scorecardresearch

दखल : मधुमेहींसाठी उपयुक्त पुस्तक

‘मधुमेह समजून घेताना..’  या पहिल्याच प्रकरणात मधुमेह म्हणजे नक्की काय याविषयी सविस्तर विवेचन केले आहे.

madhumeh ek god avhan book
‘मधुमेह एक गोड आव्हान’, – डॉ. सतीश नाईक, संधिकाल प्रकाशन,

भारतात मधुमेहाचे वाढते प्रमाण ही एक चिंतेची बाब आहे. मधुमेही रुग्णांमध्ये चीननंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो. भारतात मधुमेह आणि त्यामुळे होणाऱ्या आजारांमुळे मरण पावणाऱ्यांची संख्या मोठी आहे. बदलती जीवनशैली, परिणामी येणारा ताणतणाव यामुळे मधुमेहींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तरीही या आजाराबाबत जितकी जागरूकता निर्माण व्हायला हवी तितकी झालेली नाही. केवळ गोड खाल्ल्याने मधुमेह होतो असा समज समस्त भारतीयांमध्ये आहे. यामागे मधुमेहाबाबत असलेले अज्ञान हेच कारणीभूत आहे. परंतु डॉ. सतीश नाईक यांचे ‘मधुमेह एक गोड आव्हान’ हे पुस्तक मधुमेहाविषयीची परिपूर्ण माहिती देतं; इतकंच नव्हे तर मधुमेह होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी याबाबत अचूक मार्गदर्शन करतं.

‘मधुमेह समजून घेताना..’  या पहिल्याच प्रकरणात मधुमेह म्हणजे नक्की काय याविषयी सविस्तर विवेचन केले आहे. तर पुढच्या प्रकरणात मुधुमेह होण्याची कारणे सांगितली आहेत. अयोग्य आहार, व्यायामाची कमतरता, आयुष्यातले ताणतणाव अशी अनेक कारणे मधुमेह होण्यासाठी पूरक ठरतात. मधुमेहाचा आजार जडतो म्हणजे नक्की काय होतं, मधुमहाचे प्रकार, गरोदरपणा आणि मधुमेह याविषयी सांगताना गर्भारपणात मधुमेह का होतो, गर्भारपणातला मधुमेह आणि मधुमेही स्त्री गर्भार होणं यातला फरक, तसेच या परिस्थितीत आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणं किती महत्त्वाचं आहे याची सखोल माहिती देण्यात आली आहे. ‘मधुमेही स्त्री’ या प्रकरणात स्त्रियांमधले हार्मोन्स आणि मधुमेह यांचा संबंध, मासिक पाळीच्या समस्या, गर्भनिरोधक गोळय़ा आणि मधुमेह यांचा संबंध कसा आहे हे सांगितले आहे. तसेच ज्येष्ठ मंडळींमधला मधुमेह, मधुमेहींचा आहार, व्यायाम, उपचार, इन्शुलिनचा वापर यांची सविस्तर माहिती दिली आहे. मधुमेह जडलेल्या लोकांना कोणते आजार होतात याचेही विवेचन येते. या आजारांचा सामना कशापद्धतीने करावा याबाबतचं मार्गदर्शन रुग्णांना उपयुक्त ठरेल. ‘मधुमेह : एक गोड आव्हान’ या समारोपाच्या प्रकरणात सकारात्मक पद्धतीने मधुमेहावर मात करण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात, इतकंच नव्हे तर हे गोड आव्हान न घाबरता काळजी घेऊन कसं समर्थपणे पेलायचं याबाबत सकारात्मक विवेचन केले आहे.

‘मधुमेह एक गोड आव्हान’, – डॉ. सतीश नाईक, संधिकाल प्रकाशन,

पाने- २२०, किंमत- २५० रुपये.

मराठीतील सर्व लोकरंग ( Lokrang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Book review madhumeh ek god avhan book by author dr satish naik zws

ताज्या बातम्या