पराग कुलकर्णी

जंगलात हरणांचा कळप एका मोकळ्या जागेत गवत खात असताना, जवळच एक चित्ता असल्याची जाणीव त्यांना झाली तर ते काय करतील? वेळ वाया न घालवता लगोलग तिथून पळतील किंवा एक डोळा गवतावर आणि एक डोळा चित्त्यावर ठेवून कधीही पळण्याच्या तयारीत असतील. पण अशा परिस्थितीत अजून एक विचित्र गोष्ट काही हरीण करतात- जागेवरच उंच उडय़ा मारणे (स्टोटिंग). खरं तर हरीण अशा उंच उडय़ा मारून चित्त्याचं लक्ष विनाकारण आपल्याकडे वेधून घेत नाही का? तसेच आहे ती शक्ती, ऊर्जा पुढे चित्याकडून होणाऱ्या पाठलागासाठी जपून वापरायची सोडून ते अशा उडय़ा मारण्यात वाया का घालवतात? पण याच्या पुढे जे होते ते अजून संभ्रमात टाकणारे आहे- चित्ता जेव्हा या कळपावर हल्ला करतो तेव्हा तो या उडय़ा मारणाऱ्या (थकलेल्या?) हरणांच्या मागे न जाता दुसऱ्या हरणांना लक्ष्य करतो! हा काय प्रकार आहे? हरणांच्या आणि चित्त्याच्याही वागण्याचा अर्थ काय? या प्रश्नांचे उत्तर आहे आपल्या आजच्या संकल्पनेत- सिग्निलग थिअरी.

British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…

सिग्नल म्हणजे इशारा करणे, संदेश पाठवणे, एखादी माहिती दुसऱ्याला कळवण्याचा प्रयत्न करणे. प्रत्येक सजीव काही माहिती इतर सजीवांना कळवत असतो. पण ही माहिती केवळ आवाज किंवा भाषा यांद्वारेच पाठवली जाते असे नाही, तर अनेक जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणी केलेल्या कृतीमधूनसुद्धा ती व्यक्त होत असते. आपल्या भावना, क्षमता, स्वभाव अशा अनेक गोष्टींची माहिती आपल्या विशिष्ट कृतींमधून जाहीर करता येते- यालाच सिग्नल किंवा संदेश म्हणता येईल. अशा या संदेशांचा अभ्यास करणारी आणि केवळ जीवशास्त्रीयच नाही तर अर्थशास्त्रीय आणि सामाजिक व्यवस्थेतही या संदेशाची भूमिका आणि परिणाम तपासून पाहणारी संकल्पना म्हणजे सिग्निलग थिअरी. मायकल स्पेन्स यांनी सत्तरच्या दशकात सिग्निलग थिअरी मांडली ती मुख्यत्वे सामाजिक आणि आर्थिक व्यवस्था आणि त्यातील व्यवहारांबद्दल. त्यासाठी त्यांनी उदाहरण म्हणून शिक्षण आणि नोकरी (खरं तर पगार) यांच्या संबंधावर भाष्य केले. स्पेन्स यांच्या मते, कॉलेज डिग्री ही एक चांगली नोकरी मिळावी यासाठी विद्यार्थ्यांकडून (भावी कर्मचारी) दिलेला केवळ एक सिग्नल असतो. नोकरी देणाऱ्यांच्या दृष्टीने एखाद्या माणसातले गुण नोकरी देण्याच्या आधी पूर्णपणे जोखता येतीलच याची खात्री नसते. अशा वेळेस पुढचा माणूस किती शिकला आहे, कुठे शिकला आहे यावरून ते या गुणांचा अंदाज बांधतात. यामुळे नोकरीशी थेटपणे संबंध नसलेल्या विषयात डिग्री मिळवणारा माणूसही काहीच डिग्री नसलेल्या माणसापेक्षा जास्त योग्यतेचा ठरतो. यात ‘शिक्षणासाठी शिक्षण’ का ‘नोकरीसाठी शिक्षण’ हा आदर्शवाद वि. व्यावहारिकतेच्या वादाचा मुद्दा जरी बाजूला ठेवला, तरी आपल्या कृती कशा प्रकारे सिग्नल देण्याचे काम करतात हे यातून लक्षात येते.

याचप्रकारे वर दिलेल्या उदाहरणात उडय़ा मारणारे हरीण हे आपण तरुण, चपळ आणि वेगवान असल्याचे आणि आपला पाठलाग करणे हे कष्टाचे तसेच निष्फळ ठरू शकणारे काम असू शकते, हे त्यांच्या उडय़ातून (सिग्नल) सांगतात आणि ते समजूनच चित्ताही आपले लक्ष इतर हरणांकडे वळवतो. आपल्या आजूबाजूच्या जगात अशी अनेक सिग्नल्स आपल्याला बघता येतात. पण मुळातच अशा सिग्नलची गरज का भासते, याचे उत्तर सोपे आहे- प्रत्येकाकडे सारखी माहिती नसणे (ज्याला Information Asymmetry असे म्हणतात). दुसऱ्या कोणाबद्दलची माहिती जसे की- त्यांच्या भावना, क्षमता, आनुवांशिक गुण-अवगुण आणि इतर अनेक गोष्टी आपण थेटपणे जाणून घेऊ शकत नाही. अशा वेळेस काही सिग्नलवरून आपण या लपलेल्या माहितीचा अंदाज लावू शकतो. तसेच आपल्या फायद्यासाठी आपल्याकडे असलेली माहिती दुसऱ्यापर्यंत पोहोचवायची असते तेव्हाही अशा सिग्नल्सचा उपयोग केला जातो. बऱ्याच व्यवहारात जर अशी माहिती पुरवली गेली नाही, तर त्याचा परिणाम- तो व्यवहार आणि त्या व्यवस्थेवर होतो. समजा जर एखाद्या कंपनीच्या नवीन उत्पादनाचा दर्जा चांगला आहे ही माहिती ग्राहकापर्यंत पोहोचलीच नाही तर त्यांचे उत्पादन विकले न जाऊन ती कंपनी बंद पडू शकते. अशा वेळेस उत्पादनाची ५-१० वर्ष वॉरंटी जाहीर केली (सिग्नल) तर त्याने ग्राहकांचा त्या उत्पादनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. थोडक्यात काय, तर काही सिग्नल्समुळे तो देणाऱ्याचा आणि घेणाऱ्याचा- या दोघांमधला व्यवहाराचा आणि पर्यायाने ते व्यवहार चालवणाऱ्या व्यवस्थेचा फायदाच होतो. सिग्निलग थिअरी अशा अनेक आर्थिक, सामाजिक व्यवस्थांचा आणि त्यातील सिग्नल्सचा अभ्यास करून त्या व्यवस्था अधिक स्थिर (stable) आणि कार्यक्षम कशा होतील याचा विचार करते. या अभ्यासाच्या मुळाशी असलेला एक खूप महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कोणते सिग्नल विश्वसनीय असतात आणि ते ओळखायचे कसे? सिग्निलग थिअरीनुसार खरे, विश्वसनीय सिग्नल देण्यातून ते सिग्नल देणाऱ्याचा फायदा होतो; तर चुकीचे, फसवणारे सिग्नल दिल्यास त्याची खूप मोठी किंमत ते देणाऱ्याला चुकवावी लागते. इथे किंमत म्हणजे तो सिग्नल देण्यासाठी लागणारी थेट किंमत असू शकते. किंवा खोटय़ा सिग्नलमुळे मिळालेली शिक्षा, इतरांचा गमावलेला विश्वास अशा स्वरूपात असू शकते. सिग्निलग थिअरीनुसार, महागडे सिग्नल्स (कॉस्टली सिग्नल)- जे देण्यासाठी वेळ, पैसे, कष्ट किंवा इतर कोणत्याही साधनसंपत्तीची (रिसोर्सेस) गुंतवणूक लागते- ते शक्यतो विश्वसनीय असतात. हरणांच्या उडय़ा हे असंच एक महागडं सिग्नल आहे, ज्यात ते आपला वेळ आणि शक्ती खर्च करतात. अर्थात ते अशी शक्ती आणि वेळ वाया घालवू शकतात म्हणजे खरंच त्यांच्यात जास्त शक्ती, चपळता आहे असा अर्थ त्यातून निघतो. गरज नसलेल्या गोष्टींवर सहजपणे, खूप जास्त पैसे खर्च करणे हा असाच श्रीमंत असल्याचा महागडा सिग्नल. असे सिग्नल त्यांच्या किमतीमुळे कोणालाही सहजासहजी खोटेपणाने देता येत नाहीत, त्यामुळेच ते बहुतांश वेळेला विश्वसनीय ठरतात.

इतर अनेक संकल्पनांप्रमाणेच सिग्निलग थिअरी आपल्याला आजूबाजूचा जग बघण्यासाठी अजून एक नवीन दृष्टी देते. उपयोग नसलेले पण सुंदर असे मोराच्या पंखांसारखे निसर्गातले चमत्कार ते स्वत:ला त्रास होऊनही दुसऱ्याला मदत करू पाहणारे मानवी व्यवहार अशा अनेक गोष्टींमागच्या प्रेरणा समजून घेण्यासाठी आपल्याला सिग्निलग थिअरीची (विशेषत: कॉस्टली सिग्नलची) मदत होऊ शकते. माणसाने शोधलेल्या शब्दभाषेच्याही पुढे जात एका वैश्विक भाषेत संवाद होऊ शकतो आणि आपल्या आजूबाजूला तो सतत होत आहे, ही जाणीव सिग्निलग थिअरीमुळे होते. आणि एकदा का असे सिग्नल आपल्याला दिसायला आणि समजायला लागले की, आपल्या जगातले शब्दांच्या पलीकडले अर्थही आपल्याला कदाचित उमजू लागतील. नाही का?