गीता मांजरेकर
स्वातंत्र्याचा, लोकशाहीचा थेट संबंध संपूर्ण देशातील जनतेच्या आणि नेत्यांच्या नैतिक वर्तणुकीशी आहे. पण ना जनता नीतिमत्ता आचरणात आणते ना नेते. त्यामुळे अक्षरश: या देशातील गत आंधळ्यासारखी दिशाहीन स्वातंत्र्याची झाली आहे. पण तरीही काही माणसं सचोटीने आपले काम करत राहतात आणि निर्भयपणे भ्रष्ट व्यवस्थांविरुद्ध, त्यातील लालची अधिकार्यांविरुद्ध आवाज उठवतात; तेव्हा लोकशाहीबद्दलचा विश्वास दृढ होतो असे राजा भोयर यांनी आपल्या ‘ब्लाइंड फ्रीडम’ या कादंबरीतून सूचित केले आहे.
या कादंबरीत स्वातंत्र्यपूर्वकाळ आणि वर्तमानकाळ असे दोन कालखंड कादंबरीच्या कथानकात आलटून-पालटून येत राहतात. कथानक काळाच्या अक्षावर पुढे-मागे सरकत राहते. कादंबरीचा अवकाश प्रामुख्याने विदर्भातील चिमुर हे गाव आणि नागपूरजवळचा परिसर आहे. क्वचित मुंबई शहरातही कादंबरीतील व्यक्तिरेखा आल्याने त्याअनुषंगाने मुंबईही कथानकातील काही घटनांचा अवकाश ठरते.
‘ब्लाइंड फ्रीडम’ या कादंबरीत दोन नायक आहेत. एक आहे नानासाहेब पाटील हे चिमुर गावातील स्वातंत्र्यसैनिक, तर दुसरा नायक आहे नाना पाटील यांचा धाकटा मुलगा भालचंद्र पाटील. नानासाहेब पाटील यांनी त्यांच्या तरुण वयात स्वातंत्र्य चळवळीत झोकून दिले होते आणि निर्भयपणे ते तत्कालीन जुलमी इंग्रज सरकार आणि त्यांची पोलीस यंत्रणा याविरुद्ध उभे राहिले होते. परिणामी त्यांना तुरुंगवास आणि पोलिसांकडून छळ सोसावा लागला होता. नानासाहेबांचा हा स्वातंत्र्यलढ्यातील संघर्ष ब्लाइंड फ्रीडम या कादंबरीच्या कथानकातील थरारक भाग आहे. स्वातंत्र्य मिळाल्यावर नानासाहेबांनी तीच निर्भयता आणि सचोटी पत्रकार म्हणून दाखवली. गावातील राजकारणात ते सक्रिय होते, पण राजकारण करताना त्यांचा हेतू स्पष्ट होता. गोरगरिबांच्या भल्यासाठी त्यांना सत्ता हवी होती. गावातील आणि परिसरातील शेतकरी, कामकरी, आदिवासी यांच्या अडीअडचणीला उभे राहणारे नानासाहेब एक सरळमार्गी राजकारणी. स्वातंत्र्यसैनिक म्हणून शासनाकडून मिळणारे प्रमाणपत्र, निवृत्तिवेतन किंवा अन्य कोणतेही लाभ त्यांनी मिळवले नव्हते. त्यामुळेच भ्रष्ट नेत्यांना, बाबामहाराजासारख्या तथाकथित समाजसुधारकांना नानासाहेब डोळ्यात खूपत. नानासाहेबांना एकटं पाडण्याचे, त्यांचा अपमान करण्याचे प्रयत्न गावातील नेते मंडळी करीत. अगदी नानासाहेबांच्या पत्नीला- मंजुळाला त्यांच्या विरुद्ध निवडणुकीला उभे करण्याचा डावही गावातील विरोधी पक्षांनी टाकला होता. नानासाहेबांना घरूनही भावनिक आधार मिळू नये हा त्यामागचा हेतू होता. नानासाहेबांचा मुलगा म्हणून त्यांच्या थोरल्या मुलाला सुधाकरला जेव्हा आय.टी. आय.मध्ये प्रवेश नाकारला गेला; तेव्हा सुधाकर नानासाहेबांना दोष देऊ लागतो आणि नानासाहेब दुखावले जातात. पुढे सुधाकरला मामाच्या गावी जाऊन तिथून आय.टी.आय.चा अर्ज भरावा लागला. तिथे तो आपल्याला वडीलच नाहीत असे सांगून प्रवेश मिळवतो. नानासाहेबांची मुलगी देवकी शिक्षिका होऊ इच्छित होती. बी.एड.साठी नानासाहेब आग्रही होते. परंतु बी.एड न करता तिला गावातील शाळेत नोकरी म्ळिविण्याचा बेत नानासाहेब हाणून पाडतात. नानासाहेबांच्या धाकट्या मुलात म्हणजे भालचंद्रमध्ये नानासाहेबांचे नेतृत्वगुण, लढाऊ बाणा तसेच नैतिकतेच्या मार्गाने जाणं, सचोटीने काम करत राहणे असे गुण आहेत. अनेक अडचणींवर मात करून तो नानासाहेबांचे ‘सत्य परेशान होता है हारता नही’ हे ब्रीदवाक्य मनाशी पक्कं करून भालचंद्र व्यवसाय सुरू करतो. भालचंद्र अनेक अडचणींवर कशी मात केली त्याची हकिकती हा ‘ब्लाइंड फ्रीडम’ या कादंबरीच्या कथानकातील थरारक भाग आहे. भालचंद्रच्या भ्रष्टाचाराविरोधात चाललेल्या संघर्षांच्या अनुषंगाने कादंबरीकार प्रसारमाध्यमांच्या लाचारीबद्दलही लिहितो. एकेकाळी स्वातंत्र्य मिळवून देण्यात ज्या वर्तमानपत्रांचा मोलाचा हातभार लागला ती वर्तमानपत्रेही आता भांडवलदारांची गुलाम होऊन स्वातंत्र्य हरवून बसली आहेत याबद्दलची खंत व्यक्त करतो. मात्र अशा विकल्या गेलेल्या व्यवस्थेतही काही पत्रकार सचोटीने काम करत आहेत हेही कादंबरीकाराने दाखवले आहे.
राजा भोयर यांची कथनशैली वाचकाला गुंतवून ठेवणारी आहे. नानासाहेब आणि भालचंद्र यांच्या व्यक्तिरेखा कादंबरीकाराने मध्यवर्ती ठेवल्या आहेत. या दोन्ही व्यक्तिरेखांचा लढाऊ बाणा, सत्यावरील त्यांची निष्ठा हे संपूर्ण कादंबरीचे प्रमुख कथासूत्र आहे. देशाचे स्वातंत्र्य आणि लोकशाही टिकवायची असेल तर प्रत्येकाला असे नीतिमान, प्रामाणिक आणि लढाऊ नागरिक व्हावे लागेल असे लेखकाला या कादंबरीतून सुचवायचे आहे. स्वातंत्र्योत्तर काळात लोकशाहीमधील सर्वच व्यवस्थांमध्ये कोणतीही सामाजिक बांधिलकी न मानणारे, केवळ पैशाचे लालची आणि अधिकारपदाचा अहंकार बाळगून मनमानी काम करणारे लोक कसे भरले गेले आणि त्यामुळे सर्वसामान्य जनता कशी त्रस्त झाली हे या कादंबरीतून लेखकाला ठळकपणे दाखवायचे आहे. परिस्थिती निराशाजनक असूनही लेखकाने सकारात्मक शेवट करून कादंबरीला वेगळी उंची दिली आहे. कादंबरीच्या मुखपृष्ठावर गोगलगायीचे चित्र आहे आणि त्याला मानवी चेहरा, पाय दाखवले आहेत. लोकशाहीतील विविध व्यवस्था वरवर गोगलगायीसारख्या संथ, शांत दिसत असल्या तरी त्यांचे पोटातील पाय मात्र लालसेने, भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत आणि ही लालची माणसे हळूहळू संपूर्ण देशातील स्वातंत्र्याची व लोकशाहीची दिशाभूल करत आहेत असे मृखपृष्ठातून सुचवायचे असावे.
‘ब्लाइंड फ्रीडम’,
राजा भोयर,
लोकवाङ्मय गृह प्रकाशन,
पाने- ३३९,
किंमत- ५०० रुपये.
gbmanjrekar@gmail.com
