‘जगावेगळेपण’ म्हणजे काय असतं? नेहमी दिसणारा, सोबत प्रवास करणारा, एकत्र काम करणारा, अधूनमधून भेटणारा एखादा माणूस कोणत्या प्रकारात मोडतो, हे कसं ओळखायचं?.. तर ते थोडसं कठीणच असतं. एखाद्याचं जगावेगळेपण समजून घ्यायचं असेल तर वारंवार त्याच्या मनात डोकवावं, तेव्हा हळूहळू ते वेगळेपण जाणवायला लागतं. मग त्या वेगळेपणाची पुरती ओळख व्हावी यासाठी आपली तगमग सुरू होते.. त्यासाठी पाठलाग करावा लागतो. त्यात यश आले, की वेगळेपणाचे अनेक पदर आपल्यासमोर अलगद उलगडत जातात. तरीही ते वेगळेपण पुरते उमगतच नाही. मग प्रत्येक पाठलागात नवा पलू समोर येऊ लागतो. असे वेगवेगळे पलू, एकाच वेळी उलगडण्यापेक्षा, प्रत्येक वेळी एक एक नवा पलू उलगडण्यातला आनंदही वेगळा, मजेदार असतो. तो अनुभवावाच लागतो..

समाजात खूप नाव असलेल्या, ‘सेलेब्रिटी’ म्हणून मान्यता पावलेल्या आणि ज्याच्या केवळ दर्शनानेही धन्य वाटावे अशा एखाद्या व्यक्तीबद्दलच असे काही वाटावे, असा सर्वसाधारण समज असतो. पण तसेच असलेच पाहिजे असे नाही. आपल्या आसपासच्या, सहज भेटणाऱ्या एखाद्याच्या अंगातही असेच जगावेगळेपण असते, हे मला मंदार भारदे नावाच्या तरुणाशी ओळख झाल्यानंतर पटले. माणसाला मन नावाचा एकच अदृश्य अवयव असतो. पण मंदार भारदे नावाच्या या माणसाला अनेक मने आहेत, हे त्याच्या प्रत्येक भेटीनंतर जाणवत गेले. आसपासच्या घडामोडींवरील भाष्य अत्यंत संवेदनशीलपणाने, पण त्याच्या खास, म्हणजे गंभीर आणि मिस्कील शैलीच्या मिश्रणातून त्याच्याकडून ऐकण्यात किंवा त्याच्या लिखाणातून वाचण्यात एक मजा असतेच, पण ते केवळ विनोदाच्या चौकटीत पाहात खळखळून हसावे आणि विसरून जावे असे कधीच नसते. ते मनात रुतून बसते, अंतर्मुख करते आणि नवा विचार करायला भाग पाडते. असा अनुभव अनेकदा आल्याने, या माणसाला ओळखण्यासाठी, जाणून घेण्यासाठी मी त्याचा ‘पाठलाग’ सुरू केला. अलीकडच्या काही भेटींतून मला तो थोडासा उलगडत गेला, तरीही अनेकांप्रमाणेच हा ‘संपूर्ण भारदे’ मलाही समजलाच नाही. मग मी त्याचे लिखाण वाचत गेलो. नाशिकचे दिवंगत लेखक मुरलीधर खैरनार यांच्या ‘शोध’ नावाच्या प्रचंड गाजलेल्या कादंबरीच्या लेखनप्रक्रियेत मंदार भारदे कसे सामावून गेले होते हे जाणवत गेले आणि त्याचे अनेक पलू एक एक करीत उलगडत गेले.

course on quantum technology for the first time in the country
देशात पहिल्यांदाच क्वांटम तंत्रज्ञानावरचा अभ्यासक्रम… जाणून घ्या सविस्तर!
Ragging on two postgraduate students at BJ Medical College in Pune print news
धक्कादायक! पुण्यातील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तरच्या दोन विद्यार्थिनींवर ‘रॅगिंग’
MBBS student medical Nagpur
नागपूर : ‘एमबीबीएस’च्या विद्यार्थ्याने स्वत:ला खोलीत कोंडले !
Pune University Cancels Professor s Guideship for Demanding Bribe
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ‘त्या’ लाचखोर प्राध्यापिकेवर कारवाई

केवळ गप्पांमध्ये खिळवून ठेवणारा, विचारांना चालना आणि वेगळी दिशा देणारा, एवढेच मंदार भारदेंचे पलू नाहीत. त्यापलीकडचेही, जगाने नोंद घ्यावी असे एक अफलातून वेगळेपण त्यांच्याकडे आहे. नाशिकसारख्या अर्धनागरी शहरात शाळा-महाविद्यालयाचे शिक्षण पूर्ण करताना देवळालीच्या तळावरून उडणाऱ्या हेलिकॉप्टरच्या आवाजाचे ‘संगीत’ याच्या कानात घुमू लागायचे आणि डोळ्यांसमोर आकाशाला गवसणी घालण्याची स्वप्ने तरळू लागायची. त्या स्वप्नांचे गारूड मनावर घेऊनच हा तरुण मुंबईत दाखल झाला. पार्ले स्टेशनच्या बाहेर, स्वामी विवेकानंद रोडवर दिवस-रात्र वाहनांच्या रहदारीची घरघर सुरू असतानाही त्याचे कान मात्र िभतीपलीकडच्या जुन्या विमानतळावरून ये-जा करणाऱ्या विमानांच्या आणि हेलिकॉप्टरच्या आवाजाचा वेध घेण्यासाठी आसुसलेले असायचे. आपले भविष्य याच आवाजाशी जोडले जाणार आहे, याची त्याला त्या क्षणी कदाचित फारशी कल्पना नसावी. म्हणूनच, महाविद्यालयीन काळात फीचर फिल्म्स, डॉक्युमेंटरीज तयार करण्यासाठी तो वणवण भटकला. त्यातून माणसं वाचायची सवय जडली आणि जगाची ओळखही घडली. त्याच काळात दिवे घाटातल्या आषाढीच्या वारीचे विहंगम दृश्य चित्रित करायचे असे ठरले आणि हेलिकॉप्टरच्या शोधात त्याने अनेकांचे उंबरठे झिजवले. पण नियोजनात काही तरी कमतरता राहिलीच. पंढरीच्या वारीचे ते दिव्य दृश्य आकाशातून चित्रित करायचे राहूनच गेले. हा त्याच्या स्वप्नाला आव्हान देणारा प्रसंग ठरला. नाशिकमधल्या या तरुणाचा तोपर्यंत विमाने, हेलिकॉप्टरशी फारसा संबंध आलाच नव्हता. पण या प्रसंगानंतर त्याने विमानाशी नाते जोडण्याचा ध्यासच घेतला.

मंदारचे आजोबा बाळासाहेब भारदे हे महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष. गांधीवादी विचारांचे निस्सीम पाईक. त्यामुळे सामाजिक भान घरातूनच मनात रुजलेले. तरीही प्रत्येक गोष्टीकडे चिकित्सकपणे पाहण्याच्या आणि वेगळ्या कोनातून विचार करण्याच्या सवयीतून मंदारला वेगळ्याच कोनातून गांधीही उलगडले आणि त्या कोनातूनच त्याने आजच्या राजकारणाकडेही पाहायला सुरुवात केली. त्यामुळेच, खुमासदार शैलीतील त्याचे राजकारणाचे भाष्य ऐकणे हा एक अनुभव असतो. नेता हा कधीच गरीब, केविलवाणा दिसता कामा नये. तो राजासारखा ऐश्वर्यसंपन्न असला पाहिजे, समाजाचे प्रश्न सोडविण्याची ताकद त्याच्या व्यक्तिमत्त्वात दिसली पाहिजे, असे काही विचार खुमासदारपणे आणि तिरकसपणे मांडत मंदार राजकारणाचे त्याचे असे खास लॉजिक उलगडू लागला की त्या विनोदातही एक विदारक वास्तवाचे अदृश्य पलू दिसू लागतात. अनेक राष्ट्रीय आणि विदेशी नेत्यांनाही दर्जेदार विमानसेवा पुरवताना लाभलेल्या त्यांच्या सहवासाची भक्कम शिदोरी आज मंदारजवळ आहे, ती त्याच्या ‘माणसे वाचण्या’च्या वेगळ्या सवयीतूनच!

पण मंदार भारदेंची ही गोष्ट एवढीच नाही. ही गोष्ट आहे, नाशिकच्या या तरुणाने अवकाशात मारलेल्या कर्तृत्वाच्या खऱ्याखुऱ्या भरारीची.. एका स्वप्नाला वास्तवात आणताना बजावलेल्या आगळ्या कर्तबगारीची. मुंबईत अलीकडेच भरलेल्या ‘मेक इन इंडिया’ सोहळ्यातील एका बातमीमुळे मंदार भारदे हे नाव अनेकांना माहीत झाले. तोवर अवकाशभरारीच्या उद्योगातील अनेकांना त्याच्या विश्वाची ओळख पटली होती. त्या बातमीमुळे त्याचे सामान्यांशी नाते असल्याची ओळख अधोरेखित झाली. त्याआधीच्या काही प्रसंगांनी हे नाते अधोरेखित झालेच होते. हृदय प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेत कमीत कमी वेळात गरजू रुग्णाला योग्य हृदय मिळणे ही पहिली गरज असते. अनेकदा ब्रेन डेड व्यक्तीचे हृदय आणि गरजू रुग्ण यांच्यातील भौगोलिक अंतरामुळे प्रत्यारोपणासाठी हृदय उपलब्ध असूनही अंतराच्या अडथळ्यामुळे ते रुग्णास मिळू शकत नाही आणि हताशपणे जे घडेल ते पाहावे लागते. ही अस्वस्थ करणारी बाब संपली पाहिजे, यासाठी काही तरी केले पाहिजे, या तळमळीतून ‘एअर अ‍ॅम्ब्युलन्स’चा पहिलावहिला प्रकल्प आणि केंद्र सरकारशी तसा पहिलावहिला करार करून तातडीच्या प्रत्यारोपण शस्त्रक्रियांसाठी कमीत कमी वेळात अवयव वाहून नेण्याकरिता परवडणाऱ्या दरात विमानसेवा उपलब्ध करून देण्याचा संकल्प सोडणारा मंदार भारदे त्या करारातून जगासमोर आला. दोन वर्षांपूर्वी उत्तराखंडात अतिवृष्टीचा हाहाकार झाला आणि मोठी जीवितहानी झाली. असंख्य पर्यटकही जागोजागी अडकून पडले. त्यांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी पुरेशी हवाई यंत्रणाही आपल्याकडे नाही, हे स्पष्ट झाले. तातडीचे वैद्यकीय उपचार, संकटग्रस्तांना त्वरित मदत करण्यासाठी हवाई ताफा गरजेचा असतो. विमानाचा उपयोग याआधी बॉम्ब टाकण्यासाठी केला गेला असेलही, पण जीव वाचवण्यासाठीही विमानाचा वापर करता येतो, नव्या निर्मितीसाठीही विमाने वापरता येऊ शकतात आणि विकासाच्या वाटाही विमानाच्या माध्यमातून निर्माण करता येतात, हे मंदारचे स्वप्न त्या घटनेनंतर अधिकच बळकट झाले.. त्यातूनच एअर अ‍ॅम्ब्युलन्सचा प्रकल्प उभा राहिला. काही रुग्णांच्या हृदय प्रत्यारोपणासाठी मंदार भारदेंच्या ताफ्यातील एअर अ‍ॅम्ब्युलन्सने मोलाची कामगिरीही बजावली. भविष्यात देशात कुठेही कमीत कमी वेळात असे अवयव किंवा तातडीच्या उपचाराची गरज असलेल्या रुग्णांची ने-आण करण्यासाठी मंदार भारदेंच्या  ‘मॅब एव्हिएशन’ कंपनीत अ‍ॅम्ब्युलन्सचा ताफा सज्ज राहणार आहे.

अजूनही ही गोष्ट इथेच संपत नाही. मंदारशी बोलताना त्याच्या डोळ्यातील स्वप्नेही बोलकी होत जातात आणि व्यवसायापलीकडच्या बांधिलकीचे अनेक पलू उलगडत जातात. कधीकाळी केवळ विमाने आणि हेलिकॉप्टरच्या आवाजाने भारावून जाणाऱ्या मंदारच्या हवाई ‘भरारी’ची सुरुवात गमतीदार आहे.

असाच कधी तरी नाशिकहून मुंबईला आलेला असताना जुहूच्या विमानतळाकडे मंदारची पावले वळली. भिंतीपलीकडच्या हेलिकॉप्टरचा आवाज कानात घुमल्याने तो अस्वस्थ झाला. मग त्याने थेट गेट गाठले आणि आत घुसण्याचा प्रयत्नही केला. पण सुरक्षा रक्षकांनी त्याला अडवले. कुठे जायचे, कुणाला भेटायचे काहीच सांगता येत नसल्याने मंदारने त्या दिवशी घर गाठले. पण पुढे मुंबईत आल्यावर प्रत्येक वेळी त्याने आत घुसण्याचा हट्ट सोडला नाही. असे सात-आठ वेळा झाले. प्रत्येक वेळी अडविले गेल्यावर एकदा कुणा मंत्र्याच्या ताफ्यातील एका गाडीत घुसून त्याने हेलिकॉप्टपर्यंत प्रवेश केला आणि आपले ते ‘स्वप्न’ त्याने पहिल्यांदा उघडय़ा डोळ्यांनी डोळे भरून पाहिले. त्याच्या फिरत्या पंख्यांच्या वाऱ्याचा झोत अंगभरून अनुभवला. आणि त्याच क्षणी त्याचा निश्चय झाला. आपल्या व्यवसायाची दिशा हीच आहे, हे ठरले. मग त्याने ‘मॅब एव्हिएशन’ नावाची कंपनी स्थापन केली आणि विमाने, हेलिकॉप्टरच्या व्यवसायाबरोबरच तांत्रिक बाजूही समजावून घेण्यासाठी अक्षरश: अहोरात्र अभ्यास केला. आज मंदारच्या ताफ्यातील विमानांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक नेत्यांची भारतात आल्यावर पहिली पसंती मिळते. त्यांच्याकडून सेवेची प्रशंसा ऐकताना मंदारच्या नजरेसमोरून प्रत्येक वेळी आपल्या विमानवेडाच्या पहिल्या पायरीपासून आजच्या भरारीपर्यंतचा प्रत्येक क्षण चित्रपटासारखा सरकू लागतो आणि तो स्वत:शीच सुखावतो..

एअर अँब्युलन्सचे मंदारचे स्वप्न पूर्ततेच्या टप्प्यात आले आहे. जगभरातील आणि देशातील अनेक नामवंतांना त्याच्या विमानसेवेचा सुखद अनुभव मिळाला आहे. आता मंदारच्या डोळ्यात काही नवी स्वप्ने उमलू लागली आहेत. हवेतून उडणाऱ्या पक्ष्यांच्या विष्ठेतील एखादे बीज एखाद्या माळरानावर पडते, तेथे उन्हे झेलत पावसाची प्रतीक्षा करते आणि अंगावर पाण्याचे थेंब पडताच ते अंकुरते. पुढे त्याचा वृक्ष होतो आणि अनेकांना सावली देतो. पर्यावरणाचे हे चक्र जपण्याचे काम एकटय़ा पक्ष्याचे नाही, आपणही त्याला हातभार लावला पाहिजे, असे मंदारला वाटते. देशभरात हवाईमार्गे फिरताना वैराण जमिनी, उजाड माळराने खाली दिसू लागली, की याच विचाराने तो अस्वस्थ होत जातो. अशा जमिनीवर विमानातून झाडांची बीजे सोडली तर काही प्रमाणात तरी त्यांना नवे अंकुर फुटतील, असा ध्यास त्याने घेतला आहे. अनेकांजवळ मोठय़ा उमेदीने त्याने हा विचार मांडला आणि अनेकांनी त्याला वेडय़ातही काढले. पण आपण ठरवले तर काहीही करू शकतो, हे मंदारने त्याच्या हवाई स्वप्नाच्या पूर्ततेतून सिद्धच केले असल्याने अशा अनुभवांनी तो नाउमेद झालेला नाही. हा प्रयोगही करायचाच, असा त्याचा निर्धार आहे. जी विमाने विध्वंसासाठी वापरली जातात, त्याच विमानातून विकास घडवायचा असा त्याचा ध्यास आहे. या प्रयोगाला राज्यकर्त्यांचे केवळ पाठबळ मिळाले, तरी पुरेसे आहे. मग हवाई बीजारोपणाचा एक आगळा प्रयोग देशात करता येईल, असे सांगताना मंदारची नजर कुठल्या तरी भविष्याकडे बहुधा खिळलेली असते..

आपल्याकडे अनेकदा कृत्रिम पावसाचे प्रयोग झाले. पण नियोजन आणि नसर्गिक स्थितीचा नेमका अभ्यास नसल्याने ते तकलादूच ठरले. आखाती देशांमध्ये नियमितपणे कृत्रिम पाऊस पाडला जातो, हे त्याने त्या देशांतील वास्तव्यात अनुभवले आणि ‘क्लाऊड सीडिंग’च्या प्रयोगातून आपणही माळरानांवर, दुष्काळी भागातील वैराण जमिनींवर हिरवाई फुलवू शकू असा विश्वास मंदारच्या मनात बळावत गेला. आता हा प्रयोग तो कधी तरी नक्कीच करणार आणि तो यशस्वी होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही,  हे त्याच्या सुरावरूनच समजू लागते. मुंबईसारख्या महानगरांत डासांच्या उपद्रवामुळे आरोग्याचे असंख्य प्रश्न उभे राहिले आहेत. साथीच्या आजारांचा मुंबईच्या कोणत्या ना कोणत्या कोपऱ्याला सदैव वेढा असतो. विमानातून डासनाशकांची फवारणी करण्याची परवानगी मिळाली, तर त्यासाठी शास्त्रशुद्ध रीतीने पुढाकार घेण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. तो प्रयोग जमला, तर हवाई सेवा ही खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांशी नाते जोडणारी सेवा ठरेल, असे सांगताना मंदारचा स्वर काहीसा हळवा झालेला असतो. कारण आकाशात भरारी घेतली तरी आपले खरे नाते मातीशीच आहे, याची त्याला जाणीव आहे. त्याच्यावर आजोबांच्या आचारांचा आणि गांधीजींच्या विचारांचा पगडा आहे, हे त्याच्याशी बोलताना जाणवत राहते.

म्हणूनच, या माणसाच्या जगावेगळेपणाचे अनेक पलू उलगडलेलेच नाहीत असे वाटू लागते..

dinesh.gune@expressindia.com