उदाहरणार्थ त्याच जास्वंदाच्या फुलाकडं एक बॉटनिस्ट, एक गणेशभक्त, एक चित्रकार, एक ज्योतिष, एक ‘ग्रीन टी’चा भोक्ता, एक अत्तराच्या व्यवसायात असलेला मनुष्य असे वेगवेगळे जण वेगवेगळ्या दृष्टीने बघतात. शरीरव्यापारांकडं बघण्याची आयुर्वेदाची एक विशिष्ट दृष्टी, विशिष्ट ॲप्रोच आहे. त्यात त्याने तीन मोठ्या गटांमध्ये शरीरव्यापारांची विभागणी केली आहे. शरीरांतर्गत होणार्‍या हालचालींचा एक गट (अगदी पेशीअंतर्गत होणारं चलनवलन, मज्जातंतूंमधून जाणारा इम्पल्स ते अन्नाचं पुढं ढकललं जाणं, हवा फुप्फुसात जाणं, बाहेर येणं इतक्या स्थूल पातळीचा गट). रूपांतरण / बदल करणारा एक गट. म्हणजे खाल्लेल्या अन्नाचं होणारं रूपांतरण, घेतलेल्या श्वासाचं फुप्फुसात होणारं रूपांतरण इथपासून ते शरीरात सूक्ष्म पातळ्यांवर सतत चालू असणारी रूपांतरणं. आणि तिसरा गट आहे स्थिती राखण्याचा, टिकवून ठेवण्याचा गट; झीज / बदल / रूपांतरणं यावर कंट्रोल ठेवणारा गट.

पहिल्या गटाला वात / वायू, दुसर्‍याला पित्त तर तिसर्‍याला कफ म्हणतात. या तीन ‘शक्तीं’च्या आधारावर जीवन चालते. या जुजबी ओळखीनंतर आपण थेट खोकल्यावर येऊ. पहिला वाताचा जो गट आपण बघितला, शरीरांतर्गत हालचालींना कारणीभूत असलेला- त्याचे सोयीसाठी पाच भाग केले आहेत- प्राण, उदान, व्यान, समान आणि अपान. पैकी अपान हा शरीराच्या खालच्या भागात असतो आणि त्याची दिशा ही बव्हंशी अधो (खालच्या दिशेने नेणारी) असते. या वायूची दिशा अधोऐवजी ऊर्ध्व- वरची होत राहिली तर त्याच्या परिणामस्वरूप उदान वायूला ट्रिगर मिळून खोकला (कास नावाची व्याधी) निर्माण होतो. म्हणून कासाची चिकित्सा करताना ‘अनुलोमन’ म्हणजे विशेषत: अपान वायूची दिशा पूर्ववत करण्याचं प्राथमिक सूत्र पाळलं जातं. खोकला / कास हा अनेक व्याधींचं लक्षण म्हणूनही दिसतो आणि एक स्वतंत्र व्याधी म्हणूनही त्याचं सविस्तर वर्णन आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे शरीरात होणार्‍या वेगवेगळ्या रोगप्रवासा (संप्राप्ती / नुसार कासाचे पाच प्रकार आणि त्यांच्या चिकित्सा चरकसंहिता आणि इतर ग्रंथात आहे.

‘शुष्को वा सकफो वा अपि कसनात् कास उच्यते’ असं कासाच्या चरकसंहितेत लिहिलेल्या संप्राप्तीमध्ये म्हटलं आहे. इथे, खोकला कोरडा (शुष्क) किंवा कफासह/ओला (इथं शक्तीरूप कफ नव्हे तर वाढलेला / विकृत कफ) असतो असं सांगितलं आहे. आजही क्लिनिकल डायग्नोसिस करताना आणि (इथला कफ म्हणजे खोकला!) नुसार चिकित्सा बदलते. सध्या आपल्या आसपास खोकत असणारी/ उबळ येत राहणारी माणसे पूर्वीच्या तुलनेत जरा जास्तच पाहतो आहोत/आपणच त्यापैकी आहोत.

जापी (खअढक ) मासिकाच्या जून २०२५ च्या अंकात प्रकाशित झालेल्या एका मोठ्या अभ्यासात हे ठळकपणे समोर आलं की कोविड महामारीनंतर कोरडा खोकला असणार्‍या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. (ऊडक: 10.59556/ ्नंस्र्र.73.1026) तेही मुलांच्या तुलनेत प्रौढ रुग्णांच्या प्रवर्गात ही वाढ आणखी जास्त आहे. या अभ्यासात काही वर्षांची आकडेवारी पाहिली होती. आयुर्वेदात ‘जनपदोद्ध्वंस’ या शब्दाने एकाच वेळी अनेक जणांना बाधित करू शकणार्‍या परिस्थितींचं वर्णन आलं आहे (महामारी). वायू, जल, देश आणि काळ यांच्यापैकी कशात तरी होणार्‍या गडबडीने जनपदोद्ध्वंस उद्भवतात. चरकसंहितेत याच प्रकरणात कालमृत्यू, अकालमृत्यूची चर्चा आहे; आणि मनुष्याने जनपदोद्ध्वंसात कमीत कमी त्रास होण्यासाठी, दीर्घ आणि चांगल्या आयुष्यासाठी काय केले पाहिजे याची जंत्री आहे.

इमारती, रस्ते, मेट्रो वगैरेंच्या बांधकामांमुळे, वाढलेल्या वाहनांमुळे, कारखान्यांमुळे होणारे प्रदूषण, बेसुमार वृक्षतोड यामुळे गेल्या काही वर्षांत शहरीच नाही तर ग्रामीण भागातही आरोग्य परिस्थिती बिकट केली आहे.

(वर्ल्ड ट्रेड सेंटर पडल्यानंतर अकरा हजार अग्निरक्षक जवानांनी रेस्क्यू ऑपरेशनमध्ये भाग घेतला होता. त्यातल्या तब्बल साडेनऊ टक्के लोकांना नवव्या वर्षातही खोकला होता!)

एखादी व्याधी होऊन गेल्यावर शरीरात ज्या प्रणालीची ती व्याधी आहे त्यासंबंधित अवयवामध्ये न्यूनता (आयुर्वेदाच्या परिभाषेत ‘खवैगुण्य’) राहते; आणि तो अवयव वा ती प्रणाली व्याधी होण्यासाठी अधिक संवेदनशील असते. कोविड महामारीनंतर श्वसनसंस्थेत घाऊक प्रमाणात खवैगुण्य निर्माण झालं. सध्याच्या आलेल्या जुनाट खोकल्याच्या लाटेत ते स्पष्ट होत आहे. हे आलेलं न्यून वैद्यकीय सल्ल्याने आहारविहार, स्वच्छ हवा, योग्य मार्गदर्शनात प्राणायाम, वायुप्रदूषणाच्या जागांमध्ये मास्कचा वापर अशा गोष्टींनी दूर होऊ शकते; आणि खोखला करणार्‍या खोकल्यापासून आराम मिळू शकतो.