scorecardresearch

अवध्य सत्य!

आपली काही चूक झाली नाही याबद्दलचा पुरावा या संभाषणांतून मला मिळत गेलेला आहे.

bharat sasane share experience after speech in marathi sahitya sammelan
भारत सासणे

भारत सासणे

विचार करणारा लेखक सामान्य जीवांकडे बघतो आणि आंदोलित होतो, चिंतिस्त होतो, म्हणून तो सांगतो, बोलतो, चिकित्सा करतो, आपले विचार मांडतो. ‘आमच्या विरुद्ध, आमच्या धोरणाविरुद्ध काहीही बोललेलं आम्हाला चालणार नाही,’ असं मानणाऱ्या आणि म्हणणाऱ्या संघटित प्रतिगामी शक्तींचा विरोध येथून पुढे वाढत राहील आणि संमेलनाच्या अध्यक्षांची वारंवार परीक्षा होईल, असे संकेत मिळायला लागले आहेत. अशा परिस्थितीत गांधी या ‘अवध्य’ माणसाकडे समाजाला, रसिकाला, लेखकाला आणि सगळय़ांनाच पुन्हा पुन्हा यावं लागणार आहे..  ३, ४ आणि ५ फेब्रुवारीला होणाऱ्या साहित्य संमेलनानिमित्त मावळते अध्यक्ष भारत सासणे यांनी गेल्या वर्षी आपल्या भाषणातून मांडलेल्या प्रखर भूमिकेनंतर आलेल्या अनुभवांची ही बेरीज..

९५ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा अध्यक्ष या नात्याने ‘त्या मंचा’वरून मी भाषण केल्यानंतर मला काय अनुभव आले? अशा स्वरूपाचे प्रश्न मला विचारण्यात येतात. हे प्रश्न प्रकट मुलाखत इत्यादी प्रसंगी, अन्यत्रच्या बठकांमधून व चच्रेमधून विचारले जातातच, पण सर्वदूर पसरलेला मराठी माणूसदेखील या ना त्या स्वरूपात हा प्रश्न विचारतो आहे.

जिथे जिथे मराठी माणूस पोहोचलेला आहे, तिथे तिथे- महाराष्ट्रातून व महाराष्ट्राच्या बाहेरूनदेखील निमंत्रणं यायला सुरुवात झाली आणि मला कानाकोपऱ्यात पसरलेल्या मराठी माणसाच्या सांस्कृतिक भुकेचं दर्शन व्हायला लागलं. संमेलनाध्यक्ष या नात्यानं तिथं जाणं, त्यांना भेटणं ही माझी जबाबदारी आहे असं मानून मीदेखील त्यांच्यापर्यंत पोहोचत राहिलो. गेल्या दहा-अकरा महिन्यांत मी असंख्य रसिक वाचकांना आणि साहित्यविषयक आस्था बाळगणाऱ्या अनेकांना भेटत राहिलो. माझ्या असं लक्षात आलं की, कित्येक वर्षांत त्यांच्यापर्यंत कोणी ‘सांस्कृतिक प्रतिनिधी’ पोहोचलेला नाही. कोणी त्यांच्याशी संवाद केलेला नाही. त्यांच्या पातळीवर जे छोटे-मोठे वाङ्मयीन उपक्रम घडविले जात असतात, त्या उपक्रमातून ‘सांस्कृतिक दूत’ या नात्यानं संमेलनाध्यक्ष सहभागी झालेले नाहीत. तिथे लेखक आहेत, कवी आहेत. प्रसंगी स्वखर्चानं ती मंडळी पुस्तकं प्रकाशित करतात, भेट देतात. आणि त्याबद्दल मार्गदर्शनासाठी विचारतात. अशांची संख्या प्रचंड आहे. अगदी महाराष्ट्राबाहेरच्या कर्नाटक प्रदेशातल्या मराठी गावांतूनसुद्धा मराठी साहित्य संमेलनं होत असतात. अशा संमेलनांना मी आवर्जून उपस्थित राहिलो आणि त्या सर्वाचं वाङ्मयीन प्रेम, मराठी भाषाविषयक आस्था पाहत राहिलो.

माझा असा समज होता की, सर्वोच्च मंचावरून मी जे काही बोललो त्यावर ‘प्रथेप्रमाणे’ विशेष काही चर्चा होणार नाही. कारण संमेलनाध्यक्षाच्या भाषणावर आपण चर्चाच करत नाही, चिकित्साही करत नाही, विशेष काही बोलत नाही. परंतु माझ्या भाषणावर मोठय़ा चर्चा घडवल्या गेल्या. चिकित्साही झाली. लिहिलंही गेलं. टीकाही झाली. त्याहीपेक्षा महत्त्वाचं असं की, सर्वसामान्यांकडून मला माझ्या भाषणातल्या मुद्द्यांबद्दल ऐकायला मिळालं. उदाहरणार्थ, मी खिद्रापूर नावाच्या ठिकाणी प्राचीन मंदिर बघण्यासाठी गेलो असताना, तिथल्या मुस्लीम गाइडनं आपलं विवेचन सुरू करण्यापूर्वी माझ्या भाषणातला एक उताराच म्हणून दाखवायला सुरुवात केली आणि मी रोमांचित झालो. मला भेटलेल्या सर्वसामान्यांचं म्हणणं असं होतं की, प्राप्तकाली भोवताली जे काही सुरू आहे त्याची लेखक या नात्याने चिकित्सा करून त्या संदर्भात काहीएक भाष्य करण्याची आवश्यकता होतीच. कुणी तरी परखडपणे, निर्भयपणे आणि स्पष्टपणे बोलण्याची आवश्यकता होती. असं बोललं गेल्यामुळे काही अंशी निद्रिस्त समाजाला काहीएक जाग आली आहे आणि भ्रमयुगाबद्दलचं भान आलं आहे. विवेकी महाराष्ट्रानं बहुसंख्येनं या भाषणातल्या विचारांशी सहमती दर्शविली. मी भारलेल्या अवस्थेत आणि काही अंशी चकित होऊन या प्रतिक्रिया पाहात आणि ऐकत राहिलो. आपली काही चूक झाली नाही याबद्दलचा पुरावा या संभाषणांतून मला मिळत गेलेला आहे.

उद्गीर येथे भाषण करण्याचा अनुभव वेगळाच. आधीच्या वक्त्यांनी भरपूर वेळ व्यतीत केल्यानंतर तापलेल्या उन्हात आणि भुकेची वेळ उलटून जात असताना अखेरीस माझ्याकडे ध्वनिक्षेपक देण्यात आला आणि मी भाषणासाठी उभा राहिलो. तत्पूर्वी अनेकांनी अनावश्यक विषयांवर बोलून आणि उपलब्ध वेळ व्यतीत करून काहीएक अस्वस्थतेची लाट निर्माण केली होती. माझ्या बाजूला असलेल्या महामंडळाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी अशी सूचना करायला सुरुवात केली होती की, मी जागच्या जागी संपादन करून भाषण वाचावं, कारण आता वेळ नाही. माझ्याही मनात भीती होतीच. भुकेलेला श्रोता उठून जायला लागला तर गांभीर्य विस्कटून जाईल आणि बोलण्यातली मानसिकता शिल्लक राहणार नाही, अशी शंका येत होती. पण मी उठलो. माईकसमोर गेलो आणि मग मी बोलायला सुरुवात केली. पहिल्या क्षणापासूनच विलक्षण शांतता निर्माण झाली. मी बोलत राहिलो आणि माझा जसजसा आत्मविश्वास वाढत गेला तसतसा भाषणाचा परिणाम जाणवायला लागला. ‘जिवाचा कान करून ऐकणे’ म्हणतात तसा अनुभव मला यायला लागला. माझ्या मनातली भीती कमी व्हायला लागली. सरस्वतीदेवी शेजारी उपस्थित राहून पानं पालटण्यासाठी मदत करते आहे असं मला वाटलं. ती म्हणाली की, ‘तुला जे बोलायचं आहे ते पूर्वसुरींनासुद्धा सांगायचं होतंच, तेव्हा भितोस कशासाठी, जे सांगायचं आहे ते प्रामाणिकपणे सांग.’ मी डोळय़ाच्या कोपऱ्यातून पाहिलं तर माझ्या मागे ‘कविकुळातले सदस्य’ उभे होते. भर्तृहरी होता. गालिब होता. दाग होता. गुणाढय़ होता. दिवंगत मराठी कवी होते. मौलाना रूमी होता. ‘हम देखेंगे’ म्हणणारा उर्दू शायर होता, आर. के. नारायण होता. आर. के. लक्ष्मण होता आणि त्या गर्दीत शेक्सपियरसुद्धा होता. या सगळय़ांची शक्ती, या सगळय़ांचे विचार, या सगळय़ांचं पाठबळ आपल्या मागे आहे आणि तेही सरस्वतीच्या साक्षीने- हे पाहिल्यानंतर मी निर्भय होऊ लागलो आणि चिंतनशील लेखक या नात्याने आत्मविश्वासाने प्राप्त परिस्थितीबद्दल, भ्रमयुगाबद्दल बोलू लागलो. बोलत राहिलो. कोणीही उठला नाही. जेवणाची वेळ टळून गेली. माझं भाषण संपलं तेव्हा मंच उभा राहिला. समोरचे प्रेक्षक उभे राहिले. हे अजब, अद्भुत ‘स्टॅण्डिंग ओव्हेशन’ कोणत्याही कलावंतासाठी, लेखक, विचारवंतासाठी रोमांच निर्माण करणारा, धन्यता प्राप्त करवणारा, साफल्याची साक्ष देणारा क्षण असतो. हा क्षण अविस्मरणीय होता.

नंतर, या भाषणावर चर्चा झाली आणि बऱ्या-वाईट पद्धतीनं हे भाषण गाजत राहिलं. विचारवंत दिग्गजांना, लेखक आणि कवींना, कलावंत आणि रसिकांना हे भाषण आवडलं होतं. त्यांनी या ना त्या मार्गानं त्यांच्या पसंतीची पावती माझ्यापर्यंत पोहोचवत ठेवली. पण संघटित विरोधदेखील झाला. काही मंडळींनी योजनाबद्ध पद्धतीनं माझी निर्भत्सना केली. आपण विभाजित झालो आहोत किंवा निदान विभाजित होऊ लागलो आहोत असं जे मी भाषणातून म्हणालो होतो, त्याचा प्रत्यय यायला लागला. ‘झिरो टॉलरन्स’ पद्धतीनं बघणाऱ्यांची संख्या कमी नाही हेपण लक्षात आलं. मी विचलित झालो असणारच, पण माझ्या आधीपासून लिहीत राहिलेल्या काही ज्येष्ठ लेखकांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला. मला असं सांगितलं की, प्रश्न निर्माण करणाऱ्यांना उत्तरं नको असतात, त्यांना प्रश्नच निर्माण करायचे असतात. तेव्हा कोणालाही उत्तरं द्यायची नाहीत. त्यांना परस्परच उत्तरं दिली जातील. आणि विशेष म्हणजे, त्या सगळय़ांना निर्भत्सना करण्याचं सांगण्यात आलेलं असावं. अशांच्याकडे लक्ष द्यायचं नसतं. तुम्ही तुमचं काम केलं. विचार मांडलेत. आता चिकित्सा इतरांनी करायची. उत्तरं मिळत राहतीलच. तसंच झालं. विवेकाचा कान बाळगणाऱ्या बहुसंख्य महाराष्ट्राने या प्रश्नांची परस्पर उत्तरं दिली आणि आशेला निश्चित जागा आहे असं वाटायला लागलं.

कला विभाजित होऊ शकत नाही, जीवनवाद सगळय़ा प्रश्नांना आपल्या पोटात घेतो हे जरी खरं असलं तरी काही प्रश्न निर्माण होतातच. लेखकानं व्यवस्थेला प्रश्न विचारायचे नाहीत का, हा प्रश्न. मनोरंजन आणि बुद्धिरंजनाच्या पलीकडे जाऊन सर्वसामान्यांच्या वंचनेबाबत चिंता व्यक्त करायची नाही का, हा दुसरा प्रश्न. विवेकवाद्यांनी या प्रश्नांची परस्पर उत्तरं दिली आहेत. त्यांनी असं सांगितलं की, तुम्ही म्हणता तसं लेखकानं सत्य बोलावं. निर्भयतेनं बोलावं आणि तुमच्याच रूपक कथेतल्या कोंबडय़ाप्रमाणे लेखकानं उगवत्या सत्यसूर्याला खणखणीत बांग देऊन सलाम करावा. हा सत्याचा प्रकाश अस्तित्वात असतोच आणि त्या व्यतिरिक्त काहीही अस्तित्वात नसतं. मात्र, ‘अप्रिय सत्य’ बोलणाऱ्या लेखकाला किंमत चुकवावी लागते. ही किंमत निर्भत्सनेची असेल, बास्वरूपाची आणि भौतिक जीवनाशी संबंधित असेल तर फार काही चिंता नको; पण ‘आंतरिक तडजोडी’ कराव्या लागत असतील तर अस्सल लेखकाला ते परवडणारं नसतं. ती किंमत मात्र त्यानं चुकवायची नसते. ‘कविकुळाला बोलु’ लावून घ्यायचा नसतो. मी ‘बोलु’ लावून घेतला नाही.

मी जे सूचन केलं आहे ते सिद्ध करण्याची किंवा असिद्ध करण्याची जबाबदारी ऐकणाऱ्याची असते. जे नाव मी उच्चारलं नाही ते नाव ऐकणाऱ्याच्या मनामध्ये आपोआपच निर्माण होत असेल, तर माझं सूचन ऐकणाऱ्यांनीच सिद्ध केलेलं असतं. संघटित विरोध करणाऱ्यांनी हे सूचन स्वत:च सिद्ध केलं आणि नंतर माझी निर्भत्सना केली असं मला जाणकारांनी सांगितलं आणि मला दिलासा मिळाला.

येऊ घातलेल्या तुच्छतावादाबद्दल देखील मी बोललो. ती भीती लवकरच खरी ठरेल असं मात्र वाटलं नव्हतं. आता नवतुच्छतावाद फोफावतो आहे. बुद्धिवादाचा आणि बुद्धिवाद्यांचा उपहास आणि त्यांची उपेक्षा सहजच होताना दिसते आहे. ‘प्राप्तकाल हा विशाल भूतल’ असून त्यामध्ये सकारात्मकतेच्या सुंदर अशा लेणी कोरण्याचा आदेश जुन्या कवींनी दिला असला तरी आपण मात्र ‘निर्बुद्ध लेणी’ कोरतो आहोत हा माझा इशारा खरा ठरू पाहतो आहे, ही मात्र चिंता.

विचार करणारा लेखक सामान्य जीवांकडे बघतो आणि आंदोलित होतो, चिंतिस्त होतो, म्हणून तो सांगतो, बोलतो, चिकित्सा करतो, आपले विचार मांडतो. ‘आमच्या विरूद्ध, आमच्या धोरणाविरूद्ध काहीही बोललेलं आम्हाला चालणार नाही,’ असं मानणाऱ्या आणि म्हणणाऱ्या संघटित प्रतिगामी शक्तींचा’ विरोध येथून पुढे वाढत राहील आणि संमेलनाच्या अध्यक्षांची वारंवार परीक्षा होईल, असे संकेत मिळायला लागले आहेत. अशा परिस्थितीत गांधी या ‘अवध्य’ माणसाकडे समाजाला, रसिकाला, लेखकाला आणि सगळय़ांनाच पुन्हा पुन्हा यावं लागणार आहे. गांधीयुग संपलेलं नाही, संपणार नाही. आता ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे वेध लागलेले आहेत. हे संमेलन गांधी आणि विनोबा यांच्या कार्यक्षेत्रात होत आहे. भाषणाचा शेवट करताना ज्या ‘विवेकाच्या काना’बद्दल मी बोललो होतो त्या कानाने महात्मा गांधींना अभिप्रेत असणारा ‘आतला आवाज’ ऐकल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. कारण महात्मा गांधी हाच तारक मंत्र आहे. नवे संमेलनाध्यक्ष या संदर्भात हा विचार गांधीच्या भूमीतून पुढे घेऊन जातील अशी मला आशा आहे.

सत्य बोलल्याबद्दल निर्भत्सना करणाऱ्यांना काय मिळालं माहीत नाही, पण लेखकाने ‘आंतरिक वाङ्मयीन विश्वा’शी तडजोड करू नये या मुद्याबाबत मात्र माझा विश्वास दृढ झाला. आणखी एक ‘क्षुल्लक’ लाभ असा की, त्या अनुषंगाने बहुतांश सामान्य रसिकांत मी प्रिय झालो. कारण त्यांना अपेक्षित असलेलं, त्यांच्या मेंदूत-मनात रेंगाळणारं सत्य प्रकट झालं होतं. ही प्रियता म्हटली तर उपलब्धी. आता या माझ्या अध्यक्षीय भाषणाचा आठ भारतीय भाषांमधून अनुवाद केला जातो आहे. याचा अर्थ त्या-त्या भाषेतील जाणकार या भाषणाकडे आणि त्यातील विचारांकडे आस्थेने पाहत आहेत. येऊ घातलेल्या संमेलनाच्या मंचावरूनसुद्धा सामान्य माणसाच्या प्रश्नांबाबत, त्याच्या भावनिक शोषणाबाबत आणि त्याच्या दयनीयतेबाबत बोललं जाईल अशी अपेक्षा करता येईल, कारण सत्य अवध्य असतं- महात्मा गांधींसारखं!

bjsasne@yahoo.co.in

मराठीतील सर्व लोकरंग ( Lokrang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-01-2023 at 01:15 IST
ताज्या बातम्या