scorecardresearch

Premium

प्राथमिक शिक्षणव्यवस्थेची झाडाझडती

भारताला स्वातंत्र्य मिळण्याअगोदर म. फुल्यांनी सर्वाना प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करण्यासाठी इंग्रजांपुढे आग्रह धरला.

प्राथमिक शिक्षणव्यवस्थेची झाडाझडती

भारताला स्वातंत्र्य मिळण्याअगोदर म. फुल्यांनी सर्वाना प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करण्यासाठी इंग्रजांपुढे आग्रह धरला. पण इंग्रजांनी आणि स्वातंत्र्यानंतर भारत सरकारनेही त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले नाही. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर मात्र प्राथमिक शिक्षणाला गती मिळाली. हळूहळू वाडी-वस्त्यांवर शिक्षण पोहोचले. गोरगरिबांचा मुलगा शिक्षक होऊ लागला तसतसं शिक्षणाचं महत्त्व लक्षात येऊ लागलं. शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण होऊ लागलं. शिक्षणाची गुणवत्ता वाढू लागली तशी ती घसरूही लागली. विशेषत: नव्वदनंतर हे चित्र फारच वेगानं बदलू लागलं. या बदलत्या व्यवस्थेची झाडाझडती संजय कळमकर यांनी ‘सारांश शून्य’ या कादंबरीतून घेतली आहे.
नारायण जगदाळे या शिक्षकाच्या नजरेतून ही कादंबरी आकाराला येते. मंगळापूर नावाच्या एका छोटय़ा गावातच राहून नोकरी करताना हा अविवाहित शिक्षक गोरगरीब मुलांच्या डोळ्यांतील निरागस भाव पाहून त्यांच्या मुठीत नवी स्वप्नं देत राहतो. स्वत:ला पुन्हा पुन्हा बजावत गुणवत्तेसाठी धडपडणारा नारायण धावतपळत प्रशिक्षण गाठतो आणि तेथील वातावरण पाहून गोठून जातो. हेरंब साने या शिक्षकानं प्राथमिक शिक्षणावर आणि शिक्षकांवर केलेली आगपाखड ज्या पुस्तकातून केलेली असते ते पुस्तक जाळून त्याची होळी करतात आणि अधिवेशन संपते. आणि नारायणचा शोध सुरू होतो. गुणवत्तापूर्ण शिक्षण म्हणजे नेमके काय? त्यातील अडथळे आणि शिक्षकांची मानसिकता या कादंबरीत केला आहे.
प्राथमिक शिक्षण आणि शिक्षक हा मोठय़ा कचाटय़ात सापडलेला घटक आहे. एकीकडे गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या नावाखाली घेतली जाणारी निर्थक प्रशिक्षण शिबिरे, त्यातून वाया जाणारा शिक्षकांचा वेळ, विज्ञान शिक्षणाच्या निमित्ताने शाळेत येणारा कचरा, खिचडी योजनेतील भ्रष्टाचार आणि शाळेतील राजकारण, बांधकाम आणि त्यात रस घेणारे गावातील सरपंच व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि तत्सम पुढारी, शौचालय बांधून घेणे, शाळेची स्वच्छता ठेवणे, निवडणुकीची कामे, अहवालावर अहवाल पाठवावे लागणे, मतदारयाद्या तयार करणे अशा विविध अशैक्षणिक कामांच्या कात्रीत ही व्यवस्था शासनाने बरोबर अडकवली आहे. त्यात भर म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचे गावोगाव चालणारे राजकारण, त्यात आणखी गोंधळ निर्माण करताना दिसते. या सगळ्याची अत्यंत प्रभावी चिकित्सा या कादंबरीत केली आहे. ती करताना केवळ त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे न करता तटस्थपणे बारकावे टिपले आहेत. राजकीय मंडळी शिक्षणाकडे केवळ राजकारण म्हणूनच कसे पाहतात त्यातून अध्यक्ष, शिक्षणाधिकारी यांच्यात कसे मतभेद निर्माण होतात, प्रसंगी अध्यक्षांना अधिकारी कसे बोटावर खेळवतात याची चर्चा सविस्तरपणे आली आहे.
मंगळापूर गावची शाळा केंद्रस्थानी ठेवून शाळा ते जिल्हा परिसर आणि मंत्रालय इथपर्यंत ही कादंबरी आपला अवकाश व्यापते. अशैक्षणिक कामांनी वैतागून गेलेले गायकवाड सारखे हेडमास्तर पोषण आहारात मात्र कसा भ्रष्टाचार करतात आणि शैक्षणिकऐवजी अशैक्षणिक कामातच त्यांना कशी रुची आहे, याचे चित्रण परिणामकारकपणे आले आहे. शिक्षक संघटनेची उडालेली शकले, त्यांचे राजकारणही नोंदवताना नारायण स्वत: शिक्षक असूनही त्यामुळे मुलांकडे कोणीच लक्ष द्यायला तयार नसल्याने निरीक्षकही तो नोंदवतो. मूळ आजार, बाजार सोडून इतर गोष्टींवरच सगळीकडे चर्चा केली जाते याचा नारायणसारख्या अनेक शिक्षकांना त्रास होतो. उलट वर्ग आणि वर्गातली मुले हेच खरे आयुष्य आहे आणि तिथेच खरा आनंद मानणारे असंख्य शिक्षकही या कादंबरीत भेटतात. पण तेच शिक्षक इतर शिक्षकांची अडवणीचे वाटतात. राजू कांबळे, मधू शिंदे असे उपक्रमशील शिक्षक त्या त्या शाखेतही नको असतात. नारायण प्रयोग करायला लागला की मॅडम वैतागायला लागतात. तुमच्यामुळे आम्हालाही वर्ग सजावट करावी लागणार म्हणून ते नारायणावर वैतागतातदेखील.
एकीकडे अशैक्षणिक कामांचा वाढता रगाडा तर दुसरीकडे शिक्षक संघटना, नेतेगिरीची हौस, राजकारण्यांच्या मागे पळून आपला स्वार्थ साधू पाहणारी शिक्षकांची फळीच्या फळी उभी राहू लागली आहे. जे तरुण शिक्षक आहेत ते स्पर्धा परीक्षेच्या मागे लागलेत. स्त्री शिक्षिका घर सांभाळून नोकरी करताना वैतागून गेल्या आहेत. मुख्याध्यापक कागद नाचवून आणि हिशोब ठेवून भांबावले आहेत. सीईओ, बीडीओ, शिक्षण अधिकारी राजकारण्यांनी आणि शिक्षक संघटनांच्या त्रासांनी वैतागून गेले आहेत. कुणालाच काही नीट करता न येऊ देणे हाच एक अजेंडा जणू आजची शिक्षण व्यवस्था राबवत आहे की काय, अशी शंका ही कादंबरी वाचताना सतत येत राहते. या संपूर्ण प्रक्रियेत विद्यार्थी कुठेच दिसायला तयार नाही आणि या विद्यार्थ्यांचे कोणालाच सोयरसुतक नसल्यामुळे शिक्षकही आपल्या कर्तव्यापासून लांब चालले आहेत. आदर्श शिक्षक पुरस्कार मिळवण्यासाठी मात्र सायबरसारखा माणूस जेव्हा पाच-पन्नास हजार खर्च करतो, नाइलाजाने नारायणही त्याला मदत करतो हे पाहून आजची प्राथमिक शिक्षण व्यवस्था कोठे जाईल हा प्रश्न सतत पडत राहतो. आणि या प्रश्नाचे उत्तरही कळमकर कादंबरीच्या शेवटी देतात. सरकारी शाळा बंद पडणार किंवा त्या पद्धतशीरपणे पार पाडल्या जाणार आणि खाजगी शिक्षणाचे पेव फुटून सामान्य माणूस पुन्हा शिक्षणापासून वंचित होणार या भीतीने नारायण गर्भगळीत होतो, पण पुन्हा नव्याने बट बांधून शाळेकडे निघतो, हा आशावादही ही कादंबरी व्यक्त करते.
गेल्या पन्नास वर्षांत शाळेला शिपाई आणि क्लार्क ही व्यवस्था देऊ शकली नाही. मात्र तांदळाचा, बांधकामाचा हिशोबही मुख्याध्यापकच ठेवणार आणि शाळा तपासणीच्या आधी शाळेतले संडासही स्वत:च धुणार. ही जर आजची व्यवस्था असेल आणि शिक्षक पतसंस्था, संघटना, राजकारण, अन्य व्यवसाय आणि सांपत्तिक भरभराट यांकडे वळत असेल तर या सगळ्यांत मुलांचा काय दोष? हेरंब साने म्हणतो, ‘ठीकाय सगळे जाऊन तुमच्या मते २०० दिवस शाळेत राहता येते. तेवढय़ा दिवसात तरी तुम्ही मुलांना नीट शिकवले तरी पुरेसं आहे.’ पण असं म्हणणारा साने मात्र शिक्षकांचा शत्रू होतो. त्याचे कोणीच ऐकून घेत नाही. नुसते अहवाल आणि अहवाल. कारवाई कसलीच नाही. स्वार्थासाठी आणि कुणाला तरी अडचणीत आणण्यासाठी बदल्यांचा आणि निलंबनाचा खेळ खेळला जातो. त्याचं भांडवल करून शिक्षकही कामचुकारपणा करतात. परिणामी लाखो विद्यार्थी साध्या बेरीज-वजाबाकीत नापास होतात, हे वास्तव ही कादंबरी अधोरेखित करते.
संपूर्ण शिक्षण व्यवस्थाच राजकारणाने बरबटून निघू लागल्याचा अनुभव नारायणला अस्वस्थ करतो. पोषण आहारात लक्ष घालून नीट काम केले तर मुख्याध्यापक त्याच्याकडून ते क्लास काढून घेतात. वाचनालय काढू पाहणाऱ्या नारायणचे स्वप्न इतर शिक्षक मोडून काढतात. शाळेत ग्रंथालय असावे या जाणिवेने अस्वस्थ नारायण वाटेल तिथून पुस्तके मिळवून वाचनाची तहान भागवतो. दारात बहीण कॅन्सरने आजारी, वडील वारलेले तरीही विद्यार्थ्यांना शिकवणारा हा शिक्षक या कादंबरीचा कणा आहे. तो अस्वस्थ होतो. हतबल होतो. आपण काही बदलू शकत नाही या जाणिवेने तो आतून दुखावला जातो. परंतु तरीही बळ बांधून गुणवत्तेसाठी धडपडत राहतो.
ही कादंबरी नगरच्या परिसरात घडत असली तरी ती महाराष्ट्रात कुठेही घडू शकते. कारण निवेदनामध्ये प्रदेशाला फार महत्त्व नाही. त्यामुळे यात निवेदनाला जागा खूप कमी आहे. ही कादंबरी बऱ्याच अंशी संवादातून आकारत जाते. घटना-प्रसंगही तसे फार महत्त्वाचे नाहीत. घटनांमागील वृत्ती-प्रवृत्ती संवादातून दर्शविण्यावर भर दिसतो. त्यामुळे संवाद हे या कादंबरीचे बलस्थान आहे. संवादामध्ये नगरी बोलीचा वापर आल्यामुळे ही अधिकच परिणामकारक ठरते.
प्राथमिक शिक्षणव्यवस्थेची झाडाझडती घेणारी ही अलीकडच्या काळातील महत्त्वाची कादंबरी असली आणि संपूर्ण समाजाला आणि शिक्षणव्यवस्थेला ती अंतर्मुख करायला भाग पाडत असली तरी ती वास्तवचित्रणावर अधिक भिस्त ठेवून आकारल्यामुळे व्यामिश्र बनत नाही. वास्तवाच्या खाली असणारे खोलवरचे पदर उलगडत नाहीत. एक मोठा विषय सगळ्या अंगांनी मांडण्याचा कादंबरीकाराचा अट्टहास सगळ्या प्रश्नांना स्पर्श करत जातो परंतु त्यांच्या मुळांचा शोध घेण्याकडे नकळतपणे दुर्लक्ष होत जाते. म्हणजे या अव्यवस्थेचा जसा नारायणवर परिणाम होतो तसा तो समाज पालक विद्यार्थी इतर शिक्षक यांवर काय परिणाम होतो याची चर्चा केली जात नाही. तरीही ही कादंबरी महत्त्वाची आहे, हे नाकारता येणार नाही.
‘सारांश शून्य’ – संजय कळमकर, ग्रंथाली, मुंबई, पृष्ठे – ३३०, मूल्य – ३०० रुपये.

Shinde Fadnavis Pawar
शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर, वाचा…
boy saved in dumas sea
१२ वर्षांच्या मुलाची २६ तास समुद्राशी झुंज; गणेशमूर्ती बसवायच्या लाकडी फळीचा मिळाला आधार!
stranded passengers near panvel station get immediate help after chief minister call
नवी मुंबई : ८ ते १० तास ट्रेन एकाच ठिकाणी थांबलेली, वैतागलेल्या प्रवाशाचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन, पुढे काय झालं?
ajit pawar and devendra fadnavis
“…तेव्हा अजित पवारांना ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री बनवू”, देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Book review

First published on: 04-05-2014 at 01:02 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×