छायाचित्रकलेसारख्या दृश्यकलेच्या इतर अंगांकडेही आता मराठी लेखक, प्रकाशकांचं लक्ष जाऊ लागलं आहे, हे स्वागतार्ह आहे. ‘भिंगलीला’ हे छायाचित्रकलेचा प्रवास सांगणारं आणि दागॅरपासून ते राजा दीनदयाळ यांच्यापर्यंतच्या प्रतिभावंत छायाचित्रकारांचा परिचय करून देणारं पुस्तक आहे. छायाचित्रकलेचा विकास अधोरेखित करणारी दुर्मीळ छायाचित्रं आणि कल्पक निर्मिती यामुळे हे पुस्तक संग्राह्य झालं आहे.
lok20या पुस्तकाचे लेखक सतीश पाकणीकर हे इंडस्ट्रियल फोटोग्राफर आहेत. संगीतातील कलाकारांच्या भावमुद्रा, थीम कॅलेंडर्ससाठी छायाचित्रं अशी अभिजात कलेशी जवळीक साधणारी त्यांची छायाचित्रकला आहे. पाकणीकरांनी ‘भिंगलीला’ या नावाचे जे सदरलेखन केले ते संग्रहरूपाने आता पुस्तकात आले आहे. अनिल अवचट यांची त्याला प्रस्तावना आहे. ‘पूर्वपीठिका’ या पहिल्या प्रकरणात पाकणीकरांनी प्रकाशचित्रकलेचा इतिहास दिला आहे.
एरवी रूढ असलेल्या ‘छायाचित्र’ या शब्दाऐवजी ‘प्रकाशचित्रकला’ हा शब्द पाकणीकरांनी फोटोग्राफीसाठी वापरला आहे. फिल्म रोलवर जो प्रकाशग्राही भर असतो, त्यावर कॅमेऱ्याच्या लेन्समधून पोचलेला प्रकाश कमी- जास्त तीव्रतेनुसार आपला ठसा उमटवतो. त्याला अदृश्य प्रतिमा (’ं३ील्ल३ ्रेंॠी) असं म्हणतात. फिल्म डेव्हलप केल्यानंतर ही प्रतिमा आपल्याला निगेटिव्हच्या रूपात दिसते. तिच्या आधाराने फोटोग्राफिक पेपरवर पॉझिटिव्ह प्रतिमा मिळते. या साऱ्या प्रक्रियेत प्रकाशच प्रतिमारेखनाचे कार्य करतो. म्हणून पाकणीकरांनी ‘प्रकाशचित्र’ ही शब्दयोजना केली असावी. पण खरं तर आकार-अवकाशाप्रमाणेच छाया-प्रकाश जोडीने असतील तरच आपल्याला छाया किंवा प्रकाश कळू शकतो. त्या अर्थाने फोटोग्राफीला ‘छाया- प्रकाशचित्रकला’ असं म्हणावं लागेल!
प्रकाशचित्रकलेला १७४ वर्षांचा इतिहास आहे. लुई जॅक माँद दागॅर याने १८३९ मध्ये प्रकाशचित्रणाची पद्धत प्रथम विकसित केली. त्याला त्याने नाव दिलं ‘दागॅर टाइप’. चांदीचा वर्ख दिलेल्या तांब्याच्या पत्र्यावर सिल्व्हर आयोडाईडचा थर तयार करण्यात येई. कॅमेऱ्यात ही प्लेट ठेवून ‘फोटो’ काढण्यात येई. नंतर या प्लेटवर पाऱ्याच्या वाफा सोडण्यात येत. त्यामुळे अदृश्य प्रतिमेचं दृश्य प्रतिमेत रूपांतर होई. मिठाच्या द्रावणात ही प्लेट बुडवून या प्रतिमेला कायमस्वरूप देण्यात येई.
‘दागॅर टाइप’मध्ये प्रकाशचित्रांच्या एकापेक्षा जास्त प्रती मिळण्याची सोय नव्हती. विल्यम हेन्री फॉक्स ताल्बो याने कागदावर सिल्व्हर आयोडाईडचा थर दिला आणि निगेटिव्ह व पॉझिटिव्ह अस्तित्वात आली. एकाच निगेटिव्हवरून अनेक प्रती काढता येऊ लागल्या. त्यानंतर ‘वेट कलोडिअन प्रोसेस’ आली. काचेच्या तुकडय़ावर प्रकाशास संवेदनक्षम असा रासायनिक थर दिला जाई. चार्ल्स बेनेटने ‘ड्राय प्लेट प्रोसेस’ आणली आणि त्यामुळे पुढच्या काळात जॉर्ज इस्टमन यांनी फिल्म रोल बाजारात आणला. रंगीत प्रकाशचित्रणासाठी पारदर्शिका तसेच निगेटिव्ह अशा दोन्ही प्रकारच्या फिल्म्स कोडॅकने १९३५ आणि १९४२ मध्ये उपलब्ध करून दिल्या. डिजिटल फोटोग्राफी येईपर्यंत फिल्म आणि त्या डेव्हलप व प्रिंट करण्याची पद्धत मूलत: तीच राहिली. प्रकाशसंवेद्य फिल्मबरोबरच वेगवेगळ्या प्रकारचे कॅमेरे विकसित झाले. प्रकाशचित्रांच्या बाबतीत तंत्रकौशल्य आणि कलात्मकता याबाबतीत प्रकाशचित्रकारांनी अनेक प्रयोग केले. यामुळे प्रकाशचित्रकलेला इतर चित्रकारांच्या बरोबरीने एक कलात्मक मूल्य लाभले.
प्रकाशचित्रकलेला एक कला म्हणून मान्यता मिळवून देण्यात अनेकांचा सहभाग आहे. त्यातल्या काही निवडक प्रकाशचित्रकारांचा परिचय पाकणीकर यांनी करून दिलेला आहे. या परिचयातूनही प्रकाशचित्रकलेची वाटचाल लक्षात येते. दागॅर, ताल्बो यांच्यापासून ते आल्फ्रेड स्टिगलिट्झ एडवर्ड जिन स्टिचन, आँरी, कार्तिये ब्रसाँ, युसुफ कार्श अशा अनेक प्रसिद्ध प्रकाशचित्रकारांचे परिचय पाकणीकरांनी नेमक्या शब्दांत करून दिलेले आहेत. निसर्गचित्रे, व्यक्तिचित्रे, सामान्य लोकांचे जनजीवन, महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांची नोंद अशी विविध प्रकारची छायाचित्रं या पुस्तकात दिलेली आहेत. सुरुवातीच्या काळात प्रकाशचित्रकलेला कला म्हणायचं की नाही याबद्दल वाद होते. अनेकांना ‘प्रकाशचित्रकलेचा शोध म्हणजे चित्रकलेचे मरणच’ वाटत होतं. त्याच वेळेस प्रकाशचित्रकारांसमोर चित्रकलेचेच आदर्श सुरुवातीला होते. नादार या फ्रेंच प्रकाशचित्रकाराने घेतलेली कृत्रिम प्रकाशाचा वापर करून घेतलेली एकोणिसाव्या शतकातील प्रसिद्ध लेखक, संगीतकार, कलावंतांची वैशिष्टय़पूर्ण व्यक्तिचित्रं आणि युसुफ कार्श यांची विसाव्या शतकातील प्रसिद्ध व्यक्तींची छायाप्रकाशाचा नाटय़पूर्ण वापर करून केलेली व्यक्तिचित्रं पाहिली की व्यक्तिचित्रणातल्या विविध शैलींचा प्रत्यय येतो, ज्युलिआ मार्गारेट कॅमेरॉन या महिला प्रकाशचित्रकाराची चार्ल्स डार्विन, सर जॉन हर्शेल ही प्रकाशचित्रं तर आता पाश्चात्त्य सांस्कृतिक इतिहासाचा एक भाग झाली आहेत. फ्रान्सिस फ्रिथ याने घडवलेलं इजिप्तचं दर्शन, अ‍ॅन्सेल अ‍ॅडम्सची योसेमाइट नॅशनल पार्कच्या निसर्गसौंदर्याला अमर करणारी काव्यात्म प्रकाशचित्रं या पुस्तकात दिलेली आहेत. भारतीय प्रकाशचित्रकार लाला दीनदयाळ संस्थानिकांचं आता अस्तंगत झालेलं जग प्रकाशचित्रांमध्ये बंदिस्त करतात.
आल्फ्रेड स्टिगलिट्झ आणि एडवर्ड जिन स्टिचन ही आधुनिक प्रकाशचित्रकलेतील अत्यंत महत्त्वाची नावं. दोघेही उत्तम प्रकाशचित्रकार होते आणि दोघांनीही प्रकाशचित्रांना कलात्मक दर्जा आणि मान्यता मिळावी म्हणून सातत्याने प्रयत्न केले. स्टिगलिट्झचं वर्णन ‘गॉडफादर ऑफ मॉडर्न फोटोग्राफी’ असं केलं जातं. उत्तम प्रकाशचित्र निर्माण करण्यासाठी ‘उपजत कलाबुद्धी आणि कित्येक वर्षांचे कष्ट कारणीभूत ठरतात’ असं स्टिगलिट्झचं मत होतं. तर स्टिचन म्हणतो की, ‘प्रकाशचित्रकलेचे कार्य हे मानवाला मानवाचे अंतरंग समजावून सांगणे हे तर आहेच पण प्रत्येकाला स्वत:चे अंतरंग समजावून सांगणे हेसुद्धा आहे. जी जगातील सर्वात गुंतागुंतीची प्रक्रिया आहे.’
खळाळत्या जीवनप्रवाहातले नेमके क्षण टिपणारा आँरी कार्तिये ब्रसाँ याचे उद्गारही असेच समर्पक आहेत. तो म्हणतो, ‘सतत, शाश्वत प्रवाही असलेल्या या जगात आम्ही प्रकाशचित्रकार अतिशय सहनशील असे प्रेक्षक आहोत. आमच्या कलानिर्मितीला कारणीभूत असतो एकच क्षण! तो क्षण, जेव्हा आमच्या कॅमेऱ्याचे शटर काम करते. प्रवाही असलेल्या या जगातील त्या घटनेचा साक्षीदार!’
या पुस्तकासंदर्भात एकच सूचना करावीशी वाटते. सर्व प्रकाशचित्रकारांची नावं इंग्रजीतही हवी होती. कारण त्यांचे उच्चार मराठीत नेहमीच वेगवेगळ्या पद्धतीने केले जातात. अन्यथा हे पुस्तक म्हणजे प्रकाशचित्रकलेची धावती पण वेधक झलक आहे. मानवी जीवनातले प्रकाशचित्रात कलापूर्ण रीतीने बंदिस्त केलेले अनेक क्षण या पुस्तकात आहेत. जिज्ञासू वाचकाला प्रकाशचित्रांच्या अनोख्या विश्वाचा चिकित्सकपणे आस्वाद घेण्यास हे क्षण नक्कीच उद्युक्त करतील.
‘भिंगलीला’ – सतीश पाकणीकर, अ‍ॅड्रॉइट पब्लिकेशन, पुणे, पृष्ठे – १३१, मूल्य – ४०० रुपये.