अरुंधती देवस्थळे arundhati.deosthale@gmail.com

या वर्षीचा मागल्या महिन्यात सुरू झालेला आणि नोव्हेंबपर्यंत चालणारा व्हेनिस आर्ट बिनाले उलगडू लागलाय. जगातली उत्तमोत्तम कला एकत्र आणू पाहणाऱ्या प्रत्येक बिनालेचं काही ना काही ठळक वैशिष्टय़ असतंच. हा बिनाले कोविडनंतर जगाने घेतलेल्या जरा मोकळ्या श्वासासारखा, वासंतिक उत्साहाने फुलून आलेला आहेच; पण आठ नवे प्रगतिशील देश त्यात सामील झाल्यानं आणि स्त्री-कलाकारांच्या संख्येत अभूतपूर्व वाढ झाल्यानं ‘बिनाले इज काइंडर टू ओल्डर वीमेन अ‍ॅण्ड यंगर मेन..’ हे जे विनोदाने म्हटलं जातं त्याचा पुनप्र्रत्यय येतोय, असं तिथे आठवडाभर तळ ठोकलेल्या एका फिरंगी मैत्रिणीचं म्हणणं. हे अधिकृतरीत्या जाहीर झालेल्या आकडेवारीतूनही दिसतंच आहे. एकूण २१३ भाग घेणाऱ्या कलाकारांपैकी योगायोगाने फक्त २१ पुरुष आहेत. इटलीच्या सेसिलीया अलेमानीनी क्यूरेट केलेला यंदाचा बिनाले जास्तच रंगीबेरंगी दिसतोय हे तिचं निरीक्षणही योग्यच असावं. बिनालेचे आजवरचे तीन सर्वोच्च पुरस्कार पटकावणाऱ्या तिघींच्या- सोनया बॉइस (ग्रेट ब्रिटन), कॅथेरिना फ्रिटश (जर्मनी) आणि सेसिलीया विकूना (चीले/ अमेरिका)- कामाबद्दल जाणून घेऊ या. कॅथेरिना फ्रिटश आणि सेसिलीया विकूना या दोघींना हा पुरस्कार गेल्या वर्षीच जाहीर झाला होता, तो या वर्षी दिला गेला.

vasai, virar, palghar, lok sabha election 2024, Hitendra Thakur
सर्व पक्षांनी मलाच पाठिंबा द्यावा, हितेंद्र ठाकूर यांची चित्रफित प्रसारित
light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान

सरकारची दडपशाहीची युद्धनीती आणि त्यामुळे घडून आलेल्या अमानुष हिंसाचाराविरुद्ध विधान करून रशियाच्या कलाकार संघटनेनं बिनालेत भाग घेतला नाही. त्यांचा पॅव्हिलियन शुकशुकाटात हरवलेला. आणि नियम वाकवून युक्रेनला ऐनवेळी ज्योर्दिनीच्या परिसरात एक तंबू उभारून भाग घेऊ दिला गेला, हेही विशेष!

या वर्षीचा बिनालेचा गोल्डन लायन हा सर्वोच्च सन्मान ग्रेट ब्रिटनच्या सोनया बॉइस यांना देण्यात आला आहे. ही निवड अनेकार्थाने विशेष. कारण एका कृष्णवर्णीय कलाकाराला ब्रिटनचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळण्याची ही पहिलीच वेळ. ब्रिटिश नागरिक असलेल्या साठवर्षीय सोनया मूळच्या आफ्रो कॅरिबियन. अमेरिकेचं नेतृत्वही या वेळेला प्रथमच एक कृष्णवर्णीय शिल्पकार सीमोन ली करत आहेत हाही एक सुखद संयोग.. कलेच्या रुंदावलेल्या क्षितिजांवर शिक्कामोर्तब करणारा! ‘Sovereignty’ (सार्वभौमत्व) या विषयाभोवती मांडणी करणाऱ्या सीमोन लीला बेस्ट पार्टिसिपेशनचा गोल्डन लायन मिळालाय. त्यांच्या नव्याने केलेल्या ब्रॉन्झ आणि सेरॅमिक्समधल्या फिगरेटिव्ह शिल्पांमधून जगभरातल्या कृष्णवर्णीय स्त्रियांनी केलेल्या मेहनतीच्या आणि चिवट झुंजींच्या कहाण्या साकार केल्या गेल्या आहेत. आफ्रिकन देशांच्या समूहातून त्यांनी मागल्या दोन शतकांतल्या वेगवेगळ्या सांस्कृतिक परंपरा उचलून घेत वसाहतकालाच्या अत्यंत प्रतिकूलतेतही जिवंत राहणाऱ्या आणि ठेवणाऱ्या कलांच्या बहुविधतेचं प्रस्तुतीकरण केलंय. त्यात पश्चिम आफ्रिकन कला आणि सुरुवातीची आफ्रो-अमेरिकन कला हे दोन उठून दिसणारे बिनीचे शिलेदार!

सोनयाचं Feeling Her Way हे सन्मानपात्र ठरलेलं  इन्स्टॉलेशन दृक्श्राव्य माध्यमं, त्रिमितीय शिल्पं आणि वॉलपेपरमधून साकार होणारं. त्यांनी यासाठी चार गायिका आणि एक तालवादकाच्या सहयोगाने मुक्त संगीत निर्माण केलं आहे. १५ मिनिटांच्या या शोमध्ये प्रत्येकीचे पडद्यावर दिसत राहणारे व्हिडीओज्- त्यातून एकच ओळ क्रमाक्रमाने. कधी एकमेकींत सूर मिसळून, तर कधी वेगवेगळ्या पद्धतीने गाणाऱ्या गायिका. अनेक रंगांनी स्वयंस्फूर्तपणे विणलेला गोफ. स्पेसच्या मध्यभागी उघडलेल्या त्रिमितीय पेटय़ांसाख्या शिल्पाकृती.. त्यातून अनेक अव्यक्त कहाण्या बाहेर पडतात. प्रत्येकीच्या आवाजाचा पोत व शैली निराळी, आणि तरीही सर्वानी मिळून एक विधान केलेलं. सोनया म्हणतात, ‘आमच्या पॅव्हिलियनमध्ये आवाज जरा वरच्या टिपेला जाऊन भिडतात हे खरं, पण मला आवडतात आवाज.. जिवंतपणाचे प्रतीक असलेले. हे इन्स्टॉलेशन पाहणाऱ्याला चारी बाजूंनी संवेदनांनी घेरून टाकणारा अनुभव असावा.. बाहेर गेल्यावर विचारचक्र चालू राहावं. कोऱ्या मनाने कोणी परतू नये, एवढंच.’ इन्स्टॉलेशन्समध्ये त्यांची सिग्नेचर स्टाईल बनलेले वॉलपेपर्स- नाटय़निर्मितीत सामील होणाऱ्या एका महत्त्वाच्या अनिश्चित पात्रासारखे. यावेळी लाल, पिवळ्या, भुऱ्या, हिरव्या, गुलाबी, नािरगी रंगांच्या भौमितिक त्रिकोनी-चौकोनी आकारांचा (टॅनग्राम्स) वॉलपेपर वापरून रोज नव्या सुरांच्या माध्यमांतून मार्ग शोधण्याच्या प्रक्रियेची नाटय़मयता वाढवली आहे. बिनालेत अनेकदा विवादाचा मुद्दा बनत आलेल्या सहभागाची गुणवत्ता आणि सन्मानावर प्रतिक्रिया देताना सोनया बॉइस म्हणाल्या, ‘मागली दोन वर्ष आपण सगळेच अकल्पित आव्हानं झेलत मार्ग काढत राहिलो, हे कोणी नाकारू शकत नाही. पण मी जे हे आसपास बघतेय त्यावरून या प्रतिकूल कालावधीत आपण सर्व जण एक नव्या प्रकारची अभिव्यक्ती शोधत, दुर्दम्य मानवी सर्जनशीलतेची वाटचाल जिवंत ठेवत राहिलो, हे महत्त्वाचं.’ आपण आता ब्रिटनमधील कृष्णवर्णीय स्त्रियांच्या भक्तीसंगीतापासून सुरू झालेल्या कलात्मक अभिव्यक्तीची साठवण जपणारा प्रकल्प हाती घेणार आहोत, असंही त्यांनी टेलिव्हिजनवर सांगितलं.

व्हेनिस बिनालेत बऱ्याचदा भाग घेणाऱ्या ज्येष्ठ शिल्पकार कॅथेरिना फ्रिटश यांना त्यांच्या लाइफटाइम अचिव्हमेंटसाठी गोल्डन लायन मिळाला. त्या त्यांच्या मायभूमीच्या- म्हणजे जर्मनीच्या लाडक्या असाव्यात असं वाटतं. काही वर्षांपूर्वी जेव्हा त्यांचा ‘हान’ हा १४ फुटी, प्रचंड देखणा, गर्द निळा (अल्ट्रामरिन) पॉलिएस्टर आणि फायबर ग्लासमधून बनवलेला कोंबडा कोणती तरी आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकल्यावर २०१३ मध्ये लंडनच्या ट्राफल्गार चौकात लावायला पाठवला जाण्याची घोषणा झाली, तेव्हा आधी तो बर्लिन, हॅम्बुर्गसकट अनेक शहरांतून प्रदर्शनात दाखवला गेला होता. तो बनवायला त्यांना अडीच वर्ष लागली होती. आता हे शिल्प वॉिशग्टनच्या नॅशनल आर्ट गॅलरीत ठेवलेले आहे. हॅम्बुर्गमध्ये त्यानिमित्ताने त्यांचा ‘रेट्रो’ आयोजित करण्यात आला होता आणि त्यात त्यांचे फिगरेटिव्ह काम आणि डय़ूसेलडॉर्फमधील स्टुडिओवर फिल्म दाखवली होती. आर्किटेक्ट वडिलांचा त्यांच्या एकंदर कलादृष्टीवर  प्रभाव असावा. आजोबा नामांकित रंग कंपनीत नोकरीला असल्याने घरात खूप सारे रंग आणि स्टेशनरीची चैन होती. आजीबरोबर गॉथिक शैलीत बांधलेल्या कॅथॉलिक चर्चमध्ये नेमाने जावं लागायचं. त्याचे पडसाद कॅथेरिनाच्या शिल्पांमध्ये दिसतात. बालमनात जरा दडपणयुक्त आदर निर्माण करणाऱ्या बायबल आणि लोककथांमधील संत आणि देवता हे निसर्गातील ऑक्टोपस, साप, शंख, फळं वगैरेंइतकेच त्यांच्या शिल्पांचे विषय बनतात. त्यांनी याच माध्यमात- म्हणजे पॉलिएस्टर, फायबर ग्लास, स्टेनलेस स्टील आणि अ‍ॅक्रेलिक रंग वापरून केलेल्या मॅडोना (कॅडियम यलो), सेंट निकोलस (कोबाल्ट व्हायोलेट) यासारख्या शिल्पकृती म्यूनिकच्या पिनाकोथेकमध्ये पाहिलेल्या, त्यांच्या फ्लोरेसंट रंगांमुळे लक्षात राहिल्या होत्या. यातील प्रत्येकाची ४० शिल्पकृतींची मर्यादित आवृत्ती असून, हे पुतळे जगातील वेगवेगळ्या कलासंग्रहालयांत पाठवले गेले आहेत. त्यांच्या स्टुडिओच्या बेसमेंटमध्येच त्यांचं फोर्जिग युनिट आहे. धातूंमध्ये काम करणाऱ्या शिल्पांसाठी शारीरिक शक्तीही खूप लागते, त्यासाठी त्यांनी मदतनीस ठेवले आहेत. 

‘ Tischgeselleschatt’ ( Company at the table) हे त्यांचं बहुचर्चित शिल्प. यात अगदी एकमेकांसारखे ३२ पांढऱ्याफटक कोऱ्या चेहऱ्याचे, काळ्या सुटातले पुरुष टेबलाभोवती बसले आहेत. त्यांचे हातही एका विशिष्ट कोनात टेबलावर ठेवलेले. या संपूर्ण श्वेत-श्यामल शिल्पात शुभ्र पांढऱ्या टेबलक्लॉथवर पारंपरिक पॅटर्नमध्ये केलेलं भरतकाम हाच एकमेव अनौपचारिक घटक.. यांत्रिक वाटणाऱ्या वातावरणातील शांतता रंगाने भंग करणारा. चित्राला वेढून राहिलेली एक गूढ भीती.. त्यामुळे अस्वस्थता अजूनच वाढवणारी.

कविता, चित्रं आणि शिल्पं या कलाविष्कारांनी जगाला समृद्ध करणाऱ्या चीलेच्या सेसिलीया विकूना (१९४८) यांनाही लाइफ टाइम अचिव्हमेंटचा गोल्डन लायन देण्यात आला आहे. त्यांची कला आणि कविता दोन्ही प्री-कोलम्बियन कलेशी खोलवर नातं सांगणाऱ्या, चीलेच्या गावरान मातीतून पालवलेल्या. कवितांच्या प्रांतात त्यांनी मोठंच योगदान दिलं आहे. त्यांनी लिहिलेले, अनुवादित केलेले आणि संपादित केलेले एकंदर २७ संग्रह आजवर वेगवेगळ्या देशांतून प्रकाशित झालेले असून, त्यांनी कवितांवर आधारित काही अ‍ॅनिमेशन फिल्म्सही बनवल्या आहेत. त्यांचं एक पाऊल न्यू यॉर्कमध्ये आणि दुसरं सान्तियागोत. सान्तियागोत चीलेच्या आदिवासींच्या मानवी हक्कांसाठी त्या कार्य करतात. काही वर्षांपूर्वी त्यांना त्यासाठी देशाबाहेर पाठवून देण्यात आलं होतं. त्यांचे बहुमितीय काम आकृतिबंधाच्या मापदंडावर लवचीक, सहज प्रवाह बदलणारे. कविता म्हणून सुरू झालेली रचना सुरवंटाची कात टाकून चित्रात उतरते, किंवा फिल्ममध्ये शिरते. तिच्यात कधी गाणी येतात, तर कधी शिल्पं अवतीर्ण होतात आणि मग ते सामूहिक सादरीकरण बनतं. त्यांच्या प्रयोगशीलतेत वेगवेगळ्या अभिव्यक्तींचा, लोकसंस्कृतींचा दृक्श्राव्य मेळ असतो. त्यांनी अमेरिका आणि चीलेसकट अनेक लॅटिन अमेरिकन देशांत कार्यक्रम केले आहेत आणि त्यासाठी त्यांना अनेक देशांनी गौरविले आहे. अतिशय मृदुभाषी व्यक्तिमत्त्वाच्या, तर्कशुद्ध मांडणी करणाऱ्या विकूनांचं- ‘‘आपण स्वत: समृद्ध पाश्चिमात्य अभिजात कलेचा वारसा घेऊन जन्मलेलो नाही, आपण वेगळ्या आहोत, या जाणिवेशी थांबायचं नसतं. आपण नक्की कोण आहोत हे जाणलं तरच आपल्या स्वत्वात पाय रोवून दोन्ही कलाविश्वांना जोडणं शक्य असतं..’’ हे पायाभूत विधान सर्वच अ-पाश्चिमात्यांनी विचारात घेण्यासारखं.  आजवरचं जे काही बिनालेतलं बाहेर पोहोचतंय त्यावरून दोन-तीन ठळक ट्रेंड्स जाणवतात. पहिलं म्हणजे इन्स्टॉलेशन्स हा प्रकार व्यामिश्र अभिव्यक्ती आणि अनुभूतींकडे तेजीने वाटचाल करतोय. शिल्पं, चित्रं, संगीत आणि दृक्श्राव्य माध्यमं एकमेकांत मिसळून नव्या प्रकारचं प्रायोगिक सर्जन सुरू झालंय. आणि मुख्य म्हणजे संवादातून विश्वाला संदेश जातोय. कलाकारांमध्ये जोमाने देवघेव सुरू झालीये आणि एकमेकांना स्पर्धेने असुरक्षित करण्याऐवजी सहयोगाचा प्रयत्न दिसतो. दुसरं म्हणजे पॉप आर्टकडे बघण्याचा दृष्टिकोन आता अधिक उदार झाला असावा. तिच्याकडे आता यादृष्टीने न बघता तिचं असं जे समकालीन अपील आहे त्याचं स्वागत होत असून, ती तिच्या वैविध्यानिशी मार्केटमध्ये उतरली आहे. आणि तिसरं म्हणजे कलाक्षेत्रांत अर्थपूर्ण स्पॉन्सरशिप्स वाढत आहेत आणि कलाकारांइतकंच क्यूरेटर्स, आर्ट डीलर्स आणि म्युझियम किंवा गॅलरी मॅनेजर्सचं महत्त्व ओळखून त्यांच्या प्रशिक्षणासाठी विविध कोर्सेस संस्था किंवा सरकारी पाठबळाने आयोजित होत आहेत. त्याचे परिणाम पुढल्या तीन-पाच वर्षांत आर्ट सीनवर दिसून येणार आहेत. त्याचा फायदा कलाक्षेत्रातल्या तरुणाईने करून घ्यावा.. हीच ती वेळ आहे!