बालमित्रांनो, याआधीच्या लेखात आपण फळाची अपेक्षा न धरता बहुअंगांनी फुलल्यामुळे आत्मविश्वासाने बहरून येणार्या फुलांबद्दल पाहिले होते. आज आपण कोकणातल्या अनेक मंदिरांच्या शेजारी ताठपणे उभ्या असणार्या एका झाडाबद्दल विचार करू या.

तुम्ही कोकणातल्या एखाद्या मंदिरात गेलात तर मंदिराच्या परिसरात हा देवचाफा किंवा पांढरा चाफा डौलात उभा असलेला दिसतो. इतकेच काय, तर घराच्या अंगणातही याची उपस्थिती असतेच असते. आठ-दहा फूट उंची असणारे हे झाड बहरून येण्यासाठी अंगावरची सगळी पाने आपणहून टाकून देते आणि फक्त आपल्या फुलून येण्याकडे सारे लक्ष एकवटते. आपल्याला जर मस्तपैकी बहरायचे असेल तर त्यासाठी आपल्या आवडत्या किंवा गरजेच्या गोष्टींचाही प्रसंगी त्याग करावा लागतो हेच ही कृती दाखवते.

हे झाड दिवसेंदिवस मंदिराच्या आवारात, घराच्या अंगणात ताठपणे उभं असते. क्वचित कोणी तरी तुमच्यासारखे मूल त्याच्या फुलांची अंगठी करून तिचा आनंद घेते, तर कधी तरी एखादी तरुणी त्याच्या फुलाला कानाला लावत फोटो वगैरे काढते एवढेच. बाकी वर्षभर या झाडाकडे कोणाचेच विशेष लक्ष नसते. मात्र ते फुलत असते, कारण त्याला माहिती असते की, गुढीपाडव्याला गुढीला त्याच्या माळेशिवाय पूर्णत्व नाही. त्याचा विवेकी विचार आणि वाट पाहण्याची वृत्ती हेच त्याच्या ताठपणाचे रहस्य असावे.

joshimeghana.23 @gmail.com