पोलीस‘मन’ हे पुस्तक म्हणजे निवृत्त पोलीस अधिकारी अजित देशमुख यांना आपल्या ३६ वर्षांच्या सेवाकाळात, कर्तव्यदक्षतेच्या पलीकडे दिसलेल्या आणि त्यांच्या कायम स्मरणात राहिलेल्या २२ अनुभवांचा लक्षवेधी आकृतीबंध आहे. या पुस्तकाची ताकद म्हणजे लेखकाची चित्रमय भाषाशैली आणि त्यांनी वेळोवेळी केलेलं चिंतन. आशयगर्भ चिंतनाचं एक उदाहरण म्हणजे कुर्ला येथील स्थलांतरितांच्या बकाल वस्तीमधील दुर्दैवी लोकांबद्दल ते लिहितात. ‘पोटात रोजचे चार घास कसे जातील एवढीच सतत भ्रांत असलेल्यांच्या जीवनाचा अर्थ, स्वत:ला जिवंत ठेवणे इतकाच असतो याची जाणीव झाली आणि त्यांच्यावरील रागाचे रूपांतर कणवेत कधी झाले ते मला समजलेच नाही.’ हेही वाचा >>> विखंड भारत, अखंड लोक या पुस्तकातील विविध प्रसंगांत दिसणारी गुप्तचर खात्याच्या अधिकाऱ्यांची कामाची पद्धत, कामाचा वेग, माहितीची पडताळणी करण्याची पद्धती, विदेशी भाषांवरचे त्यांचे प्रभुत्व, परदेशातील प्रांतांची बारीकसारीक माहिती, दहशतवादी संघटनांची व त्यांच्या नेत्यांची साद्यांत - तपशीलवार माहिती हे सारे वाचताना या रक्षणकर्त्यांविषयींचा आपल्या मनातील आदर शतगुणित होतो. राष्ट्रपती पदकाने सन्मानित झालेल्या एका कर्तव्यदक्ष कर्मंयोग्याने उघड केलेले हे पोलीस‘मन’ वाचकांच्या मनाचा ठाव घेते. पोलीस‘मन’, - अजित देशमुख, संवेदना प्रकाशन, पाने- २१०, किंमत- ३०० रुपये.