सुजाता राणे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ग्रामीण कथा’ हा साहित्यप्रकार मराठी साहित्यात एक सशक्त परंपरा बाळगून आहे. सीताराम सावंत यांनी ‘हरवलेल्या कथेच्या शोधात’ या कथासंग्रहातून सध्याच्या मराठी ग्रामीण कथांचे अनुभवविश्व वाचकांसमोर परिणामकारकपणे व हुबेहूबपणे उभे करून या परंपरेला यशस्वीपणे पुढे नेले आहे.

या संग्रहातील कथांमध्ये उच्चशिक्षित असूनही बेरोजगारीच्या गर्तेत सापडलेल्या युवा वर्गाचे चित्रण आहे. उत्पन्नाची योग्य साधने योग्य वेळी उपलब्ध न झाल्यामुळे आलेला ताण व त्याच्याशी दोन हात करताना या माणसांची होणारी दमछाक वाचकांनाही अस्वस्थ करते. ‘एका कैद्याच्या दैनंदिनीतील काही पानं’, ‘आमराईतील राणू’ यांसारख्या कथा आर्थिक गणिते जुळवताना नाकीनऊ आल्यामुळे मानसिक संतुलन ढासळणाऱ्या नायकांची शोकांतिका उभी करतात. या कथा ग्रामीण जीवनात जेसीबी, ट्रॅक्टर, बोअरवेल इत्यादी यंत्रांच्या आगमनाने पर्यावरणावर आणि निसर्गावर अतिक्रमण कसे होत आहे, कर्जबाजारी शेतकरी, त्यांची मुले सरकारी अनास्था व असंवेदनशीलतेमुळे शोषणाच्या वेगवेगळ्या पद्धतींना कसे बळी पडत आहेत हे दाखवून देतात. बेरकी राजकारणाच्या दमनशाहीमुळे भरडल्या जाणाऱ्या सामान्य कष्टकऱ्यांची वेदनाही अधोरेखित करतात.

स्त्री-पात्रांची विविध रूपे या कथांमधून दिसून येतात. ग्रामीण जीवनातील स्त्रीचे कष्टप्रद, सततच्या आर्थिक हालाखीमुळे राब राब राबणारे जीवन यात आले आहे. ‘वस्तरा चालवणारी बाई’सारखी कथा पठडीबाज ग्रामीण व्यवस्थेतही परिस्थितीला शरण न जाता संघर्ष करणाऱ्या स्त्रीचे दर्शन घडवते. एकदा लग्न करून सासरी आल्यानंतर सीएचबी नोकरी करणाऱ्या नवऱ्याचा सहनशीलतेने संसार करणारी विवाहिता ‘गदिमांचं वर्तमान’सारख्या कथेत भेटते. ‘न सांगायची गोष्ट’मधील विधवा सुनेच्या अनुषंगाने नैतिकता-अनैतिकता, अध्यात्म यांसारख्या विषयांवर लेखक भाष्य करून जातो. ‘त्या तिघी’सारख्या कथेत हालाखीच्या आर्थिक परिस्थितीतील स्त्रियांची तगमग दिसून येते.

हेही वाचा >>> विखंड भारत, अखंड लोक

कथांच्या रचनांमध्ये लेखक सीताराम सावंत यांनी विविध प्रयोग करून या कथानकांना अधिक परिणामकारकपणे व प्रभावीपणे वाचकांपर्यंत पोहोचवले आहे. कधी निवेदकाने वाचकांशी संवाद साधून वाचकांना त्या कथानकात सहभागी करून घेतले आहे, तर कधी गावातील देवळाच्या गाभाऱ्यातील हनुमानाची मूर्ती आणि गाभाऱ्याच्या भिंतीवरील बारीकशा डोबळ्यात राहणारी पाकोळी यांसारख्या पात्रांच्या परस्परसंवादातून संपूर्ण कथा उभी केली आहे. (अल्ला त्याला सद्गती देवो). कथांच्या शीर्षकांतही ही प्रयोगशीलता दिसून येते- ती अनुभवण्यासाठी ‘रोचक गोष्टीची सुरुवात’, ‘न सांगायची गोष्ट’, ‘हरवलेल्या कथेच्या शोधात’ या कथा मुळातून वाचायला हव्यात. ‘संवाद’ हे या कथासंग्रहातील जवळपास सर्व कथांमध्ये महत्त्वाचे सूत्र आहे. अगदी महामंडळाच्या बसच्या खिडकीशी केलेला संवाद ते निवेदक पात्राने स्वत:च्या मनाशी केलेला संवाद, विविध पात्रांचे परस्परांशी होणारे संवाद या कथांमध्ये आले आहेत. लेखकाने विरोधाभास आणि उपरोध यांची धार असणारी भाषाशैली प्रभावीपणे वापरून गावातील माणसांच्या जीवनाची होणारी परवड ते सर्जनशील लोकांच्या अभिव्यक्तीची केली जाणारी गळचेपी असा विस्तृत अनुभवांचा पट यशस्वीपणे वाचकांसमोर उलगडला आहे. चित्रदर्शी वर्णने करणे, पात्रांची मनोवस्था अगदी बारकाईने व पारदर्शकपणे उभी करणे व कथेत पुढे काय होणार याची उत्कंठा वाचकांच्या मनामध्ये सतत जागती ठेवणे यांमुळे हा कथासंग्रह वाचनीय झाला आहे.

मुखपृष्ठावर मेंदूला कासवाकृती देऊन त्या मेंदूवर मानवी चेहऱ्यांची रेखाचित्रे आहेत. हे मेंदूरूपी कासव लेखन प्रक्रियेतील तुकड्या-तुकड्यांना सांधण्याची धडपड व्यक्त करते. ‘हरवलेल्या कथेच्या शोधात’ या शीर्षक कथेचे उत्तम प्रतिनिधित्व करते. पुस्तकाचे अतिशय समर्पक असे मुखपृष्ठ आहे.

एकूण या संग्रहातील कथा बदलत्या काळानुसार ग्रामीण व्यवस्थेतील माणसांचे वैयक्तिक, आर्थिक, सामाजिक जीवन कसे ढवळून निघाले आहे या अनुभवविश्वाला केंद्रस्थानी ठेवतात. या कथांमधून ग्रामीण माणसांचे, त्यांच्या स्खलनशीलतेचे, त्यांच्या समस्यांचे आणि संघर्षांचे व त्या अनुषंगाने मानवी जीवनाबद्दलच्या चिंतनाचे अतिशय ओघवत्या शैलीत दर्शन घडवतात. मराठी ग्रामीण कथांचे हे समकालीन विश्व वाचकांनी नक्कीच अनुभवावे असे आहे.

‘हरवलेल्या कथेच्या शोधात’, – सीताराम सावंत, लोकवाङ्मय गृह, पाने- १९२, किंमत- २५० रुपये.

sujatarane31may@gmail.com

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Book review haravlelya kathechya shodhat by author sitaram sawant zws
Show comments