scorecardresearch

Premium

नव्या वळणाच्या शहरगोष्टी..

‘गिल्ट’ ही यातली सर्वात जमलेली दीर्घकथा. कथेची रचना चित्रदर्शी, वास्तव आणि फिक्शन यांचा सुरेख मेळ असलेली आहे.

book review free fall book by author ganesh matkari in loksatta lokrang
फ्री फॉल, – गणेश मतकरी, मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, पाने- २५०, किंमत- ३०० रुपये.

शर्मिला फडके

‘फ्री फॉल’ हा गणेश मतकरीचा सहावा कथासंग्रह. गेली दहा वर्षे त्यांच्या कथा सातत्याने वाचनात आहेत. कथालेखनाचा झपाटा आणि मांडणीतली (फसवी) सहजता यामुळे त्याच्या कथांमधली काही उल्लेखनीय वैशिष्टय़े कदाचित नजरेआड झाल्याची शक्यता जमेस धरून सुरुवातीला त्यांचा थोडक्यात उल्लेख करणं गरजेचं वाटतं. ‘फ्री फॉल’मधल्या कथांमधे ही वैशिष्टय़े असल्याने ते अस्थानी ठरणार नाही.   

Fernando Botero
व्यक्तिवेध: फर्नादो बोतेरो
rasika
रसिका सुनील करणार ‘सूर नवा ध्यास नवा’च्या आगामी पर्वाचं सूत्रसंचालन, अनुभव शेअर करत म्हणाली, “पडद्यामागे सगळ्यांची…”
raj thackeray wife sharmila thackeray, sharmila thackeray spit free road campaign, udayanraje bhosle spit free road campaign
सांगवीतील विद्यार्थ्यांचे गणेशोत्सवानिमित्त ‘थुंकी मुक्त रस्ता अभियान’; शर्मिला ठाकरे, उदयनराजे भोसले, प्रसाद लाड यांचा अभियानाला पाठिंबा
a boy drew shiv parwati and ganpati bappa picture
VIDEO : कलेला तोड नाही! तरुणाने चक्क गुळापासून रेखाटलं शिव-पार्वती आणि गणपती बाप्पाचं चित्र, व्हिडीओ एकदा पाहाच

भावनिकता, प्रेम, नातेसंबंध यांच्यात अडकलेल्या मराठी कथेला गणेशने मोकळं केलं असं म्हणायला हरकत नाही. मानवी नातेसंबंध त्याच्याही कथांमधे येतात, पण ते मध्यवर्ती नसतात. मध्यवर्ती असते ती एक घटना. वैयक्तिक, कौटुंबिक, किंवा आसपासच्या सामाजिक परिघातली. तिचे धागेदोरे समकालीन वर्तमानाशी जोडलेले आणि आशय सार्वकालिक असतो. सहज घटनेचा सर्वागांनी मागोवा घेत गणेश त्याची कथा बांधत जातो. तिची रचना वाचकाला नजरबंद करणारी, बंदिस्त असते. मात्र ती सोपी नसते, अनेकदा भूलभुलैया वाटावी अशी. या रचनेत स्तर असतात, ते आडवे पसरून असतात. घटनेच्या खोलात जाण्याऐवजी आजूबाजूने, शक्य तितक्या लांबच्या परिघापर्यंत जाऊन परिणामांचा विचार करत केलेली ही रचना असते. विचारांचं, वागण्याचं विश्लेषण करणं हा त्याच्या पात्रांचा आवडता छंद. संवाद नाममात्र असल्याने कथनाचा ओघ खंडित होत नाही. कथानायक लहान वयाचा किंवा मोठा, तो रॅशनल, लॉजिकल विचारांचाच असतो. भावनिक उमाळा, शब्दांचा फापटपसारा, निसर्गदृश्यांची ललित वर्णने यांना पूर्ण फाटा असतो. मात्र शहर, वस्ती, रस्ते, इमारती, घर यांचं तपशीलवार वर्णन तो करतो. त्यातले बारकावे घटनेच्या विश्लेषणात मदत करतात. मानसिक उलथापालथ, तर्काची साखळी नेमकी कोणत्या कडीपाशी येऊन थांबणार आहे याचा अंदाज शेवटपर्यंत येत नाही.

हेही वाचा >>> विश्वोत्पत्तीची नवलकथा..

‘फ्री फॉल’ संग्रहातल्या दहाही कथांमध्ये ही सर्व वैशिष्टय़े आहेतच. शिवाय एक वेगळेपण आहे- ते म्हणजे ‘डार्कनेस’. गणेशच्या आधीच्या काही कथांमधेही गूढता होती, पण ती बरीचशी संदिग्ध होती. तर्कसंगती, वास्तवाची घट्ट पकड सुटलेली नव्हती. यात मात्र तर्कापलीकडच्या गडद विश्वात, जिथे जागृत वास्तवाचे नियम लागू होत नाहीत, त्यात त्याने प्रवेश केला आहे. याला अपरिहार्य फ्री फॉल म्हणता येईल.

अवकाशातील एखाद्या वस्तूवरचं नियंत्रण सुटलं तर तिचा जमिनीच्या दिशेने सैरावैरा पडत येण्याचा प्रवास म्हणजे फ्री फॉल. वस्तू गुरुत्वाकर्षणाच्या भौतिक नियमानुसार खाली खेचली जाते, पण ती कुठे, कशी, कधी आदळणार हे अनिश्चित असते. ‘‘या कथासंग्रहामधल्या तीन कथांमधल्या पात्रांचा प्रवास असाच अनिश्चित, तर्काचा आधार नसलेल्या गूढ तळाकडे होतो. 

‘गिल्ट’ ही यातली सर्वात जमलेली दीर्घकथा. कथेची रचना चित्रदर्शी, वास्तव आणि फिक्शन यांचा सुरेख मेळ असलेली आहे. तर्काधारित स्पष्टीकरणापलीकडची गूढता यात आहे. श्रीरंग भूतकाळातल्या आठवणीत अडकून आहे. वर्तमानावर तो त्यांचं आरोपण करू पाहतो, ज्यातून एक विखंडित अवकाश तयार होतो. श्रीरंगच्या नव्या घराची गूढ रचना, त्याबद्दलची दोघांच्या मनातली परस्परविरोधी पस्र्पेक्टिव्हज्, मित्रावरचा विश्वास आणि बायकोने पुराव्यासकट दाखवून दिलेला विरोधाभास यांचे द्वंद्व आणि त्याची भीषण परिणती आणि हतबलतेतून मनात जन्मलेली अपराधी भावना यांचं एक जबरदस्त विश्व या कथेत आहे. श्रीरंगच्या वर्णनातली अविश्वसनीयता अधोरेखित करणारे मालाड गावठाणाचे वास्तव, ‘‘चार-पाच वेगवेगळ्या मेकॅनो सेट्समधले उरलेले तुकडे कसेतरी जोडून केलेल्या मॉडेलचं आर्किटेक्चरल इक्विव्हॅलन्ट शोभेलसा रस्ता.’’ एका संथ लयीत ही कथा चढत जाते, श्रीरंगच्या विश्वात आपणही पुढे पुढे खेचले जातो. कथेत गणेशच्या वास्तव आयुष्यातल्या सिनेमाविषयक लेखनाच्या उल्लेखातून सिनेमातलं लॉजिक आणि वास्तव जगातल्या माणसांचं लॉजिक यांची सुरेख सरमिसळ आहे.

‘फ्री फॉल’ या शीर्षक कथेची सुरुवात कोणीतरी मोबाइलवर पाठवलेल्या लिफ्टच्या भीषण अपघाताची व्हिडीओ क्लिप अचानक बघण्यात आल्यामुळे झालेल्या प्रभाकरच्या मानसिक उलघालीने होते. या कथेतला बंदिस्तपणा घुसमटवणारा आहे. लिफ्टच्या अंतर्भागाचं वर्णन, कथेनं घेतलेलं अकस्मात गूढ वळण थरारक आहे. एरवी अशा घटना गणेश शक्यतो न्यूट्रलाइझ करण्याचा प्रयत्न करतो, सुपर नॅचरल अस्तित्त्वाची शक्यता असलेल्या प्रसंगांना तो लॉजिकल एक्स्प्लेनेशन देऊन टाकतो. इथेही तशी शक्यता असताना अचानक भयावह कलाटणी मिळते. 

हेही वाचा >>> शतप्रतिशत सत्य!

‘हॉन्टेड’ कथेत एक मुलगा आणि त्याचा मित्र आहेत. सोसायटीतल्या रिकाम्या फ्लॅटमधून ऐकू येणारे आवाज, भूतकाळात तिथे घडलेली भीषण घटना, नव्या भाडेकरूचे तिथे राहायला येणे, त्यातला मुलगा या दोघांच्याच वयाचा असणे हे तसे कोणत्याही भयकथेला साजेसे. पण त्या फ्लॅटमधे नेमकं काय घडत असेल याबद्दल होणारी मित्रांची स्पेक्युलेटीव चर्चा, फ्लॅटची स्प्लिट पर्सनॅलिटी, मित्राबद्दल वाटणारी काळजी कथेला वेगळ्या वळणावर नेते. रिकाम्या फ्लॅटमधून येणाऱ्या आवाजांकरिता ही मुले साऊं ड रिक्रिएशन, फॅन्टम रेकॉर्डिगसारख्या तर्कसंगत संकल्पना वापरतात आणि ते अगदीच नॉर्मल वाटतं.

‘अपरात्र’ कथेत शाश्वतची कार धारावीच्या रस्त्यावर एका सुनसान रात्री बंद पडते आणि काही अनपेक्षित घटनांची मालिका सुरू होते. शाश्वतची गोष्ट हळूहळू परिघावरच्या इतर पात्रांची बनते. धारावीत त्याला मेकॅनिक शोधायला मदत करणारा जोजफ, त्याची प्रेयसी, तिचं घरातून त्याच रात्री पळून आलेलं असणं, दुसरीकडे घरी काळजी करणारी बायको, तिचा भाऊ, त्यांचे स्वभाव, भूतकाळ यातल्या प्रत्येक तपशिलांची कडी शेवटच्या नाटय़मय क्लायमॅक्सपर्यंत एखाद्या स्टोरीबोर्ड सारखी उलगडत जाते. कथेमधला सिनेमॅटिक दृश्यानुभव वाचकाची नजर जराही ढळू देत नाही. 

‘खुर्ची’ कथेची सुरुवात ‘‘तुम्ही कदाचित माझ्या काकांचं नाव ऐकलं असेल, विश्लेष सारंग- ते कामगार चळवळीत होते.’’ अशी सहजतेनं होते. मग चाळीतली खोली, काकांची अगडबंब खुर्ची, खोलीवर असलेली बिल्डरची नजर आणि याला समांतर कथानायकाच्या वैयक्तिक आयुष्याचा पट येतो. आर्किटेक्ट वडील, लिव्ह इनमधली मैत्रीण त्यात आहे. घटनाक्रम गडद होत जातो, वर्तमानाशी जुळलेले धागेदोरे स्पष्ट होत जातात. मधेच खुर्चीच्या अनुषंगाने एक संदिग्ध गूढ वळण येतं. कथेतले तपशील गेल्या दोन दशकातल्या सामाजिक वर्तमानाशी उदा. कामगार चळवळी, पुनर्विकास, शहराचं इन्फ्रास्ट्रक्चर, उपनगरांचं बदलणं यांच्याशी जोडलेले आहेत. एरवी गणेशचा कथानायक ्रफार टोकाला जाऊन भूमिका घेणारा किंवा कृती करणारा नाही, पण इथे तो नैतिक भूमिकेतून आप्पांवर झालेल्या अन्यायाचा  सूड उगवतो, त्याच्या पद्धतीने. 

हेही वाचा >>> आदले । आत्ताचे: मोटार लाइनवाली ‘एकोणिसावी जात!’

‘आगंतुक’, ‘कबुली’ आणि ‘वारसा’ या कथांमधलं भूतकाळातल्या घटनांचा वर्तमानावर होणारा विपरीत परिणाम, त्यातून झालेला कधी सूडाचा, कधी समजुतीचा प्रवास हे समान सूत्र. ‘आगंतुक’मधे अनोळखी व्यक्ती भूतकाळातून अनपेक्षितरीत्या समोर येते, आपण सोडून कुटुंबातल्या इतर सर्वाना तिच्या अस्तित्त्वाची माहिती असते हे कळल्यावर झालेली मनाची उलघाल, वडिलांच्या अपघाताचा ताण, आगंतुकासोबत आलेले रहस्यमय भूतकाळाचे बॅगेज आहे. ‘कबुली’ कथेत भूतकाळातलं वास्तव माहीत होईपर्यंतचा प्रवास सुडाच्या दिशेने जातो. लहानपणीच्या एकाकी आयुष्यात सोबत केलेल्या आपल्या मित्राचा अपघाती मृत्यू हा घातपात असल्याचा दीर्घकाळ मनात जोपासलेल्या समजुतीमागचं नेमकं वास्तव काय हे कळण्यातले टप्पे एकाचवेळी भयकारी आणि सहानुभूतीदायक आहेत.

वाचनीयता, रंजकता आणि बौद्धिक खाद्य यांचं योग्य मिश्रण असलेल्या या कथा आहेत. प्रस्तावनेत निखिलेश चित्रे यांनी गणेशची कथा कोणत्याही ‘समीकरणात न मावणारी’ आहे असं म्हटलं आहे. ही प्रस्तावना हा एक स्वतंत्र, वाचनीय लेख आहे.

फ्री फॉल हे गणेशच्या कथालेखनातलं एक वेगळं वळण, त्याच्या कथांची पुढची वाटचाल नेमकी कशी असेल याची उत्सुकता जागवणारं आहे हे निश्चित.फ्री फॉल, – गणेश मतकरी,  मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, पाने- २५०, किंमत- ३०० रुपये.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Book review free fall book by author ganesh matkari in loksatta lokrang zws

First published on: 24-09-2023 at 01:01 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×