• राधिका विंझे

ईशाची शाळा सुरू झाली होती आणि वातावरणसुद्धा पावसाळी व्हायला सुरुवात झाली होती. मधेच एखादी सर बरसून जाई. पाऊस आणि शाळेचा पहिला दिवस यांचं जमलेलं समीकरण याची ईशाला नेहमीच गंमत वाटे. तिनं रात्री झोपताना आजोबांना विचारलं, ‘‘आजोबा, दरवर्षी माझी शाळा सुरू होताना जून महिन्यातच पाऊस कसा काय येतो हो? काही शास्त्र आहे का यामागे?’’

‘‘आपल्या भारतात ऋतुचक्र हे विभागलं गेलं आहे. चार महिने एक ऋतू असतो, मग दुसरा ऋतू. असं ऋतुचक्र अखंड सुरू असतं.’’ आजोबा म्हणाले.

‘‘पण आजोबा, जून महिन्यातच पावसानं बरसायचं किंवा मे महिन्यातच उन्हाळा, असं कुठं कोणी ठरवलं आहे का? ते कसं काय घडतं?’’

‘‘हे बघ ईशा, आपलं ऋतुचक्र अशा पद्धतीनं घडण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे पृथ्वीचं सूर्याभोवती होत असलेलं परिभ्रमण. पृथ्वी सूर्याभोवती एक प्रदक्षिणा घालते त्याला ३६५ दिवस लागतात. या कालावधीला आपण एक वर्ष म्हणतो. ऋतुचक्रही याच ३६५ दिवसांत विभागलं गेलं आहे. तू आपल्याकडे आहे तो पृथ्वीचा निळा गोल आहे त्यात बघ, पृथ्वीचं एक टोक उत्तर दिशेकडे व एक टोक दक्षिण दिशेकडे आहे. उत्तरेकडे असलेल्या टोकाला उत्तर ध्रुव व दक्षिणेकडे असलेल्या टोकाला दक्षिण ध्रुव म्हणतात. या दोन्ही ध्रुवांना जोडणारी काल्पनिक रेषा म्हणजे पृथ्वीचा अक्ष (axis) होय. तू पृथ्वीचा गोल नीट पाहिलास तर तो तिरका म्हणजेच काही अंशात कललेला आहे. त्यामुळे आपली पृथ्वी जेव्हा सूर्याभोवती भ्रमण करते, तेव्हा पृथ्वीचा एक ध्रुव सूर्याजवळ व एक ध्रुव सूर्यापासून लांब असतो. जो ध्रुव सूर्याजवळ असेल, त्या ध्रुवीय प्रदेशात सूर्याची उष्णता जास्त जाणवते, त्यामुळे तेथे उन्हाळा असतो व जो ध्रुव सूर्यापासून लांब असेल, त्या ध्रुवीय प्रदेशात सूर्याची उष्णता कमी जाणवते त्यामुळे तेथे हिवाळा असतो.’’ परिभ्रमण ही पृथ्वीची नियतकालिक ( periodic) गती असल्यानं एकानंतर एक ध्रुव सूर्याजवळ येतात आणि लांब जातात, त्यातून ऋतुचक्राची निर्मिती होते. तू पृथ्वीचा गोल पाहिलास तर त्यात आपला भारत देश विषुववृत्ताजवळ (उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव यांच्यापासून समान अंतरावर असणारी, पृथ्वीच्या मध्य भागातून जाणारी आडवी रेषा) आहे हेसुद्धा आपल्याकडे नियमित ऋतुचक्र असण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे. पृथ्वीचं परिभ्रमण नियतकालिक ( periodic) असल्यानं दर वर्षाच्या ठरावीक वेळीच आपल्याला विशिष्ट ऋतू जाणवतो. या कललेल्या अक्षाचा आणखी एक परिणाम म्हणजे पृथ्वीचा जो भाग सूर्याच्या जवळ आहे तिथे दिवस मोठा असतो. तर जो भाग सूर्यापासून लांब आहे तिथे रात्र मोठी असते.’’

दिवस-रात्रीवरून ईशानं आजोबांना पटकन विचारलं, ‘‘आजोबा, जसे ऋतू नियतकालिक आहेत तसे दिवस-रात्रसुद्धा नियतकालिक आहेत. तेसुद्धा अशाच काही गतीमुळे होतात का?’’

‘‘छान… हुशार आहेस. अगदी बरोबर. पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते तसंच पृथ्वी स्वत:भोवतीसुद्धा प्रदक्षिणा घालते. त्याला पृथ्वीचे परिवलन म्हणतात. दिवस-रात्रीचे चक्र हे पृथ्वीच्या परिवलनामुळे होते. या परिवलनामुळे आणखी एक गंमत घडते. आपण समुद्रावर लाटा पाहतो. या लाटा चंद्र व पृथ्वी यांच्यातील गुरुत्वाकर्षण बलामुळे निर्माण होतात. परंतु या लाटांच्या भरती ओहोटीचं चक्र हा पृथ्वीच्या परिवलनाचा परिणाम आहे.’’

ईशाला आज खूप नवीन माहिती कळली. उद्या भरती/ ओहोटी पाहायला समुद्रावर जाऊ या असं मनोमन ठरवून ईशा झोपी गेली.

radhikavinze@gmail.com