मृणाल तुळपुळे
वाळवंट म्हणजे वाळूचे ढीग, खजुराची झाडं, काटेरी झुडपं… असं वाळवंट हे उंट, लहान लहान प्राणी व पक्ष्यांचे घर… अशाच एका वाळवंटात शमी नावाचा उंट राहत असे. अतिशय शांत आणि मनमिळाऊ असा शमी वाळवंटातील प्राण्यांची खूप काळजी घ्यायचा. त्याच्या गळ्यात एक घंटा होती. तो वाळवंटातून चालताना ती घंटा टण् टण् अशी वाजली की इतर प्राणी त्याला भेटायला येत.
एके सकाळी नेहमीप्रमाणे शमी ओॲसिसकडे चालत निघाला. चालता चालता त्याला जाणवलं की वारा जरा वेगळाच वाहत आहे. सुरुवातीला वारा हळू वाहत होता, पण नंतर त्यानं जोर पकडला आणि वाळवंटातील वाळू उडू लागली. ती वाळू शमीच्या अंगावर पडली आणि त्याच्या डोळ्यात वाळूचे कण गेले. शमीनं डोळे मिटले आणि तो चालायचा थांबला. वाळूचं वादळ होणार आहे हे त्याच्या लक्षात आलं.
तेवढ्यात त्याला कोणाचं तरी जोराचं बोलणं आणि हसणं ऐकू आलं. शमीनं हळूच डोळे उघडले तर त्याच्याभोवती सगळीकडे वाळूचे छोटे छोटे कण फिरत होते. त्यातले एक छोटेसे वाळूचे वादळ त्याच्याशी बोलत होते. अतिशय घमेंडखोर असलेलं ते वादळ त्याला म्हणालं, ‘‘काय रे उंटा, तू एवढा उंच आहेस, शक्तिवान आहेस, पण मला घाबरलास ना? बघितलीस माझी ताकद?’’
शमी शांतपणे म्हणला, ‘‘मला माहीत आहे की तू खूप ताकदवान आहेस, पण आता जरा थांब.’’
वादळ जरा घुश्शातचा म्हणालं, ‘‘मला खूप वेळ असं उडायचं आहे. मला खूप मजा येत आहे आणि तू मला थांबायला सांगतोयस. मी का थांबू?’’
शमी त्याला शांतपणे म्हणाला, ‘‘तुझं उडणं खूप सुंदर आहे, पण त्यामुळे सगळीकडे किती गोंधळ झाला आहे ते पाहिलंस का? झुडपं वाकली आहेत, पक्षी लपून बसले आहेत, प्राण्यांच्या डोळ्यात वाळू गेली आहे आणि छोटे प्राणी घाबरून गेले आहेत. जेव्हा तू रागानं जोरजोरात उडतोस, तेव्हा तुला मजा येते; पण वाळवंटातल्या इतरांना त्याचा खूप त्रास होतो.’’
वादळ चिडून शमीला म्हणालं, ‘‘मी अजिबात थांबणार नाही. मला आणखी जोरात वाहायचंय!’’
शमी त्याला म्हणाला, ‘‘ठीक आहे, तुला आवडतंय तर तू थोडा वेळ हवेत उड, पण मनातला राग आणि चिडचिड बाजूला ठेव आणि शांतपणे उड. तू तुझी ताकद जर नीट वापरलीस तर तू वादळ न बनता एक झुळूक होऊ शकतोस.’’
वादळानं उंटाच्या बोलण्याचा विचार केला आणि त्याला ते पटलं. मग हळूहळू ते मंद झालं आणि वाळूचे कण जमिनीवर उतरले. आकाश स्वच्छ होऊन सूर्यप्रकाश पडला, झुडपं डोलू लागली, घाबरलेले लहान प्राणी उड्या मारायला लागले आणि पक्ष्यांनी पुन्हा चिवचिवाट सुरू केला. ते बघून वादळाला खूप आनंद झाला आणि ते उंटाला म्हणालं, ‘‘मी चिडून जोरजोरात उडालो आणि सगळ्यांना घाबरवलं; पण तू मला माझा राग आवरायला शिकवलंस. मी आता अगदी शांतपणे उडेन आणि मंद झुळूक बनेन.’’
शमी हसला आणि म्हणाला, ‘‘छान. आता लक्षात ठेव की राग आवरल्यावर आपल्यातली ताकद सर्वात सुंदर बनते.’’ ते ऐकून वादळ खुदकन् हसलं. शमीनं मान हलवून आपल्या गळ्यातली घंटा वाजवली आणि वादळाचं कौतुक केलं. तेव्हापासून मंद झुळूक बनलेलं वाळूचं वादळ आणि उंटाची दोस्ती झाली.
आता जेव्हा जेव्हा वाळवंटात गार वारा वाहतो तेव्हा सगळे म्हणतात, ‘‘बघा, शमीचा दोस्त त्याला भेटायला आला आहे!’’
(मोरक्कन कथेवर आधारित)
mrinaltul@hotmail.com
