मध्यंतरी जून महिन्यात इंग्रजी पुस्तक परिचयाच्या ‘बुक अप’ सदरात मी ब्रिटिश पार्लमेंटमधल्या वाक्चातुर्याच्या संकलनाचा परिचय करून दिला होता. ‘अॉनरेबल इन्सल्ट्स’ आणि ‘डिसऑनरेबल इन्सल्ट्स’ ही ती पुस्तकं. भाषासौष्ठव, हजरजबाबीपणा वगैरेंच्या आधारे ब्रिटिश खासदार आपल्या राजनैतिक विरोधकाला कसं घायाळ करतात त्याचे काही मासलेवाईक दाखले त्यात आहेत. विन्स्टन चर्चिल, अॅटली ते अगदी टोनी ब्लेअर वगैरेंचे अनेक किस्से त्यात होते. राजकारण्यांचं भाषेवर जर प्रभुत्व असेल तर तिचा किती उत्तम वापर करता येतो असा तो विषय. तो मांडता मांडता आपल्याकडेही असं काही संकलन निघायला हवं, अशी अपेक्षा त्या लेखात मी व्यक्त केली होती. मुद्दा हा की महाराष्ट्राच्या विधानसभेत वा देशाच्या संसदेत इतकी अठरापगड भाषासंस्कृती आहे की असं काही संकलन तयार झालंच तर ते सर्वासाठीच निखळ आनंददायी असेल. भाषेच्या प्रवासाचा आढावाही त्यातून सहज मिळू शकेल.ही इच्छा व्यक्त करायला आणि तसं पुस्तक आकाराला यायला एकच गाठ पडली. ‘संसद आणि विधिमंडळातील विनोदी प्रसंग’ हे त्या पुस्तकाचं नाव. मुंबईतल्या अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेनं ते प्रकाशित केलं आहे. रणजित चव्हाण आणि लक्ष्मणराव लटके यांनी ते संपादित केलंय. संकलन उत्तम आहे, हे सांगायची गरजच नाही. पहिल्या भागात संसदेतल्या गमतीजमती आहेत आणि नंतर महाराष्ट्र विधानसभेतल्या. अधिक उठावदार आहे तो अर्थातच महाराष्ट्र विधानसभेचा भाग. कारण उघड आहे. त्यात भाषांतर करावं लागलेलं नाही. म्हणजे आपले आमदार, मंत्री जे काही बोलले तसंच्या तसं देता आलंय.संसदेतले किस्से अगदी पं. नेहरूंच्या काळापासूनचे आहेत. चीन युद्धाच्या वेळी अक्साई चीनमध्ये गवताचं एक पातंही उगवत नाही अशा स्वरूपाचं विधान पं. नेहरूंनी जे काही झालं, त्याचं समर्थन करताना केलं होतं. त्या वेळी लगेच खासदार महावीर यांनी प्रतिप्रश्न केला होता : मला पूर्ण टक्कल आहे आणि गेली कित्येक र्वष त्यावर एक केस उगवलेला नाही. तेव्हा म्हणून माझं डोकं मारू द्यायचं का? माजी परराष्ट्रमंत्री स्वर्णसिंग यांचा किस्साही बहारदार आहे. भारत-रशिया संबंधावर बोलताना त्यांनी अटलबिहारी वाजपेयी यांनी केलेल्या टीकेचा उल्लेख केला. त्या टीकेचा त्यांना प्रतिवाद करायचा होता. तर मध्येच खासदार फ्रँक अँथनी म्हणाले.. त्यापेक्षा वाजपेयींच्या मेंदूची तुम्ही साफसफाई का नाही करत? यावर ते काही बोलायच्या आत पिलु मोदी म्हणाले, स्वर्णसिंग यांना मेंदू कुठे असतो ते माहीत नाही. यावर स्वर्णसिंग भडकले. कारण या विनोदाला त्यांच्या सरदारीपणाचा फेटा होता. त्यामुळे ते घुश्शातच मोदींना उत्तर द्यायला गेले, म्हणाले.. मोदी यांचं बरोबर आहे.. कारण त्यांचा मेंदू गुडघ्यात आहे. हे ऐकल्यावर हजरजबाबीपणासाठी विख्यात असलेल्या मोदी यांनी क्षणही दवडला नाही.. ते म्हणाले : बघा मी म्हणतो ते किती बरोबर आहे.. स्वर्णसिंग यांना मेंदू कुठे असतो ते खरोखरच माहीत नाही.यावर स्वर्णसिंग यांचं काय झालं असेल, याची कल्पना करता येईल.एकदा मोहन धारिया लोकसंख्यावाढीबाबत चिंताग्रस्त भाषण करत होते. त्यांचं म्हणणं होतं, दिवसाला ५५ हजार पोरं आपल्याकडे जन्माला येतात. हे सांगण्याच्या ओघात ते म्हणाले, आता मी १० मिनिटे बोललोय तर या वेळात सुमारे ९०० बालकं जन्माला आली असतील. त्यावर खासदार ए. डी. मणी म्हणाले.. या सभागृहात नाहीत, तर चित्ता बसू म्हणाले.. मी यास जबाबदार नाही. बसू अविवाहित होते. तेव्हा त्यांचं ऐकून धारिया म्हणाले.. केवळ अविवाहित आहेत म्हणून संख्यावाढीस ते जबाबदार नाहीत असं म्हणता येणार नाही.मधु दंडवते, पिलु मोदी, अटलबिहारी वाजपेयी, भूपेश गुप्ता, मधु लिमये यांचे अनेक बहारदार किस्से यात सापडतात. पण खरी धमाल आहे ती राज्याच्या विधानसभेतली.कोकणात जाणाऱ्या रातराणी बसगाडय़ांना फार अपघात होतात, हा चर्चेचा मुद्दा होता. त्यावर एक अविवाहित आमदार म्हणाला, ‘या रातराण्या काही फारशा चांगल्या नाहीत.. आता रातदासी सेवा सुरू करा.’ त्यावर सभापती शेषराव वानखेडे म्हणाले, ‘राणी काय, दासी काय.. ज्यांचा कोणताही उपयोग सन्माननीय सदस्यांना माहीत नाही, त्यांनी या फंदात का पडावे?’आजच्या काळात हा विनोद भलताच अंगाशी आला असता. पण तेव्हा खपून गेला.संजय गांधी उद्यानातल्या सिंह, सिंहिणी आणि बछडय़ांवरील प्रश्नात एका आमदाराने त्यांची नावं विचारली.. मंत्र्यांनी ती सांगितली. त्यातल्या एका सिंहिणीचं नाव होतं मधुबाला. ते ऐकल्यावर प्रमोद नवलकर यांनी विचारलं, मधुबाला सिंहीण कशी ओळखायची? सभापतींचं उत्तर होतं.. ते सिंह बघून घेतील, तुम्ही कशाला काळजी करता.एकदा एका मुद्दय़ावर अनेकांना बोलायचं होतं. चर्चा लांबत गेली. तर सभापती वानखेडेंनी आदेश दिला, आता मी फक्त एक पुरुष आमदार आणि एक स्त्री आमदार अशा दोघांनाच प्रत्येकी दहा मिनिटं देणार. पण या दोघांची भाषणं झाल्यावरही एक आमदार उठला, तेव्हा त्याच्याकडे पाहून वानखेडे म्हणाले : एक पुरुष झाला, एक स्त्री झाली.. तुम्ही कोण?तेव्हा तो आमदार घाबरून खाली बसला.हा सगळाच ऐवज वाचनीय आहे. त्याचबरोबर काही त्रुटींचा उल्लेख करावयास हवा. एक म्हणजे घटना कालानुक्रमे नाहीत. म्हणजे दूरसंचारमंत्री सुखराम वगैरे नंतर मध्येच पिलु मोदी, मधु दंडवते वगैरेंचे किस्से आहेत. पं. नेहरूही मध्येच येतात. यामुळे मोठा रसभंग होतो. महाराष्ट्रासंदर्भातील एक उणीव अधिक गंभीर आहे. ती म्हणजे बऱ्याच किश्शात एक आमदार, एक मंत्री असे उल्लेख आहेत. त्यांची नावे नकोत? काही ठिकाणी सभाध्यक्षांची नावे नाहीत तर काही ठिकाणी मंत्र्यांची. महाराष्ट्र विधानसभा कामकाजाच्या नोंदीतून हा तपशील मिळवण्याचे कष्ट घ्यायला हवे होते. त्याचबरोबर या घटनांचा कालक्रम दिला असता तर पुस्तक परिपूर्ण व्हायला मदत झाली असती. भाषिक वैविध्यानेही अधिक बहार आली असती. असो.तरीही पुस्तक वाचनीय आहे. हा विधिमंडळीय विनोद आनंददायी आहे. त्या व्यवस्थेतून मिळणारा तेवढाच आनंद. तो घ्यावा. बाकी एरवी आहेच. सभात्याग वगैरे.‘संसद व विधिमंडळातील विनोदी प्रसंग’ - संपा. लक्ष्मणराव लटके, रणजित चव्हाण, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, मुंबई,पृष्ठे - १५९, मूल्य - २५० रुपये.