खरंखुरं ‘तमस’ जगलेल्या भीष्मजींच्या (लिहिताना नाव भीष्म, पण बोलताना उच्चार पंजाबी पद्धतीनं भीषम केला जाई) सुहास्यामागे चेहर्‍यावर मागील दु:खाचा एक हलकासा मेघ नेहमी तरळत असे- बुद्धाच्या चेहर्‍यावरच्या अथांग मानवीय करुणेशी नातं सांगणारा! कदाचित तो मला होणारा भासही असेल. डाव्या विचारसरणीचे, लहान चणीचे, देखणे, सौम्य- संयत स्वरांत बोलणारे भीष्म साहनी भेटत तेव्हा कधी सेलेब्रिटी समोर असल्याचं दडपण येत नसे. ‘तमस’ सारखी कादंबरी किंवा त्या आधी ‘चीफ की दावत’ आणि ‘अमृतसर आ गया है’सारख्या उभं माणूसपण, अंतर्मन ढवळून टाकणार्‍या कथा लिहिणारे भीष्मजी, कधी काळी व्यक्तिश: अपरिचित होते… तेव्हाही त्यांच्याशी एक अव्यक्त तार जोडल्यासारखी होती. असं अनेकांचं होत असणार आणि ते भीष्मजी जाणून असावेत. म्हणून त्यांचं मोठेपण विसरून लोकांनी त्यांच्याशी बोलावं, असं त्यांना तीव्रतेनं वाटे, हे मी ऐकून होते आणि पुढे अनुभवलंही!

सहज अकादमीच्या किंवा ब्रिटिश कौन्सिल लायब्ररीत किंवा एनएसडीच्या प्रांगणांत भेटले तरी ‘मी घाईत आहे… आत्ता वेळ नाही,’ असं कधी म्हणत नसत. देहबोलीतही घाई असल्याचं न दर्शवता विचारपूस, काहीतरी छानसं बोलून निरोप घेत. संवेदनशील सुसंस्कृततेचं उदाहरण होते भीष्मजी! कधी कधी त्यांच्या पत्नी शीलाजी बरोबर असायच्या. तशाच सुबक, ठेंगण्या, छोट्याशा चेहर्‍यावर मोठीशी बिंदी, सुंदरशा हॅन्डलूमच्या साडीतल्या! जोडी घरातल्या मोठ्यांनीच बातों बातों में ठरवलेली, पण नंतर दोघांनी उदंड खाचखळग्यांतून वाट काढत निभावलेली. आर्थिक स्थैर्य, मानसन्मान आयुष्याच्या उत्तरार्धात आलेले.

फाळणीची ती वर्षं डोळ्यांनी पाहिलेली… दोन्ही देशांतली आंधळ्या द्वेषाची अमानुषता आणि उघडं पडलेलं पाशवी क्रौर्य ते कधी विसरू शकले नसावेत. योगायोगानं एनबीटीनं त्यांच्याकडून लिहून घेतलेल्या ‘जालियनवाला बाग’च्या मराठी अनुवादाचं काम मला मिळालं आणि भीष्मजींशी गप्पा मारायची आणखी एक संधीही. मनात वागवलेला प्रश्न उतावीळपणे विचारलाच- ‘‘तुम्ही पिंडीच्या दंग्यांचे साक्षीदार होता. नंतर पिंडी आणि भारतातल्याही विस्थापितांच्या छावण्यांत कहाण्या ऐकत रेकॉर्डस् जुळवण्याचं काम केलंत. ते सगळं उतरलेल्या ‘तमस’साठी १९७४ पर्यंत का थांबलात?’’ ते शांतपणे म्हणाले, ‘‘ हा अनेकांनी विचारलेला प्रश्न! झालं असं की, पिंडीहून मी फक्त स्वातंत्र्य दिन बघायला आठवडाभरासाठी भारतात आलो होतो, तो परत जाऊच शकलो नाही.

सुरुवातीचा कालखंड प्रचंड गुंतागुंतीचा होता. बँटवारे का अंजाम कोई नहीं जानता था, न सियासत, न अवाम. बेतहाशा फैली नफरत, जान और माल के नुकसान को दोनों कौमें हक्की-बक्की झेल रहीं थी. ‘सरकारं बदलतात, पण आपलं घरदार जनतेनं थोडंच सोडायचं असतं?’ म्हणत पिताजी पिंडीत एकटे. त्यांच्याशी पूर्ण संपर्क तुटलेला आणि आम्ही भाऊ मुंबईत… एकीकडे पोटापाण्याची विवंचना, दुसरीकडे कुटुंबाची. जे काही पाहिलं त्याचा आगापिछा लक्षात येत नव्हता. वाचायचो भरपूर, लिहायची सुरुवात कॉलेजातच झालेली, गोष्टी छापल्या गेल्या वगैरे… पण लेखनावर पोट भरत नाही हे तेव्हाही माहीत होतं. ती वर्षं जिग सॉ बनलेल्या आयुष्याची घडी बसवण्यात गेली, लिहिणार तरी कसा!’’ एक मात्र समजलं की साहनी परिवार प्रेमाच्या घट्ट धाग्यांनी बांधलेलाय, एकमेकांना धरून राहिलेलाय, बलराज आणि भीष्मजी कधी आई-वडिलांनाही एकटे सोडत नसत. त्याचे उल्लेख येत राहातात वेगवेगळ्या संदर्भात.

‘‘‘तमस’मधील हे चित्रण पिंडीचे आगी आणि आक्रोशानं भरलेले दंगे (लहानपणी अनुभवलेले), फाळणीच्या वेळी पाहिलेला क्रूर नरसंहार आणि १९७० मधले भिवंडीचे धार्मिक दंगे यांचा परिपाक! तू ‘अमृतसर आ गया है’ वाचलीयेस? (मी विषय काढला खरा, पण ती कथा आठवून आता पोटात ढवळायला लागलंय). त्याबद्दल लिहिणं हे कॅथार्सिस नव्हे. लिहिणं म्हणजे ते दु:ख परत जगणंही असतं. दृश्यं एकएक डोळ्यासमोर येतात. पण दर काही वर्षांनी उसळणारे भिवंडीचे दंगे पाहून वाटलं, हे थांबलंच पाहिजे. मैं क्या कर सकता हूँ? तो इन्हे आईना दिखाने की कोशिश कर सकता हूँ, तो लिखता गया और पूरा अफसाना बन गया, छप गया… खैर…’’ १९७५ चं साहित्य अकादमी अवॉर्ड ‘तमस’ला मिळालं. त्याच्यावर दूरदर्शनची मालिका खूप लोकप्रिय झाली वगैरे…

भीष्मजींची ‘कबीरा खडा बाजार में’, ‘मय्यादास की माडी’, ‘माधवी’, ‘हानुश’ ही नाटकं एनएसडीत वेगवेगळ्या बॅचेसमध्ये, वेगवेगळ्या दिग्दर्शकांच्या तालमीत बसवली जात, विद्यापीठांमध्ये पाठ्यपुस्तकं म्हणून लावली जात. दरवर्षी कुठलं ना कुठलं नाटक असेच, त्यानिमित्तानं विद्यार्थ्यांबरोबर नाटककार म्हणून त्यांचा संवादही असे, त्यांना एकमुखी व्याख्यानाऐवजी चर्चेचं निमंत्रण आवडे. ‘हानुश’साठी भीष्मजी आवर्जून जायचे. प्रागमध्ये १७ वर्षं खपून देशातलं पहिलं घड्याळ बनवणार्‍या एका प्रतिभावान कलाकाराला चेक राज्यसत्तेच्या क्रौर्यामुळे नेत्रहीन केलं जातं. त्यानं असंच घड्याळ परत बनवू नये, या असुरी राजहट्टामुळे. ही लोककथेवर आधारित दारुण शोकांतिका घर करून राहिली होती त्यांच्या मनात… तिनं १३ वर्षं घेतली नाट्यरूपात उतरायला. ती एनएसडीनं आधी दोनदा नाकारली होती.

विद्यार्थ्यांशी संवादाविषयी आपल्या आजवरच्या प्रवासाबद्दल ते एकदा सांगत होते, ‘‘बलराज माझ्याआधी वडिलांचा दबाव बाजूला सारून प्रथम शांतिनिकेतन, मग वर्धा आणि नंतर मुंबईतल्या नाट्यक्षेत्रात आला. उनाड शेंडेफळ असल्यानं मला वडील आणि बलराज दोघांचा धाक. (लहानपणी गावभर उंडारायचा म्हणून वडिलांनी पितळ्याचा ठसठशीत बिल्ला गळ्यात बांधला होता. ‘हा हरबंसलाल साहनींचा मुलगा आहे, सापडल्यास घरी आणून सोडावा!’ कोणी घरी आणून सोडलं की आईचा मार… हा अनेकदा घडणारा प्रकार). बलराज निघून गेल्यानं सैरभैर वडिलांच्या आग्रहाखातर पिंडीतलं त्यांचं दुकान मी काही वर्षं सांभाळलं. नंतर तो आणि मी इप्टात बरोबरच होतो.

तो उंच, देखणा म्हणून त्याची निवड सहज झाली असावी. माझी केस मात्र कठीण होती. ‘हिरो’वाली शख्सियत तो थी नहीं, हालात से परेशान था, बीमारसा लगता था. मला कुठल्या सभ्य भूमिका मिळणं मुश्कील होतं. (ती हौस नंतर ‘तमस’, ‘मिस्टर ॲॅण्ड मिसेस अय्यर’, ‘लिट्ल बुद्धा’ वगैरे सिनेमांत खास भूमिका निभावून पूर्ण केली.) म्हणून बलराजनं मला इंग्रजी साहित्य शिकवायला कॉलेजमध्ये पाठवून दिलं. घर-गृहस्थी सुरू झाल्यानं माझी अभिनयाची आवड मागे पडली. साम्यवादी कार्यकर्त्याच्या वाट्याला येणार्‍या अडचणी झेलत वेगवेगळ्या शहरांत आयुष्यभर लिहीत, इप्टाची नाटकं करत आणि शिकवत राहिलो.’’ मी बघितलं होतं की स्वत:बद्दल बोलणं त्यांना फारसं रुचत नसे, आत्मस्तुती तर दूरच राहो. सर्जनाबद्दल, कलाकृतींबद्दल वस्तुनिष्ठपणे, मोकळेपणे बोलत!

बलराज आणि त्यांच्यात जेमतेम दीड वर्षाचं अंतर, पण सालस भीष्मजींसाठी, गांधीवादी मोठा भाऊ हिरो होता. त्यांच्यावर त्यांनी लिहिलेलं ‘माय ब्रदर बलराज’ हे हृद्य पुस्तक पेंग्विननं प्रकाशित केलं आहे. सर्जनशीलतेची अस्वस्थता सतत जाणवणारी. मध्यंतरी ७ वर्षं भीष्मजी रशियात होते. अनेक महत्त्वाच्या रशियन साहित्यकृतींचा त्यांनी अनुवाद केला. बहुभाषिक भीष्मजींनी पुस्तकी माध्यमांतून आत्मसात केलेली रशियन मात्र त्यांना पुस्तकांपलीकडे फारशी कामी आली नाही, कारण बोली भाषा, उच्चार वेगळे आणि कामाचा वेग व तणावामुळे सामान्यजनांशी संपर्कही मोजूनमापूनच असे. खरं तर भाषा आणि लहजे त्यांना सहजपणे येत. संस्कृत, हिंदी, उर्दू, पंजाबी व इंग्रजीवर त्यांचा समान अधिकार होता. (भीष्मजींनी पंजाब युनिव्हर्सिटीतून साहित्यात डॉक्टरेट मिळवली होती असं मला कृष्णा सोबतींनी बोलता-बोलता सांगितलं होतं, त्याबरोबर हेही की विनयी स्वभावामुळे तिचा उल्लेख फक्त ते नोकरी बदलताना अर्जात करत.

आम्हाला पार्टी-बिर्टी नाही दिली!) भीष्मजींचं आणखी वैशिष्ट्य म्हणजे त्यांना पद्मभूषणच नव्हे तर संगीत नाटक आणि साहित्य अकादमी या दोन्ही संस्थांनी गौरवान्वित केलं होतं. एकदा मात्र त्यांचा बांध फुटलेला पाहावा लागला. डावी पथनाट्यं लिहून, ठिकठिकाणी करणार्‍या ‘जन नाट्य मंच’च्या सफदर हाश्मी यांच्यावर एक जानेवारी १९८९ला साहिबाबाद येथे राजकीय गुंडांनी ‘हल्ला बोल’ ही नाटिका चालू असताना दिवसा-ढवळ्या जीवघेणा हल्ला केला होता. अचानक झालेल्या त्या हल्ल्यात सफदर शहीद झाले. तीन तारखेला त्यांची शवयात्रा निघाली तेव्हा त्यांच्या परिवाराच्या अभेद्य मानसिक बळाचं अविस्मरणीय दृश्य लोकांसमोर होतं. शववाहक ट्रकवर उभे राहून सफदरची आई आणि पत्नी मालासहित सारं कुटुंब आणि झोहरा सहगल, भीष्मजी, हबीब तन्वीर, गो. पु. देशपांडे, एम. के. रैनांसारखे संस्कृतिकर्मी आपले अश्रू पुसून त्याच्या कार्याला शोभेलसा निरोप देण्यासाठी मुठी उभारून ‘लाल सलाम, लाल सलाम, सफदर तुझको लाल सलाम’च्या घोषणा देत होते.

हेही वाचा
इतकी झुरळे कुठून आली?bhishma-sahni-birth-anniversary-tamas-author-life-and-literary-journey Sap 05

हजारोंचा जनसमुदाय… त्या अंत्ययात्रेत भावनिक कोलमडण्याला अलिखित मनाई असल्यासारखी. सरकारला संदेश द्यायचा होता की सफदरला असं संपवून लढा संपणार नाहीये, मशाल पुढे नेण्यासाठी हजारो हात आहेत… पण पारदर्शी भीष्मजींना मधून उमाळे येत, कृद्ध शोक मनात मावेनासा होई. तो प्रसंग आणि भीष्मजींचा नि:शब्द शोक काळजाचं पाणी पाणी करणारं… सफदरचं काम पुढे नेण्यासाठी त्यांच्या पुढाकारानं ‘सहमत’ या संस्थेची स्थापना झाली आणि तिथे भीष्मजी अनेक वर्षं कार्य करत राहिले. ‘मेरी साहित्ययात्रा’ ही भीष्मजींची कहाणी ज्ञानपीठानं प्रसिद्ध केली आहे. एक व्यक्ती आणि एक कलाकार म्हणून त्यांच्या घडवणुकीचं वाण-पोत जाणून घ्यायला याहून सुयोग्य काही सापडणं कठीण!

arundhati.deosthale@gmail.com