मा. श्री. बराकजी ओबामासाहेब,
अध्यक्ष, अमेरिका देश,
व्हाइट हाउस, अमेरिका.
     यांना सप्रेम जय हिंद, जय महाराष्ट्र.
पत्रास कारण की, तुम्ही भारत देशात दौरा करून गेला ते तीन दिवस आम्हाला खूप आनंद झाला. सुदाम्याच्या घरी डायरेक्ट कृष्णभगवान आले असेच वाटले. (तुम्हाला वाटेल की कृष्णाचे तर ब्लू ब्लड. पण तसे काही lok01नाही. कृष्ण काळापण असतो. वाईट वाटून घेऊ  नये.) तुम्ही गेल्यामुळे आता सगळा देश आम्हाला खायला उठला आहे. अजिबात करमत नाही. टीव्हीसुद्धा गोड लागत नाही. तुम्ही होता ते तीन दिवस कसे रंगारंग कार्यक्रमासारखे गेले. तुमच्या निमित्ताने आम्हाला टीव्हीच्या बातम्यांमधे एकाच वेळेला अनेक च्यानेल पाहायला भेटत होते. तुमच्या गाडीच्या बातम्या पाहताना वाटायचे, आता डिस्कव्हरी लागलाय. तुमच्या खाण्याच्या बातम्या लागल्या की वाटायचे, आता मास्टरशेफच बघतोय. मधीच मोदीसाहेबांचा फॅशन च्यानेलपण बघायला भेटत होता. अशी सगळी गंमत.
तुम्ही हिंदीत नमस्ते बोलला, शाहरूखभाईचा डायलॉग बोलला, ते ऐकून तर आमच्या डोळ्यात पाणीच आले होते. आमच्या हिच्यापण डोळ्यात पाणी आले होते. पण ते सोनियाजींचे हिंदी भाषण ऐकतानासुद्धा येते. पण आता ते सारे संपले. तुम्ही सौदीला गेला, तेव्हापासून आमच्या काळजातून सारखा एकच आवाज येत आहे की ‘परत या परत या, ओबामाभाई परत या.’
दिल्लीतल्या हवेमुळे तुमच्या आयुष्यातले सहा तास घटल्याच्या बातमीचा तुम्ही धसका घेतला असेल, हे आम्हाला माहीत आहे. पण तुम्हाला सांगतो, ती बातमी शंभर टक्के पेडन्यूज आहे. तिच्यावर विश्वास ठेवू नये. दिल्लीत राहून असे आयुष्य घटत असते, तर आमच्या तमाम दिल्लीकरांचे आयुष्य मायनसमधीच मोजावे लागले असते. दिल्लीतली हवा तशी काही वाईट नाही. उलट या हवेमधे आले की माणसे टुणटुणीत होतात, असा इतिहास आहे. आमच्या नरसिंह रावसाहेबांनी (तेव्हा आम्ही काँग्रेसमधे होतो. सध्या भाजपमधे.) त्याचा अनुभव घेतला होता. तुम्ही इकडे असेच येत राहिलात तर तुम्हालापण तो अनुभव येईल हे आम्ही गॅरंटीने सांगू इच्छितो.
तुमच्याकडेपण काँग्रेस आहे असे काल पेपरमधे वाचले. त्याच्यावर आपला काही विश्वास बसला नाही. राहुल गांधीसाहेब अमेरिकेत येत नाहीत काय? असो. पण तसे असेल तर ती बातमी तुमच्याकडच्या काँग्रेसवाल्यांनीच पेरलेली असणार, यात काही शंका नाही. एफबीआयला सीआयडी चौकशी करायला सांगा. म्हणजे दूध का दूध आणि पानी का पानी होईल.
पण कदाचित तो इकडील काँग्रेसवाल्यांचापण डाव असण्याचीपण  शक्यता आहे. मोदीसाहेबांनी तुम्हाला परत या, असे आग्रहाचे आमंत्रण दिले आहे. ते स्वीकारून तुम्ही पुन्हा नेमके एखाद्या राज्यातल्या निवडणुकीच्या आधी आलात तर? अशी त्यांना भीती आहे. म्हणून तुमच्या आगामी दौऱ्यात विघ्न आणायचे हे मोठे आंतरराष्ट्रीय राजकारण करण्यात येत आहे. तुम्ही त्याला बळी पडू नये. तुम्हाला दीर्घायुरारो.. की असेच काहीतरी लाभावे म्हणून आमच्या सार्वजनिक गणेश सेवामंडळ (रजि.)च्या वतीने महाआरतीचा कार्यक्रम आयोजित करणार आहोत. तेव्हा निश्चिंत असावे व मा. सौ. मॅडमनापण तसे सांगावे, ही विनम्र विनंती.
तुम्हाला मोदीसाहेबांचा नमोकुर्ता फार आवडला असे समजले. मोदीसाहेबांनी तुम्हाला तो दिल्याचे कुठे वाचनात आले नाही. मोदीसाहेबांनी सध्या काटकसर मोहीम सुरू केली आहे, त्यामुळे दिला नसावा. म्हणून फूल ना फुलाची पाकळी म्हणून या पत्रासोबत एक नमोकुर्ता कुरियर करीत आहोत, त्याचा स्वीकार करावा, हीपण विनम्र विनंती.
(साहेब, तुम्हाला मोदीसाहेबांचा तो कोट आवडला नाही हे मात्र बरे झाले. तो आवडला असता तर आमची पंचाईत झाली असती. पैशाचा काही प्रश्न नाही. मोदीसाहेब पाठीशी असले तर असे दहा कोट आपण लायनीत उभे करू. सवाल तो नाही. सवाल आहे गुजरातमधल्या कापडनिर्मात्यांचा. इंग्रजी स्पेलिंगे इंग्रजीतच लिहील असा कापडवाला तेथे कोठून आणायचा? असो.)
अधिक काय लिहू? कमी लिहिले जास्त समजून घ्यावे आणि आमची ही भेट पावन करून घ्यावी, अशी पुन्हा एकदा विनंती करून थांबतो. कधी अमेरिकेत आलो तर भेटायला येईनच.
कळावे,
लोभ असावा, ही विनंती.

तुमच्या आगामी दौऱ्याची वाट पाहणारा आपला विनम्र,
बंडूसाहेब डी. पाटील, बीए
माजी पं. स. सदस्य lr10