lr13

Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
lokrang
गीतांचा भीमसागर…: चळवळीची गाणी…
lokmanas
लोकमानस: मौनामागचे रहस्य..
Uddhav Thackrey Kundli Shine In Loksabha Elections Till 2027
“उद्धव ठाकरेंच्या पत्रिकेतच पुरावा, लोकसभेत शिवसेनेला..”, ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी

स्त्रियांच्या लेखनकर्तृत्वाचा विचार कथा, कादंबरी आणि कविता या तीन वाङ्मयप्रकारांच्या संदर्भात करणाऱ्या त्रिखंडात्मक ग्रंथापैकी ‘स्त्री-लिखित मराठी कादंबरी (१९५० ते २०१०)’  हा पहिला खंड नुकताच प्रकाशित झाला आहे. त्याचे संपादन कवयित्री अरुणा ढेरे यांनी केले आहे. यात गेल्या पाच दशकांच्या काळात मराठी कादंबरीच्या इतिहासात ज्यांनी विशेष ठसा उमटवला, अशा अकरा लेखिकांच्या कादंबऱ्यांचा अकरा अभ्यासक-समीक्षकांनी परामर्श घेतला आहे.
कादंबरी या साहित्य प्रकारात भोवतालाचा त्याच्या समग्रतेसह शोध घेण्याचा कलात्मक प्रयत्न असतो. वास्तव आणि भोवतालचे जग ही एक संस्कृतिसिद्ध संरचना असते आणि कादंबरी या वास्तवाची प्रतिकृती असते. ही संरचना कमल देसाई यांच्या १९५९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ या कादंबरीपासून ते २०१०मध्ये प्रसिद्ध झालेल्या कविता महाजन यांच्या ‘कुहू’ या कादंबरीपर्यंत कशी विकसित, परिवर्तित आणि आव्हानांना झेलणारी व छेदणारी ठरत गेली, यांचा विश्लेषक आणि अभ्यासपूर्ण आढावा या संपादनात दिसून येतो. कमल देसाई, ज्योत्स्ना देवधर, आशा बगे, निर्मला देशपांडे, गौरी देशपांडे, तारा वनारसे, रोहिणी कुलकर्णी, अंबिका सरकार, शांता गोखले, सानिया आणि कविता महाजन या तीन पिढय़ांच्या स्त्री-कादंबरीकारांचाया खंडात समावेश आहे. या अकरा स्त्री-कादंबरीकार निवडण्यामागची संपादकीय भूमिका स्पष्ट करताना अरुणा ढेरे लिहितात, ‘या लेखिकांच्या लेखनामागे जीवनशोधाचे गंभीर प्रयोजन आहे. स्त्री जीवन, कुटुंब जीवन आणि स्त्री-पुरुषसंबंध हेच बहुतांशी कंेद्रवर्ती विषय असतानाही या कादंबरीकार स्त्रिया पुरुषविरोधाचा कडवटपणा दूर ठेवून आपल्या अनुभवविश्वाच्या सूक्ष्म गुंतागुंतीचा शोध निष्ठेने घेताना दिसतात. या शोधामागची त्यांची शहाणीव त्यांच्या लेखनाला वेगळी उंची देणारी आहे.’
ही वेगळी उंची समीक्षेच्या दृष्टिकोनातून मोजण्याचे आणि त्याचे समर्पक व उचित अभ्यासपूर्ण विश्लेषण करण्याचे काम विद्युत भागवत, स्वाती कर्वे, प्रभा गणोरकर, अश्विनी धोंगडे, मंगला आठलेकर, अरुणा दुभाषी, पुष्पलता राजापुरे-तापस, सिसिलिया काव्‍‌र्हालो, शोभा नाईक, विनया खडपेकर आणि नीलिमा गुंडी यांनी केले आहे. १९६० पासून २०१० पर्यंत समग्र स्त्री कादंबरीचा प्रवास रेखा इनामदार-साने यांनी ‘आत्मशोधाच्या स्वयंप्रकाशी वाटा’ या प्रस्तावनेत अतिशय मार्मिक आणि विश्लेषक पद्धतीने घेतला आहे.
आंतरराष्ट्रीय महिला वर्षांनंतर स्त्रीवादी, स्त्रीमुक्ती साहित्याची आलेली आणि अजूनही सुरू असलेली चळवळ व १९९० नंतर नव्वदोत्तरी साहित्यातील आशय-अभिव्यक्तीची नवता हे मराठी साहित्यातील महत्त्वाचे टप्पे आहेत. स्वातंत्र्योत्तर कालखंडातील कादंबरीकार कमल देसाई यांनी दोन कठीण विषय त्यांच्या लेखनासाठी निवडले. एक म्हणजे ‘देव’, ‘धर्म’ आणि ‘एकूण विश्व’ तर दुसरे ‘लैंगिकता’ या विषयावर ‘पुरुषी दृष्टिकोना’चे वर्चस्व. अशा विषयांवर स्वतंत्र विचार मांडणारी निर्मितिक्षम लेखिका होण्याचे धाडस कमल देसाईंनी दाखवले. स्त्री-कंेद्री आणि चरित्रात्मक कादंबरी हे ज्योत्स्ना देवधर यांच्या कादंबऱ्यांचे स्वरूप होते, म्हणून ‘संक्रमण काळातील स्त्रीच्या भावविश्वाचे चित्रण करणाऱ्या कादंबऱ्या’ असे ज्योत्स्नाबाईंच्या कादंबऱ्यांचे सूत्र आहे. आशा बगे यांच्या कादंबऱ्या स्त्रीवादी साहित्याला सुरुवात झाल्यानंतर प्रकाशित झाल्या; पण तरीही त्या स्त्रीवादी लेखिका नाहीत तर ती विचारधारा बाजूला ठेवून स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वाचा वेगवेगळ्या पातळ्यांवर शोध घेतात. ‘टिकलीएवढं तळं’ या पहिल्या कादंबरीने ज्यांनी शीर्षकापासून आपलं वेगळंपण अधोरेखित केलं, त्या कादंबरीकार निर्मला देशपांडे स्त्री-पुरुष नातेसंबंधातील गुंतागुंत व्यक्त करतात.
गौरी देशपांडे यांच्या लेखनाचा काळ १९८० हा होता. ‘एकेक पान गळावया’ ते ‘उत्खनन’ या त्यांच्या लघुकादंबऱ्यांतून व्यक्तिस्वातंत्र्याचे प्रश्न प्राधान्याने येतात. स्त्री विरुद्ध पुरुष हा संघर्ष इथे नाही तर आपल्या अधिकारात असलेल्या कोणत्याही व्यक्तीने, मग ती स्त्री वा पुरुष असो, अन्य कुणाच्या स्वातंत्र्याची गळचेपी करता कामा नये हा मुद्दा लेखनाच्या कंेद्रस्थानी राहिला. तारा वनारसे, रोहिणी कुलकर्णी, अंबिका सरकार, शांता गोखले यांच्या कादंबऱ्यांतून स्त्री-कंेद्री, स्त्री-अवकाश आणि त्यांच्या परिघात घडणाऱ्या घटनांचा वेध, कधी चौकटीला धरून तर कधी चौकटीला दूर सारत घेतला गेला. कथालेखिका म्हणून नावाजलेल्या सानिया यांच्या कादंबऱ्यांची प्रकृती मनोविश्लेषणात्मक आहे. त्या कथानक असूनही कथानकप्रधान नाहीत. ‘ब्र’ या कादंबरीच्या लेखिका कविता महाजन यांनी सामाजिक क्षेत्रातील अनुभव धीटपणे मांडले आणि १९९० नंतर मराठी साहित्यात आलेले जागतिकीकरण आणि खासगीकरण यांचेही चित्रण केले.
प्रस्तुत संपादनात स्त्रियांच्या कादंबऱ्यांची समीक्षा करून त्यांचे वाङ्मयीन महत्त्व, सामाजिक दस्तऐवज म्हणून असलेले सामथ्र्य, एकंदर मराठी कादंबरीसाठी दिलेले योगदान, कादंबरीकार स्त्रियांच्या मर्यादा, पुरुष कादंबरीकारांपेक्षा असलेले निराळेपण आणि व्यक्त झालेल्या अवकाशाची सीमित व्याप्ती, विषयाचा ऊहापोह, त्यावर केलेले भाष्य आणि गेल्या साठ वर्षांत अनुक्रमे त्यात होत गेलेले बदल यांचे चित्रण आले आहे. संपादनात कोणतीही एकच एक काटेकोर समीक्षादृष्टी स्वीकारलेली नसल्याने प्रत्येक अभ्यासकाने आपापल्या परिप्रेक्ष्याने खुली-लवचिक समीक्षा केली आहे. स्त्री-पुरुषांच्या आयुष्यातील कोंडी, पालकत्वामुळे होणारी गोची, लैंगिक आक्रमणातून शरीरमनावर पडणारे चरे, शोषणाच्या नाना तऱ्हा, आरक्षणाचा प्रश्न, नोकरीतील स्त्रियांची मुस्कटदाबी इत्यादी अनेक प्रकारचे वास्तव चित्रित करण्याचे आव्हान लेखिकांनी स्वीकारावे म्हणून दिलेली दिशाही या संपादनात आहे.
 एकंदरच भारतीय भाषांमधील स्त्री कादंबरीच्या तुलनेत मराठी स्त्री कादंबरी कशी-कुठे आहे, याची अभ्यासकांना दृष्टी मिळावी ही अरुणा ढेरे यांची या मागची संपादनाची भूमिका सफल झाली आहे हे निश्चित.
‘स्त्री-लिखित मराठी कादंबरी (१९५० ते २०१०)’ – संपादन : अरुणा ढेरे, पद्मगंधा प्रकाशन, पुणे, पृष्ठे- ३२०, मूल्य- ३२० रुपये.