जनगणना हा मला मोठाच गमतीचा विषय वाटत आलेला आहे. शाळेत असताना आम्हाला शाळेची सहल गेली की कोणतेही ठिकाण पाहिल्यानंतर पुन्हा बसमध्ये चढवताना रांगेत चढवायचे. त्यावेळी आम्हाला मोजायचे आणि बसमध्ये भरायचे. प्रत्येकाला मोजल्यावर बेरीज एकने वाढायची. सगळ्यांना आणि मला सारखेच मोजणे हे तेव्हाही मला मोठे अन्यायाचेच वाटायचे. आमच्यातल्या काही जणांना अर्धा म्हणूनच मोजले पाहिजे आणि मला मोजल्यावर तर इतरांपेक्षा जास्त संख्या म्हणून मोजले पाहिजे अशीच माझी भावना होती. सरसकट सगळ्यांना एक म्हणून मोजणे ही हिशोबातली  मोठीच गफलत आहे असे मला वाटत आले आहे.

१८ वर्षांचा झाल्यावर आमच्या गल्लीतला होतकरू गुंड आणि मी- आमचे निवडणुकीतील मताचे मूल्य हे ‘एक मत’ असे समानच असल्याचे आढळल्यावर मी काहीच्या काही हळहळलो होतो. त्या होतकरू गुंडाचे लोकशाहीतले योगदान हे माझ्यापेक्षा कितीतरी जास्त होते. तो एका दांडिया मंडळाचा आणि दोन गणपती मंडळांचा सदस्य होता. एकदा त्याच्या वाढदिवसाचा रस्त्यात लागलेला फलक मी बारकाईने पाहत असताना त्यात खूप सारे फोटो शुभेच्छुक म्हणून छापले होते. त्यात मला माझाही फोटो आढळला. मी काही त्याला शुभेच्छा वगैरे द्यायला गेलो नव्हतो. हा नरश्रेष्ठ कधी जन्माला आला याचीही मला माहिती नव्हती. माझ्या नावाआधी ‘माननीय’ आणि नावाखाली ‘प्रतिष्ठित नागरिक’ म्हणून त्याने छापले होते. ते काही मला नाकारता येईना! अनेक दिवस माझे मित्र मला ‘या, प्रतिष्ठित या!’ म्हणून हाक मारायचे. आमच्या परिसरातले अझरबैजान देशातले लोक हाकलले पाहिजेत, त्यांच्यामुळे स्थानिकांवर अन्याय होतो, नोकऱ्यांवर गदा येते.. असा एक फलकही त्याने मध्यंतरी लावला होता. मी त्याला ‘तुला उत्तर प्रदेश, बिहारमधून आलेले परप्रांतीय असे म्हणायचेय का?’ असे विचारले, तर त्याने ‘ह्य़ाऽऽऽ’ म्हणून उडवून लावले. परप्रांतीयांबद्दल बोलणाऱ्या पक्षांनी त्याला बहुतेक दारात उभे केले नव्हते. त्यामुळे आपले राजकारण पुढे न्यायला त्याने अझरबैजानच्या नागरिकांबद्दल बोलायला सुरुवात केली होती. ‘बाकीचे पक्ष आपल्याच देशातल्या अन्य राज्यांतून आलेल्या लोकांची तक्रार करतात. मी तर देशाबाहेरून आलेल्या लोकांची तक्रार करतो. त्यामुळे माझे राजकारण जास्त सर्वसमावेशक आहे,’ अशी त्याची मांडणी होती. आणि एकदा का माणसाने सर्वसमावेशक राजकारण करायचे ठरवले, की मग अझरबैजान कुठे आहे, त्यातले किती नागरिक भारतात आणि विशेषत: आपल्या वॉर्डात राहतात, हे प्रश्न गैरलागू ठरतात. शेवटी विरोध महत्त्वाचा!

mpsc exam preparation guidance
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – इतिहास प्रश्न विश्लेषण
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…
old generation, new generation
सांधा बदलताना : नव्यातले जुने…
Academic difficulties Psychological assessment Career counseling
ताणाची उलगड: स्वत:ला स्वीकारा

एकीकडे हा वाढदिवसाचे फलक लावणारा, दांडिया आणि गणपती भरवणारा, अझरबैजानच्या सरकारला इशारे देणारा इसम आणि दुसरीकडे मी.. आमच्या दोघांच्याही मताला एक म्हणूनच मोजणे हे लोकशाहीत अन्यायाचेच आहे. तो मतदान करून आला की निदान तीन-चार मते म्हणून तरी त्याचे मत मोजले जायला हवे. माझ्या परिचयातला एकजण राजकीय विश्लेषक आहे. दिवस-रात्र तो राजकारणाबद्दलच बोलतो. इतकी खोलवर लोकशाही ज्याच्यात रुजली आहे त्याचे आणि माझे मत एकसारखेच मोजणे हे काही मला बरोबर वाटत नाही. तो मतदान करून आला की ईव्हीएम मशीनने किमान दहा तरी मते मोजायला हवीत आणि सगळ्यांना जसे सरसकट बोटाला शाई लावतात तसे त्याला न करता निदान कपाळावर टिळा लावून त्याची वेगळी मोजणी करायला हवी.

.. तर सांगायचा मुद्दा हा की, जनगणना या शास्त्राबद्दल आपण पुनर्विचार करायला हवा आणि त्यातल्या सगळ्या त्रुटी होता होईल तो दूर करायला हव्यात. सगळ्यांना एक म्हणून मोजणे हे अन्यायाचे आहे हे आपल्याला कळायला हवे. मी माझ्या लग्नाची पत्रिका द्यायला एकाकडे गेलो होतो. तो फट् म्हणता कधीही मोक्षाला पोहोचेल अशी त्याची अध्यात्मात ख्याती होती. मी पत्रिका दिल्यावर त्याने मला आपादमस्तक न्याहाळले आणि म्हणाला, ‘‘शरीरावरची चरबी हा आभास आहे, चरबीच्या आतला सांगाडा हेच वास्तव आहे. तो सांगाडा बघायला शिक. तो सांगाडा बघायला शिकलास की संसाराचे पाश सुटतील आणि तू विश्वाचा संसार करायला घेशील!’’ जगात नतद्रष्ट किती आहेत आणि किती वेगवेगळ्या प्रकारचे आहेत याचेच अजून आपल्याला आकलन झालेले नाही, याची खिन्न करून टाकणारी जाणीव मला तेव्हा झाली. मी मागच्या पाच जनगणनांचे अहवाल पाहिले. स्त्रिया किती, मुले किती, म्हातारे किती, अशा सर्व गोष्टी त्यांनी मोजल्यात. पण आपल्या देशात नतद्रष्ट किती, याची काही नोंदच नाही. नतद्रष्टांची नेमकी संख्या माहीत असणे हे देशासाठी अत्यंत गरजेचे आहे.

काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. एक श्रेष्ठ भारतीय नागरिक सकाळीच प्यायला आणि दुपारी प्राणिसंग्रहालयात गेला. तिथे पट्टेरी वाघाला मोकळे फिरायला मिळावे म्हणून परिसर राखून ठेवला होता. त्या परिसरात हा श्रेष्ठ भारतीय नागरिक शिरला आणि थेट वाघावर धावून गेला. तेव्हा वाघाच्या चेहऱ्यावरचे बुचकळ्यात पडलेले भाव मला आजही आठवताहेत. हा धावतोय आणि पट्टेरी वाघ पुढे पळतोय, हे दृश्य मी आजही विसरू शकलेलो नाही. जनगणनावाले  माणसे मोजत होते तेव्हा कोणालाच कसे कळले नाही, की आपण एका अशा माणसाला मोजलेय- जो प्रसंगी वाघावर धावून जायची क्षमता बाळगतो. मला असेही कळले आहे, की काही विशेष ड्रायव्हर आहेत- ज्यांना ‘पलटी ड्रायव्हर’ म्हणून ओळखतात. मालाने भरलेला ट्रक ते लीलया घाटात पलटवतात आणि पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदवतात. या कलेत त्यांनी इतके प्रावीण्य मिळवले आहे की स्वत:च्या अंगाला ओरखडाही न आणता ते ट्रक पलटी करतात. त्यानंतर म्हणे ट्रकचे आणि मालाचे भरपूर पैसे इन्शुरन्स कंपनी देते. एकाच महिन्यात भागलपूर, कसारा घाट, म्हैसूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी ट्रक पलटी करून येणारे महाभाग आहेत. आता जेव्हा देश मोजायला काढला तेव्हा या पलटीबहाद्दरांना वेगळे मोजायला नको का?

पैसे घेऊन सभेला जाणाऱ्यांबद्दल तर मला पराकोटीचा आदर आहे. लोकशाहीतले सर्वात पहिले लाभार्थी जर कोणी असतील तर ते पैसे घेऊन सभेला जाणारे लोक होत. असे पैसे घेऊन सभेला जाणाऱ्यांना उमेदवार निवडून आला काय किंवा पडला काय,  लाभ हा होतोच. मी अनेक सभा ऐकायला जातो. याच सभेत काही चतुर लोक आहेत- ज्यांना भाषण ऐकायचे पैसे मिळताहेत आणि आपल्याला मात्र कोणी पैसे विचारायलादेखील आले नाही याने मला फारच फसवल्यासारखे वाटते. पैसे घेऊन सभेला जाणे हे ‘करिअर’ म्हणून निवडणारे लोक वेगळे मोजायला नकोत? पैसे घेऊन सभेला जाणारे आणि मतदान करण्यासाठी पैसे घेणारे लोक हा लोकशाहीतील चमत्कार आहे. लोकशाही येण्यापूर्वी राज्य करणारे आणि आपल्यावर राज्य करवून घेणारे असे दोनच वर्ग अस्तित्वात होते. आपल्यावर एखाद्याला राज्य करायला मिळावे म्हणून त्याला मत देण्यासाठी त्याच्याकडून पैसे उकळणारे आणि त्याच्या सभेला जाण्यासाठीही पैसे घेणारे महाभाग या देशात आहेत! पण जनगणना अहवालात तुम्हाला या लोकांची कुठे वेगळी नोंद दिसते का?

माझ्या एका मित्राच्या महाविद्यालयात वाङ्मय मंडळाचे उद्घाटन होते. त्यासाठी शिक्षणसंस्थेच्या एक संचालकांना बोलावले होते. संस्थेचे सचिवच सर्व कार्यक्रमांना जातात, आम्हाला कधीच प्रमुख पाहुणे म्हणून बोलावत नाहीत अशी त्यांची तक्रार होती. म्हणून बहुतेक या कार्यक्रमाला त्यांना बोलावले होते. त्यांनी तब्बल पावणेचार तास भाषण ठोकले. समोर बसलेली मुले बिचारी वैतागली. तर ते मुलांवरच डाफरले, ‘‘नेहमी नेहमी येतो का मी? कधीतरीच येतो ना! मग ऐकून घ्या चुपचाप..’’ म्हणत ते बोलतच राहिले.

पावणेचार तास भाषण करणारे शिक्षणसंस्थेचे दुय्यम संचालक, पैसे घेऊन सभेला जाणारे आणि मतदान करण्यासाठी पैसे घेणारे लोक ही आपली राष्ट्रीय विरासत आहे. यांची नोंद जनगणना करताना करणार की नाही?

कोणत्याही समाजाची खरी ओळख ही त्यातल्या नतद्रष्ट लोकांमुळेच होत असते. नतद्रष्ट लोक संस्कृतीच्या प्रस्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावतात. आपण माणसांच्या नोंदी या एक माणूस म्हणजे एक नग अशा पद्धतीने ठेवतो. त्याऐवजी तो किती ‘नग’ आहे याचे मोजमाप करायची पद्धत शोधून काढून या नोंदी ठेवायला हव्यात. कोणत्याही समाजातले कर्तृत्ववान महापुरुष हे त्या समाजाच्या इतिहासात असतात. तर नतद्रष्ट हे त्या समाजाच्या वर्तमानाचा भाग असतात. नतद्रष्टांची गणना करणे, त्यांना स्वतंत्र आणि इतरांपेक्षा जास्त मताधिकार देणे हे आपल्याला वर्तमानाचे नीट आकलन होण्यासाठी अतिशय आवश्यक आहे.

खूप खोलात जाऊन जेव्हा मी विचार करतो, की मला माझा भोवताल आवडतो किंवा समाज आवडतो तेव्हा मला नक्की काय आवडत असते? कुठला तरी त्यागमूर्ती किंवा घरादारावर तुळशीपत्र ठेवणारा अथवा एखादा प्रज्ञाचक्षू प्राणी हा माझ्या आदराचा भाग असतो; पण आवडीचा असतोच असे नाही. परंतु नतद्रष्ट आणि त्यांच्या कथा या चिरंतन असतात. वर्षांनुवर्षे त्यांच्या कथा गप्पांचा भाग बनून राहतात. देदीप्यमान कर्तृत्व गाजवणाऱ्या लोकांनी भलेही संस्कृतीला ओळख दिली असेल, पण संस्कृतीची वीण घट्ट करतात ते नतद्रष्ट लोकच- हे आपण विसरता कामा नये!

mandarbharde@gmail.com