scorecardresearch

विमनस्क प्राध्यापकाची कहाणी

मॅगसेसे पुरस्कारविजेते  डॉ. भरत वटवानी लिखित मेनका प्रकाशनाचे ‘बेदखल’ हे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले

(संग्रहित छायाचित्र)
(संग्रहित छायाचित्र)

मॅगसेसे पुरस्कारविजेते  डॉ. भरत वटवानी लिखित मेनका प्रकाशनाचे ‘बेदखल’ हे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले. रस्त्यावरच्या भटक्या निराधार मनोरुग्णांसाठी ते गेली ३२ वर्षे करीत असलेल्या कामाचा लेखाजोखा म्हणजे हे पुस्तक होय. त्यातील एक प्रकरण..

मुंबईतल्या प्रख्यात जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या एका सुवर्णपदक विजेत्या माजी प्राध्यापकाला आम्ही रस्त्यावरून उचलून उपचारासाठी ‘श्रद्धा’मध्ये आणलं, तो ‘श्रद्धा’च्या वाटचालीतला पुढचा महत्त्वाचा टप्पा होता. या प्राध्यापकाला मानसिक आजारानं ग्रासलं, वेढलं; पण त्या आजाराकडे पूर्ण दुर्लक्ष झालं. परिणामत: हा गृहस्थ शरीरानंसुद्धा पुरता खंगला. हाडाचा सापळा झाला. दक्षिण मुंबईतल्या प्रसिद्ध ‘जहांगीर आर्ट गॅलरी’बाहेरच्या रस्त्यावर तो दीर्घकाळ पडलेला होता. त्याच्याच एका विद्यार्थ्यांनं केव्हातरी त्याला पाहिलं आणि आम्हाला कळवलं. या विद्यार्थ्यांचे वडील त्याआधी काही काळ आमच्या खासगी रुग्णालयामध्ये मानसोपचार घेत होते. एका नामवंत संस्थेतून सुवर्णपदक मिळवून उत्तीर्ण झालेल्या आणि नंतर त्याच संस्थेत काम करणाऱ्या एका प्राध्यापकाची ही अवस्था व्हावी! मानसिक आजार खरोखरीच कुणालाही, केव्हाही पछाडू शकतो, हे सत्य त्या प्रकरणानं पुन्हा एकदा थेटपणे आम्हाला भिडलं.

माझी पत्नी आणि मी जहांगीर आर्ट गॅलरीपाशी गेलो. त्या प्राध्यापकाची मनधरणी केली, त्याला आमच्या मोटारीत बसवलं आणि बोरिवलीच्या आमच्या खासगी रुग्णालयात घेऊन आलो. कृश हा शब्द अपुरा पडावा इतका तो बारीक झाला होता. निव्वळ हाडं आणि कातडं. मागे एकदा दुसऱ्या रुग्णाच्या बाबतीत जे आम्ही केलं होतं, तेच आता पुन्हा करावं लागलं. त्याचे कुणी नातेवाईक नसल्यामुळे त्याला इलेक्ट्रिक शॉक (इसीटी)चे उपचार आम्हाला करावे लागले. अर्थातच पूर्णपणे आमच्या जबाबदारीवर. ‘इसीटी’च्या सुधारित पद्धतीत रुग्णाला भूल द्यावी लागते. आम्ही असला काही धोका पत्करू पाहतो आहोत, हे दिसल्यावर भूलतज्ज्ञ भूल द्यायला तयारच होईना. रुग्णाचं जर काही बरं-वाईट झालं, तर आम्ही सगळी जबाबदारी घेऊ आणि त्याला झळ लागू देणार नाही, असं आश्वस्त केल्यावर तो अखेर तयार झाला. कायद्याच्या दृष्टीनं आमची ती कृती निसरडी असेलही, पण आमचा देवावर पूर्ण विश्वास होता आणि प्राप्त परिस्थितीत ती कृती नैतिकदृष्टय़ा योग्यच होती, याची आम्हाला पूर्ण खात्री होती.

आमच्या संपूर्ण कारकीर्दीतली ती बहुधा सर्वात कठीण ‘केस’ असावी. तो प्राध्यापक बरा व्हायला जवळजवळ पाच-सहा महिने लागले. तो स्वभावत: अतिशय छान होता आणि त्याच्या सहकारी प्राध्यापकांचा, विद्यार्थ्यांचा लाडकाही होता. त्यांच्यापैकी बरेच जण त्याला भेटायला रुग्णालयात येत असत. तो बरा झाल्यावर त्याला नोकरीत परत घेण्यासाठीही आम्ही प्रयत्न करावेत, असं त्यांनी सुचवलं. तशी विनंती करण्यासाठी आम्ही ‘जे. जे.’च्या प्रमुखांना भेटलो. परंतु मानसिक आजारपणाच्या काळात या प्राध्यापकानं त्यांच्या विरोधात अश्लाघ्य भाषेमध्ये जे. जे.च्या भिंतीवर बरंच काही लिहिलं होतं. त्यामुळे ते त्याला पुन्हा नोकरीवर घ्यायला अनुकूल नव्हते. तो प्राध्यापक मानसिक आजारातून आता मुक्त झाला आहे आणि म्हणून त्याच्याकडे सहानुभूतीनं पाहिलं जावं, त्याला माफ करावं, अशी आर्जवं आम्ही केली. त्या प्रमुखांच्या अक्षरश: पायाही पडलो. शेवटी आम्ही हा विषय वरच्या पातळीवर नेला आणि महाराष्ट्र सरकारला औपचारिक साकडं घातलं. शिक्षण खात्याच्या तत्कालीन सचिव कुमुद बन्सल यांना आम्ही भेटलो. सरकारदरबारी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता केली आणि मंत्रालयात किती तरी खेटे मारले, तेव्हा कुठे तब्बल सहा महिन्यांनी त्या प्राध्यापकाला नोकरीत पुन्हा रुजू करून घेतलं गेलं.

मानसिक रोगोपचारांच्या क्षेत्रात आमची संस्था ज्या प्रकारचं काम करत होती, त्याबद्दल या प्रकरणामुळे समाजात बरीच जागृती निर्माण झाली. आस्था तयार झाली. मोठं चित्र-प्रदर्शन आयोजित करून संस्थेसाठी निधी उभारावा, असं कुणी तरी सुचवलं. या सूचनेनं सुरुवातीला आम्ही गांगरलोच. कलेच्या किंवा चित्रांच्या दुनियेतलं आम्हा कुणालाही यित्कचितसुद्धा समजत नव्हतं. जहांगीर आर्ट गॅलरी तर सोडाच, इतरही कोणत्याही आर्ट गॅलरीत आम्ही कधी पाऊलही ठेवलं नव्हतं. पण आमच्याकडे बऱ्या झालेल्या त्या प्राध्यापकाच्या सहकार्याने त्यांची सर्व प्रतिष्ठा पणाला लावत आम्ही याची सगळी जबाबदारी स्वत:कडे घेतली. मुख्य म्हणजे प्रदर्शन लावण्यासाठी जहांगीर आर्ट गॅलरीच्या तारखा त्यांनी प्रयत्नपूर्वक मिळवल्या. दिल्लीस्थित ज्येष्ठ चित्रकार मनू पारेख यांना या रोगमुक्त प्राध्यापकाबद्दल विशेष आस्था होती. त्यांच्या स्वत:च्या प्रदर्शनासाठी ते जेव्हा ‘जहांगीर’ला येत, तेव्हा त्याला आवर्जून जेवू घालत, असं कुणीतरी म्हणालं. मी मनू पारेखना लगेच फोन लावला आणि दिल्लीत भेटायला येऊ का, असं विचारलं. त्यांनी होकार देताच त्या प्राध्यापकाला घेऊन मी दिल्लीत त्यांच्याकडे जाऊन थडकलो. आमच्या भेटीचा हेतू कळल्यावर मनू पारेख विलक्षण प्रभावित झाले. या खटाटोपामागची माझी एकूण कळकळ त्यांना भावली आणि त्यामुळे त्यांनी त्यांचं स्वत:चं एक उत्कृष्ट ‘पेंटिंग’ तर प्रदर्शनासाठी देऊ केलंच, पण त्यांच्या परिचयाच्या दिल्लीतल्या आणखी काही मोठय़ा चित्रकारांना त्वरित फोन करून आम्हाला त्यांची वेळ मिळवून दिली. आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या अंजली इला मेनन आणि कृष्णा खन्ना यांच्यासह दिल्लीतल्या आणखी काही चित्रकारांना आम्ही जाऊन भेटलो, तेव्हा त्यांनी भरपूर वेळ देऊन अतिशय आस्थेनं आमचं म्हणणं समजून घेतलं. आमच्या प्रयत्नांमुळे त्यांची भावनिक तार छेडली होतीच, पण मानसिक रोगातून मुक्त झालेला ‘जे. जे.’चा तो सुवर्णपदक विजेता प्राध्यापक स्वत: माझ्यासोबत आला होता, हेही त्यांच्या पाठिंब्याचं एक मोठं कारण असावं.

दिल्लीतल्या प्रतिसादानं माझा उत्साह दुणावला आणि त्यामुळे मी तिथूनच कोलकात्याला जाण्याचा निर्णय ऐन वेळी घेतला. मनू पारेख यांनी त्यासाठी आवश्यक ती सगळी माहिती मला फोनवर दिली होती. एका अर्थानं त्यांनी ‘श्रद्धा रिहॅबिलिटेशन फाऊंडेशन’चं आणि या प्रदर्शनाचं याबाबतीत पालकत्वच स्वीकारलं होतं. कोलकात्यातल्या बडय़ा चित्रकारांच्या भेटीगाठी आटोपल्यानंतर तो प्राध्यापक आणि मी शांतिनिकेतन, चेन्नई, हैदराबाद, बंगळुरू आणि आणखी कितीतरी शहरांत गेलो, तिथल्या चित्रकारांना, शिल्पकारांना भेटलो. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी ज्याचं स्वप्न पाहिलं आणि प्रत्यक्षात आणलं, त्या ‘शांतिनिकेतना’त जाणं, तिथल्या ज्या झाडाच्या सावलीत त्यांनी शिक्षणाची अभिनव कल्पना रुजवली, त्याच झाडाखाली आपण स्वत:ही काही क्षण व्यतीत करणं, हा अनुभव देहभान हरपून टाकणारा होता. प्रदर्शन यशस्वी करण्याच्या निश्चयानं आम्ही इतके झपाटलो होतो की, भारतभरातल्या शेकडो चित्रकार-शिल्पकारांना भेटल्यानंतरच आम्ही मुंबईत परतलो. या काळात मी माझं घरदार मागे ठेवलं आणि प्राध्यापकानं त्याच्या नोकरीतनं रजा घेतली. आम्ही दोघं देशभरातली शहरं पालथी घालत होतो, त्या संपूर्ण काळात या महत्त्वाकांक्षी उपक्रमाच्या मुंबईतल्या पूर्वतयारीचं सूत्रसंचालन स्मिता आणि सुप्रिया सिन्हा या पार पाडत होत्या. सुप्रिया ही तेव्हाच्या ‘श्रद्धा’मधली एकमेव कार्यकर्ती होती. पुढे ती आमच्या विस्तारित कुटुंबाचाच एक घटक बनली.

आमच्या प्रयत्नांना फळ आलं. देशातल्या एकशेचाळीसहून अधिक कलावंतांनी त्यांची चित्रं आणि शिल्पं मोठय़ा प्रेमानं या प्रदर्शनासाठी दिली. त्यामध्ये बिकाश भट्टाचार्जी, टी. वैकुंठम, परितोष सेन, ललिता लाजमी यांसारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या किती तरी जणांचा समावेश होता. ज्या ‘जहांगीर आर्ट गॅलरी’बाहेरच्या रस्त्यावर सापळ्यासारखा मानसिक रुग्ण प्राध्यापक वर्षांनुवर्ष पडलेला होता, त्याच ‘जहांगीर’मध्ये हे प्रदर्शन भरलं. त्याला उदंड प्रतिसाद मिळाला आणि त्यातून प्रसिद्धी आणि पसा मोठय़ा प्रमाणात उभा राहिला. एव्हाना त्या प्राध्यापकाच्या मानसिक आजारपणाची आणि आजारमुक्तीची हकीगत कलाक्षेत्रात सर्वदूर माहीत झाली होती. त्यामुळे भारतातल्या आणि परदेशातल्या भारतीय कलावंतांनी सढळपणे मदत केली. एस. एच. रझा, बुडिकिन्स चावला, कृष्णा रेड्डी आदींनी प्रदर्शनासाठी त्यांच्या कलाकृती तर पाठवल्याच, पण आर्थिक साहाय्यसुद्धा केलं. उत्तुंग सामाजिक स्थान असूनही हे सगळेच कलाकार उपक्रमामागची भूमिका लक्षात घेऊन व्यक्तिगत स्तरावरसुद्धा अतिशय साधेपणानं वागले. उपक्रमाला त्यांनी खरोखरीच अगदी मनापासून सुयश चिंतलं.

हे कलाप्रदर्शन कल्पनेपलीकडे यशस्वी ठरलं. मुंबई महानगरपालिकेचे तत्कालीन उपायुक्त जी. आर. खैरनार, हिंदी चित्रपट अभिनेते जॅकी श्रॉफ आणि ‘आरपीजी’ उद्योग समूहाचे प्रमुख हर्ष गोयंका या तिघांनीही प्रदर्शनाला भेट देऊन भरभरून कौतुक केलं. प्रदर्शनातून उभ्या राहिलेल्या पशांमधून भटक्या मनोरुग्णांसाठीचं स्वतंत्र केंद्र उभं करण्याच्या विचारालाही चालना मिळाली.

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-02-2020 at 04:12 IST

संबंधित बातम्या