– मेघना जोशी
ऊन-पावसाचा खेळ सुरू झाला की आकाशात एका क्षणी सात रंगांची लयलूट होते. रंगविहीन पाण्याच्या थेंबातून सूर्याची किरणे जातात आणि त्यात लपलेले सप्तरंग सर्वांच्या दृष्टीस पडतात. फक्त दृष्टीस पडत नाहीत, तर पाहणार्याला मोहित करून टाकतात. जेव्हा तो निव्वळ पाण्याच्या थेंबाचा समूह असतो; तेव्हा कुणाच्या खिजगणतीतही नसतो. पण त्यातील सप्तरंगांची उधळण होत ज्यावेळी इंद्रधनुष्य प्रकटतं, तेव्हा मात्र त्याच्याकडे इतरांचं लक्ष जातं. बालमित्रांनो, आपलंही असंच असतं. जोपर्यंत आपल्यामधील छुपे सद्गुण इतरांना दिसत नाहीत तोपर्यंत आपल्याकडे कोणाचंही लक्ष जात नाही. कोणीही आपला विचार करत नाही. साधं वळून पाहतही नाहीत. पण योग्य संधीचा फायदा घेत जर का आपण आपल्यामधील छुपे गुण प्रकट केले, तर आपोआपच आपण चमकून उठतो, आपल्या नकळतच! त्यानंतर सर्वांना आपली दखल घ्यावीशी वाटते. आपल्याला मिळणार्या यशाचंही बघा ना, अनेक प्रयत्नांनंतर कधीतरी क्षणिक यश पदरात पडतं, पण तो यशाचा एक क्षण आपलं पूर्ण आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतो. अनेकदा क्षणिक गोष्टीही जीवनाला रंगीत करतात… इंद्रधनुष्यासारख्या!
joshimeghana.23@gmail.com
