रवींद्र बेडकिहाळ
मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्यावर अलीकडेच त्रिखंडात्मक चरित्र प्रकाशित झाले. केवळ ‘दर्पणकार’ इतकीच त्यांची ओळख जगासाठी मर्यादित. अगदी दीड दशकाच्या कालावधीत विविध कार्यांत त्यांनी झोकून दिले. या सगळ्यांचे तपशील एकत्र करणाऱ्या ग्रंथ प्रकल्पाविषयी…
मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक म्हणून ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर एवढीच त्यांची ओळख गेली अनेक वर्षे सर्वांना परिचित. जांभेकर यांची फारशी चरित्रे उपलब्ध नव्हती. कोकणात, तसेच त्यांची कर्मभूमी असलेल्या मुंबईमध्ये, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील पोंभुर्ले गाव हे बाळशास्त्रींचे जन्मगाव, तेथून देखील पुरेसा माहिती स्राोत नव्हता. खरे तर मराठी पत्रकारितेची सुरुवात झालेले ‘दर्पण’ वृत्तपत्र (६ जानेवारी १८३२), मराठीतील पहिले मासिक ‘दिग्दर्शन’ (१७ मे १८४०) सुरू करणारे बाळशास्त्री जांभेकर एवढीच त्यांची ओळख नाही. त्यांचा जीवनकाळ २० फेब्रुवारी १८१२ ते १७ मे १८४६ असा फक्त ३४ वर्षांचा…
१८३० मध्ये त्यांचे मुंबईतील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या निधनापर्यंत (१८४६) कर्तृत्व कालावधी फक्त १६ वर्षं इतकाच लाभला. मग त्यांनी एवढ्या अल्पवयात, अल्पकाळात पत्रकारिता, शिक्षण, मराठी भाषा, विविध ग्रंथलेखन, इतिहास आणि पुरातत्त्व संशोधन, हिंदू धर्माची चिकित्सा आणि शुद्धीकरण आदी कामे केली. त्यासह ज्योतिष व खगोलशास्त्र संशोधन, मराठी गद्या, निबंध लेखन, काव्य व अन्य ग्रंथांचे समीक्षण, तत्कालीन न्यायदान प्रक्रियेतील उच्चपदस्थ म्हणून सहभाग घेतला.
इतकेच नाही तर मुंबईतील पहिल्या विद्यार्थी वसतिगृहाचे संस्थापक, एतद्देशीय शिक्षक, विद्यार्थी, अभ्यासकांच्या ज्ञानात भर पडावी म्हणून पहिले मराठी चर्चासत्र मंडळ व मुंबईतील पहिल्या ग्रंथालयाचे संस्थापक म्हणून काम पाहिले. हे करीत असताना एल्फिन्स्टन महाविद्यालयातील पहिले भारतीय प्राध्यापक, कुलाबा वेधशाळेचे पहिले भारतीय संचालक, अक्कलकोटचे युवराज श्रीमंत छत्रपती शहाजीराजे भोसले यांचे प्रशिक्षक ही जबाबदारी पार पाडली. त्यातूनही वेळ मिळाला की ब्रिटिशांच्याच बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये प्रथम विद्यार्थी (१८२५), नंतर त्याच संस्थेत गणित शिक्षक (१८२९), त्याच संस्थेत प्रथम डेप्युटी नेटिव्ह सेक्रेटरी (१८३०), नंतर पूर्णवेळ नेटिव्ह सेक्रेटरी, एशियाटिक सोसायटी ऑफ बॉम्बे या जागतिक कीर्तीच्या संशोधन संस्थेतर्फे प्रसिद्ध होत असलेल्या जर्नलमध्ये भारतीय पुरातत्त्व संशोधनातील पहिले भारतीय मराठी संशोधक आणि त्याद्वारे विविध शिलालेख, ताम्रपटांचे इंग्रजीत भाषांतर करून ११ शोधनिबंध प्रसिद्ध करणारेही पहिलेच मराठी संशोधक (१८४१ ते १८४६) म्हणून मान मिळवला.
हे कमी म्हणूून की काय दक्षिण महाराष्ट्र, कोकण आणि कर्नाटकमधील काही भाग यामध्ये प्राथमिक शिक्षणासाठी शाळा तपासनीस (१८४१), देशातील पहिल्याच अध्यापक प्रशिक्षण कल्पनेचे प्रवर्तक आणि त्या संस्थेचे संचालक, १७ ग्रंथांचे लेखन आणि ‘ज्ञानेश्वरी’चे प्रथमच मुद्रण तसेच प्रकाशन (१८४५) असे अनेक पैलू त्यांच्या चरित्र, स्मरण कार्यातून समजत गेले.
त्या दृष्टीने एका मराठी माणसाने केलेले सर्वांगीण मोठे कार्य लक्षात घेऊन, पुन्हा नव्याने त्यांचे वाड्मयीन स्मारक व्हावे असा प्रयत्न मी सुरू केला. त्यांचे लहान मुलांसाठी एक चरित्र आणि त्यापेक्षा एक मोठे २५० पानांचे आणखी एक चरित्र ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर चरित्र आणि कार्य’ या नावाने लिहिले. बाळशास्त्रींच्या निधनाच्या शताब्दीनिमित्त ( १९४६) त्यांच्या वंशातले एक अभ्यासक लेखक गणेश गंगाधर जांभेकर (पुणे) यांनी सन १९५० मध्ये बाळशास्त्रींच्या कार्याची मीमांसा म्हणून त्यांचे चरित्र तीन खंडात प्रसिद्ध केले. त्याआधी म्हणजे १८९२ मध्ये बाळशास्त्री यांचे एक विद्यार्थी बाळकृष्ण नारायण देव यांचे ३२ पानांचे बाळशास्त्रींचे चरित्र तत्कालीन मुंबईमधील (दादर) युनियन क्लबने प्रकाशित केले.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य म्हणून काम करताना लक्षात आले की, बाळशास्त्री जांभेकर यांच्यावरही असा एखादा सविस्तर बृहद्ग्रंथ प्रकल्प होऊ शकेल. तातडीने मंडळाच्या बैठकीत हा विषय मांडून मंजूर करून घेतला. आणि मग त्या क्षणापासून मी, पत्नी अलका, सहकारी संशोधक अमर शेंडे आणि रोहित वाकडे याकामी लागलो. तीन वर्षे हे काम चालले आणि आता अथक परिश्रमातून, डॉ. सदानंद मोरे यांच्या मार्गदर्शनाने ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर – कर्तृत्वाचा एक शोध’ हा त्रिखंडात्मक चरित्रग्रंथ जुलैमध्ये तयार झाला.
खंडनिहाय वैशिष्ट्ये
पहिल्या खंडात बाळशास्त्री जांभेकरांचे चरित्र, कार्य आणि कर्तृत्व विश्लेषण येते. बाळशास्त्री सन १८२५ मध्ये आपल्या पुढील शिक्षणासाठी मुंबईत कसे आले ते यात कळते. त्यांचे शिक्षण चालू असतानाच त्यांच्या तैलबुद्धी ज्ञानाने प्रभावित होऊन बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन या ब्रिटिशांच्या वर्चस्वाखालील शिक्षण संस्थेत त्यांना तिसऱ्याच वर्षी गणिताचे अध्यापक म्हणून दरमहा रुपये १५ मानधनावर नियुक्ती मिळाली. पुढे विशेष म्हणजे याच संस्थेत शिक्षण पूर्ण झाल्यावर (मार्च १८३०) प्रथम डेप्युटी सेक्रेटरी; नंतर दोन वर्षांनी पूर्ण वेळ नेटिव्ह सेक्रेटरी म्हणून त्यांनाच दरमहा शंभर रुपये मानधनावर मार्च १८३२ पासून नेमणूक दिली. अशी नियुक्ती मिळणारे ते पहिलेच मराठी भाषक होते.
या खंडाचे खास वैशिष्ट्य म्हणजे ‘दर्पण’ चे अंक प्रत्यक्षात कसे होते ही वाचकांची उत्सुकता लक्षात घेऊन काही उपलब्ध प्रत्यक्ष अंकांच्या छायाप्रती यात दिल्या आहेत. त्याआधी जांभेकरांच्या मुंबईतील आगमनावेळची राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक परिस्थितीची पार्श्वभूमी नमूद केली आहे. नेटिव्ह सेक्रेटरीपदी नेमणूक व्हावी यासाठी बाळशास्त्रींनी स्वहस्ताक्षरात केलेला इंग्रजीतील अर्ज, जांभेकर घराण्याचा इतिहास, वंशावळ, छत्रपती संभाजी महाराजांकडे आणि पेशव्यांकडे असलेली जांभेकरांची काही माहिती उपलब्ध करून दिली आहे.
‘दर्पण’ आणि ‘दिग्दर्शन’मधील काही लेखांची मीमांसा, त्या काळात हिंदू धर्मातून बळजबरीने ख्रिाश्चन धर्मात गेलेल्या श्रीपत शेषाद्रीला मुंबई सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून कसे परत आणले याचा तपशील इथे सापडेल. त्याला हिंदू धर्मात पुन्हा घेण्यासाठी करावा लागलेला संघर्ष, त्यासाठीचा दुर्मीळ पत्रव्यवहार, सनातनी धर्मपंडितांना शास्त्रोक्त वादानंतर निरुत्तर, शंकराचार्यांचा आणि सुमारे शंभरच्या वर हिंदू धर्म पंडितांचा बाळशास्त्रींच्या बाजूने शास्त्रशुद्ध प्रतिवाद पाहायला मिळू शकेल. बाळशास्त्रींना घ्यावे लागलेले प्रायश्चित्त याचे सविस्तर वर्णन या खंडातील प्रकरणात समाविष्ट आहे. समाजप्रबोधनाची सुरुवात आणि हिंदू धर्माची चिकित्सा, शुद्धीकरण यामुळे अर्थातच बाळशास्त्रींची कीर्ती महाराष्ट्राच्या बाहेरही गेली होती.
याच खंडातील पाचव्या विभागात बाळशास्त्रींच्या मराठी वाड्.मयातील योगदानाची चिकित्सा केली आहे. मराठी वृत्तपत्रातून प्रथमच मराठी साहित्य, कथा, निबंध, वृत्तप्रकाशन करण्याची परंपरा ‘दर्पण’ ने सुरू केली. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीकडे आलेल्या मराठी ग्रंथांना उत्तेजनार्थ पुरस्कार देणे, या ग्रंथांची समीक्षणे ‘दर्पण’ व ‘दिग्दर्शन’मधून प्रकाशित करणे, अखिल भारतात ‘एक भाषा एक लिपी’ या ब्रिटिशांच्या धोरणाला केलेला ऐतिहासिक विरोध, बाळशास्त्रींनी लिहिलेल्या काही ग्रंथांची मुखपृष्ठे, गणित पुस्तकातील स्वहस्ताक्षरात केलेली टिप्पणी या प्रकरणाचे एक वैशिष्ट्य.
१८४६ ला बाळशास्त्रींचे निधन झाल्यानंतर समकालीन वृत्तपत्रांनी त्यांच्यावर लिहिलेले मृत्युलेख, समकालीन विद्वान तसेच अधिकारी यांनी वाहिलेल्या श्रद्धांजली आणि १८४६ नंतर आजपर्यंत बाळशास्त्रींच्या कार्याचा गौरव करणाऱ्या काही निवडक मान्यवरांच्या प्रतिक्रिया ही या खंडाची महत्ता. याच खंडात प्रारंभी बाळशास्त्रींच्या जुन्या राहत्या घराचा पडका चौथरा, जांभेकरांची गोव्यातील कुलदेवता, पोंभुर्ले येथील ग्रामदैवत, जांभेकर घराण्याची पोंभुर्ले येथील जांभाई देवी, शाळा, ग्रामपंचायत यांच्या रंगीत छायाचित्रांचाही समावेश आहे.
बाळशास्त्रींनी आपल्या वडिलांना हठयोगातून प्राणत्याग करण्यापासून परावृत्त करण्यासाठी लिहिलेले भावुक पत्र, सातारच्या छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी अक्कलकोटच्या युवराज छत्रपती शहाजीराजे यांचे प्रशिक्षक म्हणून अक्कलकोटला घेऊन जाताना बाळशास्त्रींना बहुमताने आपल्या स्वारीबरोबर घेतल्याचा प्रसंग आणि त्यांची पत्रे इथे वाचायला मिळतात.
‘दिग्दर्शन’मधील लेखातून सोने, चांदी, रुपे तयार करण्याच्या प्राचीन पद्धती, ‘दर्पण’मधून स्त्रियांना शिक्षण, मुलींच्या मुंजी, विधवा केशवपन, सतीची चाल बंद करणे, विधवांचा पुनर्विवाह, शहरांचा विकास व स्वच्छता कशी असावी याची माहिती मिळते. राज्यात मध्यवर्ती पतपेढी असावी, ‘दिग्दर्शन’मधून आकाशातील ताऱ्यांना नवी नावे, ‘दर्पण’ची महाराष्ट्राबाहेर दखल, लोकमान्य टिळकांच्या नावात ‘बाळ’ नाव कसे आले, मुंबईतील रस्त्यावर पोलिसांच्यात झालेल्या मारामारीचे कोर्टात इंग्रजीत केलेले अचूक वर्णन, शिक्षकांना केलेला बहुमोल उपदेश आदी ज्ञान-उपयुक्त संदर्भ येतात.
बाळशास्त्रींची उपलब्ध दुर्मीळ ग्रंथसंपदा दुसऱ्या खंडात येते. त्यामधील सर्वात उल्लेखनीय म्हणजे बाळशास्त्रींनी पुरातत्त्व संशोधनातून मिळालेल्या शिलालेख, ताम्रपटांचे भाषांतर… दि रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ बॉम्बे या जागतिक पातळीवरील संशोधन संस्थेची सुरुवात तसेच मुंबईतील शाखा. या संस्थेतर्फे सन १८४१ साली आंतरराष्ट्रीय पातळीवरील संशोधन पत्रिका मुंबईत सुरू झाली. संस्थेच्या संदर्भ ग्रंथालयात त्यांनी या संशोधन पत्रिकेचे संपादक प्रो.ऑर्लेबार यांच्या विनंतीवरून भारतीय पुरातत्त्व संशोधन कार्य हाती घेतले.
विविध ताम्रपट, शिलालेख यांचा अभ्यास करून ते यातील लेखनाचा प्रथम प्राकृत मराठी आणि नंतर इंग्रजी भाषेत भाषांतर करीत. दुसऱ्या प्रकरणात बाळशास्त्री जांभेकर यांनी लिहिलेल्या १३ ग्रंथांची तपशीलवार माहिती आहे. त्यांचे उपलब्ध ग्रंथ अभ्यासकांसाठी पुनर्मुद्रित करण्यात आले आहेत. हे सर्व ग्रंथ सध्या दुर्मीळ आहेत. या सर्व ग्रंथांची एकत्रित प्रस्तावनाही या प्रकरणात आहे. या प्रकरणातून बाळशास्त्रींची कुशाग्र बुद्धिमत्ता, ज्ञानग्रहण करून लिहिण्याची चौकस जिज्ञासा आणि संग्राहकता दिसून येते. काही पाश्चात्त्य ग्रंथांचे त्यांनी मराठीत भाषांतर करून तत्कालीन अभ्यासकांसाठी बहुमोल ऐतिहासिक खजिनाच उपलब्ध करून दिला, हे या प्रकरणाचे खास वैशिष्ट्य.
दि रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ बॉम्बे या संस्थेची आधी लंडनमध्ये आणि नंतर मुंबईमध्ये कशी स्थापना झाली; याचीही माहिती या खंडात घेतली आहे.
‘ज्ञानेश्वरी’चे प्रथम मुद्रण आणि प्रकाशन
बाळशास्त्री जांभेकर यांना ‘ज्ञानेश्वरी’ची प्रथम छपाई का करावीशी वाटली याचा मी शोध घेत होतो. कारण तत्कालीन काळात म्हणजे बाळशास्त्री मुंबईत आले त्यापूर्वी मुंबईत मराठी मुद्रणाची व्यवस्था नव्हती. मुंबईतल्या काही छापखान्यातून हिंदू धर्माची धार्मिक पुस्तके आणि पोथ्या छापल्या जायच्या, त्यामध्ये श्रीधरकृत, हरिविजय, रामविजय, पांडवप्रताप, व्यंकटेश स्तोत्र, शिवलीलामृत, नामदेवांचे अभंग, तुकोबांचे अभंग, भजने, भूपाळ्या इत्यादीचा समावेश होता. या सर्वांवर बाळशास्त्रींची चाणाक्ष नजर असायची, पण त्यांना त्यामध्ये ज्ञानेश्वरी, भगवद्गीता यावरील छपाई दिसायची नाही. म्हणून त्यांनी अनेक तत्कालीन ज्ञानेश्वरी हस्तलिखितांचा शोध घेतला. त्यात एकनाथ महाराजांनी शुद्धीकृत करून (मूळ ज्ञानेश्वरीच्या ३०० वर्षांनंतर) हस्तलिखित केलेली प्रत बाळशास्त्रींनी मिळविली. त्यात काही पाठभेद दुरुस्ती करून त्यांनी ती प्रत सन १८४५ मध्ये मुंबईतल्या ‘प्रभाकर’ छापखान्यात छापून प्रकाशित केली.
या सर्व तिन्ही खंडांचे लेखन करीत असताना एक विचार प्रकर्षाने मनात येत होता, आजही येत आहे की, बाळशास्त्री जांभेकर यांच्या समग्र कार्याचे यथोचित स्मारक मराठी भाषा विभागाच्या वतीने मुंबई या बाळशास्त्रींच्या कर्मभूमीत करणे अत्यंत आवश्यक आहे. पारतंत्र्यांच्या ब्रिटिश काळात सर्व परिस्थितीचा धैर्याने आणि आपल्या दृष्टीने विचार करून समाजास जागरूक करणारा आणि मार्ग दाखविणारा एक बुद्धिवान पुरुष जन्माला आला त्याचे नाव बाळ गंगाधरशास्त्री जांभेकर. आपले राज्य का गेले आणि इंग्रजांचे राज्य या देशात का आले, याचे अचूक निदान करून पुढे काय करायचे याची दिशा देणारा हा महाराष्ट्रातील पहिला महापुरुष.
या महापुरुषाचे काळाच्या पडद्याआड गेलेले कार्यकर्तृत्व तीन खंडांमध्ये चरित्रित झाले आहे. नव्या पिढीतील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रातील सर्वांना या त्रिखंडांतून काही नवे विचार मिळाले तर मी माझे भाग्य समजेन.
