अनिता यलमटे
‘डोईचा पदर आला खांद्यावरी’ या छाया महाजन यांच्या कादंबरीच्या शीर्षकावरून संत जनाबाई यांच्या अभंगाची व मध्ययुगीन काळातील या संत कवयित्रीच्या विद्रोहाची आठवण झाली. साधारणत: सत्तरच्या दशकातील या कादंबरीची मुख्य नायिका ‘कोमल’ हे पात्र… सुरुवातीला कमालीचे उथळ वाटणारे, पण तिचा ‘स्त्रीत्वाचा प्रवास’ हा सोशिकतेकडून बंडखोरीकडे जाणारा दिसून येतो. नेणत्या वयात झालेल्या मोहाच्या क्षणाची आयुष्यभर ती शिक्षा भोगत असते. शहरी मध्ययुगीन कुटुंबातील जीवन, सुशिक्षित आई-वडील, आजी-आजोबाचे पुढारलेले विचार या सगळ्या गोष्टीत वाढलेली कोमल अनाहूतपणे एका चक्रव्यूहात सापडते.

तुझा निर्णय, तुझी चूक म्हणून कुटुंबानेही हात काढून घेतलेले असतात व ती अडकत जाते नको असलेल्या बंधनात. साधारणत: ७० च्या दशकातील ही कादंबरी, यात ७२च्या भयंकर दुष्काळाचेही वर्णन करते. तसेच सामाजिक परिवर्तनाचे काही अंशही दिसून येतात. भंडाऱ्यासारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी राहणारी कोमल खेड्यामध्ये जाहागीरदारांच्या घरी विवाहित होते.

जिथे बाईचे आयुष्य दावणीला बांधलेल्या गुरासारखे बनत जाते. ‘रांधा वाढा उष्टी काढा’ अशा वातावरणातील घरात इतर स्त्रियाही तिला तुच्छतेची वागणूक देतात. जाहागीरदारी रुबाब, थाटमाट, कायम चुलीवर असलेले चहाचे पातेले तसेच बैठकीत कायम असणारा माणसांचा राबता. नोकर माणसे, शेतीवाडी व्यवसाय या सगळ्या भरभराटीत कोमलची जागा स्वयंपाकघरात कायम होती. तिच्या भावना, तिची इच्छा तिचा आत्मसन्मान, तिचे सुशिक्षित असणे या गोष्टीला काडीचीही किंमत नव्हती.

वाढदिवसाला आलेले पत्र वडिलांसारख्या सासऱ्याने वाचून पाहावे व तिने विचारलेला प्रश्न ऐकून तिच्या कानफटीत द्यावे. गंमत म्हणजे सुशिक्षित व प्रेमविवाह केलेल्या नवऱ्याने शांतपणाने पाहात बसावे. या सगळ्या गोष्टी लेखिकेने जिवंत करत जहागीरदारांच्या घरातील स्त्रियांचा कोंडमारा प्रभावीपणे मांडलेला आहे. सुशिक्षित मुलगी आपल्या घरी येते, अनोळखी घर, माणसं, गाव आपले करण्याचा प्रयत्न करते. पण तिच्या वाटेला मात्र द्वेष, तिटकारा, उणीधुणी, टोमणे, करणी धरनी, इत्यादी येते.

अजून एक विशेष नोंद या ठिकाणी करावीशी वाटते, या कादंबरीतील कोमलच्या वाटेला आलेला जहागीरदाराच्या वाड्यातील सासुरवास हा केवळ पुरुषांनीच केलेला नाही तर यामध्ये सासू व जाऊ या स्त्रियाही तितकाच मोलाचा वाटा उचलतात. सासुरवास काय असतो याची प्रचीती लेखिकेने खूपच प्रभावीपणे मांडलेली आहे.

संपूर्ण कादंबरीत अजून एक अप्रत्यक्ष पात्र कादंबरीवर वावरत राहते ते म्हणजे मनवा. हे पात्र तिला एखाद्या मैत्रिणीसारखे वाट दाखवत असते. भल्या बुऱ्याची जाणीव करून देत असते. जहागीरदारांच्या घरातील पुरुषांच्या बाहेरख्यालीपणाविषयी लेखिका सांगते. या सगळ्या जहागीरदारी पुरुषांमध्ये सोज्वळ, नम्र व उच्चशिक्षित वाटणारा सुरुवातीला नायक म्हणून वाचकाच्या मनावर बिंबवला गेलेला मुकेश पुढे खलनायकाच्या भूमिकेत अलगदपणे उभा होतो, यातूनच लेखिकेच्या लेखनशैलीची प्रचीती येते.

डॉ. व्यंकट हे पात्र अलगदपणे तिच्या जीवनात येते व शेवटपर्यंत मधे मधे डोकावत राहते. हे पात्र कधी मित्राच्या भूमिकेत येते तर कधी हितचिंतक तर कधी प्रियकर… पण या नात्याने कुठल्याच मर्यादा छेदल्या नसल्याचे जाणवत राहते. डॉ. व्यंकटसारखे सोज्जळ मित्र प्रत्येक स्त्रीला भेटतीलच असेही नाही. कादंबरीच्या शेवटी कोमलचे क्रांतिकारी पाऊल, मुलीने व भावाने दिलेली खंबीर साथ यामुळे तिच्या जीवनात तिला आत्मभान येते. या कादंबरीतील स्त्रीचा विद्रोहाचा प्रवास व तिला आलेले आत्मभान या दोन्ही गोष्टी यामध्ये उत्तमपणे अधोरेखित झाल्या आहेत.

‘डोईचा पदर आला खांद्यावरी’,

डॉ. छाया महाजन, राजहंस प्रकाशन,

पाने- २०५, किंमत- २८० रुपये