डॉ. सिसिलिया काव्‍‌र्हालो

आयुष्याच्या जीवघेण्या प्रवासात आपल्या संवेदनशीलतेची थरथर आणि कवितेच्या निर्मितीक्षमतेची जाणीव यांची सोबत लाभलेला कवी पुनीत मातकर! ऐन विणीच्या हंगामातच पीक झाकोळण्याच्या – कोळपण्याच्या अनुभवांनी जाणतेपणा मिळाल्याचा हवाला कवितासंग्रहाच्या मनोगतात कवीने व्यक्त केलेला आहे. सामान्यांच्या आयुष्यात अभावाचीच सुगी असल्याने आलेली उद्ध्वस्तता, भकासपणा असा समकालाचा स्वर सूचित करणारी त्यांची कविता आहे. विविध स्तरांवरील वर्धिष्णू प्रदूषितता, सपाटीकरणात भरडून निघालेले मानवी नातेसंबंध, निसर्ग – माणूस यांच्या नात्यातील हरवलेली संवेदनशीलता, भावजीवनाला आलेले निर्ढावलेपण, अशा नकारात्मकतेची ‘वीण’ वाढत चालल्याने सकारात्मकतेची माणुसकीची ‘वीण’ वृद्धिंगत व्हावी, असे कवितागत नायकाचे मागणे कवितांच्या आशयाभिव्यक्तीचा परीघ रुंदावत नेणारा आहे. मानवी प्रवृत्तीतील विनाशकारी ऋतूबदल, निसर्गचक्राच्या ऋतूबदलाने होणाऱ्या प्रभावाइतकाच घातक असल्याच्या नोंदी हा निवेदक करीत जातो. ऐन हंगामात करपलेली शेती – माती, पीक – पाणी, शेतकरी – कामकरी – कास्तकार, मळलेली – पिळलेली सारीच माणसे, ऐन विणीच्या झाकोळलेल्या हंगामात त्यांच्या कळ – झळा – पिळांसह लख्खपणे आपल्यासमोर येतात. ‘हे कोणते ऋतू आलेत’ म्हणत ‘गळून पडते झूल’ आणि ‘उत्तराचे कोवळे डोळे’, ‘असे दंश मोरपंखी’, ‘अपूर्ण कवितांच्या वहीतून’, ‘अबोल नोंदवहीवरची धूळ झटकीत’, ‘ हजारो इंगळय़ांच्या दंशातून’ अशा शीर्षकांतून विभागली गेलेली मातकरांची कविता एकाच वेळी मोरपंखी दंश आणि हजारो इंगळय़ा डसल्यासारखी भिडत राहते. हे विभाग एकमेकांत विणल्यासारखे समोर येतात, त्यामुळे या साऱ्या कविता माणुसकीच्या धाग्याने विणलेला सलग सणंग असल्याचे जाणवते. त्यात काही गाठी आणि दशा असलेल्या जागा आहेत आणि तीच खंत कवितागत निवेदकाला लपेटून राहिलेली आहे. माणूस मातीपासून माणसांपासून दुरावल्याची, झगमगाटात देखील हरवल्याची आणि व्यवस्थेच्या स्तरावर हरल्याची देखील ही खंत आहे. जी थोडी – थोडकी आशेची तिरीप आहे- ती संवेदनशीलतेची धग आणि धुगधुगी शिल्लक आहे. ती आश्वस्तताच त्यांच्या कवितेतून पाझरत राहिलेली आहे.

vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
will Andheri Subway under water this year too work of widening of Mogra drain will be done next year
‘अंधेरी सबवे’ यंदाही पाण्याखाली? मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम पुढच्या वर्षीच

समाजमाध्यमांवर भाष्य करताना कवितागत नायक म्हणतो, ‘गुदमरणाऱ्या अस्वस्थ चित्रांनी आभाळ झाकोळून गेलेलं असताना, केवळ कवितेच्या पणतीने निरभ्र आकाशात मोकळी हवा खेळू लागते.’ अशा सकारात्मकतेची तुरटी फिरविण्याची आवश्यकता कवी प्रतिपादन करतो.

अनिष्ट, अशिष्ट अशी अनेक नकारात्मक कृत्य स्वैर उधळून दिली जात असताना महत्त्वाचं असं जे संविधान, ते मात्र बासनात बांधून ठेवतो आणि फक्त भाषण करण्यावेळी बाहेर काढतो. यावर निवेदक नेमके बोट ठेवतो. एकीकडे वाढत जाणारी बथ्थडता, निबरता.. त्याचबरोबर स्पंदनशील होत जाणारी सृजनजाणीव यात आत-बाहेरचा विरोधाभास तो नेमका टिपत जातो. 

 कर्जबाजारी शेतकऱ्याचं दु:खं असं की पेढीवरून त्याचा कुठलाही जिन्नस माघारी परतलेला नसतो. त्याच्या झरणाऱ्या डोळय़ांना मृगनक्षत्र उगवल्यावर कोणताही उपाय सापडलेला नसतो. हे भयावह वास्तव मांडताना शहरातील कवी आणि गावाकडील कवी यांच्यासह कवितेतील जमीन-अस्मनाचा फरकही प्रत्ययकारकपणे मांडतो.

जाळय़ात अडकलेल्या तडफडणाऱ्या माशांसारखे अनेक प्रश्न कवितागत नायकाच्या मनात उद्भवतात. आयुष्याला भिडलेले प्रश्न आणि अश्वत्थाम्याची अनुत्तरित चिरवेदना घेऊन वावरणारा कवितागत नायक या कवितांच्या दारोदारी फिरताना दिसतो- शांतवनाचं तेल मागत! अबोल नोंदवहीवरची धूळ झटकली जाऊ नये असे त्याला वाटते; त्याची आत्ममग्नतेतील प्रत्ययकारिता येथे जाणवते. माणसांची ओळख सांगणाऱ्या साऱ्याच ओळी आपण कवितेतून गाळत चाललोयत का याचा तपास तो घेतो.

कवितेची निर्मितीप्रक्रिया ‘हजारो इंगळय़ांच्या दंशातून’ अत्यंत प्रभावीपणे मांडत जातो. त्याला शब्द पाण्यासारखे पारदर्शी दिसतात. त्यावर कोणाची नाममुद्रा नसते. त्यांच्या कवितेला, जखमा अधोरेखित कराव्याशा वाटतात. वल्र्ड ट्रेड सेंटरच्या मलब्याखाली चिंधडय़ा उडाल्याच्या, इराकमधील बॉम्बस्फोटात, इंडोनेशियाच्या त्सुनामीत बळी पडलेल्यांच्या, बोको हरामने छळलेल्या कोवळय़ा पोरी, किनाऱ्यावर उपडा पडलेला आयलान कुर्दी, अ‍ॅमेझॉनचा अग्निकल्लोळ, इथिओपिआतील भुकेचा डोंब, याबरोबरच मॅनहोलमध्ये अदृश्य झालेली, पुलाखाली समाधिस्त झालेली गळफासात सरून जाणारी, आपल्या मातीतल्या माणसांपासून पृथ्वीच्या पाठीवरील अनेकांच्या जखमांतील रक्त त्यांच्या कवितांतून शब्दात असे साकळत गेलेले दिसते.

शेती-माती, गाव शहर शेतकरी-कास्तकरांचे कर्जबाजारी जिणे आणि त्यांच्या आत्महत्या, आत-बाहेर असलेली अस्वस्थता आणि उद्विग्नता, यांची शब्दचित्रे ‘ऐण विणीच्या हंगामात’ या कवितासंग्रहात जिवंत झालेली आहेत. माणसांना झाडं लावण्याची सोय नाही; पण झाडांना माणसं लावायची सोय असती तर किती बरं झालं असतं, असं म्हणत अभावाच्या उन्हात कोणी करपून जाऊ नये म्हणून हा कवितागत नायक पसायदान मागतो. शुष्क वाळवंटात प्राणस्पर्शी मरुद्याने फुलावीत, दाणा – पाण्यासाठी कुणा पाखराची चोच झुरू नये, भुकेमुळे कुणा लेकराची माय आटू नये. पेटायचंच असेल तर पळस किंवा गुलमोहर व्हावा पृथ्वीनं सूर्याची आग पोटात घ्यावी आणि सूर्यानं पृथ्वीची दु:खं ओठात घ्यावी अन् शतकाच्या पानावर सूर्यासारखी लख्ख कविता लिहिता यावी असे हे पसायदान आहे.

‘ऐन विणीच्या हंगामात’ कविता संग्रहाचे कवी पुनीत मातकर यांच्या शब्दांत विजेची आवर्तनं आहेत आणि प्रकाशाचे शुभ्र कवडसे देखील आहेत. त्यांच्या कवितेतील काळोखाच्या अस्वस्थ नोंदी प्रकाशाची पाऊलवाट उजळवितात, छंदबद्ध आणि छंदमुक्त कविता एकाच ताकदीने मनात उतरतात आणि तेथे ठाण मांडतात. विरोध – समतोल तत्त्वांची काव्यात्मक कलाटणी मनतळ हलवून सोडतात. ऐन विणीच्या हंगामात उद्भवणाऱ्या संघर्षांमुळे मातीला कलित करण्याची क्षमता नसली तरी ‘पुनीत’ करण्याची ताकद कवीच्या शब्दांत निश्चितच आहे!

‘ऐन विणीच्या हंगामात’, – पुनीत मातकर, लोकवाङ्मय गृह प्रकाशन, पाने- १९२, किंमत- २५० रुपये.

drceciliacar@gmail.com