विलास गिते
‘‘अच्छा, म्हणजे हे आहे हायकोर्ट!’ मी मनाशी म्हणालो. इथे मला नोकरी मिळाली होती. साहेब बॅरिस्टरचा स्टेनो टायपिस्ट म्हणून. त्याआधी मी वेगवेगळ्या कामांमध्ये नशीब अजमावून पाहिलं होतं. कधी फेरीवाला म्हणून, तर कधी टाइपरायटर क्लिनर म्हणून.’’
‘‘साहेब म्हणजे इंग्रज. त्यांचे नाव नोएल फ्रेडरिक बारवेल. विभूतीबाबूंचा हात धरूनच मी इथे आलो होतो. विभूतीबाबू हायकोर्टात टायपिस्ट म्हणून नोकरी करीत. त्यांना पगार होता मासिक पाच रुपये. त्या काळचे पाच रुपये! एकदा बारवेल साहेब त्यांना म्हणाले, ‘‘माझे थोडे टायपिंगचे काम आहे. करून देता का? टाइपरायटर माझ्या ऑफिसमध्येच आहे.’’
यावर विभूतीबाबूंनी त्यांचे काम करून दिले. ते टाइप करीत असताना साहेब म्हणाले, ‘‘यंग मॅन, संत्रे खाणार का?’’ विभूतीबाबूंना नवल वाटले की, एक इंग्रज माणूस आपल्याला त्याच्याकडील संत्र्यामधले अर्धे संत्रे देऊ करीत आहे!
बारवेल साहेब कनवाळू होते आणि माणुसकी जपणारे होते. टायपिंगचे काम झाल्यावर साहेबांनी त्यांना पाच रुपयांची नोट दिली. विभूतीबाबू म्हणाले, ‘‘माझ्याकडे सुट्टे पैसे नाहीत!’’ यावर बारवेल साहेब म्हणाले, ‘‘अहो, हे पूर्ण पाच रुपये मी तुम्हाला दिले आहेत!’’ यावर विभूतीबाबूंना नवल वाटलं. एरवी महिन्याला पाच रुपये मिळवणारे विभूतीबाबू; आणि इथे दीड तासाच्या कामासाठी त्यांना पाच रुपये मिळाले होते!’’
…ही आहे ‘कत अजानारे’ या पुस्तकाची सुरुवात
विभूतीबाबू हे शंकर यांच्या परिचयाचे ज्येष्ठ गृहस्थ आणि त्यांचे हितचिंतक. ते त्यांना बारवेल साहेबांकडे घेऊन आले होते. बारवेल साहेबांकडे शंकर हे स्टेनो-टायपिस्ट म्हणून नोकरी करू लागले. तिथे अनेक प्रकारचे लोक, अनेक प्रकारचे अशील येत. ते लोक आपापल्या कहाण्या सांगत आणि शंकर यांना ऑफिसचे काम म्हणून त्या कहाण्या शॉर्टहँडमध्ये लिहून घ्याव्या लागत.
असे करता करता शंकर यांनी अनेक जणांच्या अनेक कहाण्या ऐकल्या. याच कहाण्यांवर आधारित असे त्यांनी आपले पहिले पुस्तक लिहिले. त्या पुस्तकाचे नाव होते ‘कत अजानारे’ (उच्चार ‘कोतो अजानारे’). ही मूळ रवींद्रनाथ टागोरांच्या गीतांजलीमधील एका गीताची ओळ आहे. ‘कत अजानारे जानाईले तुमि.’. ‘माझ्याशी अपरिचित असलेल्या कितीतरी लोकांना तू माझा परिचय करून दिलास’ असा त्या ओळीचा अर्थ.
बारवेल साहेबांच्या ऑफिसमधील अनुभवांवर आणि तिथे भेटलेल्या लोकांवर शंकर यांनी आपले पहिले पुस्तक लिहिले. ते ‘देश’ या साप्ताहिकात १९५५ क्रमश: प्रकाशित झाले आणि नंतर पुस्तकरूपाने प्रकाशित झाले. पहिल्याच पुस्तकापासून शंकर यांना नाव मिळाले.
शंकर हे त्यांचे टोपण नाव होते. मूळ नाव मणिशंकर मुखोपाध्याय. ‘पथेर पांचाली’चे लेखक विभूतीभूषण बंद्योपाध्याय आणि शंकर हे एकाच गावचे. (पहिल्या परिच्छेदात उल्लेख केलेले विभूतीबाबू वेगळे). ‘पथेर पांचाली’कार विभूतीबाबूंचा जन्म वनगावमधला. तत्कालीन अखंड भारतामधल्या पूर्व बंगाल मधला.
तेथेच शंकर यांचाही जन्म १९३३ मध्ये झाला. शंकर यांचे वडील हे गिरीश घोष यांच्यासाठी नाटके लिहीत; परंतु नाटके लिहिण्यात फारसा अर्थलाभ नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी वकिली सुरू केली. बनगावचे कार्यक्षेत्र नंतर कोलकात्याला गेल्यावर शंकर यांचे वडील हरिपद हे आपल्या कुटुंबासहित कोलकात्याला आले आणि हावड्याला राहू लागले.
वडील नाटककार आणि आईला वाचनाची आवड. आईला खरे तर आधी वाचताच येत नव्हते, पण ती स्वत:च्या प्रयत्नांनी वाचायला शिकली आणि वाचनालयातून पुस्तके आणून तिने वाचन करायला सुरुवात केली. यामुळे शंकर यांनाही साहित्याची आवड घरातूनच मिळाली. शंकर अगदी चौदा वर्षे वयाचे असताना त्यांचे पितृछत्र हरपले. शंकर यांची आई त्यांना शांतपणे म्हणाली, ‘‘शंकर, आता तुला हातपाय हलवावे लागतील.
काहीतरी काम कर बाबा! पण कुठलंही काम केलंस तरी ते सर्वोत्तम असलं पाहिजे.’’ त्यामुळे जगण्यासाठी शंकर यांना सुरुवातीला बराच संघर्ष करावा लागला. त्यांनीच आपल्या आठवणीत म्हटले आहे त्याप्रमाणे ‘‘सुरुवातीला मी फेरीवाला म्हणजे आजच्या भाषेत सेल्समन होतो. विकायचो काय, तर कपडे धुण्याचे साबण. तेही फूटपाथवर उभे राहून. त्यातही आपण सर्वोत्तम विक्रेता व्हावे असे मला वाटे. कारण आईचा उपदेश होता की तू जे काही करशील त्यात तू सर्वोत्कृष्ट हो! तेव्हा मला वाटे की, फूटपाथवर दोन साबणविक्रेते असले तरी लोकांनी माझ्याकडूनच साबण विकत घेतले पाहिजेत.
नंतर मला टेम्पररी प्यूनची नोकरी लागली. तिथेही मी मनापासून काम करीत असे. अगदी साहेबांना पाणी पाहिजे असेल तरी तो ग्लास प्रत्येक वेळी धुवून पुसून घेत असे. ग्लासवर डाग तर नाहीत ना हे पाहत असे, कारण आई म्हणत असे, ‘‘तू प्यून झालास तरी असा प्यून हो, की जगात तुझ्यासारखा चांगला प्यून नाही असे लोकांनी म्हटले पाहिजे.’’ काही काळ शंकर यांनी खासगी शिकवण्या घेतल्या व एका शाळेत शिक्षक म्हणूनही काम केले.
अखेर विभूतीबाबूंच्या ओळखीने शंकर यांना नोएल फ्रेडरिक बारवेल यांच्याकडे स्टेनो टायपिस्ट म्हणून नोकरी लागली. दरम्यान शंकर यांनी महाविद्यालयात शिकून बी. ए.ची पदवी मिळवली. ऑफिसमध्ये असताना बारवेल साहेब इंग्रजीत म्हणत, ‘‘शंकर, बोल माझ्याशी!’’ शंकर म्हणतात, ‘‘मला इंग्लिश नीट येत नसे, त्यामुळे मी साहेबांशी फारसा बोलत नसे. माझ्यापेक्षा साहेबांचा प्यून शंभर टक्के अधिक चांगली इंग्लिश बोलत असे. हळूहळू माझी भीड चेपली आणि मी इंग्लिशमध्ये साहेबांशी बोलू लागलो. हळूहळू इंग्लिश बोलण्यात पारंगत झालो.’’
‘कतो अजानारे’ या पुस्तकापासून ज्या पुस्तकत्रयीची सुरुवात झाली त्या त्रयीतील पुढचे दोन भाग म्हणजे ‘चौरंगी’ आणि ‘घरेर मध्ये घर’. ‘चौरंगी’ ही कादंबरी एक हॉटेल आणि तेथील कर्मचारी व ग्राहक यांच्यावर आधारलेली आहे. कलकत्त्याच्या ‘स्पेन्सर्स’ हॉटेलवरून आपल्याला ही कादंबरी सुचली असे शंकर यांनी म्हटले आहे. बारवेल साहेबांच्या काही कामांसाठी त्यांना या हॉटेलमध्ये जावे लागे. तेथील निरीक्षणांवर ही कादंबरी आधारलेली आहे. ‘चौरंगी’ ही कादंबरी १९६२ मध्ये प्रकाशित झाली. व त्यानंतर ‘घरेर मध्ये घर’.
शंकर यांच्या लेखनात वारंवार तो काळ आणि त्या काळातील निरीक्षणे येतात व बंगाली लोकांवरील संकटांचे चित्रण येते. १९७६ मध्ये शंकर यांची आणखी एक कादंबरी ‘स्वर्ग मर्त्य पाताल’ प्रकाशित झाली. तिची सुरुवात १९७० च्या दशकाच्या सुरुवातीला होते. चांगले शिक्षण घेतलेले अनेक तरुण केवळ नोकरी नसल्याने घरात बसून असत आणि नोकरीसाठी अर्जामागून अर्ज करीत असत त्या तरुणांच्या नजरेतून त्यांची सुख दु:खे, मान-अपमानाच्या गोष्टी शंकर यांनी या कादंबर्यांमध्ये लिहिल्या आहेत. या कादंबर्यांपैकी ‘जन अरण्य’ आणि ‘सीमाबद्ध’ या कादंबर्यांवर सत्यजित राय यांनी चित्रपट दिग्दर्शित केले.
शंकर हे बुद्धिप्रामाण्याला आणि विज्ञानाला खूप महत्त्व देत. आपल्या देशातील नागरिकांना विज्ञानाबद्दल कुतूहल आणि प्रेम वाटले पाहिजे आणि वैज्ञानिकांनीही आपला देश जाणून घेतला पाहिजे असे त्यांना वाटे. १९६८मध्ये शंकर यांची ‘निवेदिता रिसर्च लॅबोरेटरी’ ही कादंबरी प्रकाशित झाली. ही कादंबरी लिहिताना तिच्यामध्ये वापरण्यासाठी शंकर यांनी दोनशे विविध कीटकांची बंगालीतील नावे संग्रहित केली. या कादंबरीत त्यांनी एका विज्ञानसाधकाची कथा लिहिली आहे.
‘आशा आकांक्षा’ या कादंबरीत त्यांनी एका तरुणाची कथा लिहिली आहे. कठोर परिश्रमांनी त्याने खत उत्पादन प्रक्रियेत यश मिळवलेले असते. ‘सुवर्णसुयोग’ या कादंबरीत ग्रामीण भागामधील असंख्य शेतकर्यांना उपयोगी पडेल अशा पंपाच्या शोधाची तो कल्पना करतो. बंगाली लोक हे प्रामुख्याने नोकरीपेशा लोक असतात. त्यांच्या कार्यालयांमध्येही व्यक्तीच्या कामावरून उच्च – नीच असे भेदभाव तयार झाले आहेत.
कोण ऑफिसर, कोण कारकून, कोण शिपाई यावरून माणसाचा दर्जा ठरवण्याची पद्धत तयार झालेली आहे. कार्यालयांमध्ये माणसांना उच्चनीच विभागांमध्ये विभागण्याचे चित्रण शंकर यांनी आपल्या अनेक कादंबर्यांमध्ये करून बंगाल्यांच्या दांभिकपणाचे दर्शन घडवले आहे.
शंकर स्वत: आर्थिक अडचणीतून गेले असल्यामुळे ते पैशांचे महत्त्व नेहमी सांगत. ते म्हणत, ‘मनी इज द पेट्रोल’. गाडी कितीही चांगली असली तरी पेट्रोल नसेल तर तिला काहीही अर्थ नाही. पॉवर कम्स फ्रॉम मनीबॅग. या अर्थाजनासाठी बंगाल्यांनी नोकरीबरोबरच स्वतंत्र व्यवसाय करण्याचाही विचार करायला हवा, कारण बिजनेस मेक्स मॅन बिग. साहित्यामध्ये त्यांनीच प्रथम कॉर्पोरेट संस्थांच्या आतील गोष्टींबद्दल लिहायला सुरुवात केली. ते स्वत: मोठ्या संस्थांमध्ये एच. आर. ओ. म्हणून काम करीत.
स्वातंत्र्योत्तर काळात बंगाली जीवनात मनुष्याची अवहेलना होताना त्यांनी पाहिली म्हणूनच नंतर ते रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद यांच्या अभ्यासाकडे वळले. त्या विषयावरही त्यांनी सहा पुस्तके लिहिली. त्यांचे जसे बंगाली भाषेवर व लोकांवर प्रेम होते, तसेच बंगाली लोकांचेही त्यांच्यावर प्रेम होते. एकेकाळी तर कुठल्याही बंगाली लग्नामध्ये आहेर म्हणून शंकर यांच्या एकाच कादंबरीच्या चार चार प्रती भेट यायच्या! शंकर यांना २०२१ मध्ये त्यांच्या ‘एका एका एकाशी’ या आत्मचरित्रात्मक पुस्तकाबद्दल साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता.
शंकर आणि पुणे
शंकर हे दोन वेळा पुण्याला येऊन गेले होते. १९९४ मध्ये पुण्यातील बंगाली असोसिएशनने मॉडर्न महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित केलेल्या दुर्गापूजा महोत्सवाचे उद्घाटन करण्यासाठी शंकर हे कोलकात्याहून पुण्याला आले होते. त्याआधीही १९६३ मध्ये ते पुण्याला आले होते. तेव्हा शरदिंदू मुखोपाध्याय पुण्यात विजयानगर कॉलनीत ना. सी. फडके यांच्या दौलत बंगल्याशेजारी राहत होते. त्यांच्या त्या घरात शंकर उतरले होते. १९९४ मध्ये ते घर शोधत विजयानगर कॉलनीत ते फिरले होते. तिथे रस्त्यात त्यांना एक तरुणी भेटली.
तिला पत्ता विचारला तेव्हा तिने शंकर यांना त्यांचे नाव विचारले. ‘‘मी मणि शंकर मुखर्जी,’’असे सांगताच तिचे डोळे चमकले आणि ती म्हणाली, ‘‘म्हणजे प्रसिद्ध बंगाली लेखक शंकर तुम्हीच ना?’’ यावर शंकर यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. त्या तरुणीने शंकर यांना जवळच असलेल्या आपल्या घरी नेले आणि तिच्या संग्रहातील शंकर यांची पुस्तके त्यांना दाखवली. दौलत बंगला पाडून आता तिथे मोठी इमारत उभी राहिल्याचे तिने सांगितले. शरदिंदुबाबू राहत ते घरही आता तिथे नाही, पण तिथले ओळखीचे झाड मात्र त्यांना दिसले. तेव्हा त्यांचे मन हरखून गेले होते.
‘पुन्हा पुण्यात कधी येणे होईल हे सांगता येत नाही, पण पुढच्या भेटीत पुण्याची आणि मराठी संस्कृतीची अधिक जवळून ओळख करून घेण्याची इच्छा आहे,’ असे ते म्हणाले होते.
u vilasgitay@gmail.com
