉम्बिनेशन भारतीय चित्रपट संगीताच्या इतिहासात सुवर्णपान म्हणून नोंदलं गेलंय. या लेखात गुलजारजी पंचमदा आणि त्यांच्या जुळून आलेल्या भावबंधाचे कानेकोपरे धुंडाळण्याचा प्रयत्न करतात. गुलजार शास्त्रीय संगीताचे जाणकार होते, परंतु पंचमदांची हिंदी भाषेची समज बेताची होती. मात्र, दोघांच्या वैयक्तिक मैत्रीचे पडसाद त्यांनी निर्माण केलेल्या अजोड गाण्यांमधून उमटले आहेत. यात ‘परिचय’, ‘घर’, ‘आंधी’, ‘किताब’पासून ते नॉन-फिल्मी आल्बम ‘दिल पडोसी हैं’पर्यंतच्या अजरामर गाण्यांच्या निर्मितीची कहाणी आहे.
‘साहिर आणि जादू’ हा साहिर लुधियानवी आणि जावेद अख्तर या दोन बेमिसाल शायरांवर तिसऱ्या बेमिसाल शायराने लिहिलेला तितकाच पॅशनेट लेख. त्याची सुरुवातच विलक्षण केली आहे. जावेद अख्तर यांची सगळी वंशावळ पाहिली तर अशीच शायरांची होती. बाप जाँनिसार अख्तर, मामा- मजाज आणि आता सासरा- कैफी आझमी. जादूचं आपल्या बापाशी होतं भांडण. एवढं, की बाप जिवंत असेपर्यंत जादूने कवीमनाचा असूनही एकही कविता लिहिली नव्हती. लिखाणाचे सर्व फॉम् हाताळले, पण कवितेकडे मात्र पाठ फिरवली. जाँनिसार अख्तर यांचं निधन झाल्यावर काही दिवसांतच यश चोप्रांच्या ‘सिलसिला’मधील ‘देखा एक ख्वाब तो..’ हे गाणं लिहून जादूनं त्यांना श्रद्धांजली वाहिली. असा बापाविषयी विलक्षण राग आणि पराकोटीचं प्रेम जादूच्या मनात होतं. साहिर लुधियानवी हे जाँनिसार अख्तर यांचेही मित्र आणि जादूचेही जिवलग. बापावरचा राग ओकण्यासाठीचं हक्काचं ठिकाण. जादू आणि साहिर दोघंही विलक्षण मनस्वी. एकमेकांशी अनेकविध भावबंध गुंफलेले. पुढे जावेद अख्तरही नावारूपाला आले तरी त्यांच्यातील बंध तितकेच अतूट राहिले. हा लेख गुलज़ारांच्या या दोघांशी असलेल्या मैत्रीचा कस लावणारा झाला आहे. ‘कुलदीप नय्यर आणि पीरसाहेब’ हाही एक वेगळा लेख. कुलदीप नय्यर हे भारतातील ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि पत्रकार. नय्यर यांच्यासोबत वाघा बॉर्डरला जात असताना त्यांनी सांगितलेल्या पीरसाहेबांच्या किश्श्यांवर आधारित हा लेख आहे. नय्यरसाहेबांसारख्या कठोर राजकीय विश्लेषकामध्ये दडलेल्या हळव्या माणसाचं अलवार दर्शन गुलज़ारजी या लेखात आपल्याला घडवतात.
‘मेरे अपने सिप्पीसाहेब’ हा एन. सी. सिप्पी या चित्रपट निर्मात्यांविषयीचा लेख. व्यावसायिक कारणानिमित्त झालेली त्यांची ही ओळख गुलजारांनी दिग्दर्शित केलेल्या अनेक आशयघन चित्रपटामागे खंबीरपणे कशी उभी राहिली याची कथा हा लेख सांगतो. सिप्पीसाहेबांशी जुळलेल्या अनुबंधाची गोष्ट सांगता सांगता गुलज़ारजी हिंदी चित्रपट व्यवसाय, त्यातील प्रथा-परंपरा आणि त्यांच्या अंगभूत ह्य़ुमरवरही अलगद बोट ठेवतात. ‘माझं कॉलेजच्या दिवसांपासून क्रश होतं निम्मीवर..’ असं आपल्याहून कितीतरी वर्ष वयाने लहान असणाऱ्या गुलजारांना सांगण्याइतका मोकळेपणा सिप्पीजींकडे होता. ‘मेरे अपने’ हा सिप्पीसाहेबांसोबत केलेला गुलज़ारजींचा पहिला चित्रपट. या चित्रपट निर्मितीच्या वेळी तीन मोठी संकटे आली, परंतु सिप्पीजींनी निर्माते म्हणूनच नव्हे तर वडीलधाऱ्याच्या भूमिकेतून आपल्याला भक्कम साथ दिल्याचं गुलजारजींनी म्हटलं आहे. निर्माता म्हणून अशी माणसं मिळणं हल्ली दुर्मीळ होत चाललं आहे, हे निरीक्षणही ते इथं नोंदवतात.
पुस्तकाचंच शीर्षक असणाऱ्या ‘धूप आने दो..’ या लेखात गुलज़ारजी कोविडमुळे स्तब्ध झालेल्या जगाची स्पंदनं टिपतात. आपल्या आयुष्यात आलेल्या या वळणाचा सर्जनाच्या माध्यमातून वेध घ्यायचा प्रयत्न ते करतात. आपला नातू, किशोर कदम आणि विशाल भारद्वाज यांच्या संदर्भाने कोविडचा अंधार अधिक गडद झाल्याचं त्यांनी लिहिलंय. डॉक्टर आणि पोलीस यांच्याविषयीची कृतज्ञतेची भावनाही त्यात आहे. विशाल भारद्वाज यांनी लॉकडाऊनच्या काळात मसुरीला राहून गुलजारांच्या ‘धूप आने दो..’ या गाण्याला चाल लावली. गुलजारांनी या काळात मल्याळम् भाषा शिकण्याचा विचार केला. त्यांनी ज्येष्ठ शास्त्रीय गायक अजोय चक्रवर्तीच्या सांगण्यावरून कवी काझी नझरुल इस्लाम यांच्या रचनांचं भाषांतर केलं. त्यांना या काळाचा राग येत नाही, पण खंत जरूर वाटते. या लेखात त्यांनी एकटेपणाबाबतचं मुक्त चिंतन केलं आहे. याच काळातील स्थलांतरितांच्या वेदना, आजूबाजूची परिस्थिती पाहून विद्ध झालेलं त्यांचं मन त्यांच्या पाच कवितांमधून प्रकट झालं आहे.
गुलजारांचं असं हे सर्वव्यापी अनुभवकथन पहिल्यांदाच मराठीत प्रसिद्ध होतंय. ‘ऋतुरंग’ प्रकाशनाची ही देखणी निर्मिती आहे. यातलं लिखाणच नव्हे, तर रेखाटनं व गुलजारांच्याच हस्ताक्षरातील मूळ कविताही आहेत. ही वाचनानुभवासोबत दृश्यात्मक पर्वणीही आहे.
‘धूप आने दो..’- गुलजार, ऋतुरंग प्रकाशन, पाने- २३५, किंमत- ३५० रुपये. ६

First glimpse of Kiran Gaikwad movie Dev manus released
‘देवमाणूस’ किरण गायकवाडच्या चित्रपटाची पहिली झलक प्रकाशित
Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
Narayani Shastri family
पाच बहिणी अन् एक भाऊ, आई महाराष्ट्रीय तर वडील…; प्रसिद्ध अभिनेत्रीने कुटुंबाबद्दल दिली माहिती
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट