भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक सॅम पित्रोदा यांना भेटण्याची आणि त्यांचे विचार ऐकण्याची संधी काही दिवसांपूर्वी मिळाली. ८०-८५ च्या काळात भारतातल्या प्रत्येक माणसाच्या घरात फोन असला पाहिजे, हे स्वप्न या माणसाने आधी इंदिरा गांधींना आणि नंतर राजीव गांधींना दाखवले. लोकांना एकमेकांशी कधीही कुठेही बोलता येणे हे आज आपल्याला किती सहज आणि सोपे वाटते. थोडय़ा वेळासाठी रेंज नसेल तर जीव कासावीस होतो. त्या काळात फोन करायला मिळणे ही चैनीची गोष्ट होती. त्याकाळी वेगाने माहिती पोहोचवायचे एकमेव साधन म्हणजे तार करणे हे होते. साधे सुतकाचेसुद्धा वेळेवर कळवता आले नाही म्हणून लोक हळहळ व्यक्त करायचे. तार घेऊन पोस्ट खात्याचा कर्मचारी दारात आला की घरातल्या बायाबापडय़ा आधी हंबरडाच फोडत. बहुतांश वेळेला तातडीने कळवायची बातमी ही ‘कळवण्यास अत्यंत वाईट वाटते’ हीच असे. त्यामुळे तारेत काय आहे हे वाचण्यापूर्वीच साधारण जाण्याच्या वयात जी जवळची माणसे असत त्यांचे चेहरे सर्रकन् डोळ्यासमोर यायचे.

ज्याच्याकडे फोन असेल तो व्हीआयपी समजला जायचा. शेजारपाजारचे लोक त्याला धरून असत. त्याचा नंबर आजूबाजूच्यांकडेच तर असेच; पण त्यांच्या समस्त नातलगांकडेही असे. आपला काही महत्त्वाचा फोन त्याच्याकडे आला तर त्याच्याशी आपली जवळीक असायला हवी, नाहीतर तो आपल्याला निरोपच देणार नाही अशी भीती त्यांना वाटे. आपल्याकडे कुठल्याही गोष्टीचे वाटप कसे करायचे आणि कुणाला महत्त्व द्यायचे, हा नेहमीच कळीचा मुद्दा ठरत आलाय. जेव्हा टेलिफोनच्या जाळे विणले जात होते तेव्हा भारतासारख्या अवाढव्य देशात ते प्रचंड मोठे आव्हान होते. तेव्हा आधी ‘घरात फोन’ हे टार्गेट न ठेवता ‘गावात फोन’ हे टार्गेट ठेवून तारा अंथरायचा निर्णय सॅम पित्रोदांनी घेतला आणि पिवळ्याधम्मक रंगातले एसटीडी बूथ उभे राहिले. आपले लोक फोन करायला आजूबाजूला जाऊ  शकतात, त्यांना संपर्काची सोय हवी आहे. पण त्यांना ती घरात हवी अशी काही गरज नाही. तेव्हा गावात फोन पोचवला की सध्या पुरे असा तो निर्णय होता. गावातल्या पिवळ्या एसटीडीवाल्याने शेजारच्याला निरोपासाठी गयावया करायची गरज संपवून टाकली. त्याला रोख पैसे मोजायचे आणि फोन करायचा असा सोपा हिशेब. सॅम पित्रोदांचे भाषण ऐकत होतो तेव्हा एकाचा फोन सारखा वाजत होता. ‘तू तुझा फोन जरा बंद ठेव,’ असे सॅम पित्रोदा समोर असताना त्याला सांगायला मला विलक्षण संकोचाचे वाटत होते. या माणसाने भारतीय लोकांना एकमेकांशी बोलायला मिळावे म्हणून आपले आयुष्य खर्ची घातले आणि आता त्यांच्यासमोर एखाद्याला ‘आता तू फोनवर जरा वेळ बोलू नकोस,’ असे सांगितले तर त्यांना वाईट वाटेल असे मला उगाचच वाटले. नंतर गप्पा मारताना पित्रोदा स्वत:च कुरकुर करत म्हणाले की, दिवसाला ७००-८०० व्हॉट्सअ‍ॅप येतात, २००-३०० ई-मेल्स येतात. कसे काय इतक्या सगळ्यांशी बोलायचे? कसे काय त्यांना उत्तरे द्यायची? लोक खूप संपर्क करतात म्हणून भारतातल्या संपर्क-क्रांतीच्या जनकाने भंडावून जाणे हे मला आगीच्या बंबाला आग लागण्यासारखे वाटले आणि खूप मजाही वाटली. ‘शनीची महती सांगणारा मेसेज दहाजणांना पाठवा आणि तत्काळ सुभाग्याचे धनी व्हा,’ असे सांगणारे मेसेज त्यांनाही तर मिळत असतीलच ना? आपण सरकारदरबारी एकेक कागद पुढे सरकावा म्हणून टाचा घासल्या, ‘लोकांना घालायला कपडे नाहीत, खायला अन्न नाही अशा देशात कशाला हवेत टेलिफोन?’ असल्या बिनडोक प्रश्नांची उत्तरे देण्यात दिवसचे दिवस घालवले, ऊर फुटेपर्यंत भारतातल्या डोंगरदऱ्यांतून टेलिफोनच्या तारा अंथरल्या, त्याच तारांमधून घरंगळत, सॅटेलाईटच्या लहरींवर तरंगत शनीचा मेसेज पित्रोदांच्या फोनवर येत असेल तर त्यांच्या मनात काय भावना येत असतील, या विचाराने मला हसू आले. मला खात्री आहे- लोकांना थंड हवा मिळावी म्हणून ज्या कोणी पंख्याचा शोध लावला असेल त्याला जेव्हा टांगून घेऊन जीव द्यायला त्या पंख्याचा उपयोग होतो, हे कळले असेल तेव्हा जे वाटले असेल तेच पित्रोदांना शनीचा मेसेज मिळाल्यावर वाटले असणार.

मला भारतातल्या संपर्क-क्रांतीचा प्रवास आणि त्यावेळी लोक जे समजत होते, जे आडाखे बांधत होते, ते कधी चुकत होते, कधी बरोबर येत होते.. तो सगळा प्रवास हा एखाद्या चित्रपटाचा विषय वाटतो. गावात फोन, मग कार्यालयात फोन, मग घरात फोन, मग पेजर, मग मोबाईल, मग ई-मेल, मग स्मार्टफोन.. हा सारा प्रवासच किती रंजक आहे! दरवेळेला वाटायचे, आता याच्यापेक्षा जास्त थोडेच काही असणार आहे? आणि दर वेळेला नवीन काहीतरी यायचं आणि खजील व्हायला व्हायचं. आपणही काय गमतीचे लोक आहोत! आपल्याला जेव्हा घरात फोन येईल असे सांगितले जात होते तेव्हा घरात कशाला हवा फोन, असे वाटले होते. मोबाईल फोन जेव्हा आले तेव्हा कॉल करणे खूप खर्चीक आहे.. फक्त ज्यांचे बिल सरकार भरते असे काही अधिकारी आणि काळाबाजारवाले यांनाच हे मोबाईलचे फॅड परवडेल, असे मला शपथेवर ज्याने सांगितले होते त्यानेच मला आज त्याच्या मुलाच्या वाढदिवसाचा फोटो व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवलाय. ‘काय करायचाय स्मार्टफोन? लोकांना फोन करता आले आणि ते घेता आले की झाले! आम्हाला नाही जमणार ते गुंतागुंतीचे फोन हाताळणे..’ असे म्हणणारे आज स्वत:च्या फोनवरून उबेर बुक करतात आणि त्याच उबेरमध्ये आपल्या नातवंडांशी स्काइप करत त्यांच्यासाठी त्यांच्या देशात घराजवळच्या दुकानातून पिझ्झा ऑर्डर करतात. पूर्वी लोक हातातल्या फोनला स्टेटस सिम्बॉल समजायचे, हे आठवले तरी आज हसू येते. आमच्या गावात एकाकडे नुकताच मोबाईल फोन आला होता. तेव्हा फोन घ्यायला पण पैसे पडायचे. तेव्हा तो उगाचच सगळ्यांमध्ये बसून ‘इतके शेअर विकून टाक.. दोन लाख बँकेत भरले का?’ वगैरे बोलत फोनवर होता आणि त्याचवेळी त्याचा खरोखरच फोन वाजला तेव्हा लोकांनी त्याची खूप चेष्टा केली होती.

मुद्दाम चारचौघांत मोबाईलवर बोलणे पूर्वी लोकांना भारी प्रतिष्ठेचे वाटायचे, तेच आता असभ्यपणाचे समजले जाते. चार ठिकाणी शब्द टाकून, भरपूर वाट बघत लँडलाइन फोन मिळवण्यासाठी ज्यांनी आटापिटा केला होता, तेच लोक आता ‘काय करायचाय लँडलाइन फोन?’ म्हणून फोन लाइन काढून टाका, असा अर्ज करताहेत. मला एक गंमत आठवते. एका मोबाईल कंपनीने तुम्ही जिथे जाल तिथे आमचे नेटवर्क तुमच्या पाठी येईल असे सांगणारी एक जाहिरात केली होती. पग जातीचा एक छोटा कुत्रा एका छोटय़ा मुलाच्या पाठी सगळीकडे जाताना फार सुंदर दाखवले होते. ती इतकी प्रभावी जाहिरात होती, की पुढे अनेक दिवस ती जाहिरात कंपनीने चालवली. जेव्हा ती जाहिरात पहिल्यांदा दाखवली तेव्हा फोन करायला दोन रुपये लागायचे आणि पगचे पिल्लू तीन हजाराला मिळायचे. वर्षभर जाहिरात केल्यावर फोन करायचा दर पन्नास पैसे झाला होता आणि पगचे पिल्लू तीस हजाराला मिळायला लागले होते. मी कॉलेजला असताना माझ्याकडे पेजर आला. पेजर म्हणजे काय, हे अनेकांना आता माहीतदेखील नसेल. लँडलाइन फोनवरून कॉल सेन्टरला फोन करायचा. मग ती मुलगी मेसेज लिहून घेणार आणि मग तो मेसेज टाईप करून पाठवणार- अशी व्यवस्था. माझा एक मित्र मला प्रेमाने अगदी असभ्य संबोधन वापरायचा. मला पेज करायला म्हणून त्याने ते असभ्य संबोधन वापरले म्हणून पेजरवाल्या मुलीने त्याला सॉलिड झापले होते. खाजगी संभाषण ही गरज असू शकते हे आपल्याला माहीतच नव्हते असा हा काळ फार जुना नाही. लांब कुठेतरी हेडफोन लावून कोणीतरी कोणाशी तरी गुलुगुलु बोलत असतो तेव्हा मला रांगेत उभं राहून पिवळ्या एसटीडीच्या बूथचे दार ओढून घेत, बाहेरच्या दारावर टकटक करत असताना केलेले खाजगी संभाषणाचे प्रयत्न आठवत राहतात आणि हसायला येते.

..पित्रोदा बोलत होते. संपर्क आणि माहितीचे भविष्य काय असेल, हे उलगडून सांगत होते. मला एक खाजगी आणि एक सार्वजनिक असे असलेले माझे दोन सेलफोन, एक लॅपटॉपला जोडायचे पेनड्राइव्हवाले इंटरनेट आणि असू द्यावा अडचणीसाठी म्हणून घेतलेला डोंगल, एक वायफाय घरातला, एक ऑफिसमधला, गाडीतला रस्ते दाखवणारा जीपीएस असे सारे डोळ्यासमोर येत होते. या माणसाच्या मूलभूत कामामुळे मिळालेल्या फोन, इंटरनेट या सगळ्या सुविधांत मी आणि माझ्यासारखे इतर लोकही इतके गुंगून गेलो होतो, की या माणसाबद्दल पुरेसे कृतज्ञ असायलाही आपल्याला आजपर्यंत वेळ मिळाला नाही याचे वाईट वाटत राहिले. एखाद्याचे भाषण नुसते ऐकल्यावर कृतज्ञता दाटून यावी असे किती कमी प्रसंग आयुष्यात येतात!

मनात विचार आला, काय करायचाय फोन? कोण वापरणार आहे? हे श्रीमंतांचे चोचले आहेत! गरीबाला परवडणार आहे का ते? असले बेमुर्वतखोर प्रश्न विचारून किती भंडावून सोडले होते भारतातल्या लोकांनी सॅम पित्रोदा आणि त्यांच्या टीमला. नवीन, वेगळे काहीतरी जेव्हा लोक मांडत असतात तेव्हा आपण आपल्या क्लासिक सनातन अडाणीपणातून आलेल्या आत्मविश्वासामुळे ‘हे शक्यच नाही,’ हे किती आत्मविश्वासाने म्हणतो! इतक्या वेळा तोंडावर पडूनही नवीन काहीतरी मांडणाऱ्याला विरोध करण्याची आणि त्याच्यावर अविश्वास दाखवायची आपली खोड काही जात नाही. माणूस आणि अक्कल यांच्यातली निर्बुद्ध गृहितकाची भिंत संवादाच्या लहरींनी भेदली जाऊ  शकतेच की! पण ही संरक्षक भिंत नाही तर अज्ञानाची आहे, इतके तरी वेळेवर समजायला हवे.

आवेगाने आणि आत्मविश्वासाने पित्रोदा म्हणाले की, गांधीजींचे आयुष्य हे ‘गांधी- पार्ट वन’ होते. आणि आज जेव्हा जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच सगळे विश्व परस्परांशी सहज कनेक्टेड झाले आहे तेव्हा ‘गांधी- पार्ट टू’ लिहिला जाणार आहे.

पित्रोदा, तुमच्या तोंडात साखर पडो!

मंदार भारदे – mandarbharde@gmail.com