scorecardresearch

Premium

सशस्त्र स्वातंत्र्यलढय़ाचा ऐतिहासिक आढावा

या ग्रंथाचे जाणवण्याजोगे ठळक वैशिष्टय़ म्हणजे त्याची तब्बल पाच पानी विस्तृत अनुक्रमणिका, तिच्यामुळे पुस्तकाचा विशाल पट लक्षात येतो.

bhartiy swatantrache shamgrache kantichi vatchal book
‘भारतीय स्वातंत्र्यसंग्राम : सशस्त्र क्रांतीची वाटचाल’, – डॉ. कृ. पं. देशपांडे, स्नेहल प्रकाशन,  पाने- ४८६, किंमत- ६५० रुपये.

सशस्त्र स्वातंत्र्यलढय़ाचा ऐतिहासिक आढावा | book review bhartiy swatantrache shamgrache kantichi vatchal by k p deshpande zws 70

आनंद हर्डीकर

asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
Old Malavani Aaji Writes Letter To Son After Ganpati Visit How Konkan Gets Lonely International Day Of Older Person Emotional
गणपतीला आलेला लेक, सून, नात मुंबईत निघून गेले, आणि मी पुन्हा वेडीच ठरले!
ajit pawar
‘दादा कचऱ्याची गाडी येत नाही’, भरकार्यक्रमात महिलेची तक्रार, अजित पवारांनी दिलं मिश्किल उत्तर, म्हणाले…
Sharad Pawar on Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakhe
शिवाजी महाराजांच्या वाघनखांवरून वाद, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मला काही…”

भारताला १९४७ साली जे स्वातंत्र्य मिळाले, ते कुणामुळे आणि कोणत्या मार्गाने मिळाले, या प्रश्नाचे अहिंसावादी आणि गांधीजी केंद्रित उत्तर बऱ्याच वेळा दिले गेले आहे. त्याबद्दल विपुल ग्रंथनिर्मिती यापूर्वीही झाली आहे आणि यापुढेही होत राहील. तथापि, काँग्रेसच्या स्थापनेपूर्वीपासून आणि ती अस्तित्वात आल्यानंतरही तिला समांतर अशा पद्धतीने सशस्त्र क्रांतीचे प्रयत्नही वेळोवेळी होत राहिले, ही बाब तुलनेने कमी प्रमाणात सांगितली गेली आहे. जे थोडे-फार लेखन झाले आहे ते विशिष्ट व्यक्तींशी निगडित तरी आहे (उदा. स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग- राजगुरु- सुखदेव, नेताजी सुभाषचंद्र इ.) किंवा विशिष्ट कालखंडाशी तरी निगडित आहे (उदा. १८५७ ते १९४७). पण सशस्त्र उठाव करून ब्रिटिश सत्तेचा पाडाव करू इच्छिणाऱ्यांचा साकल्याने आढावा मात्र फारच क्वचित घेतला गेला आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. कृ. पं. देशपांडे यांनी लिहिलेला ‘भारतीय स्वातंत्र्यसंग्राम : सशस्त्र क्रांतीची वाटचाल’ हा ग्रंथ निश्चितच स्वागतार्ह मानला पाहिजे. या ग्रंथाचे जाणवण्याजोगे ठळक वैशिष्टय़ म्हणजे त्याची तब्बल पाच पानी विस्तृत अनुक्रमणिका, तिच्यामुळे पुस्तकाचा विशाल पट लक्षात येतो.

असंख्य अपरिचित घटनांचे/ व्यक्तींचे उल्लेख जिज्ञासू वाचकाचे कुतूहल जागे करतात आणि नेमकी कोणती घटना कोणत्या पृष्ठावर वाचावयास मिळू शकेल, तेसुद्धा समजते. १७५७ मधील प्लासीच्या लढाईत रॉबर्ट क्लाईव्ह यशस्वी झाला आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या वर्चस्वाचा कालखंड सुरू झाला हे आपण सर्व जाणतो. तथापि, त्या वर्चस्वाविरुद्धचे उठावही त्यानंतर अल्पावधीतच सुरू झाले, अपयशी ठरले, तरीही ते वेळोवेळी होतच राहिले आणि देशभर ठिकठिकाणी- अगदी बीड किंवा नांदेडसारख्या ठिकाणीसुद्धा होत राहिले. हे आपण सहसा ऐकलेले वा वाचलेले नसते. १८५७ च्या आधीचा हा शतकभराचा महत्त्वाचा इतिहास आवश्यक त्या सर्व बारकाव्यांनिशी मांडणारे या पुस्तकातील पहिलेच प्रकरण लक्ष वेधून घेते आणि मग पुढचा सारा कथाभाग वाचत राहावे असेच वाटते. सशस्त्र क्रांतीचा विस्तृत आढावा घेणारे हे पुस्तक साधार आहे. पानोपानी संदर्भ देत पुढे जाणारे आहे. कै. बाळशास्त्री हरदास यांनी १९५७ मध्ये लिहिलेला ‘सत्तावन्न ते सुभाष’ हा अशाच स्वरूपाचा ग्रंथ अभ्यासकांची जिज्ञासा पुरवण्याच्या दृष्टीने अपुरा होता. डॉ. देशपांडे यांनी ही त्रुटी आपल्या पुस्तकात ठेवलेली नाही. त्यांनी ठिकठिकाणी आधारभूत ग्रंथांची नावेच नाही, तर त्याचे पृष्ठक्रमांकही दिलेले आहेत. (अर्थात त्यांनी बहुतांश मराठी-हिंदी संदर्भ साहित्यच वापरले आहे.

इंग्रजी वा अन्य भाषांमधील संदर्भसामग्रीचा त्यांनी उपयोग केलेला नाही आणि ही या पुस्तकाची मुख्य मर्यादाही आहे, हे निश्चित) ‘एक अयशस्वी गरुडझेप’ या उपशीर्षकाखाली महर्षी विनायक रामचंद्र (अण्णासाहेब) पटवर्धन यांच्या एका कल्पक मोहिमेबद्दलची जी माहिती देशपांडे यांनी दिली आहे, तिचा आवर्जून उल्लेख करायला हवा. लोकमान्य टिळक ज्यांना गुरुस्थानी मानत, त्या महषऱ्ींनी वऱ्हाड प्रांत ब्रिटिशांच्या ताब्यातून सोडवण्यासाठी निजामाच्या दिवाणाशी- सालारजंगशी संधान बांधून प्रयत्नांची कशी शर्थ केली होती त्याचा वृत्तान्त या पुस्तकात केवळ तीन पानांत दिलेला आहे. पण तेवढय़ावरून त्या मोहिमेमागची प्रेरणा सहज स्पष्ट होऊ शकते. प्रकाशझोतात न आलेल्या अशा इतरही अनेक व्यक्तींबद्दल व घटनांबद्दल या पुस्तकात संकलित स्वरूपात भरपूर माहिती आढळते आणि आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचे श्रेय त्या समरवीरांनाही दिले गेले पाहिजे, अशी जाणीव नकळत वाचकांच्या मनात निर्माण होते. राष्ट्रीय लढय़ामध्ये वनवासी योद्धयमंचे योगदान किंवा महिलांचे योगदान स्पष्ट करणारी स्वतंत्र प्रकरणेच या पुस्तकात आहेत, तीसुद्धा मुख्य आशयाला पूरक अशीच आहेत.

प्रकरणांची आरंभपृष्ठे म्हणून या पुस्तकात जी चित्रे-छायाचित्रे वापरली आहेत, ती स्वातंत्र्य लढय़ाशी संबंधित आहेत हे जरी खरे असले, तरी त्यांची जागा मात्र काही ठिकाणी सपशेल चुकलेली आहे. उदाहरणार्थ- ‘धगधगता बंगाल’ या प्रकरणाचे शीर्षकचित्र- वंगभंगाची कर्झनची योजना आणि त्याविरुद्ध पेटलेले आंदोलन या प्रकरणाचा विषय असताना शीर्षकचित्रात तळाशी स्थलांतर करणारी माणसे दाखवली आहेत. १९०५ साली झालेल्या बंगालच्या फाळणीच्या वेळी असे स्थलांतर झालेच नव्हते. ते पुढे १९४७ च्या फाळणीच्या वेळी मात्र झाले. कारण त्या वेळी देशाचीच फाळणी केली गेली होती. अशा काही त्रुटी या ग्रंथात आहेत. पुढील आवृत्तीत त्या दुरुस्त केल्या जातील, अशी प्रकाशकांकडून अपेक्षा. मात्र आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्यलढय़ातील सशस्त्र क्रांतिकारकांच्या महत्त्वपूर्ण योगदानाची पुरती कल्पना आणून देणारे व्यापक संकलन या पुस्तकाच्या रूपात आता जिज्ञासू वाचकांना उपलब्ध झाले आहे. या पैलूवर अधिक व्यापक आणि अद्ययावत संशोधन सामावून घेणारी पुस्तके आगामी अमृतकाळात प्रकाशित होतील, परंतु या पुस्तकाने तशा मोहिमेचा शुभारंभ झाला, असे मराठी साहित्य क्षेत्रापुरते म्हणता येईल, हे निश्चित!

‘भारतीय स्वातंत्र्यसंग्राम : सशस्त्र क्रांतीची वाटचाल’, – डॉ. कृ. पं. देशपांडे, स्नेहल प्रकाशन,  पाने- ४८६, किंमत- ६५० रुपये.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Book review bhartiy swatantrache shamgrache kantichi vatchal by k p deshpande zws

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×