सुचित्रा साठे
‘‘आजी, नियम म्हणजे काय गं?’’ सात-आठ वर्षांच्या आराध्यने शाळेतून आल्या आल्या विचारले. आजूबाजूला काहीतरी नियमाविरुद्ध घडलेलं दिसतंय, हे आजीने ओळखलं. जरा सावध होत ती म्हणाली, ‘‘अरे, नियम म्हणजे एखादी गोष्ट चांगल्या रीतीने करण्याची पद्धत. म्हणजे असं बघ, तुला जेवण वाढताना मी ताटात मधोमध मीठ वाढते. मग मिठाच्या डाव्या बाजूला चटणी, कोशिंबीर आणि उजव्या बाजूला भाजी, आमटी वाढते. आणि शेवटी भात वाढते. या क्रमाने पदार्थ वाढण्याचा हा नियम आहे. किंवा वहीत लिहिताना डाव्या बाजूला समास सोडून वरच्या ओळीपासून लिहायला सुरुवात करतो. मध्येच कुठेतरी लिहीत नाही. हे नियम पाळूनच सुरुवात करतो. हे नियम पाळूनच करतो. पण आज तू असं का विचारतो आहेस? कुठला नियम तुला हवा आहे?’’

‘‘आराध्यचे डोळे चमकले. तो आजीला सांगायला अगदी अधीर झाला होता. खांद्यावरचं जड दप्तर खाली काढून ठेवायला तो विसरला होता.
‘‘अगं आजी, आता येताना गंमत झाली. झेब्रा क्रॉसिंग आल्यावर मी आणि बाबा थांबलो. तेवढ्यात ट्रॅफिक पोलीसदादाची शिट्टी ऐकायला आली. एक आजोबा स्कूटर चालवत होते. नातू समोर उभा होता माझ्यासारखा. शाळा सुटली की नातवाला घरी सोडून हास्यक्लबला जायचं, हा त्यांचा रोजचा नियम. शाळा थोडी उशिरा सुटल्यामुळे विचारांच्या नादात ते झेब्रा क्रॉसिंगच्या बरेच पुढे गेले आणि म्हणून पोलीसदादांनी शिट्टी वाजवली.’’ आराध्यने एका दमात सांगून टाकलं.

अद्वैयदादाने शिट्टी वाजवत विचारलं, ‘‘आजोबा थांबले की नाही मग, आराध्य?’’
इतक्यात बाबा आले आणि त्यांनी विषय पुढे नेला. ‘‘अरे हो, त्या पोलिसाने चांगलं झापलं आजोबांना. केस पांढरे झाले तरी समजत नाही का? इतकी घाई का करता? असं बोललेलं ऐकायला आलं. मुख्य म्हणजे नातवासमोर पोलीस त्यांना रागावला. त्यामुळे त्यांचा चेहरा एकदम पडला.’’
‘‘अगं आजी त्या आजोबांचा नातू पोलीसदादाला म्हणाला की, तो आजोबांना सांगत होता, पुढे जाऊ नका, पण आजोबांनी त्याचं ऐकलं नाही,’’ आराध्यने नातवाची बाजू मांडली.

‘‘शेवटी झालं काय?’’ अद्वैयदादाला नेमकं उत्तर हवं होतं.
‘‘अरे, पोलीसदादाने आजोबांना जरा रस्त्याच्या कडेला बोलावलं तेव्हा नातू घाबरला. पोलीसदादाला म्हणाला की, माझ्या आजोबांना घेऊन जाऊ नका. ते खूप चांगले आहेत.’’ आराध्यही सांगताना कावराबावरा झाला.

‘‘मला वाटलं की आजोबा काही तरी चिरीमिरी हातावर ठेवतील आणि प्रकरण तिथेच मिटवून टाकलं जाईल. पण अपेक्षेपलीकडे गोष्ट घडली. तो पोलीस आजोबांना म्हणाला की, तुमच्या वयाकडे बघून थोडी समज देऊन मी तुम्हाला सोडू शकतो. पण तुमच्या नातवाच्या भविष्याकडे बघून मला वाटते की, तुम्ही रीतसर दंड भरावा. ही तुम्हाला शिक्षा होईल, पण नातवावर केलेला तो एक चांगला संस्कार असेल. आजोबांनी पैसे दिले. त्या पोलिसाने दंडाची पावती नातवाच्या हातात देऊन एक सत्कृत्यच केले. घरी गेल्यावर गाजावाजा होणारच होता. पण तरीसुद्धा पोलिसांच्या कारवाईमागचा हेतू स्वच्छ व उद्बोधक होता. आजोबांनाही सांगितल्यावर तो मनोमन पटला. त्यांची शिक्षा नातवाच्या आयुष्याला शिस्त लावणार होती.

वाहतुकीचे नियम हे पाळण्यासाठी आणि आपल्या सुरक्षेसाठी असतात, हा धडा नातवाच्या डोक्यात अगदी फिट बसला.’’ बाबांनी घडलेला प्रसंग सविस्तर सांगून टाकला.

‘‘यासाठी पोलिसालाही मार्क द्यायला हवेत. त्याचा प्रामाणिकपणा, दूरदृष्टी कौतुकास्पद आहे,’’ अद्वैयदादाने कौतुक केले.
‘‘आजोबांनी तो नियम मोडायलाच नको होता, नाही का गं आजी!’’
‘‘हो रे, मोठे जसे वागतात, तशीच मुले वागत असतात. ती बरोबर अनुकरण करत असतात. संस्कार पुस्तकं वाचून होत नाहीत, ते समोर घडणार्‍या कृतीतून होत असतात.’’
आराध्यच्या डोक्यात नियम पाळायचं बीज पेरलं गेलं होतं. आजीने समाधानाने विषय संपवला.
suchitrasathe52@gmail.com