‘मेरा देश बदल रहा है’, असं अभिमानाने सांगणारी एक जाहिरात आजकाल अधूनमधून माध्यमांमध्ये दिसते, तेव्हा अनेकांच्या मनात अनेक शंका उभ्या राहू लागतात. खरंच, देश बदलतोय? मग तो बदल दिसत कसा नाही, असा थेट प्रश्नही कुणाच्या ओठांवर येतो. कारण बदल ही डोळ्यांदेखत घडणारी, अनुभवायला मिळावी अशी प्रक्रिया असली पाहिजे, अशी अपेक्षा असते. चार-पाच दशकांपूर्वी किंवा त्याआधी मुंबईत स्थायिक झालेल्यांच्या आठवणींच्या कप्प्यावरची धूळ बाजूला केली, की मुंबईचं एक वेगळं, अलगद रूप उलगडू लागतं आणि त्याबरोबर उसासेही ऐकू येतात.. ‘आता त्यातलं काहीच उरलं नाही’ या वाक्याने आठवणीच्या पाढय़ांचा शेवट होतो आणि नवा मुंबईकर या नवलकथा आ वासून ऐकत बसतो.

त्या काळी, जेव्हा मुंबईत चाळ संस्कृती होती, तेव्हा शेजारपाजारच्यांच्या भरवशावर खोलीचं दार सताड उघडं टाकून एखादी गृहिणी मार्केटमध्ये भाजी आणायला जायची आणि घरात आई दिसत नाही म्हणून बाळ रडू लागलं, तर सगळी चाळ गोळा होऊन आई परतेपर्यंत त्याची काळजी घ्यायची.. त्या काळी, चाळीच्या एखाद्या भाडेकरूच्या घरातलं एखादं कार्य म्हणजे अख्ख्या चाळीचं कार्य असायचं. कार्य पार पडेपर्यंत कोणत्याही गोष्टीची गरज भागवायला अख्खी चाळ सरसावलेली असायची.. त्या काळी, शेजारची सगळी कुटुंबं आपली सुखदु:खं वाटून घ्यायची..

पुढे मुंबई बदलली. चाळी गेल्या. कुटुंबं दरवाजाआड राहू लागली. शेजाऱ्यांशी ओळखही होईनाशी झाली आणि जुन्या मुंबईच्या आठवणींनी जुना मुंबईकर केवळ उसासे टाकत राहिला.

एकीकडे, मुंबईसारख्या महानगरांचं किंवा शहराचं रूप, तिथली संस्कृती अशी बदलत होती, तर दुसरीकडे, मुंबईपासून लांब, खान्देशातल्या एका छोटय़ाशा गावाची संस्कृती बदलत्या काळाबरोबर मुंबईच्या नेमकी उलटय़ा दिशेने बहरत होती.

त्या गावाचं नाव, काकोडा!

जळगाव जिल्ह्य़ात, मुक्ताईनगर या तालुक्यापासून तीस-पस्तीस कि.मी. अंतरावरचं हे गाव. आज इथल्या एखाद्या माणसाशी त्या काळाबद्दल बोलायला सुरुवात केली, तर जुन्या आठवणींनी तो शहारून जातो. त्या आठवणी त्याला लाजवतात, नकोशा होतात. पुन्हा ते दिवस नकोत, असं स्वत:ला बजावत राहतो. ही जुन्या मुंबईकराच्या आठवणींच्या नेमकी उलटी स्थिती!

त्या काळी, १९७०-७५ पर्यंत, हे गाव कुणाच्या गावीही नव्हतं.  हजारभर लोकवस्तीच्या या गावात एक शाळा होती, पण तिकडे गावातली मुलं फारशी फिरकत नसत. त्यामुळे जवळपास सगळंच गाव अशिक्षित. सगळीकडे घाणीचं साम्राज्य. घराबाहेरून वाहणारी सांडपाण्याची गटारं, आणि तुंबून राहिलेल्या पाण्यात घोंघावणाऱ्या माशा. जवळपास प्रत्येक घराच्या आतल्या एखाद्या अंधाऱ्या खोलीत, खोकल्यानं जर्जर झालेला, आजारपणाला वैतागलेला एखादा रुग्ण.. सगळं, उदास, भकास! आला दिवस गेला, की दुसऱ्या दिवसाची वाट पाहात गाव जगायचा.

गावातल्या जुन्यापुराण्या, पडीक देवळाचा वापर गावकरी आपली जनावरं बांधण्यासाठी करायचे. गावाबाहेरच्या कट्टय़ावर तर अक्षरश: हागणदारी होती. वेळ घालवायला काहीच साधने नसल्याने, गावात तंटेही होत असत. दारू हे जणू अनेकांचे मुख्य अन्न होते. शहराला जोडणारे तर दूरच, पण गावात घराघरांना जोडणारे रस्तेही नव्हते. गवताचा भारा डोक्यावर घेऊन चालता येईल एवढय़ा रुंदीचेही रस्ते गावाने पाहिले नव्हते. गावकऱ्यांनीच अतिक्रमणं केल्याने रस्ते आकुंचन पावले होते. एक घर सोडलं, तर गावात कुणाकडेच वीजही नव्हती. शेतीला ज्ञानाची जोड नव्हती. पाणीटंचाई तर पाचवीला पुजलेली होती. गावाबाहेर एक ओटा होता, तिथे अक्षरश: नरक होता. शेजारीच शाळा होती. त्या घाणीतूनच शाळेत जायला लागायचं, म्हणून कुणी फारसं शाळेतच जात नसे.

या इतिहासाला आता जवळपास चाळीस र्वष झाली. १९७७ साल उजाडलं आणि गावाचं नशीब बदललं. गावात कुलकण्र्याचं एक घर होतं. या घरातली माणसं गावाच्या तुलनेत बऱ्यापैकी शिकलेली. याच घरातला भालचंद्र नावाचा युवक पदवीधर होऊन गावात आला. गावातला आणि घराण्यातलाही एकमेव पदवीधर!

अशा उदासवाण्या गावात हा शिकलेला तरुण काय करणार, असा प्रश्न गावालाही कदाचित तेव्हा पडला असावा. मनातल्यामनात त्याच्या वेडेपणावरही गावानं शिक्का मारला असावा. पण भालचंद्र कुलकर्णीना गाव बदलायचं होतं. आपण शिकलो, तसं गावानं शिकलं पाहिजे, असा त्यांनी निर्धार केला होता. तिथंच त्यांनी शिक्षकाची नोकरी स्वीकारली. गावातल्या मुलांना शाळेत जायचा, अभ्यासाचा कंटाळा येतो, हे लक्षात आल्यावर त्यांनी आपल्या घरातच अभ्यासिका सुरू केली. गावात फक्त याच घरात तेव्हा वीज होती. इथे अभ्यासासाठी येणारा मुलगा कुठल्या घरातला, कुठल्या जातीचा वा धर्माचा हे त्यांनी कधीच विचारलं नाही. अभ्यासिकेत येऊन अभ्यास करणारा एक मुलगा त्या वर्षी शाळेत पहिल्या वर्गात आला आणि काहीतरी बदलतंय, याची गावकऱ्यांनाही खात्री वाटू लागली.

कुलकर्णींची ‘प्रयोगशाळा’ आता खऱ्या अर्थाने सुरू झाली होती. मग त्यांनी गावात फेरफटका मारण्यास सुरुवात केली. गावकऱ्यांशी संवाद सुरू झाला आणि गावाची मानसिकता उलगडू लागली. समस्या, व्यथा आणि वेदनाही बोलक्या झाल्या. कुढणारी मनं मोकळी होऊ  लागली. गावाला विश्वास वाटू लागला.

असा सूक्ष्म बदल जाणवू लागताच, कुलकर्णीनी गावाचं सर्वेक्षण केलं आणि एक धक्कादायक वास्तव उजेडात आलं. जवळपास प्रत्येक घरात एक तरी टी.बी. पेशंट होता.. गावाला अनारोग्यानं ग्रासलं होतं. अस्वच्छता, उघडय़ावरचे विधी, घाणीनं भरलेली गटारं अशी असंख्य कारणं त्यांना डोळ्यांसमोर दिसत होती. अशात कुणी आजारी माणूस अखेरच्या घटका मोजू लागला तर तातडीच्या उपचारांचीही गावात सोय नव्हती. जळगावात न्यायचं, तर गावात वाहनेही नव्हती आणि गावात खराब रस्त्यांवरून चालले तर चप्पल तुटतात म्हणून डॉक्टरही गावात यायला राजी नसत. प्रेत न्यायलादेखील गावात रस्ता नव्हता.

कुलकर्णींना हे बदलायचं होतं. त्यांनी सर्वात आधी शौचालय योजना गावकऱ्यांसमोर मांडली आणि त्यांच्या गळी उतरवली. ही गोष्ट १९९५-९६ मधली. गावात शंभरएक शौचालयं बांधून झाली, त्यांचा वापर सुरू झाला. यामुळे झालेला बदल गावालाही जाणवू लागला.

काही दिवसांनी, त्यांनी गावातल्याच, अभ्यासिकेत येणाऱ्या मुलांना बरोबर घेतले आणि चक्क गावातला रस्ता करायला घेतला. रस्त्यावर गावकऱ्यांनीच केलेली अतिक्रमणे काढावीत म्हणून गळ घातली. गावकऱ्यांनी विश्वासानं साथ दिली आणि  गावातला रस्ता तयार झाला. एक गवताचा भारा न्यायलाही रस्ता नव्हता, तिथे चकाचक रस्ते झाले. रस्ते नसल्याने गावात डॉक्टर येत नाही म्हणून तोवर कुलकर्णीनी औषध पेटी योजना सुरू केली होती. या पेटीत गावकऱ्यांना गरजेला लागणारी सगळी औषधं असायची. अगदी मलमपट्टी, अंगदुखी-डोकेदुखी यांपासून ते हिवताप-मलेरियापर्यंत!

रस्ते झाले आणि गावात आरोग्य उपकेंद्र सुरू झालं. गावाच्या आरोग्याचे नवे दिवस सुरू झाले होते. मग आरोग्य शिबिरं सुरू झाली. अलीकडे वर्षांआड गावात रक्तदान शिबिरं होतात. गरजूंसाठी रक्तदान करण्याचं महत्त्व गावाला पटलंय. रक्तदात्यांची सूची तयार आहे. अगदी दुर्मीळ अशा ‘ओ – निगेटिव्ह’ गटाचे रक्तदातेही गावात आहेत. गरज लागेल तेव्हा कुठून तरी त्यांना बोलावणं येतं आणि हे तरुण रक्तदानाचं पुण्यकर्म करून गावात परततात. आरोग्याचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हं दिसू लागली आणि कुलकर्णीनी शेती, पाणी समस्येवर लक्ष केंद्रित केलं. एव्हाना सगळा गाव विश्वासानं त्यांच्या साथीला सज्ज होता.

गावाशेजारून नदी वाहायची, पण तिला बोटाएवढी धार असायची. एका विहिरीत बऱ्यापैकी पाणी होतं. कुलकर्णीनी गावाला साद घातली आणि गावकऱ्यांनी एकत्र येऊन या विहिरीतला गाळ काढला. पाणी वाढलं, तसा गावाचा विश्वासही वाढला. चांगल्याची चाहूल गावाला लागली होती..

सात-आठ जणांना घेऊन कुलकर्णीनी ही नदी अडवायचा घाट घातला आणि महिनाभरात त्याची फळं गावाला दिसू लागली. बंधाऱ्याआड साठलेल्या पाण्यानं, गावातल्या गुरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. कपडे धुवायला नदीवर वर्दळ सुरू झाली होती. नदीवर जमणाऱ्या महिला सुखदु:खं वाटून घेऊ  लागल्या आणि मनं, माणसं जोडली जाऊ  लागली. मग खतांच्या रिकाम्या पिशव्या दगडमातीनं भरून नदीवर बंधारा बांधायचं काम सुरू झालं आणि बघता बघता, दोन दिवसांत मोठा बंधारा तयार झाला. परिसराचा पाण्याचा प्रश्न सुटणार, या जाणिवांनी गावं सुखावली.

गाव बदलत होता. याचाच फायदा घेऊन, पुढचं कोणतंही काम गावकऱ्यांच्याच सहकार्यानं , त्यांच्याच सहभागातूनच पूर्ण करायचं, असं कुलकर्णींनी ठरवलं.  गावाबाहेरच्या शाळेशेजारच्या हागणदारीच्या ओटय़ाची सफाई करायचं ठरलं. तिथे देऊळ बांधायचा प्रस्ताव त्यांनी गावासमोर ठेवला आणि गावकऱ्यांनी नाकं मुरडली. जिथे शौचालय होतं, तिथे देवालय बांधायचं ही कल्पना त्यांना अस होती. पण तसं केलं नाही, तर स्वच्छता नांदणार नाही हे कुलकर्णींनी गावाला पटवून दिलं आणि एकेकाळच्या हागणदारीच्या ओटय़ावर दुर्गा मंदिर उभं राहिलं. आज हे मंदिर गावाच्या एकोप्याचं प्रतीक बनलंय. ३० र्वष झाली, सगळं गाव या मंदिरात जातिभेद विसरून गोळा होतं.

सरकारनं तंटामुक्ती योजना जाहीर केली, त्याच्या कितीतरी आधी एका आगळ्या मार्गानं गावात तंटामुक्तीचा नवा प्रयोग कुलकर्णी सरांनी सुरू केला होता. त्यातून व्यसनमुक्तीही आपोआप साधत होती. गावात शांतता, सौख्य नांदावं म्हणून त्यांनी भागवत सप्ताह सुरू केला. पारायणासाठी गावकरी एकत्र येऊ  लागले आणि गावातले तंटे मिटले. सुधारणेच्या प्रत्येक कामात गावकऱ्यांचा सहभाग वाढला. आता गावात कुणीही दारू पीत नाही.

गावात जिल्हा परिषदेची शाळा आहे. तिला मंदिराइतकंच पावित्र्य असलं पाहिजे, हे कुलकर्णी सरांनी गावाच्या मनावर ठसवलं आणि गावानं लोकवर्गणी काढून शाळेत मुलांसाठी बाकडी बनविली. बाकडी असलेली जिल्हा परिषदेची ही बहुधा एकमेव शाळा ठरली. या शाळेत शिक्षक, विद्यार्थी आणि  गावकरी यांचं आगळं नातं निर्माण झालं. शाळेतील प्रदीर्घ काळाच्या सेवेनंतर बदली झालेल्या एका शिक्षकाला सगळ्या गावानं एकत्र येऊन प्रेमाचा निरोप दिला आणि समारंभपूर्वक त्याचा सत्कार करून कृतज्ञताही व्यक्त केली. झेडपीच्या शाळेतल्या एखाद्या प्राथमिक शिक्षकाच्या वाटय़ाला असं प्रेम क्वचितच येत असावं. तीस-पस्तीस वर्षांपूर्वी ओस पडलेल्या याच शाळेतली मुलं पुढे स्कॉलरशिपच्या परीक्षेत चमकू लागली. परीक्षेचा निकाल लागला की, आनंदानं मोहरून उभं गाव शाळेतल्या शिक्षकांचा सत्कार करतं, शिक्षिकांना साडीचोळी देऊन त्यांच्याविषयीचा आदर व्यक्त करतं. आता अलीकडेच गावकऱ्यांनी वर्गणी काढून शाळेत संगणकही घेतलाय.

या परिवर्तनाचं खरं श्रेय भालचंद्र कुलकर्णीना आहे. पण त्यांच्याशी बोलताना मात्र, ते सगळं श्रेय गावकऱ्यांना देतात. ‘गावकऱ्यांनी साथ दिली नसती, तर हे अशक्य होतं’, असं ते सांगतात. गावाबाहेर धनगरांची पालं पडायची. गावोगाव फिरून गुजराण करणारा हा समाज स्थिरावला, तर त्यांच्या मुलाबाळांना शिक्षण मिळेल आणि या समाजाचं परिवर्तन होईल, हे ओळखून कुलकर्णींनी पुन्हा गावकऱ्यांनाच गळ घातली आणि गावाबाहेर या समाजासाठी ‘अहिल्यानगर’ नावाची वसाहत उभी राहिली. शाळाही सुरू झाली. धनगरांची मुलं आता इथल्या शाळेत शिकताहेत. भटके धनगर स्थिरावले आहेत.

भालचंद्र कुलकर्णी आता सेवानिवृत्त झालेत. सत्तरी गाठली असली तरी गावाच्या विकासासाठी आता आपल्याकडे भरपूर वेळ आहे, असा त्यांच्या सेवानिवृत्तीचा अर्थ आहे. पूर्वी, जेव्हा कामाला सुरुवात केली, तेव्हा दिवाळी- दसऱ्याला शाळेतल्या मुलांना बरोबर घेऊन गावातले रस्ते झाडून काढायचा त्यांचा शिरस्ता होता. कुलकर्णी सर सांगतात, ‘तेव्हा गावकरी आपली चेष्टा करायचे, आता सफाईसाठी सगळं गाव एकसाथ काम करतं..’

‘तेव्हा’ आणि ‘आता’ हा ‘बदलाचा एक प्रवास’ सांगताना कुलकर्णी सरांचा सुखावलेला स्वर आपल्याला स्पष्टपणे जाणवतो.

दिनेश गुणे – dinesh.gune@expressindia.com