मृदुला दाढे- जोशी – mrudulasjoshi@gmail.com

गीता आणि अविनाश एकमेकांमध्ये गुंतलेले असताना वास्तव मात्र त्यांना वेगळेच चटके देत असतं. गीताच्या आईवडिलांना अजिबात मान्य नसलेलं हे लग्न अगदी घाईगडबडीत, पण मजेदार पद्धतीनं मित्रमंडळी घडवून आणतात. स्वच्छ विचारांची गीता अविनाशला पटवून देते की, हा निर्णय कुठल्याही भावनेच्या आहारी जाऊन घेतलेला नाहीये. त्या क्षणी अविनाश म्हणतो, ‘शादी करोगी मुझसे? अभी.. इसी वक्त?’ अतिशय गोड क्षण असतो हा.. अंतरीची खूण पटलेली असते. त्या एका खोलीतच स्वर्ग उतरतो. त्या ‘खोली’चं- ब्रह्मचाऱ्याच्या मठीचं ‘घर’ झालेलं असतं!

Birds mumbai, Birds suffer from heat,
मुंबई : वाढत्या उष्म्याचा पक्ष्यांना त्रास, १६ दिवसांमध्ये १०० हून अधिक पक्षी व प्राणी रुग्णालयात दाखल
Loksatta kutuhal Artificial intelligence that avoids potholes
कुतूहल: खड्डे चुकवणारी कृत्रिम बुद्धिमत्ता!
Holi 2024
Holi 2024: गोऱ्यांनाही पडली होती भारतीय रंगांची भुरळ; युरोपियन पाहुण्यांनी होळीचे दस्तऐवजीकरण कसे केले?
delhi chief minister arvind kejriwal
अरविंद केजरीवाल यांच्या अटकेमुळे भाजपाचा आत्मविश्वास वाढीस?

‘ये तेरा घर ये मेरा घर,

किसी को देखना हो गर,

तो पहले आ के मांग ले,

मेरी नजर तेरी नजर,

ये घर बहोत हसीन है!’

काव्य फार ‘खोल’ नसलं तरी, चाल फार गुंतागुंतीची नसली तरी, गायकीचे कुठलेही चमत्कार नसले तरी एखादं गाणं कसं छान ‘जमून’ जातं याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे गाणं. खरंच त्या नवथर वयात हव्या त्या व्यक्तीशी लग्न झाल्यावर काय लागतं सुखी व्हायला? दोघांचं घर सुंदरच असतं. कारण मुळात दोघांचं विश्वच छान असतं. फक्त ते सौंदर्य अनुभवायला एकमेकांच्या नजरेतून ते घर बघायला हवं. आणि कुणी कशाला म्हणायला हवं? आम्हीच अभिमानानं म्हणतो की, हे घर फार सुंदर आहे! कारण तो हवेवरचा इमला नाही, तर साध्यासुध्या, पण खऱ्याखुऱ्या दगडविटांचं, आमच्या हिमतीचं, निर्धाराचं घरकुल आहे! चांदणं नसलं तरी आमच्या प्रेमाचाच प्रकाश भरपूर!

हे थोडंसं स्वप्नाळू, काहीसं भाबडं गाणं, पण फार नैसर्गिक विभ्रम दाखवणारं. ‘त्या’ काळात ना गच्चीत झोपणं खुपत, ना आवाजाच्या स्टोव्हवर चहा करणं, ना रंग उडालेल्या भिंती, ना ऐनवेळी गायब होणारं नळाचं पाणी! कारण प्रत्येक क्षण, प्रत्येक ताण आता वाटला गेलेला असतो आणि त्या वाटण्यात प्रचंड सौख्य असतं. ‘हमारे घर न आयेगी कभी खमुशी उधार की’ ही यातली सगळ्यात सुंदर ओळ. जे आहे ते ‘खरं’ आहे. उसनं अवसान ना प्रेमाचं टिकत, ना पैशांचं, ना नात्यांचं! वरचे बेगडी थर कधीच गळून पडतात. इथं सगळं खरं खरं. आपल्या या घराला खऱ्याखुऱ्या आनंदाचं उधाण आलेलं असेल. इथले रुसवेफुगवे खरे आणि इथलं समाधानही खरं. हे घर आपल्या हिमतीचं,आपल्या महत्त्वाकांक्षा फुलवणारं, आपल्या धीराला गंजू न देणारं!

‘न आरजू पे कैद है, न हौसलों पे जंग है

हमारी हौसलों का घर, हमारी हिम्मतों का घर’

जावेदजींच्या शब्दांना यात अतिशय प्रवाही नाद आहे. राहत, चाहत, हसरत, हौसला, हिंमत असे प्रासयुक्त शब्द कानाला फार सुंदर वाटतात. ती नादमय लय त्या चालीत फार सुंदर वाहत राहते. जगजीतजींचा आवाज कानाला सुखावणारा आणि सुकून देणारा आहे यात आश्चर्य नाही. पण चित्रा सिंग यांचा आवाज हा अत्यंत नैसर्गिक, टोकदार आणि कमी परिष्कृत आहे. अगदी काही ठिकाणी त्याचं गुळगुळीत नसणं जाणवतं. किंचित त्या आवाजाचे कोपरे घासतात कानाला.. तिथेच तो जिंकतो. कुठेही चित्रा सिंगजींनी कुणासारखाही आवाज काढायचा प्रयत्नही केला नाहीये, हेच त्याचं मर्म आहे. कारण या गाण्याची तीच मागणी आहे. गीता जितकी साधी, अकृत्रिम तसाच हा आवाज!

कुठल्याही दोन व्यक्तींमध्ये एक तिसरा घटक आल्याशिवाय आयुष्य पुढे जात नाही. तसा इथे तिसरा घटक म्हणजे ‘परिस्थिती’ हा आहे. इथे ‘लग्न’ हा सुखान्त नाही, तर एका संघर्षांची सुरुवात आहे. मुंबई काम देते, पैसा देते, पण त्या बदल्यात अपार किंमत वसूल करते. ती किंमत आहे संवादाची, सहवासाची, एकमेकांच्या हळव्या स्पर्शाची, आधाराची! ‘संसाराला पैसे लागतात’ या तीन शब्दांत भल्याभल्यांची फरफट होते. तिथे या दोघांचं काय? त्याची रात्रपाळी, तिची दिवसभर नोकरी. खोखो सुरू होतो. हे सगळं आजही आहेच. फक्त त्यांच्यासारख्या भिंतीवर चिठ्ठय़ा न लिहिता मोबाइलवर मेसेज पाठवणं, एवढाच फरक. नंतर त्या चिठ्ठय़ांमधला मजकूरही त्रोटक व्हावा, यातच त्यांच्यातली कुतरओढ समजते. परिस्थितीने होरपळून निघणारी गीता बघून अस्वस्थ झालेला अविनाश शेवटी तडजोडीला तयार होतो. निव्वळ धंदेवाईक असणाऱ्या सतीशबरोबर हातमिळवणी करून चटकन् खपणारी खालच्या दर्जाची पुस्तकं काढण्यात सामील होतो. मूल्यं वगैरे बासनात जातात. पैसा मिळायला लागतो. नवीन घर मिळतं. मूल होतं, पण गीता अतिशय अस्वस्थ आहे. हा पैसा अविनाशला स्वत:ची मूल्यं, तत्त्वं विकून मिळतोय, हे तिला पटत नाही. हाच का तो अविनाश ज्याच्यावर मी प्रेम केलं? कुठे गेला तो अंगार? हा लाचार अविनाश माझ्या ओळखीचाच नाही. वरकरणी खोटे मुखवटे चढवून आपल्या तत्त्वांना मुरड घालत दांभिक आयुष्य जगणं गीताला मान्य नाही. पण अविनाशसुद्धा अंतर्मनात स्वत:च्या सदसद्विवेकबुद्धीशी झगडतच असतो. तडजोड करताना होणाऱ्या यातना केवळ गीतासाठी, मुलासाठी सोसत असतो. भौतिक सुख मिळवायचं तर संस्कारांचा गळा घोटावाच लागणार असा त्याचा समज आहे. त्याला एक सुंदर आयुष्य जगायचंय! हे सांगताना फारुख शेखच्या डोळ्यांत विलक्षण चमक दिसते. पण अश्लील पुस्तकं काढून पैसे मिळवताना एक पिढी वाया जाईल ही भीती गीताला आहे. ज्याच्यावर प्रेम केलं त्याचाच तिटकारा यावा असा हा क्षण.. अत्यंत व्यथित अवस्थेत घर सोडून जाण्याच्या तयारीत असताना ती गातेय..

‘क्यू जिंदगी की राह में मजबूर हो गये?

इतने हुए करीब के हम दूर हो गये!’

इथं मला पाडगांवकरांची ओळ आठवली-

‘इतुके आलो जवळ जवळ, की जवळपणाचे झाले बंधन!’ किती वेगळी भावना! एकमेकांवरच्या प्रेमाचा अतिरेक झाला तरी तो जाचकच.. ही कसली अगतिकता? मी तुला समजून घेत गेले, पण तू मात्र हरवतच चाललास कुठेतरी! मला गृहीत धरत गेलास आणि मीसुद्धा त्याच अतिप्रेमामुळे स्वत:चं मत लादायला लागले का तुझ्यावर? माझ्यावरच्या प्रेमापोटीच केलेली असलीस तरी तडजोडच ही. त्यामुळे दुरावतोयस मला तू.. आणि हे अंतर मला सहन होत नाही!

‘ऐसा नहीं के हमको कोई भी खमुशी नहीं

लेकीन ये जिंदगी तो कोई जिंदगी नहीं!

क्यूं इसके फैसले हमें मंजूर हो गये?’

का ऐकतोय आम्ही या परिस्थितीचं? का नाही बदलू शकत?

‘पाया तुम्हे तो हमको लगा तुमको खो दिया!

हम दिल पे रोये और ये दिल हम पे रो दिया..

पलकों से ख्वाब क्यूं गिरे क्यूं चूर हो गये?’

मी मनाची कींव केली.. मनानं माझी.. काय उपयोग एकदा तुला गमावल्यावर? पापण्यांमधल्या स्वप्नांचा चक्काचूर झाला.

जावेदजींचाच एक शेर आठवतोय..

‘कभी जो ख्वाब था वो पा लिया,

मगर जो खो गयी वो चीज क्या थी?..’

चित्रा सिंगचा आवाज अतिशय धारदार आणि तीव्र लागलाय. ‘मजबूर हो गये’ म्हणतानाचा कोमल धैवत आणि कोमल निषाद.. एक वेगळी हुरहुर लावतात. ‘इतने हुए करीब’ ही ओळ खाली येते आणि ‘दूर’ हा शब्द मात्र एकदम वेगळा- ‘दू’ हे अक्षर लांबवल्यामुळे त्यात अंतराचा भास देणारा आहे.. ‘हम’ हा शब्द ‘सा’वर आहे आणि ‘दूर’ हा कोमल निषाद.. सा ते नी हे अंतर खरोखरच दुरावा दाखवणारं.. पण एक नक्की, की जावेद अख्तरजींच्या काव्यावर ही चाल कुठेही वर्चस्व गाजवत नाही. किंबहुना, तिचा साधेपणा त्या शब्दांना जास्त खुलवतो. कुलदीप सिंग यांच्या संगीत देण्याच्या शैलीत एक सहजता आहे. ती अशावेळी कथेला पूरक ठरते. कारण त्या चालींना काहीही सिद्ध करायचं नसतं, त्यात पवित्रा नसतो, आविर्भाव नसतो.

यातला संघर्ष आजच्या घडीला काहीसा भाबडा वाटू शकेल, पण त्यातलं मर्म कालातीत आहे. भावनांशी प्रामाणिक राहण्यातली असोशी आजही तितकीच हवीहवीशी वाटते. घर सोडून जाणाऱ्या गीताला अविनाश थांबवतो. तत्त्वांशी तडजोड न करण्याचं वचन देतो. गीताच्या मनात खोल असलेलं प्रेम डोळ्यांतून वाहायला लागतं.. आणि अविनाशच्या डोळ्यांतली ‘तीच’ निरागस ओढ आणि चमक पुन्हा तरारून उठते आणि ‘त्या’ निसटू पाहणाऱ्या क्षणांना दोघे पुन्हा कवेत घेतात. अविनाशच्या विझू पाहणाऱ्या निखाऱ्यावर गीता फुंकर मारते. त्यांच्या भावविश्वात स्थान होतं ते अन्यायाविरुद्ध भांडण्याच्या धुंदीला, त्या ‘जुनून’ला.. ते सोपं नसतंच. कारण जळता निखारा हाती धरण्यासारखंच असतं ते. गीताचं प्रेम लाडावून ठेवणारं नाही, तर काहीसं दाहक, टोकदार! स्वत:च्या धगधगीत निष्ठांशी प्रामाणिक राहायला सांगणारी गीता योग्य, की कुटुंबासाठी तत्त्वांना मुरड घालून जगणारा अविनाश योग्य? कोण जिंकतं? तर दोघांचं प्रेम जिंकतं.. त्या मिठीत सगळं सगळं विरघळून जातं. कढत अश्रू काजळी धुऊन काढतात.

(उत्तरार्ध)