हां हां म्हणता गावात बिबट्या फिरतोय अशी बातमी पसरली. वर्तमानपत्रात बिबट्या झळकू लागला तो त्याच्या उघड्या तोंडातून दिसणार्‍या तीक्ष्ण सुळ्यांसकट. वॉट्सॲपवर, यूट्यूबवर, फेसबुकवर, इन्स्टावर जिथे म्हणाल तिथे बिबट्याच. व्हिडीओजमध्ये हत्तीवर बसलेला बिबट्या तर कधी सापाबरोबर दोन हात करणारा, तर कधी झाडाच्या फांदीवर बसलेला. काही व्हिडीओत तर मगरीच्या बरोबर पाण्यात पोहत असलेला तर काही व्हिडीओंत तोंडातून हरीण घेऊन पळणारा. एकामध्ये तर झोपडीत शिरून कुत्र्यावर हल्ला करणारा बिबट्या. अशा विविध प्रकाराने बिबट्या विहार करत होता. काय खरं काय खोटं, कोणालाच कळेना. कदाचित ‘एआय’ची मेहेरबानी असावी असंही वाटू लागलं. बिबट्याच्या वावरामुळे शाळेत न जाण्यासाठी लहान मुलांनाही एक कारण मिळालं होतं. मोठी माणसंही कामधंदा सोडून चहा पीत बिबट्याविषयीच बोलत गल्लीगल्लीत नाक्यावर उभी होती.

‘बिबट्या दिसला की त्याला धरायचाच’ असा आव आणून! आसपासचे नेते आपल्या अनुयायांबरोबर घोळक्याने हातात काठ्या घेऊन डोंगराच्या पायथ्याशी फिरत होते. जणूकाही बिबट्या त्यांना दिसला रे दिसला की लगेचच ते त्याच्यावर हातातील काठीने वार करणार होते अशा थाटात घाबरतच, पण ‘घाबरलो नाही’ असे दाखवत इकडून तिकडे फिरत होते. बिबट्या मात्र जिथे कुठे होता तिथून ही गंमत पाहत मधेमधे जिभल्या चाटत होता. खरं म्हणजे आदल्या रात्री एक बेवारशी कुत्रा खाऊन पोट भरलं होतं. त्यामुळे लोकांची उडालेली तारांबळ बघण्यात त्याचा वेळ मजेत जात होता.गल्लीबोळातले, पाळलेले प्राणीही सजग होते.

‘प्राण्यांना काय कळतंय?’ असं एरवी माणसांमध्ये बोललं जातं, पण बिबट्याची बातमी सर्व पाळीव प्राण्यांमध्ये पसरली होती, हे लोकांना अर्थातच समजत नव्हतं. सबनीसांची मांजर गायब झाली होती. मांजरं गायब होतातच पण येतात परत, अशा कल्पनेमुळे सबनीसकाकू निवांत होत्या. देसाईंचा ‘सुलतान’ कुत्रा एरवी भकाभका भुंकत असतो, पण बराच वेळ झाला तरी त्याचा आवाज काही कोणाच्या कानावर आदळला नव्हता. पटवर्धन आजी ‘आमची मनी कुठे, मनी कुठे’ चा जप करत घाबरून कधी नव्हे ती माळ जपत देवाचा धावा करत होत्या. मनी गायब झाली होती. गुब्ब्या जरा ‘ढीलच’ होता. त्याला बर्‍याच वेळा काही झालं की उशिराच लक्षात यायचं. त्यातून तो खाण्यात दंग असला की इकडे तिकडे बघणे नाहीच.

आसपासच्या गोठ्यातील गाई-म्हशींना डोंगरावर चरायला जायला बंदीच होती दोन दिवस. त्यामुळे कंटाळून त्या सतत हंबरत होत्या. जणूकाही करोनाचेच दिवस, असं गंभीर वातावरण सर्वत्र दिसत होतं. अशा परिस्थितीत दुसरा दिवस उजाडला. रात्रभर नाही म्हटलं तरी सगळे बिबट्याच्याच चिंतेत होते. काही हरहुन्नरी ‘रात्रपाळी करणार’, असं म्हणाले तरी होते. सकाळ झाली आणि सर्व घराघरांतून मोबाइलचे मेसेजेस खणखणायला लागले. ‘बिबट्या दिसला का रे?’ सगळे एकमेकांना विचारत होते. बिबट्याला कोणीतरी डोंगरावर पळून जाताना पाहिला होता अशा अफवांना उधाण आलं होतं. काही लोकांनी तर त्याला म्हणे रात्री लाल सिग्नल तोडून क्रॉस करून जाताना पाहिलं होतं.

सर्व बंगल्यांच्या गच्च्यांवरून उड्या मारत फळांची नासधूस करत फिरणारी वानरंही बिबट्याच्या चाहुलीने सावध झाली होती. त्यांना जंगलात फिरण्याचा अनुभव होता त्यामुळे त्यांनी आसपासच्या सर्व मांजरं- कुत्र्यांना एकत्र आणलं. ते म्हणाले, ‘‘नुसतं घरात लपून बसायचं नाही. आपण सगळे मिळून बिबट्याला हाकलून लावू जंगलात. त्यांनाही जगायचा हक्क आहे. जंगलात खायला नाही मिळालं तर ते तरी कसे जगणार? मग येतात बिचारे गावात.’’

‘‘हो ना, आपल्याला सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे. सध्या आम्हा कुत्र्यांना शहराबाहेर हाकलून लावायची मोहीम चालू आहे म्हणे! का, तर आम्ही चावतो!’’ सुलतान म्हणाला. एरवी वेडपट वाटणारी वानरं इतका विचार करून बोलत आहेत हे पाहून मांजरं, कुत्रे चाट झाले. म्हणाले, ‘‘आज रात्री आपण एकत्र जंगलात जाऊन काहीतरी करून बिबट्याला जायला लावू म्हणजे तो वाचेल, आपण आणि माणसेही. मांजरांनाही ‘लांबचा असला तरी भाचाच आपला. वाचला तर बरंच’ असं वाटू लागलं. रात्र झाली. वानरांनी चित्रविचित्र आवाज काढले. हळूहळू घरात आणि इतरत्र लपून राहिलेले प्राणी बाहेर आले. लालू आली, नादिया आली, मोतीही निघाला.

आसपास असलेले मुंगुसही बिळातून डोकी वर काढून इतर प्राण्यांचं काय चाललं आहे ते पाहू लागले. सगळे समोरच असलेल्या डोंगरावर जाऊन झाडीतून बिबट्याला शोधू लागले. आणि बर्‍याच वेळाने झाडीतून दोन डोळे लुकलुकले. सर्व प्राण्यांमध्ये शांतता पसरली. कुत्रे भुंकणार होते, पण वानरांनी त्यांना खूण करून शांत राहायला सांगितलं. लालू, नादिया, मनी, गुब्ब्या सर्वांच्या पोटातली गुरगुर त्या भयाण शांततेत ऐकू येऊ लागली. पण ती गुरगुर बंद करणं शक्य नव्हतं. ती आपोआपच पोटातून होत होती. आणि बिबट्या शेपटी वर करून उठला. त्याबरोबर वानरांनी सर्वांना बिबट्या येत होता त्याच्या विरुद्ध दिशेने पळायला लावले. बिबट्या चक्क गांगरला. आदल्या रात्रीच्या कुत्र्याच्या जड जेवणानंतर तोही थोडा सुस्तावला होता. तरीही तो त्या धावणार्‍या प्राण्यांच्या मागे पळू लागला. पण सर्व प्राण्यांनी त्याला चकवलं. ते दिशा बदलून गावाच्या पलीकडच्या जंगलाच्या दिशेने धावू लागले.

सर्व प्राणी बिबट्या ज्या वस्तीत फिरत होता त्यापासून खूपच दूर उलट दिशेने पळाले. अगदी बिबट्यालाही समजणार नाही अशा ठिकाणी पळत सुटले. घुबडं चित्कारू लागली. बिबट्याही गांगरला. मधूनच चंद्र प्रकाशात त्याचं सुंदर सोनेरी अंग चमकायचं. थोड्याच वेळात डोंगरांच्या रांगांमधून, झाडाझुडुपांमधून बिबट्या गायब झाला. मांजरं दमूनभागून मागेच राहिली होती. बिबट्याच्या मागे धावणं त्यांना शक्य नव्हतं. कुत्रे आणि वानरांनी मात्र बिबट्या दिसेनासा होईपर्यंत डोंगर-दरी-झाडी पिंजून काढली. पहाट व्हायला लागली. बिबट्या दृष्टीआड झाला असं कळल्यावरच मांजरं घराकडे परतली. त्यांचे जेवणाचे वाडगे चाटून पुसून साफ झाले. वानरं आणि कुत्रे मात्र बिबट्या पूर्णपणे दिसेनासा होईपर्यंत परतले नाहीत. दुसर्‍या दिवशी वनरक्षक आले. त्यांनीही डोंगर पिंजून काढला. पण त्यांची फेरी व्यर्थ ठरली. बिबट्या वाचला होता, पण कोणामुळे वाचला होता ते मात्र लोकांना समजलेच नाही. दुसर्‍या दिवशी वर्तमानपत्रात बिबट्या अनेक डोंगर पार करून निघून गेला असं छापून आलं. त्याचा फोटोही पुन्हा छापून आला. वानरं, कुत्रे, मांजरं मात्र प्रसिद्धीविना रोजच्या उद्योगाला लागली.

vidyadengle@gmail.com