एक होता जिरू नावाचा जिराफ. त्याचे डोळे छोटेसे अगदी सुंदर! पाय नारळाच्या झाडासारखे ताडमाड आणि मान तर इतकी लांबलचक… इतकी इतकी लांबलचक होती की ढगांच्याही वरती यायची. उंचच्या उंच झाडाचा पालादेखील त्याला मान वाकवून खावा लागायचा. असा हा आपला जिरू!
जिरू ज्या जंगलात राहायचा, तिथे हजारो प्रकारचे प्राणी आणि शेकडो प्रकारचे पक्षी राहायचे. पण जिरूचं घर होतं ते जंगलातल्या सगळ्यात उंच डोंगरावर. उंचावर राहणं त्याला इतकं आवडायचं की तो कधी खाली उतरायचाच नाही. त्याला वाटायचं, ‘‘मी तर एवढा उंचपुरा आणि रुबाबदार प्राणी! मी खाली उतरून पायथ्याशी जायचं? च्छे!! माझी प्रतिमा ढासळेल की!!’’ तसा तो दुसऱ्या प्राण्यांचा द्वेष करायचा असं नाही. मात्र बाकीच्यांनी वरती आले तर चालेल, पण मी खाली उतरणार नाही, यावर मात्र तो अगदी ठाम होता.
त्या डोंगराखाली एक तलाव होता आणि तलावाकाठी सगळे प्राणी पाणी प्यायला यायचे. तलावाजवळ आले की बऱ्याच जणांना जिरूला पाहायचा खूप मोह व्हायचा. मग ते डोंगरावर चढत येऊन जिरूसोबत गप्पा मारायचे.
एकदा मंटू माकड पाणी पिऊन डोंगरावर जिरूकडे आले. मंटू म्हणजे जंगलातला स्टँडअप कॉमेडियन! एखाद्याला हसवणे म्हणजे त्याच्यासाठी डाव्या हाताचा खेळ. त्याने इतर प्राण्यांचे गमतीचे किस्से सांगून जिरूचे मस्त मनोरंजन केले. जिरू खूप दिवसांतून मान हलवून हलवून हसू लागला. जिरूला एवढं हसत मान हलवताना सगळ्या जंगलाने पाहिले. मग पोपट, कावळे, चिमण्या, हरीण, ससे, मांजरं सगळे तिथे जमले. मग काय, मंटूने अजून करमणूक करावी म्हणून सगळ्यांनी आग्रह धरला.
हसून… मजा करून झाल्यावर सगळे दमून बसले. इतक्यात वरती कापसासारखे मऊ, आणि जांभळे जांभळे ढग जमा होऊ लागले. ऊन नाहीसे झाले. थंड हवा वाहू लागली. आणि काही क्षणातच टप टप टप असा आवाज करत पावसाचे टपोरे थेंब बरसू लागले. ते गारेगार थेंब चेहऱ्यावर आणि पूर्ण अंगावर झेलत सगळे प्राणी नाचू लागले. एकमेकांच्या अंगावर पाणी उडवू लागले. त्या उत्साहात जिरू उठून उभा राहिला आणि त्याचा हसरा चेहरा मावळूनच गेला ना! का? अहो तो उभा राहिल्यावर त्याची मानही ढगांच्याही वर आली!
मानेखालचं अर्धं शरीर पावसात भिजतंय आणि चेहरा मात्र कोरडा ठक्क! इतकंच नव्हे, त्याला तर ढगांमुळे खालचे प्राणीही दिसत नव्हते. त्याचं पावसात मनसोक्त भिजत धावायचं स्वप्न या उंचीमुळे आता दु:खद बनलं होतं. आणि आता सर्वांना एवढी मजा करताना पाहून आता तर त्याला जास्तच रडू येऊ लागलं. सगळे आपापल्या परीने त्याची समजूत काढत होते, पण जिरू मात्र रडतच बसला.
आता सर्वांनीच जिरूची इच्छा पूर्ण करण्यासाठी शक्कल लढवायला सुरुवात केली. हे पूर्ण ढगच वर कसे सरकवता येतील यासाठी शक्कल लढवू लागले. मंटूरावांनी पक्ष्यांना गोळा करून त्याची युक्ती सांगितली. आणि मग सगळ्या पक्ष्यांनी मिळून जितकं जवळ थांबता येईल तितकं जवळ थांबून एक लांब आणि रुंद थवा तयार केला. हिप हिप हुर्रे म्हणून सगळ्यांनी एकाच वेळी उडत ढगाला वर उचलायला सुरुवात केली. संथपणे एखादा कापूस तरंगावा तसे ढग वरवर येऊ लागले. इतकंच काय, ते जिरूच्याही डोक्याच्या वर जाऊ लागले.
आपल्याला पाऊस मिळावा म्हणून चाललेले पक्ष्यांचे प्रयत्न पाहून त्याचं मनही भरून आलं. ढग आता खूप वर आले. पक्ष्यांनी ढगाला अलगद तिथेच सोडलं. पावसाच्या धारा आता जिरूच्या डोक्यावरून बरसू लागल्या. जिरूने आपला चेहरा आभाळाकडे केला… डोळे मिटले आणि पावसाचे थेंब झेलू लागला. पावसात पळू लागला, पण त्याचा तो आनंद थोडाच वेळ टिकला. अगदी काही वेळातच पाण्याच्या भाराने ढग पुन्हा खाली येऊ लागले. पक्षी पुन्हा ढग वरती उचलण्यासाठी येऊ लागले, पण जिरूला आता त्याच्या आनंदासाठी आपल्या मित्रांना त्रास देणं ठीक वाटत नव्हते. त्याने पक्ष्यांना थांबायला सांगितले आणि तो खाली बसला. सर्वांना हे जाणवत होते की जिरूच्या मनात काहीतरी विचारमंथन जरूर चालू आहे. कुणालाच अंदाज लागत नव्हता की तो आता नक्की काय करणार तरी काय! त्याने सगळ्यांना आपल्या पाठीवर बसायला सांगितले. तो उठला. जिरूने आपली लांब मान वळवली. मागे सर्वांकडे पाहून मस्त हास्य केलं. आणि चक्क डोंगरावरून खाली उतरू लागला. आता तो खाली खाली येईल तसे तसे ढग आपोआप त्याच्या डोक्यावर जाऊ लागले. पायथ्याशी आल्यावर सगळ्यांनी त्याच्या पाठीवरून खाली उडी घेतली आणि जिरूसोबत सगळे नाचू लागले.
मंट्याच्या मनात मात्र ‘‘आता जिरू खाली उतरलाच आहे तर त्याच्या मानेवर बसून उंचच उंच झाडावरून पटकन फळे कशी काढता येतील!’’ हा विचार घोळू लागला.
vishal6245 @gmail.com