scorecardresearch

पुस्तक परीक्षण : नानाविध विषयांचा कॅलिडोस्कोप

वेगवेगळ्या साहित्यकृतींमधील असे प्रसंग नेमकेपणाने वेचून शिंत्रे यांनी हा लेख लिहिला आहे

पुस्तक परीक्षण : नानाविध विषयांचा कॅलिडोस्कोप

माधुरी तळवलकर panchami6300@gmail.com

संतोष शिंत्रे यांचे ‘बायोस्कोप’ हे पुस्तक म्हणजे काळाच्या विशाल बायोस्कोपमध्ये डोकावल्यावर निरनिराळ्या क्षेत्रांतील ज्या गोष्टी त्यांना आवडल्या, ज्यांचं विशेष आकलन झालं, त्याबद्दल समरसून लिहिलेल्या लेखांचा हा संग्रह आहे. काही व्यक्तिरेखा, तंत्रज्ञान, पर्यावरण, तसेच ऐतिहासिक व वाङ्मयीन विषयांवरील काही लेख असा एकूण ऐवज या पुस्तकात आहे.

अमिताभ बच्चन यांच्या व्यक्तिमत्त्वातील बलस्थानं लेखकानं ‘अमिताभ आख्यान’ या लेखात नेमकेपणानं उलगडून दाखवली आहेत. त्याच्या काव्यवाचनाची संतोष शिंत्रे यांनी आवर्जून दखल घेतली आहे. त्यातली शब्दफेक इतकी प्रभावी आहे, की आयुष्यात जर कुणाला काव्यवाचन करायचं असेल तर त्याने आधी अमिताभचं काव्यवाचन ऐकावं आणि मग कार्यक्रम करावा असं ते म्हणतात. बेबस दुनियेत असंतोषाची स्वप्नं विकणाऱ्या या जादूगाराचं यथातथ्य व्यक्तिमत्त्व या लेखातून आपल्यापुढे साकारतं.

खरं तर प्रतिभावंत, बुद्धिमान माणसांना तितक्याच तोलामोलाचं कोणी मिळणं आणि त्याच्याशी सख्य जमणं अवघड असतं. पण एडिसन आणि फोर्ड यांनी एकमेकांच्या चांगल्या गुणांना, शास्त्रीय संकल्पनांना सतत उत्तेजन देत आपली मत्री जपली. थोडीथोडकी नव्हे, तर ३५ वर्ष फुलत गेलेल्या या स्नेहबंधाची या पुस्तकातली कहाणी मोठी रोचक आहे.

‘वाङ्मयशोभा’ हे मासिक मराठी साहित्य क्षेत्रात ५५ वर्षे डौलाने प्रकाशित होत होते. म. म. केळकर यांनी हे मासिक व ‘मनोहर ग्रंथमाला’ हे प्रकाशन चालवले. जी. ए., गंगाधर गाडगीळ, स्वा. सावरकर, नारायण धारप अशा शंभराहून अधिक नामांकित लेखकांनी या मासिकातून व प्रकाशनामधून आपली हजेरी लावली. प्रतिभावान व विद्वान अशा कितीतरी लेखकांचे वैचारिक साहित्य फायदा-तोटय़ाचा विचार न करता केळकर यांनी प्रकाशित केले. लेखात दिलेले या लेखकांचे विषय व त्यांची नावे वाचून आपण अचंबित होतो.

‘वीरप्पन विरुद्ध विजयकुमार’ या पुस्तकात विजयकुमार यांनी वीरप्पन या गुन्हेगाराला यमसदनी पाठवताना केलेल्या कष्टांची, दाखवलेल्या बुद्धिमत्तेची आणि थंड डोक्याने, पण सजग बुद्धीने केलेल्या नियोजन आणि अंमलबजावणीची कल्पनेपेक्षाही भयंकर आणि रहस्यपटाच्याही वरताण अशी कहाणी आहे. त्यासंबंधातला लेख इतका खिळवून ठेवतो, की त्यावरून हे पुस्तक किती जबरदस्त असेल याची कल्पना येते.

पुण्याच्या डॉ. सुधीर आणि डॉ. श्यामला वनारसे यांच्या २५ वर्षांच्या व्यावसायिक प्रवासातले आणि त्या अनुषंगाने त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये झालेल्या मशागतीचे अनुभव ‘ग्यानबाची एचार्डी’ या लेखात मांडले आहेत. या पुस्तकातील महत्त्वाचे विचार, वैशिष्टय़े शिंत्रे यांनी वाचकांसाठी अधोरेखित केली आहेत.

जुलै २०१९ च्या अहवालानुसार, भारतामध्ये विविध प्रकारचे ९०३ संरक्षित प्रदेश आहेत. यासंबंधात ‘द स्टेट ऑफ वाइल्डलाइफ अँड प्रोटेक्टेड एरियाज् ऑफ महाराष्ट्र’ हा खंड पंकज सेखसरिया या तज्ज्ञ निसर्ग-अभ्यासकाने संपादित व संकलित केला आहे. या महत्त्वाच्या खंडाचा ‘महाराष्ट्रातील संरक्षित प्रदेशांचे अभ्यासू विश्लेषण’ या लेखातून परिचय होतो. ‘घाटमाथा’ या पर्यावरणविषयक कादंबरीचाही रसपूर्ण परिचय या पुस्तकात आहे.

‘स्मार्टफोन, तारतम्य आणि पर्यावरण’ या लेखातील माहिती अंतर्मुख करणारी आहे. डिजिटल दुनियेसाठी केवढी पर्यावरणीय किंमत मोजावी लागते याचा प्रत्येकानं नव्याने विचार करणं किती निकडीचं आहे हे या लेखात प्रकर्षांनं जाणवतं.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्नाटक मोहिमेला अतिशय प्रेरणादायी असे काही सामरिक, सामाजिक व राजकीय पदर आहेत. पूर्ण भारताच्या पुढच्या शतकातल्या इतिहासावर खूप मोठा परिणाम या स्वारीमुळे झालेला दिसतो. मुत्सद्दी, सेनानी व अत्यंत प्रजाहितदक्ष राज्यकर्ता म्हणून महाराजांचे अद्वितीय पलू या लेखात उजळून निघतात. ‘शिवरायांच्या कर्नाटक स्वारीचे विविधांगी महत्त्व’ व ‘कृषिकल्याण राजा’ या केवळ दोन लेखांसाठीसुद्धा ‘बायोस्कोप’ हे पुस्तक वाचायला हवे. बियाणे, पाटबंधारे, सारामुक्त जमीन अशा कितीतरी विषयांत त्यांनी किती बारकाईने लक्ष घातले होते हे या लेखांमधून, महाराजांच्या पत्रांमधून कळते आणि त्यांच्याबद्दलच्या आदरानं मन भरून येते.

आपण महाराष्ट्रीय लोकांनी फारसं लक्ष न दिलेलं असं एक ‘डेन्मार्क’ तंजावरमध्ये आहे. तरंगमबाडी येथील या डेन्मार्कचा परिचय वाचताना भारतीय लोकांची सहिष्णु मनोधारणा व आक्रमकांची क्रूर वृत्ती, त्यांचा धर्मप्रसाराचा हेतू हे सारे वाचल्यावर आत्मपरीक्षण करावेसे वाटते.

संतोष िशत्रे हे पर्यावरणाबद्दल मनापासून आस्था असलेले अभ्यासक आहेत. ललित लेखांच्या जोडीला त्यांनी मानवेतर प्रजातींच्या एकविसाव्या शतकातील भवितव्याविषयी वस्तुस्थिती मांडणारे चार लेख या पुस्तकात लिहिले आहेत. वनस्पती, कीटक व प्राणी मिळून पृथ्वीतलावर निदान सुमारे आठ दशलक्ष प्रजाती असाव्यात. यातील जमिनीवर वास्तव्य असणाऱ्या ५.९ दशलक्ष प्रजातींपैकी सुमारे पाच लाख प्रजाती पुढील काही दशकांत पृथ्वीतलावरून कायमच्या लुप्त होण्याची दाट शक्यता आहे. त्याची मुख्य कारणे म्हणजे अत्यंत अपुरे अधिवास आणि नाश पावलेल्या अधिवासांचे कोणतेही पुनरुज्जीवन न होणं. आजघडीला एक दशलक्ष प्रजाती नामशेष होण्याकडे वाटचाल करीत आहेत. विनाशाची ही गती गेल्या एक कोटी वर्षांतील सर्वात जास्त आहे. आणि रोज ती वाढतेच आहे. यामुळे मानवाचेच नुकसान होत आहे, हे या लेखांतून अनेक दाखले, उदाहरणे देऊन लेखकाने पटवून दिले आहे. या लेखांमध्ये या प्रजातींच्या संरक्षण-संवर्धनाची मूलतत्त्वे सांगितली आहेत. इतर देशांमधलीही यासंदर्भातील काही माहिती लेखकाने दिली आहे. हा विषय खरं तर फारच व्यापक आहे, पण चार छोटय़ा लेखांमधून यासंबंधीची सद्य:स्थिती व त्याचे परिणाम अतिशय प्रभावीपणे वाचकाच्या मनावर ठसवण्यात लेखक यशस्वी झाला आहे. या लेखांच्या अखेरीस ‘मनुष्यप्राणी जर पुन्हा निसर्गाशी नाळ जोडू शकला तर मानवाबरोबरच मानवेतर प्रजातींचंही भवितव्य चालू शतकात अधिक चांगलं होईल,’ असा आशावादही लेखकाने व्यक्त केला आहे.

पुस्तकाच्या अखेरीस दोन साहित्यविषयक लेख दिले आहेत. सलील वाघ यांच्या कवितेचे रसग्रहण आणि वेगळेपणाचा आस्वाद एका लेखात घेतला आहे. तर अखेरचा लेख अगदी वेगळ्याच विषयावरचा आहे.. ‘साहित्यातील मृत्युचित्रे’! अशा क्षणांचे चित्रण साहित्यामध्ये कमी आढळते. वेगवेगळ्या साहित्यकृतींमधील असे प्रसंग नेमकेपणाने वेचून शिंत्रे यांनी हा लेख लिहिला आहे. मूळ पुस्तकातील ते उतारे व त्यावरचे लेखकाचे भाष्य हृदयस्पर्शी आहे.    

‘बायोस्कोप’- संतोष शिंत्रे,

ग्रे सेल्स पब्लिकेशन्स,

पाने-१४८, किंमत- २५० रुपये               

मराठीतील सर्व लोकरंग ( Lokrang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2022 at 01:01 IST