किराणा घराण्याच्या ख्यातनाम गायिक हिराबाई बडोदेकर यांचे डॉ. शुभदा कुलकर्णी यांनी लहिलेले ‘हिराबाई बडोदेकर : गानकलेतील तारषड्ज’ हे चरित्र रोहन प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहे. त्यानिमित्ताने या पुस्तकातील एका प्रकरणातील संपादित अंश..

साल १९४०-४१ असावं. हैदराबादच्या निजामाच्या मुलीचं लग्न होतं. महाराष्ट्रातील पुण्याच्या प्रसिद्ध गायिका हिराबाई बडोदेकरांची खास मैफल आयोजित केली होती. गालिचे, झुंबरं, दिव्यांच्या माळा, सुगंधी फवारे, फुलांचे गजरे, हार-तुरे, दरबारातून फिरणारी सरबतांची आणि पानाची तबकं.. असा  दरबार सजला होता. मोठमोठे सरदार, दरकदार, हैदराबादचे जाणकार आणि शौकीन, इतर ठुमरी, दादरा, गजल -गायिका-गायकही उपस्थित होते. जवळच्या संस्थानातले सरदार, दरकदार, इतर काही निमंत्रित, हैदराबादमधील निवडक प्रतिष्ठित माणसंही हजर होती. सगळा तामझाम निझामाच्या इतमामाला साजेसाच होता. 

Skin care tips jaggery face pack helpful to glowing your skin
चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागल्या? गुळाचा करा खास वापर; त्वचा दिसेल तरुण- चमकदार
What Is Sugar Made Of Milk Honey Table Sugar
साखर हे पांढरं विष? दूध, मध, साध्या साखरेत नेमकं असतं काय? १० दिवस साखर खाल्ली नाही तर कसं बदलेल शरीर?
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…
Eating walnuts on an empty stomach in the morning
अक्रोड खाताना ‘ही’ योग्य वेळ, पद्धत व प्रमाण पाळल्यास मेंदू होईल तल्लख; तुमच्या शरीरात काय बदलेल?

निजामाची आज्ञा होताच हिराबाई आणि साथीदार दरबारात आले. तबलानवाज शमसुद्दीन, हार्मोनिअमवादक राजाभाऊ कोसके आणि सारंगीवादक बाबूराव कुमठेकर. हिराबाईंनी अदबीनं बसून तानपुरे जुळवायला घेतले. आधी जुळवले होतेच, पण महालातून दरबारात येण्याच्या काळातही कदाचित थोडे बिनसू शकतात याची जाणीव असल्यानं, पुन्हा मन लावून त्या तानपुरे जुळवू लागल्या. ‘सूर गया तो सिर गया, ताल गया तो बाल’ ही प्रतिज्ञाच होती ना त्यांच्या किराणा घराण्याची! याचा अर्थ तालाकडे दुर्लक्ष असा मुळीच नव्हता. पण स्वरप्रधानता प्रमुख! अब्बूजींचं गाणं ऐकल्यावर कळतंच की, लयीशी झटापट न करता तालाचा-लयीचा ते किती बारकाईनं, नैसर्गिक सहजतेनं आणि  स्वाभाविक विचार करीत असत.

तर तानपुरे जुळून आल्यावर, निजामाच्या दरबारात हिराबाईंचा शांत, धीम्या आलापीत पूरियाधनाश्री सुरू झाला. ‘पार कर अरज सुनो’ या झपतालातल्या बंदिशीची स्थायी नजाकतीनं मांडून त्या डौलानं समेवर आल्या. निजाम इकडे अस्वस्थ झाला होता. कपाळावर आठय़ांचं जाळं पसरलं. ‘ये क्या हो रहा है?’.. या खडय़ा सुरात आलेल्या अरेरावी आवाजीनं गाणं थांबलं. दरबार स्तब्ध झाला. ‘आप को खडी रह के अदा के साथ गाना होगा।’ निजामाचं फर्मान आलं. हिराबाईंनी नम्रपणे नकार दिला आणि साथीदारांना उठण्याची खूण करून त्याही उठल्या. तानपुऱ्याची साथीदार तानपुरा गवसणीत घालू लागली. हिराबाई आणि साथीदार उठून चालू लागले. मागून सेवक आले ते नजराण्याची चांदीच्या मोहोरांनी भरलेली ताटं घेऊन. त्यावर ‘‘मैंने गायनसेवा नही की, मैं ये नजराना नहीं ले सकती।’’ हिराबाईंनी शांतपणे सांगितलं. त्यावर दरबारात कुजबूज सुरू झाली. निजाम कडाडले ‘हमारे दरबार से कोई खाली हाथ नही जा सकता।’’

‘‘सेवा रुजू न करता बिदागी घेणं, हा तर सरस्वतीचा अपमान होईल!’’ हिराबाई उत्तरल्या. शमसुद्दीन समजावत होता की बाई, समझोता करो! निजामाचे प्रधानसेवकही पुन्हा हिराबाईंच्या मागे नजराणा घेऊन जाऊ लागले. काही कळायच्या आत खणकन् आवाज आला. त्या तेजस्वी पंडितेनं सेवकाच्या हातचं ताट भिरकावून दिलं होतं! लक्ष्मीनं सरस्वती विकत घेऊ पाहत होते ते लोक, हे या पंडितेला कसं सहन होणार!

इकडे दरबारात हजर असलेल्या गायिकांनी उभं राहून अदा करत गायन सुरू केलं होतं. एरवी हिराबाई कोणत्याही परिस्थितीत दुसऱ्या कलाकाराचं गाणं ऐकायला थांबल्या नाहीत असं कधीच झालं नव्हतं, मग तो कलाकार बुजुर्ग असो वा नवखा! आता मात्र त्यांचा पारा इतका चढला होता की त्या आणि सर्व साजिंदे थेट त्यांना दिलेल्या महालात परत आले. त्यांच्या तानपुरा साथीसाठी आलेली त्यांची शिष्या शारदा थोडी बिचकली होती. एरवी शांत, प्रेमळ स्वभावाच्या आपल्या गुरूचं ती एक वेगळंच रूप पाहत होती ना! अर्थातच ही सर्व मंडळी दुसऱ्याच दिवशी पुण्याला परतली.

.. तर इतक्या लवकर दौरा आटोपून मंडळी परत आली म्हणून अम्मा चकित झाल्या! लेकीचा चेहेरा आणि एकंदर नूर पाहून तिला काहीच विचारलं नाही. शारदा दूरच्या लहान गावातली. हिराबाईंकडे राहून शिकत होती. त्या काळी मुली स्वतंत्र जागा घेऊन वगैरे राहत नसत. त्यात शारदा घरची तशी श्रीमंत नव्हती. पण हिराबाई शिष्येला कधी विन्मुख पाठवायच्या नाहीत. त्यांनी शारदाला त्यांच्या बंगल्यातली वरच्या मजल्यावरच्या स्वत:च्या खोलीजवळची एक लहान खोली राहायला दिली होती. त्यांच्याकडे राहूनच गुरुकुल पद्धतीनं ती शिकायची. सुदैवानं हिराबाईंची आर्थिक स्थिती तोवर चांगली झाली होती.

रात्री जेवणखाण झाल्यावर अम्मा शारदाच्या खोलीत गेल्या. शारदानं घडलेली सर्व हकीगत त्यांना सांगितली. अम्मांना फारसं आश्चर्य वाटलं नाही. त्या सांगू लागल्या, तुझ्या गुरू पहिल्यापासूनच जिद्दी आणि स्वाभिमानी. तुझ्या गुरूचं पाळण्यातलं नाव चंपू हे तुला माहीतच असेल. चंपूचं सगळंच वेगळं गं, अगदी जन्मापासून.

२९ मे १९०५ हा दिवस. आम्ही तेव्हा मिरजेला होतो. माझी तब्येत खूपच बिघडली होती. अंगात ताप होता. अशक्तपणा आला होता. बाळंतपणाच्या कळाही सोसवत नव्हत्या. मी अपुऱ्या दिवसाचीच बाळंत झाले. पोरगी अगदी कृश, लहानखुरी, जेमतेम तीन पौंडांची होती. जन्मली तेव्हा गेलीच म्हणून कोपऱ्यात गुंडाळून ठेवली होती पोर. थोडय़ा वेळानं मिरजेचे प्रसिद्ध डॉक्टर भडभडे आले. बाळ गेलं असं समजल्यावर एकदा पाहू म्हणाले आणि दुपटं उलगडून तपासलं तर त्यांना थोडीशी धुगधुगी वाटली जिवात. पाहिलं तर पोरगी जिवंत होती. डॉक्टरांनी तिला माझ्याजवळ आणून ठेवली. ते मला तपासत असतानाच पोर सुरात रडली. मग मुंबईहून आम्ही पुण्यात आलो. चंपू- छोटूला मी हुजूरपागेत घातलं होतं. मला शिकवून डॉक्टर करायचं होतं ना चंपूला! शाळेत ती हुशार विद्यार्थिनी म्हणूनच नावाजली होती, पण हिला सुरांचं वेड होतं लहानपणापासूनच. मिरजेला असताना तिचे अब्बूजी सकाळी रियाज करायचे, कधी राग भैरव, कधी रामकली, कधी तोडी, असा रियाज असायचा त्यांचा. त्यांच्या सुराचं काय सांगू तुला, तू आता चंपूकडेच शिकतेयस म्हणून सांगते. भैरवचा कोमल ऋषभ असा लागायचा की सगळी आर्तता प्रकट व्हायची त्यातून, आणि तो शुद्ध गंधार, नुकत्याच उगवणाऱ्या सूर्यकिरणासारखा, पण भक्कन् दिवा पेटतो तसा नव्हे, तर पूर्वेकडून सूर्य हळूहळू वर येतानाच्या किरणांसारखा! चंपू तेव्हा लहान होती, ५-६ वर्षांची, पण त्या सुरांनी जागी होताच, डोळे चोळत धावत जायची अब्बूजींच्या खोलीत. त्यांच्या सुरात सूर मिळवून षड्ज लावायची. स्वर कोणता वगैरे कळण्याचं वय नव्हतं तिचं अर्थात. पण अब्बूजींची गायनाची पट्टी वरची असल्यानं तिचा षड्ज लागायचा तरी. तेव्हा शिशूशाळेतच होती. शाळेत जाण्यासाठी आवरायला मी हाक द्यायचे, पण तो सर्व रियाज ऐकल्याशिवाय ही मुळी बाहेर यायची नाही.

 अगं, मी मुंबई, पुण्यात आले तेव्हा माझ्या पदरी पाच मुलं; आणि गाण्याशिवाय तसं हातात काही नाही. बरं त्या काळात गाण्याला पांढरपेशा समाजात मान नाहीच. चंपूलाही शाळेत वडील कोण, कुठे असतात या विषयावरून बरंच छेडलं जाई. आई गाणं-बजावणं करते यावरून एकदा बाईंनी विचारलं, ‘‘या वेळची फी नाही आली? परवडत नाही का? नुसत्या गाण्यावर काय भागणार इतक्या भावंडांचं? का आणखी काही व्यवसाय आहे आईचा? नादारी घ्यायची मग!’’ असं काहीबाही विचारलं जायचं. यातली खोच कळण्याचं चंपूचं वयही नव्हतं. पण फार चांगलं बोलत नाहीत आईबद्दल एवढं मात्र कळत होतं. ती चिडली नाही की रागावली नाही. मला  न विचारताच ‘नादारी घेणार नाही,’ असं मात्र तिनं ठामपणे सांगून टाकलं. 

शाळेच्या वाटेवरच्या एका देवळाबाहेर चंपूची पावलं एक दिवस थबकली! काय सुंदर, आर्त भजन गात होता एक भिकारी. त्याच्या आवाजानं अंगावर काटा आला तिच्या. ते भजन तिच्या कानावर पडलेलं होतं. अब्बूजींचे आर्त सूर तर हृदयात आणि कंठात होतेच. ती नकळत देवळात गेली आणि  अजानची एक आर्त पुकार घेऊन तिनं अम्मा शिकवायची ती गणपती-स्तवनाची बंदिश सुरू केली. ‘उठी प्रभात सुमिर लेन’.. सर्व भक्तगण स्तब्ध उभे राहिले. चंपूची बंदिश संपल्यावर एक पगडीधारी गृहस्थ तिच्याजवळ येऊन म्हणाले, ‘‘काय नाव पोरी तुझं? या मंदिरात रोज भजन गाशील? तुला बक्षीस म्हणून बिदागी देईन.’’ ते मंदिराचे विश्वस्त होते- पराडकरबुवा. चंपूला खूप आनंद झाला. गायला मिळेल आणि शाळेतपण नादारी नको. तिनं तत्काळ होकार दिला- पुन्हा एकदा मला न विचारताच. मी थोडीशी रागावले, पण पोरीची जिद्द पाहून सुखावलेही. तिची ही जिद्द आणि स्वाभिमान, विजिगीषू वृत्ती, ती मोठी झाली तरीही तशीच आहे. बरं, चल, आता रात्र बरीच झालीय, चंद्रकिरणं खोलीत आली आहेत. तू झोप आता.’’ शारदा हो म्हणाली. पण तिला शेजारच्या खोलीतून दुर्गा रागाचे आलाप ऐकू येत होते. ती पाऊल न वाजवता हलकेच खोलीत जाऊन बसली. खिडकीतून येणाऱ्या चांदण्याच्या शीतल प्रकाशात तिच्या गुरू रात्रीचा राग दुर्गा आळवत होत्या. त्यांचं लक्ष गेलं नाही. तानपुरा घेऊन, डोळे मिटून ‘लादले लदाले’ बंदिश त्या गात होत्या. त्यांची झपतालातली ‘सखी मोरी’ तिनं ऐकली आणि शिकलीही होती. हे एक दुर्गाचं वेगळंच रूप होतं. तो होता दुर्गा-केदार. नव्यानं शिकल्या होत्या बहुतेक हिराबाई. शारदाला नवल वाटायचं की, इतकी प्रसिद्धी, मैफली मिळूनही त्या नवीन काही घेण्यासारखं वाटलं तर उत्साहानं शिकायच्या आणि इतर मोठे गवई त्यांना मोकळेपणानं शिकवायचे. ही बहुतेक त्यांच्याहून लहान असणाऱ्या कुमार गंधर्वाची असावी! मधे कधीतरी हिराबाई तिला त्याविषयी सांगत होत्या. अर्थात मैफलीत त्या अशा बंदिशी शक्यतो पेश करायच्या नाहीत. त्या शिकायच्या ते गळय़ाच्या आणि बुद्धीच्या तयारीसाठी. दुर्गामधला तराणा गाऊन हिराबाईंनी तानपुरा कोपऱ्यात ठेवला आणि वळून पाहिलं तर शारदा बसलेली. ‘‘अगं, तू कधी आलीस? रात्र बरीच झालीय.’’

‘‘हो, पण गुरूचं गाणं ऐकणं हे एक शिकणंच असतं ना? आणि तुम्ही तर अजूनही किती मैफली, रेकॉर्डस् ऐकत असता. बालगंधर्व, गौहरजान, अब्दुल करीम खाँ, फैयाज खाँ, डी. व्ही. पलुस्कर, नारायणराव व्यास, केसरबाई, मोगूबाई, किशोरीताई.. नव्या-जुन्या पिढीतील सर्व घराण्याचे गायक, तुम्ही ऐकता. मग शेजारीच असणारं तुमचं गाणं मी कसं सोडणार?’’ शारदा उत्तरली. ‘‘हो शारदा, काना-मनावरचे संस्कार फार महत्त्वाचे. तो एक प्रकारचा श्रवणाभ्यास, रियाजच!’’हिराबाई म्हणाल्या. गरम दूध घेऊन दोघी मग आपापल्या खोलीत गेल्या. झोपायला कितीही उशीर झाला तरी पहाटे तानपुरे निनादू लागायचे या वास्तूत आणि रियाज सुरू व्हायचा. रात्रीची-संध्याकाळची मैफल असली तरी हा नेम कधी चुकला नाही. घरी लवकर येणारे शिष्यगणही असत. शारदा तर राहूनच शिकत होती. तिच्या कानावर अखंड गाणं पडत असे. बाकी शिष्याही आल्या की दोन-तीन तास स्वरयज्ञ चालत असे. काही संसार करून, नोकरी करून येणाऱ्या शिष्या होत्या. त्यांची हिराबाईंना कोण काळजी! उशीर झाला तर जेवायला थांबवून घेत असत. स्वत: वाढत असत. मायेनं विचारपूस करत असत. त्यांचं काळीजही त्यांच्या शांत आणि मृदू गाण्यासारखंच होतं.