बाई संभाळ कोंदण

आजकाल गावोगाव, विशेषकरून शहरांमधून मॉर्निग वॉकची चळवळ जोरात आहे. या भल्या पहाटे चालण्यामागे उत्स्फूर्ततेपेक्षा डॉक्टरांनी बंधनकारक करण्याचा वाटा मोठा असतो.

आजकाल गावोगाव, विशेषकरून शहरांमधून मॉर्निग वॉकची चळवळ जोरात आहे. या भल्या पहाटे चालण्यामागे उत्स्फूर्ततेपेक्षा डॉक्टरांनी बंधनकारक करण्याचा वाटा मोठा असतो. अर्थात काही हौशी आरोग्य उपासकही असतात. डॉक्टरांनी चालणे अनिवार्य केलेला आणि हौशी चालणाऱ्यांचा.. बऱ्यापैकी नियमित असणाऱ्यांचा आमचा एक ग्रुप तयार झालाय. त्यात वेगवेगळ्या स्वभावाचे लोक आहेत. काहीजण तोंड lok01चालवायला मिळतं म्हणून पाय चालवतात. काही मात्र ‘कॅलरीज् बर्न’ करायचे उद्दिष्ट डोक्यात ठेवूनच तन्मयतेनं चालत असतात. काहींना घरून जबरदस्ती चालायला पाठवलेलं असतं. वेळ लावून चालणारे सारखे पळणाऱ्या घडय़ाळाच्या काटय़ाकडे पाहत असतात. यात आमचे एक इंजिनीअरसाहेब आहेत. टेलिफोन खात्यात मोठय़ा पदावर कार्यरत असणारे हे साहेब आहेत मोठे मनमिळावू. कुठंही साहेबी थाट नाही. जबाबदारी मोठी असल्यामुळं व्यापही मोठा आहे. पण त्यातूनही इंजिनीअरसाहेबांच्या डोक्यात टेलिफोनच्या केबलसारखे गुंतागुंत झालेले अनेक प्रश्न, प्रसंग वळवळत असतात. पाहता पाहता हे साहेब माझे मित्र झाले. रोज ‘हाय- हॅलो’ होतं. कधी चालताना गप्पा रंगतात. प्रत्येक प्रश्नावर त्यांना स्वतंत्र पुस्तक हवं असतं. आपण एखादं पुस्तक सुचवलं तर ते मिळवून वाचतात. चर्चा करतात. टेलिफोनच्या क्रॉस कनेक्शनमध्ये एखादा विचित्र संवाद ऐकू यावा तसा एखादा वेगळाच प्रश्न त्यांच्या डोक्यात येतो. पण त्या प्रश्नामागे जाणून घेण्याची प्रामाणिक तळमळ असते. सहा फुटी धिप्पाड देहातली चरबी कमी करण्याकरिता झपाझपा चालताना साहेबांचं तोंडही सुरू असतं. परवा त्यांनी एक छोटासा प्रसंग सांगून एक गंभीर प्रश्न उपस्थित केला. बोलताना थोडेसे हळवे झाले होते.
इंजिनीअरसाहेब शहरालगतच्या औद्योगिक वसाहतीतल्या कार्यालयात भेट द्यायला निघाले होते. सकाळची वेळ. डय़ुटी गाठण्यासाठी प्रचंड वेगात वाहनं धावत होती. रस्त्याच्या कडेचं दृश्य बघून साहेबांनी र्अजट गाडी थांबवली. रस्त्याच्या कडेला एक तरुण मुलगी विव्हळत पडली होती. रस्त्यावरच्या वाळूवर स्लिप झालेली स्कूटी बाजूला पडलेली होती. पण कुणीही थांबायला तयार नव्हतं. त्या अपघाताकडे दुर्लक्ष करून वाहनं सुसाट पळत होती. साहेबांनी तातडीने त्या मुलीला उठवून बसवलं. गाडीतली बाटली आणून पाणी पाजलं. मुलीला बरंच खरचटलं होतं. ती घाबरली होती. तिचं अंग थरथरत होतं. साहेबांनी तिला धीर दिला.
जवळपास दवाखाना नव्हता. दरम्यान, दोन-चार वाहनं आता उत्सुकतेपोटी थांबली होती. त्यांनी त्या मुलीच्या घरी कळवण्यासाठी घरचा पत्ता, मोबाईल नंबर विचारला. पण ती मुलगी काहीच बोलली नाही. मुलगी आता थोडी शांत झाली होती. पुन्हा साहेबांनी माहिती मिळवायचा प्रयत्न केला. मुलगी मात्र शांत. आर्किटेक्ट कॉलेजची ती विद्यार्थिनी होती. थांबलेल्या वाहनांतल्या एक बाई तिच्याशी बोलू लागल्या. मुलगी त्यांच्याशी बोलत होती. मुलीने त्या बाईंना घरचा पत्ता, फोन सांगितला. बाईंनी तिच्या घरी संपर्क साधला. प्रश्न मार्गी लागलेला बघून साहेबही निघाले. निघताना ती जखमी मुलगी साहेबांना ‘थँक्स काका!’ एवढं बोलली.
प्रसंग एवढाच आहे. यात त्या मुलीनं स्वत:ची माहिती, कॉन्टॅक्ट नंबर न सांगणं ही गोष्ट इंजिनीअरसाहेबांना चांगलीच लागली होती. त्यांच्या मते, ‘मलाही मुलगी आहे. म्हणजे मी तिच्या बापासारखाच आहे. शिवाय रस्त्यावर कुणीही लक्ष देत नव्हतं तेव्हा कर्तव्य म्हणून मी गाडी थांबवून तिला मदत केली. तिला घरी पोचवण्यासाठीच मला तिचा पत्ता, मोबाईल नंबर हवा होता. मग तिने माझ्यावर अशावेळी अविश्वास का दाखवला असेल? हा प्रश्न साहेबांना छळत होता.. आतून अपमानित करीत होता. यावर बरीच चर्चा झाली. राहून राहून साहेब पुन्हा या विषयावर यायचे. ‘माझा चेहरा एवढा भीतीदायक आहे? का कधी मी एखाद्या स्त्रीसोबत वाईट वागलोय? ज्या स्त्रीसोबत ती मुलगी घरी गेली, ती स्त्रीही अनोळखीच होती. मग माझ्यावरच अविश्वास का?’ एखादा दिवस गेला की साहेबांची हळवी जखम भळभळू लागायची. एका परपुरुषाला आपला कॉन्टॅक्ट नंबर किंवा पत्ता सांगणं त्या मुलीला योग्य वाटलं नाही. त्यात वैयक्तिक इंजिनीअरसाहेबांवरच्या अविश्वासापेक्षा ‘पुरुष’जातीची वाढत चाललेली दहशतच अधिक जबाबदार असावी. पोटच्या मुलीप्रति बापाचीच विकृती पुढे येताना बापासारख्या पुरुषावर विश्वास कसा ठेवायचा? प्रत्येक लाल मुंगी आपल्याला चावत नसते. पण लाल मुंग्या दिसल्या की आपण सावध होतो. कारण लाल मुंगीच्या कडाडून चावण्याची किमान माहिती आपल्या गाठीशी असते. बायका अशाच दचकून असतात पुरुषांच्या बाबतीत.
खऱ्या अर्थानं बाईचं हे दचकणं, संकोचणं, घाबरणं आणि आणि सावरणं सुरू होतं एका घटनेपासून. ती घटना म्हणजे स्त्रीला होणारी ऋतुप्राप्ती होय. या घटनेपासून बाईच्या जगण्यावर अचानक अनेक बंधने येतात. याचे अनेक संदर्भ लोकगीतांतून, ओव्यातून येत राहतात..आता आलं ग बंधन
अंग झालंया चंदन
चंदनाची दरवळ
बाई संभाळ कोंदण
सगळ्यांसोबत बिनधास्त खेळणारी, बागडणारी मुलगी अचानक मुलांपासून वेगळी होते. भोवतालच्या नजरा तिच्याकडे वळतात. बहिणी, तिच्या मैत्रिणी एकदमच तुटक वागायला लागतात. त्याचा लहानपणी अर्थ लावता येत नसे. या ‘कावळा शिवण्याचा’ लहानपणी भयंकर राग येत असे. कारण त्यामुळे तीन दिवस आईपासून लांब राहावं लागायचं. ‘शिवू नको, लागू नको, दूर हो’ असे जाचक नियम घरात असत. बाहेरून खेळून आल्यावर स्वत:ला आईच्या अंगावर झोकून द्यायची सवय. नेमके तीन दिवस आई अस्पृश्य असायची. त्या काळात ‘कावळा शिवणे’ या घटनेचा सामाजिक-सांस्कृतिक अर्थ डोक्यात असणं शक्य नाही. पण या घटनेचे दृश्य परिणाम खटकणारे होते. याबद्दलची दाटून राहिलेली बालमनाची अनाकलनीयता पुढं कवितेतून उजागर झाली..
‘शेपटी वेण्या हलवत मिरवणारी
हुशार परकरी पोरगी
एकदम वर्गातच घाबरली-ओरडली,
बाईंनी तिला उठवलं- विचारलं
तर बेंचावर भलंमोठ्ठं रक्त सांडलेलं,
आम्ही घाबरलो
बाईंनी आम्हाला वर्गातून हाकललं
नेमकं काय झालं?
कुठला गृहपाठ विसरल्याची
ही रक्तरंजित शिक्षा,
का बेंचाचा खिळा लागला?
(अशा बाहेर आलेल्या खिळ्यांमुळे
आमच्या खाकी चड्डय़ा फाटायच्या.)
कुणीच काही सांगेना
शेवटी मी भांडेवाल्या गंगाबाईला विचारलं
तवा घासताना गंगाबाई बोलली,
‘‘तुला काय संडय़ा
जलमलास पुरुषाच्या जातीत
त्या पोरीचा
जाळभाज सुरू झालाया बाबा’’
मला काही कळेना
नुस्ता तव्यावर
विटकर घासल्याचा खरखर आवाज’
दहा वर्षांपूर्वी ही कविता ‘जाळभाज’ या शीर्षकाखाली ‘कवितारती’च्या दिवाळी अंकात छापून आली. कविता मिळताच संपादक प्रा. पुरुषोत्तम पाटील यांचे कौतुकाचं पत्रही आलं. इतरही अनेक प्रतिक्रिया आल्या. हे सर्व इंजिनीअरसाहेबांच्या प्रश्नामुळं मनात घुमू लागलं.
स्त्रीला मुळातच पापी ठरवण्यात आलं आहे. तिच्या पापामुळे ती रजस्वला (कावळा शिवणे) होते. त्या पातकापासून मुक्त होण्यासाठी स्त्रिया ऋषिपंचमीचा उपवास करतात असा एक संदर्भ आहे. हे मी इंजिनीअरसाहेबांना सांगत होतो. त्या घटनेतील मुलीवर स्त्री म्हणून असणारा दबाव त्यांच्या लक्षात येत होता. अपेक्षेप्रमाणे साहेबांनी यासंदर्भात पुस्तकाचं नाव मला विचारलंच. स्त्रीला अपमानित करणारी मूळ गोष्ट म्हणून अरुणा देशपांडेंच्या ‘एका शापाची जन्मकथा’ या पुस्तकाचं नाव मी त्यांना सांगितलं. साहेबांनी ते पुस्तक मिळवलं, वाचलं आणि चर्चा सुरू झाल्या. जगातील सर्व संस्कृतींतील ऋतुप्राप्तीबद्दलचे समज-गैरसमज अरुणाबाईंनी परिश्रमपूर्वक त्यात मांडले आहेत. सोबत शास्त्रीय माहिती आहे. खरं तर हा विषय चर्चेसाठी आजही निषिद्ध मानला जातो.
आदिमानवाला रक्ताबद्दल भीती वाटत होती. कारण रक्तस्राव म्हणजे जिवाला धोका हेच समीकरण आदिमानवाला माहीत होतं. त्यामुळे प्राण्याचा, माणसाचा जीव रक्तात असतो, ही कल्पना रूढ झाली. कोणतीही जखम न होता स्त्रीला होणारा रक्तस्राव धोकादायक मानला जाऊ लागला. या रक्तस्रावाबद्दल गूढता आणि भीती निर्माण झाली. या गूढतेपासून इतरांना वाचवण्यासाठी अशा स्त्रियांना वेगळे ठेवण्यात येऊ लागलं. त्यांच्या हालचालींवर आणि आहार-विहारावर बंधने घालण्यात आली. ही समाजशास्त्रीय अभ्यासकांची मांडणी मूळ गैरसमजाला हात घालणारी आहे. स्त्रीच्या माथी लावलेल्या ‘विटाळ’ शब्दाची निर्मिती ‘विष्ठा’ शब्दापासून झालेली आहे. प्राचीन संस्कृतीत स्त्रीसाठी ‘भस्त्रा’ हा शब्द वापरला आहे. ‘भस्त्रा’ म्हणजे केवळ अपत्यांना जन्म देणारी कातडय़ाची पिशवी! प्रजननासाठी पुरुष बीजाचे महत्त्व लक्षात घेऊन पुरुषी वर्चस्व प्रस्थापित झालं. स्त्रियांच्या निसर्गधर्माला निषिद्ध ठरवणाऱ्या शापकथा वाचताना आज करमणूक होते. गंमत म्हणजे या शापकथा ऊर्फ करमणूक कथा सर्वच धर्मात सापडतात. कुणाच्या तरी शापामुळं किंवा पापामुळं स्त्रीला मासिक पाळी येते, असा या सर्व कथांचा मथितार्थ आहे. आजही पुरुषांचा वंशवृक्ष वाढवण्यासाठी शापित स्त्रिया बाळंत होतात. बिचारी छोटी मुलगी ‘चिऊ, चिऊ ये, काऊ काऊ ये, दाणा खा, पाणी पी, भुर्र्र उडून जाऽऽ’ असे पिटुकले हात हलवत आवतन देते. पुढं हाच कावळा त्या मुलीला शिवतो. मुलीचा जाळभाज सुरू होतो. ती कोणावरच विश्वास ठेवू शकत नाही. नाइलाजाने भीती, संकोच, घुसमट सोबत वागवावी लागते. तिला शिवलेला कावळा दृश्यरूपात क्षणोक्षणी जाणवत राहता. पण आपल्या जगण्याला शिवलेला अज्ञानाचा, रूढी-परंपरांचा आणि पुरुषी वर्चस्वाचा कावळा मात्र कोणालाच दिसत नाही.   

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Be careful here is male dominance