भारती महाजन-रायबागकर
‘‘आई, काय केलंय जेवायला? लवकर वाढ, खूप भूक लागलीय.’’ संध्याकाळी शाळेतून आल्यावर दप्तर जागेवर ठेवत तेजसनं विचारलं
‘‘दोडक्याची भाजी आणि पोळी, शिवाय खिचडीही केलीय तुझ्या आवडीची, ये हातपाय धुऊन पट्कन गरमागरम जेवायला.’’ आईनं सांगितलं.
‘‘रोज रोज काय गं तेच- भाजी-पोळी अन् खिचडी! नवीन काहीतरी करत जा नं. नको मला जेवायला.’’ तेजसनं कुरकुरत म्हटलं.

‘‘तूच सांग नवीन काय करत जाऊ ते.’’
‘‘मी! मला काय माहीत काय करायचं असतं ते.’’
‘‘मग तुझ्या नवीन ‘काहीतरी’ पदार्थांची नावं सांग दोन-चार’’
‘‘अगं पण… आयडिया! अब मेरे पास AI है’’ चुटकी वाजवत तेजस म्हणाला आणि आपल्या खोलीत गेला.

‘‘हो, खरंच विचार तुझ्या त्या AIला. माझ्या डोक्यावरचा भार तरी कमी होईल रोज रोज काय करावं याचा…’’ आई सुटकेचा नि:श्वास टाकीत म्हणाली.
तेजसची आजी माय-लेकरांचा हा संवाद ऐकत होती. तिलाही आता या AI बद्दल उत्सुकता वाटत होती. कारण बर्याच दिवसांपासून ती घरात हा शब्द सतत ऐकत होती. दुसर्या दिवशी फक्त घरातल्यांसाठी केलेल्या एका नवीन ग्रुपवर एक लिस्ट आली. ‘आता हे काय नवीनच’ असं म्हणून तेजसच्या आजीनं पाहिलं तर त्यात आलटून-पालटून सकाळ, दुपार, संध्याकाळ फक्त तेच तेच आणि अगदीच मोजके पदार्थ खाण्यासाठी सुचवले होते. त्यातही महाराष्ट्रीयन जवळपास नव्हतेच. एवढ्यात तिला स्वयंपाकघरातून तेजसच्या आईचा आवाज आला.

‘‘काय मग तेजस, यातले कुठले पदार्थ बनवू बरं आज?’’
‘‘छट्! काय गं आई! या AIला तर आपले मराठी पदार्थ कळतच नाहीत. कसं तरी समजावून सांगितलं तर ही लिस्ट पाठवली त्यानं. यापेक्षा तर तूच कितीतरी वेगवेगळे पदार्थ बनवत असतेस आणि कधी कधी आजी पण…’’
‘‘फार लवकर कळलं. आणि तरीही तू दररोज कुरकुर करतच असतोस.’’ आईनं आपलं हे वाक्य मनातच म्हटलं.

आजीच्या कानावर माय-लेकाचं हेही संभाषण पडलं आणि तिला काहीतरी सुचलं आणि तिनं दिवसभरात आठवून-आठवून जवळपास ५०-६० पदार्थांची यादी करून ती एका कागदावर लिहिली. हल्ली तिला स्वयंपाकघरात फारसं काम नसायचं त्यामुळे स्मरणशक्तीला मात्र काम मिळालं आणि दुसर्या दिवशी तो कागद तिनं स्वयंपाकघरातल्या एका भिंतीवर चिकटवून दिला. तेजसनं ती यादी पाहिली मात्र…
‘‘आज्जी, कि त्ती पदार्थ आहेत यात… आणि माझ्या आवडीची मॅगी आणि पास्तासुद्धा लिहिलंय… शिवाय पावभाजीसुद्धा… वॉव आज्जी “You are great’’

‘‘हो, पण ते पास्ता, मॅगी फक्त कधीतरीच बरं का…’’
‘‘चलेगा… नही, नही दौडेगा.’’
तेजसच्या आईनंही म्हटलं, बरं झालं बाई, ही यादी आता डोळ्यासमोर असली की ‘आत्ता काय करू?’ हा प्रश्न चुटकीसरशी सुटेल माझा. यातील जवळपास सगळे पदार्थ माहितीतलेच आहेत. पण ऐनवेळी सुचत नाहीत, आणि सुचले तर त्याला लागत असलेली सामग्री घरात असेलच याची खात्री नाही. आणि हो, काही तुमच्या पिढीतील पदार्थही ऐकून आहे, चवही चाखली आहे कधीतरी… पण केले नाहीत फारसे, आता तेही करून पाहायला हरकत नाही. आई, थँक्यू हं, माझंही काम सोप्पं केलंत तुम्ही.’’

‘‘अगं, माझे नाही, त्या AIचे आभार मानायला हवेत. त्याच्यामुळेच तर मी माझ्या स्मरणशक्तीला चालना दिली आणि एवढे पदार्थ आठवले. आता तुम्ही दोघांनीही त्यात आणखी भर घातली किंवा जुन्या आणि नवीन पदार्थाचं मिश्रण म्हणजे ते तुमचं फ्युजन की काय म्हणतात ते केलं तर सोन्याहून पिवळं. काय तेजस!’
‘‘हो तर, AIची महती खरी, पण
‘2 अ’ म्हणजे तुम्ही दोघी- Aai आणि Aaji पण खूप भारी.’’ तेजस म्हणाला.
u bharati. raibagkar@gmail.com

प्राण्यांचे काव्यसंमेलन

प्राण्यांचे काव्यसंमेलन घ्यायचे ठरवले
वनराजाने तसे जाहीर केले
स्वरचित कविताच हवी
नको कुणाची कुठली कॉपी
सर्वांनाच मग मजा वाटली
सगळ्यांनी अक्षरांशी मैत्री केली
माकडाने खूपच छान कविता केली
उड्या मारत सगळ्याच्या पुढे नेली
खार तर शीघ्र कवीच ठरली
स्टेजवर येताच तिला कविता स्फुरली
हरीण आले उड्या मारत
‘कविता म्हणजे काय?’ बसले विचारत
कोल्ह्याने तर खूप छान कविता केली
नंतर कळले… घोड्याची कविता त्याने चोरली
डुलत डुलत हत्ती आला
पोवाडा सुरात त्याने गाऊन दाखवला
घोड्याने दुसरीच कविता वाचून दाखवली
पण मनासारखी काही नाही झाली
जिराफाने एक गझल पेश केली
सर्वांची वाहवा मिळवून गेली
झेब्य्राने एक भजन म्हटले
वनराजही टाळ वाजवू लागले
सशानेही एक केली चारोळी
ती ऐकून वाघाने फोडली डरकाळी
सगळ्यांच्या कविता छानच झाल्या
गाढवाच्या मात्र डोक्यावरून गेल्या
अशा प्रकारे प्राण्यांचे काव्यसंमेलन झाले
पुढच्या वर्षीही यायचे, आमंत्रण देऊन गेले.

  • सानिका कुपटे