– उज्ज्वला देशपांडे

मस्तीखोर मुलांचा वर्ग म्हणून आमचा वर्ग संपूर्ण शाळेत प्रसिद्ध होता. खरं तर आमच्या वर्गात इतर वर्गांसारखीच काही अभ्यासात हुशार, काही खेळात तरबेज, तर काही नाटक-वक्तृत्वासारख्या कलांमध्ये आघाडीवर होती. तरीपण आम्ही ‘मस्तीखोर’ म्हणून प्रसिद्ध. कारण आम्ही सगळेच्या सगळेच खूपच जास्त खोडकर होतो, कधी-कधी ‘त्रासदायक खोडकर’.

यावर्षी वर्गशिक्षिका म्हणून नम्रताबाई येणार हे कळल्यावर मात्र वर्गात नुसता दंगा सुरू झाला. नम्रताबाईंनीच आम्हाला सगळ्या मस्तीखोर मुलांना वाचनाची सवय आणि गोडी लावली होती. त्यामुळे आमच्या त्या आवडत्या. पहिल्या दिवशी नम्रताबाई वर्गशिक्षिका म्हणून आम्हाला वर्गात भेटायला आल्या, पण एकट्या नाहीत. त्यांच्याबरोबर एक मुलगी आणि मुलगा असे दोघे होते- जे नव्याने आमच्या शाळेत दाखल झाले होते आणि आता ते आमच्या बरोबरीनं शिकणार होते.

आमच्या मस्तीखोर वर्गानं खोड्या काढायला बरोब्बर नवीन ‘सावज’ हेरलं, एकमेकांकडे डोळ्यानं खाणाखुणा करून झाल्या. आम्हाला आश्चर्य वाटलं नम्रताबाईंचं! त्या आमच्या वर्गाला चांगल्याच ओळखत होत्या तरी का बरं नवीन विद्यार्थ्यांना आमच्या वर्गात घेतलं असेल? हा प्रश्न संपूर्ण वर्गाला पडला.
‘‘नम्रताबाई, या मुलांना आमच्याच वर्गात का घेतलंत?’’ वर्गातल्या सर्वांत मस्तीखोर महेशनं विचारलं.

‘‘सांगते, आधी या दोघांची नावं सांगते.’’ असं म्हणून त्यांनी सर्वांना त्यांची नावं सांगून ओळख करून दिली आणि ते दोघे आमच्याइतकेच खोडकर आहेत हेही सांगायला त्या विसरल्या नाहीत.

नम्रताबाईंचं बोलणं संपल्यावर निशाद न राहून म्हणाला, ‘‘अरेरे, आता हेच आपल्या सगळ्यांच्या खोड्या काढणार का? इतके सारे ‘सावज’ त्यांनाच तर मिळाले?’’

नम्रताबाई हसून म्हणाल्या, ‘‘हे दोघे अभ्यासात खूप हुशार आहेत.’’

‘‘त्यात काय मग, हुशार तर मी आणि दिनेशही आहे.’’ समीरनं तातडीनं दिलेलं उत्तर ऐकून नम्रताबाईंना हसू आलं.

त्या म्हणाल्या, ‘‘हे दोघं मल्लखांब चॅम्प्स आहेत.’’ आमच्या वर्गातली खोडकर कबड्डीपट्टू असलेली सरिता म्हणाली, ‘‘आमच्यातही वेगवेगळ्या खेळांतले चॅम्प्स आहेत की!’’ असं अजून दहा मिनिटं चालू राहिलं. ती नवीन मुलं शांत होती. शेवटी नम्रताबाई म्हणाल्या, ‘‘तुम्हाला येतं ते बरंचसं या दोघांनाही येतं; परंतु त्यांच्याशी तुम्हाला छान संवाद साधता आला पाहिजे.’’

खोडकर संतोष म्हणाला, ‘‘त्यात काय अवघड? आम्ही ते लगेच सुरू करतो.’’ त्यानं लगेच त्या नवीन मुलांना कुठं बसायचं ते दाखवलं.

नम्रताबाई हणाल्या, ‘‘मी निघते. तासाचा उरलेला वेळ तुम्हाला जे येत नाही ते तुम्ही सर्वांनी त्यांच्याकडून शिकून घ्यायचंय.’’ आम्ही त्यांना ‘म्हणजे काय’ हे विचारणार इतक्यात नवीन आलेल्या मुलांशी छान हसून त्या निघून गेल्यासुद्धा. सगळा मस्तीखोर वर्ग त्या दोघांभोवती गोळा झाला आणि एकच गलका सुरू झाला. आणि मग आमच्या लक्षात आलं नम्रताबाई काय म्हणत होत्या. कारण ते दोघेही मुके होते. साइन-लँग्वेज येत असेल तरच त्यांच्याशी संवाद साधता येणार होता! वर्गात एकदम शांतता पसरली. आम्हाला संवाद तर साधायचाच होता, त्यांच्याशी मैत्रीपण करायची होती. आता काय करायचं?

मग समीरनं एक कागद-पेन घेतला. त्यावर नुसतं लिहून चालणार नव्हतं, कारण नम्रताबाईंनी जे आम्हाला येत नव्हतं ते त्यांच्याकडून शिकून घ्यायला सांगितलं होतं- म्हणजेच साइन-लँग्वेज.

समीरनं कागदावर लिहिलं की, ‘‘आम्हाला तुमची साइन-लँग्वेज शिकवा आणि जिथे आम्हाला कळत नाही तिथे लिहून समजवा.’’
अर्थात हे सोप्पं नव्हतं. हसत-खेळत एकमेकांच्याच खोड्या काढत हळूहळू मस्तीखोर वर्गाने साइन-लँग्वेज शिकायला सुरुवात केली. संवाद साधायला घाबरत असलेल्या निमासाठी ही ॲक्टिव्हिटी खूप उपयोगी ठरली. आपल्याला नीट बोलता-ऐकता येतं तरी आपण का घाबरतो असं म्हणून तिनं आपल्या मनातल्या भीतीला पळवून लावायचं ठरलं.

तिच्याप्रमाणेच अन्य मुलंही साइन-लँग्वेज शिकून पुढे त्याचा उपयोग कसा करायचा याचाही विचार करू लागले. वर्षभर या साइन-लँग्वेजने आम्हा मुलांमध्ये खूप शिस्त आणली. शाळेच्या वार्षिक बक्षीस समारंभात आमच्या वर्गाला ‘विशेष पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आलं. मस्तीखोर मुला-मुलींच्या पालकांच्या डोळ्यात तर आनंदाश्रू होते. आपल्याला मस्तीखोर वाटणारी आपली बाळं किती समंजस आहेत ही त्यांच्यासाठी अभिमानास्पद बाब होती.
‘नम्रताबाईंनी या दोघांना आमच्याच वर्गात का घेतलं?’ या प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळालं होतं. ‘मस्तीखोर’ ते ‘गुणी मुलं’मध्ये रूपांतर करण्याचा तो एक भन्नाट प्रयोग होता तो!

ujjwala.de@gmail.com