मी रेल्वेने चाललो होतो. माझी एक सवय आहे, मी आजूबाजूच्या लोकांच्या गप्पा ऐकायचा प्रयत्न करत असतो; रेल्वेत ते बरे पडते. दोन-तीन वेगवेगळी कुटुंबे जर प्रवास करीत असतील तर कितीतरी वेगवेगळे विषय ऐकायला मिळतात. बहुतांश वेळा मी गप्प बसून ऐकत राहायचा प्रयत्न करतो, मात्र कधी कधी शक्य होत नाही. मागे मी एकदा असेच इतरांचे बोलणे गुपचूप ऐकत बसलो होतो, पण मध्ये अगदीच राहावले नाही म्हणून मी- ‘‘आता उगाच चर्चा करीत बसू नकोस; सरळ उठ आणि तुझ्या भावावर खटला दाखल कर. ही लढाई आता आरपारची आहे. आता मागे हटलास तर परत कधीही उभा राहू शकणार नाहीस. तुझ्या भावाला धडा शिकवणे हे तुझे कर्तव्यच आहे,’’ असे सरळ सांगितले. त्यानेही मग मला जवळचा समजून दोन आंब्यांचे उत्पन्न भाऊ  कसा हडप करतो, वडील होते तोपर्यंत सारे सुरळीत होते, नंतर भाऊ  खूप माजलाय वगैरे सांगितले. त्यावर ‘‘आई किंवा मोठय़ा काकांना मधे घालून काही उपयोग होईल का,’’ असेही मी त्याला विचारले. तर ‘‘त्याचा काही उपयोग नाही,’’ असे तो म्हणाला. ‘‘तसे जर असेल तर आता काय तो निवाडा कोर्टातच होईल,’’ असा अंतिम निर्णय मी दिल्यावर त्याच्या बायकोनेही ‘‘मी सांगतच होते, पण हे ऐकतील तर ना!’’ असे ऐकवले.

गप्पा मारणे ही आपली राष्ट्रीय आवड आहे. हा देश चालवायचे मुख्य इंधन गप्पा हेच आहे, यावर माझा नितांत विश्वास आहे. आपण कुठेही, काहीही निमित्त काढून गप्पा मारू शकतो, एखाद्याची विचारपूस करू शकतो. तुम्ही आपल्या देशात कुठेही जा, लोक काहीतरी निमित्त काढून गप्पा मारत बसलेले तुम्हाला दिसून येतील. मागे एकदा असेच रेल्वेत दोन जण बजेटमध्ये संरक्षण खात्यासाठी ६५ हजार कोटींची तरतूद आहे की ६६.५ हजार कोटींची यावरून वाद घालत होते. मी म्हटले, ‘‘अरे, जाऊ  द्या ना. काय फरक पडतो दीड हजार करोडने?’’ तर त्यातला एक भयंकर चिडला, ‘‘जनाब, दीड हजार करोडमध्ये ३० रणगाडे येतात, सुमारे १०० छोटी हेलिकॉप्टर येतात, ८५ लाख एलएमजीची काडतुसे येतात.. आणि तुम्ही म्हणता काय फरक पडतो? तुमच्यासारख्या अडाणी लोकांमुळे संरक्षण हे बिनमहत्त्वाचे क्षेत्र झाले आहे. घराघरांत संरक्षणाचे तज्ज्ञ निर्माण होणे गरजेचे आहे. प्रत्येक लहान मुलाला शाळेत बाकीचा भूगोल नंतर शिकवा, पण आपल्या देशाच्या सीमा कुठे आणि कशा फिरतात हे त्याला आधी शिकवा. अर्ध्या रात्री झोपेत जरी त्याला सीमेवर नेऊन सोडले तरी त्याला कुठल्या बाजूला गोळी चालवायची हे कळायला हवे. प्रत्येक घरात मशिनगन आणि प्रत्येक दारात रणगाडा हे मिशन ठेवून जोपर्यंत सरकार चालत नाही तोपर्यंत पाकडय़ांना दहशत वाटणार नाही,’’ असेही म्हणाले. मी आपला चाचरत ‘वंदे मातरम्’ म्हणून माझ्या बाकडय़ावर झोपायला गेलो. रात्रभर स्वप्नात मला बखोटीला धरून सीमेवर नेलेय आणि भूगोल कच्चा असल्याने अंधारात आपले दिशेचे भान सुटलेय अन् आपल्याच लोकांच्या दिशेला मी गोळ्या झाडतोय, असे दिसत राहिले.

JAY SHANKAR
अन्वयार्थ: हे मुत्सद्दी की प्रचारकच!
uddhav thackeray and kangana
“भाजपाई कंगनाने तिचे अगाध ज्ञान पाजळून इतिहासाची…”, ठाकरे गटाचा टोला
Lower voter turnout in Maharashtra than national average What is the national average voter turnout
राष्ट्रीय सरासरीपेक्षा महाराष्ट्रात कमी मतदान, मतदानाची राष्ट्रीय सरासरी किती?
Sanjay Raut Eknath Shinde Devendra Fadnavis
“गुलामांच्या तोंडावर तुकडे फेकले जातात, आम्ही..”; संजय राऊत यांची महायुतीवर टीका

मागे एकदा ज्येष्ठ नागरिकांच्या कोंडाळ्यामागे मी गप्पा ऐकत होतो. मल्ल्या फरार आहे तर त्याच्या कॅलेंडरचे काय होणार, या विषयावर सगळेच चिंतीत होऊन चर्चा करत होते. मल्ल्याला अटक जरी झाली तरी कॅलेंडर काढण्यापुरते तरी त्याला पॅरोलवर सोडायला हवे, असे त्यातल्या सगळ्यांचेच मत होते. कालनिर्णयवाल्यांनी मल्ल्याकडून कॅलेंडर काढायची आधुनिक कला शिकून घ्यायला हवी, याबद्दल सगळ्यांनीच कालनिर्णयकारांना एक मेल लिहायचाही निर्णय घेतला होता.

जलिकट्टू या खेळाची माहिती जेव्हा त्यावर बंदी आणल्याने लोकांना झाली तेव्हा जलिकट्टू या क्रीडा प्रकाराबद्दल सगळ्यांचेच प्रेम उफाळून आले होते. एका स्थानिकाने तर या क्रीडा प्रकारावर बंदी हा लोकशाहीचा संकोच असल्याचे मत माझ्याकडे मांडले होते. खरं तर टीव्हीवर क्रिकेटची मॅच बघणे इतकाच स्थानिकांचा खेळांशी संबंध होता, पण जलिकट्टूने तो फारच दुखावला होता. आपण शनिवारवाडय़ासमोर प्रोत्साहन म्हणून जलिकट्टूचे आयोजन करायला हवे, असे त्याच्या सगळ्याच मित्रमंडळींनी ठरवले. तसे केले तर न्यायालयाच्या निर्णयाची बेअदबी होऊ  शकते, हे लक्षात आणून दिल्यावर ‘कोर्टाच्या या निर्णयामुळे माझी बेअदबी झालीये त्याचे काय?’ असा तेजस्वी प्रश्न त्याने विचारला होता. शेवटी शनिवारवाडय़ासमोर बैल कुठून आणायचे आणि जिवावर उदार होऊन बैलांशी लढायला धडाडीची माणसे कुठून शोधायची, या प्रश्नांची उत्तरे न मिळाल्याने त्यांनी तो बेत रहित केला. नंतर कितीतरी दिवस सगळे पुणेकर त्या स्थानिकाला ‘या जलिकट्टू या चहा प्यायला’ असे म्हणून त्याचे स्वागत करायचे!

कुचाळक्या आणि राजकारण हे भारतीय माणसाचे गप्पा मारायला सर्वाधिक आवडीचे विषय आहेत. क्रिकेट, चित्रपट, संगीत, समाजकारण, फॅशन, अर्थकारण हे सगळेच विषय त्यानंतर येतात. आजकाल तर ‘मोदी’ हा कुठल्याही चर्चामधला जवळजवळ महत्त्वाचा विषय बनलाय. मोदींबद्दल चर्चा करताना आतापर्यंत रक्तदाब वाढल्याने चार हजार लोकांना हॉस्पिटलमध्ये भरती केल्याची माझी माहिती आहे; त्यात त्यांना विरोध करणाऱ्यांची जितकी संख्या आहे तितकीच त्यांची बाजू घेणाऱ्यांचीही आहे. लोक त्यांच्याबद्दल वाद घालत असताना नंतर नंतर लोकांच्या डोक्यातून युक्तिवाद आणि तोंडून शब्द फुटत नाहीत, नुसतीच हवा बाहेर येत राहते अन् मग रक्तदाब वाढून ते मूच्र्छित होतात, असे आढळून आले आहे. माझ्या परिचयातले दोघे जण- एक जण पशुवैद्यक आहे आणि दुसरा केशकर्तन कलाकार आहे- केशकर्तन कलाकाराच्या दुकानात मोदींवर वाद घालत असताना मूच्र्छित होऊन पडले होते आणि त्याबद्दल मोदींनी ट्विट का केले नाही यावर वाद घालत असताना एक प्लम्बर आणि सेवानिवृत्त मुख्याध्यापकांना सलाइन लावावे लागले होते!

एक प्रयोग म्हणून राजकारणबाह्य़ विषयांवर मराठी माणसाने चर्चा करायला सुरुवात करायला हवी. सोमवार, बुधवार, शुक्रवार या तीन दिवशी राजकारणावर बोलणे, चर्चा करणे टाळायचे. काहीही घडले तरी राजकारणावर बोलायचे नाही किंवा शक्य असेल तर विचारही करायचा नाही. सोमवारी फॅशन, बुधवारी क्रीडा आणि शुक्रवारी छंद याच विषयांवर चर्चा मर्यादित ठेवायची.. अगदी भाजप आणि काँग्रेसने गठबंधनचे सरकार बनवल्याचे कळले तरी आपण मात्र पिकासो किंवा किशोरीताई या विषयांपासून ढळायचे नाही. राजकारणावर सलग चोवीस तास बोलणे टाळल्यामुळे सुरुवातीला रक्तदाब वाढल्यासारखे वाटेल, पण नंतर नंतर हलके वाटेल. चर्चा करण्यापासून तर आपण दूर राहू शकणार नाही, पण निदान वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करून आपण आपला व्यासंग वाढवायचा प्रामाणिक प्रयत्न करायला हवा, असे मला वाटते. आपण इतरही विषयांवर ठरवून चर्चा करायला लागलो, की राजकारणावर आपल्याला जी तज्ज्ञता लाभली तशी इतरही विषयांवर लाभू शकेल.

लोकांच्या गप्पा ऐकल्या, त्या त्यांच्यामध्ये जाऊन ऐकल्या, की लोकांच्या मनात काय चालू आहे याचे लसावि-मसावि काढता येतात. आपल्या उत्पादनांच्या मार्केटिंगची स्ट्रॅटेजी ठरवायची असेल किंवा त्यांच्या प्रश्नांचा अभ्यास करायचा असेल अथवा काही राजकीय आडाखे बांधायचे असतील, तर हा लसावि-मसावि फार महत्त्वाचा आहे. या देशातल्या लोकांच्या मनात काय आहे, हे शोधणे खूप अवघड आहे. त्यांच्या मनाचा लसावि-मसावि त्यांच्याशी गप्पा मारत बसल्याशिवाय निघू शकत नाही. आपल्या वातानुकूलित केबिनमधून बाहेर पडलो, एखाद्या टपरीवर हातात चहा घेऊन उभे राहिलो किंवा विनाकारण गावच्या बाजारात फिरलो किंवा चर्चगेटहून विरारला काहीही कारण नसताना जाऊन आलो, तर लसाविच्या जवळ जाणे शक्य होईल. पण ज्यांना हा लसावि कळणे गरजेचे आहे ते जिना उतरत नाहीत, गाडीच्या काचा खाली करत नाहीत आणि गूगलला विचारतात लोकांच्या मनात काय आहे?

गूगल केले की नाते कळेल; एखाद्याचे वडील कोण, बायको कोण, भाऊ  कोण आहे ते गूगलवरून कळेल, पण भाऊबंदकी कशी कळेल? भाऊबंदकीवरून नात्यांची वीण ठरते, हे कळायला गूगलवर नाही तर गप्पांच्या अड्डय़ावर जावे लागते. हेक्टर, एकर गूगलवर मोजता येतील; पण कोणी बांध कुठे सरकवला यावर घरात मोठय़ाचे चालते की लहानाचे, की अजून दोघेही बापाचे ऐकतात ही गुंतागुंत गूगल करून कळत नाही. त्यासाठी लोकांच्या कोंडाळ्यातच बसावे लागते. मोठे मोठे लोक लोकांशी बोलत बसायला शॉर्टकट शोधत राहतात आणि लोकांमध्ये न मिसळता लोकांच्या वर्तनाचा लसावि काढता येईल यावर विश्वास ठेवतात. सोनिया गांधी या विदेशी आहेत, आपल्याला कसे काय विदेशी महिलेला पंतप्रधान बनवून चालेल, असा थयथयाट करणाऱ्यांना ‘सोनिया ही आपल्या देशाची सून आहे, ती आपल्या देशात सून म्हणून आली तेव्हाच आपली झाली’ हे जर ते लोकांमध्ये गप्पा मारायला बसले असते तर ऐकायला आलंच असतं. आणि ‘..त्यांच्या मागे कोण आहे? ना मुलगा, ना बायको, ना सून. त्यांना कोणासाठी सत्ता हवीय? लोकांसाठीच ना!’ असे मोदींबद्दल लोक बोलताहेत हेही ऐकायला आलं असतं. लोकांच्यात बसायचा, त्यांच्याशी बोलायचा, त्यांच्यात मिसळायचा आळस करून त्यांच्या मनातलं जाणून घेण्याचा प्रयत्न करणारे लोक हे स्वत:साठी आणि लोकांसाठीही खूप धोकादायक आहेत.

माणसं गप्पा मारताहेत तोपर्यंत खूप छान आहे. मग ते थापा मारोत, बढाया मारोत, दु:ख सांगोत वा आनंद व्यक्त करोत.. त्यांनी एकमेकांशी बोलायला हवे. अचानक काहीतरी होतं आणि माणसं एकमेकांशी बोलेनाशी होतात. त्यांच्याकडे एकमेकांना सांगण्यासारखे काहीही उरत नाही. त्यांचे बोलणे बंद झाले, की ते हिंसक होतात. मग ते स्वत:ला तरी संपवतात किंवा बंदूक तरी उचलतात.

वेल्हाळपणे एकमेकांना काहीतरी सांगत बसलेले लोक हे फार शुभंकर चित्र आहे. हे चित्र दिलासा देते, की हे लोक वाद घालतील, भांडण करतील पण एकमेकांच्या बरोबर राहतील, त्यांना एकमेकांची आठवण येईल आणि ते एकमेकांना धरून राहतील.

जेव्हा त्यांना मन रमवायला यंत्र पुरेसे होईल आणि एकमेकांची गरज उरणार नाही तेव्हा जगाच्या शेवटाची ती सुरुवात असेल.

मग कुठे भेटू या?

– मंदार भारदे

mandarbharde@gmail.com